– आदित्य संतोष
‘धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो!’, ‘जब जब मोदी डरता है, पुलिस को आगे करता है!’, ‘इन्किलाब जिंदाबाद’, आणि ‘जय भीम’च्या नार्यांनी केवळ आसमंतच नाही तर सत्ताधार्यांचे कानही भरले गेले असताना शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा दिल्याने सीजेपीच्या देशव्यापी चळवळीला नवा अर्थ प्राप्त झाला आहे. या कोवळ्या मुलांना राजकारणातलं काय कळतं? समाजमाध्यमांवर वेळ वाया घालवणारी ही पिढी कधी रस्त्यावर उतरू शकणार आहे का? असे अनेक प्रश्न ज्यांनी तुच्छतेने आणि संशयी नजरेने विचारले त्या सर्व प्रश्नांना आजच्या जेन झी पिढीने आपण जिवंत असल्याचा आणि आपल्याला जाणीव आणि धमक असल्याचा सबळ पुरावा या आंदोलनाद्वारे दिला आहे. सत्तेने आणि व्यवस्थेने उभारलेली बॅरिकेड्स या पिढीने धुडकावून लावली आहेत. आणि अशा अनेक बॅरिकेड्सच्या पल्याड आज उभी असलेली ही पिढी या आंदोलनाकडे, सत्तेकडे, व्यवस्थेकडे आणि समाजाकडे काय नजरेने पाहते आहे याचा एक अंदाज बांधण्याचा प्रयत्न या लेखात करत आहे.
आकाशात काळे ढग दाटलेले असताना, पोलिसांच्या अगणित तुकड्या जागोजागी तैनात असताना, त्यांच्या लाठ्या खात, सतत सायरनचे आवाज आणि मुदत संपलेल्या अश्रुधुरांच्या नळकड्यांमधला विषारी गॅस डोळ्यात जळजळ करत असताना जंतर-मंतरवर आलेल्या लाखो युवांनी वेल्डिंग केलेली, इले्ट्रिरक शॉक असलेली बॅरिकेड्स सर्व शक्तीने तोडून टाकली आणि या देशाच्या संसदेकडे कूच केली, ही या आंदोलनामधली एक महत्त्वपूर्ण घटना आहे. तसेच या घटनेचे, कृतीचे आणि या दृश्याचे महत्त्व आणि त्याचे अर्थ केवळ तात्कालिक नसून त्याकडे अधिक व्यापक अर्थाने पाहण्याची गरज निर्माण होते. म्हणून जेन झी पिढीने तोडलेली ही बॅरिकेड्स केवळ पोलिसांनी उभारलेली बॅरिकेड्स नसून ती गेल्या अनेक वर्षांत इथल्या व्यवस्थेने समाजात उभारलेली बॅरिकेड्स आहेत हे विसरता कामा नये. आणि त्यामुळे सर्व प्रश्न सुटले आहेत असा भाव नाही तर आपण अशा अनेक बॅरिकेड्सना तोडून आज एकत्र आलो आहोत आणि ही लढाई इथून पुढेही लढायची आहे हाच विश्वास या क्षणी या पिढीत भरून राहिला आहे असं वाटते.
बॅरिकेड्स केवळ रस्ता अडवत नाहीत तर ती सत्तेने आणि व्यवस्थेने जाणूनबुजून एकमेकांत अंतर निर्माण करण्यासाठी उभी केलेली असतात. समाज म्हणून एकजूट न होऊ शकणे हे सत्ताधार्यांना नेहमी फायद्याचे असते याची जाणीव आता या पिढीला झाली आहे. धर्माची, जातीची, लिंगाची, भाषेची, प्रांताची आणि संस्कृतीची अनेक बॅरिकेड्स या देशात आहेत आणि त्याने सतत विद्यार्थ्यांना, शेतकर्यांना, श्रमिकांना, महिलांना, दलितांना, आदिवासींना, मुस्लिमांना आणि समाजातल्या शोषित वंचित घटकांना एकत्र येऊ दिलेलं नाही. आजची जेन झी पिढी याबाबत कमालीची जागरूक आहे असे वाटते आणि हळूहळू आमचा क्रांती मार्ग आम्हीच शोधत जाऊ असा त्यात विश्वास वाटतो.
जंतर- मंतरवर झालेलं आंदोलन हे जसे तात्कालिक दृष्टीने महत्त्वाचे आहे, तसेच त्याने चळवळीलाही आतून बाहेरून बदलून टाकले आहे. वेगवेगळ्या विचारधारा, संस्था, संघटना या शिक्षणाचे हे आंदोलन गेली अनेक वर्षे लढत असल्या तरी आज त्यांचे जन आंदोलन होणे ही चळवळीच्या दृष्टीने एक महत्त्वाची बाब आहे. तसेच आंदोलन कसे करतात, याचे काही ठोकताळे आजपर्यंत समाजात रूढ होते. त्यांनाही मोडून काढत या आंदोलनाने एक वेगळी दिशा दिली आहे. समाजमाध्यमे केवळ आयटी सेलचा प्रपोगंडा पसरवण्याचे माध्यम नाही तर तेही एक लढाईचे मैदान आहे हे या देशाच्या पंतप्रधानांनीच मान्य केले आहे.
आणि माणूस म्हणून आपण सर्व एक आहोत आणि जेव्हा गरज पडेल तेव्हा आपण सर्व एकमेकांसाठी उभे राहू ही भावना पुन्हा एकदा आज समाजात निर्माण होताना दिसते आहे, हे या आंदोलनाचे यश म्हणायला हवे.
‘जय भीम’चा नारा केवळ दलित आणि आंबेडकरवादी लोकच देतात अशी एक समजूत वजा बॅरिकेड काही प्रमाणात या समाजात असताना या आंदोलनाने दाखवून दिले आहे की ‘जय भीम’चा नारा हा शिक्षणाचा, संघर्षाचा आणि संघटित होण्याचा नारा आहे. काही लाखो लोकांच्या या आंदोलनात अनेक शहरांत दिसलेले ‘जय भीम’चे झेंडे आणि आंबेडकरांचे फोटो याचा पुरावा आहेत की या देशात आंबेडकरांचा विचार तितक्याच ताकदीने जिवंत आहे.
आंदोलनस्थळी आणि देशभरात शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याने एक आनंदाचे वातावरण असले तरी एक बॅरिकेड्सची एकच रांग आज तुटली आहे आणि आपल्यासमोर अनेक आव्हाने आता उभी आहेत, याची जाणीव या पिढीला आहे.
शिक्षण घेऊन पदवी मिळवून नोकरी मिळवणे इतकाच शिक्षणाचा संकुचित अर्थ नसून शिक्षित होणे म्हणजे नक्की काय, या प्रश्नाचा ही पिढी गांभीर्याने विचार करते आहे. पेड न्यूज आणि पेड प्रमोशन ती आता पक्की ओळखू लागली आहे. आपल्या आवाजाची, अन्यायाविरुद्ध उभी राहण्याची काय किंमत मोजावी लागते याचा आजच्या जेन झी पिढीला अनुभव आला आहे.
सत्तेसमोर आपल्या मागण्या ठेवत असताना आपण त्या अधिक सखोलपणे आणि विस्तृत स्वरूपात त्या मांडल्या पाहिजेत हेसुद्धा या आंदोलनाने त्यांना शिकवले आहे.
समाजाने ज्यांच्याकडे अपरिपक्व म्हणून पाहिले त्या युवांनी आज हे सिद्ध केले आहे की प्रत्येक पिढीला आपला आवाज कधी ना कधी सापडतो. चुका करत करत का होईना आज ना उद्या या देशाची जेन झी पिढी दुर्दम्य साहसाने आपल्या हक्कासाठी झटत राहणार आहे असा विश्वास वाटतो. समाज एकसारखा नसला तरी तो एकत्र नक्कीच येऊ शकतो हा विश्वास माझ्या पिढीने देशाला दिला आहे, याचा मला अभिमान वाटतो.
आणि म्हणूनच सत्तेने व व्यवस्थेने उभी केलेली बॅरिकेड्स मोडून पुढे जाण्याची ताकद ठेवणारी जेन झी आता बॅरिकेड्सच्या अल्याड नाही तर पल्याड उभी आहे आणि अश्रुधुराचा कितीही मारा केला तरी तिला पुढचे चित्र आता स्पष्ट दिसू लागले आहे, सत्ताधार्यांनी आता हे विसरता कामा नये.
