खुशी राजाणे
दिल्लीतील महिला सुरक्षा आंदोलनात कचोरी, समोसा, चहा, सिगारेट, बटाटा-पुरी अशा घोषणा ऐकू आल्या आणि आधी हसू आलं. या घोषणा मिश्कील आहेत, त्यामुळे हलक्याफुलक्या वाटतात. पण त्या घोषणा देणाऱ्या मुलींकडे पाहिलं, तर जाणवतं त्यांच्यासाठी हा विनोद नाही, त्यांनी आपल्या रोजच्या जगण्यातल्या असुरक्षिततेवर उपरोधाने बोट ठेवलं आहे. स्वातंत्र्याला पंचाहत्तर वर्षांहून अधिक काळ लोटला, तरी आजही “आम्ही सुरक्षित का नाही?” हा प्रश्न त्या विचारत आहेत. त्यांच्या त्या मिश्कील घोषणांमागे चीड आहे, अनास्थेविषयीची, प्रश्न आहेत अनेक वर्षांच्या अस्वस्थतेतून पुढे आलेले…
या आंदोलनांमध्ये जेन-झी मुलींनी आंदोलनाच्या पारंपरिक भाषेला एक नवा रंग दिला आहे. समाजमाध्यमे, मीम संस्कृती, अर्थाअर्थी काहीही संबंध नसलेली आणि तरीही मुद्दा लक्षात राहील अशा प्रकारे मांडणारी यमकं, विनोद आणि उपरोध यांचा वापर करून त्या आपला संताप व्यक्त करत आहेत. ‘हम औरतें आजाद हैं’, ‘रेपिस्ट को अंदर करो, लड़कियों को नहीं’, ‘बेटी की लोकेशन नहीं, बेटे का इंटेंट चेक करो’ अशा घोषणांपासून ते ‘एक कचोरी, दोन समोसा…इन मर्दों का क्या भरोसा’ पर्यंतचा हा प्रवास केवळ मनोरंजनाचा नाही, त्यामागे सुरक्षितपणे जगण्याची मागणी आहे.
पुरुषप्रधानतेला विरोध की भीतीची अभिव्यक्ती?
बायका पुरुषांवर टीका करू लागल्या सर्वांत आधी मांडला जाणारा मुद्दा म्हणजे- ‘सगळे पुरुष सारखे नसतात’. होय, सगळे पुरुष सारखे नसतात. प्रत्येक पुरुष छेडछाड करणारा नसतो. प्रत्येक पुरुष हिंसक नसतो. प्रत्येक पुरुष स्त्रीकडे वाईट नजरेने पाहत नाही. उलट अनेक पुरुष स्वतःहून या आंदोलनाच्या बाजूने उभे आहेत. सगळे पुरुष गुन्हेगार आहेत असं, या मुलींचं म्हणणं नाहीच. त्या अशा व्यवस्थेविरुद्ध बोलत आहेत, जिथे सुरक्षित राहण्यासाठी अजूनही त्यांच्या हालचालींवर निर्बंध घातले जातात. एखादी मुलगी रात्री उशिरा घरी निघाली की, “मी निघालेय, थोड्या वेळात पोहोचते,” असा फोन करावा लागतो. दुसरी कॅबमध्ये बसताच वाहनाचा नंबर घरच्यांना पाठवते. तिसरी रस्त्यावरून चालताना मागून येणाऱ्या प्रत्येक पावलाचा आवाज संशयाने ऐकते. कुणी अचानक जवळून गेलं तरी ती सहज मागे वळून पाहते.
ही भीती कुठल्या एका घटनेची नसते, ती रोजच्या जगण्यात नकळत भिनलेली असते. मुलींनी कुठे जायचं, किती वाजता परतायचं, कोणत्या रस्त्याने जायचं, कॅबमध्ये बसल्यावर कोणाला लोकेशन पाठवायचं याची गणितं शिकवली जातात. पण एक साधा प्रश्न मात्र अजूनही अनुत्तरित राहतो- ‘सो-कॉल्ड’ समानतेच्या या जगात सुरक्षित राहण्यासाठी प्रत्येक वेळी मुलीनेच एवढी काळजी का घ्यावी? आज मुली जी भाषा वापरत आहेत, त्यात तर्कापेक्षा भीती मोठी आहे आणि भीतीचा आवाज नेहमी सभ्य असेलच असं नाही. तशी अपेक्षा करणंही व्यर्थ आहे. ‘इन मर्दों का क्या भरोसा?’ वर पुरुषांनी ऑफेन्ड व्हावं का?
समाज माध्यमांवर काही पुरुषांनी या घोषणांना उत्तर देताना म्हटलं आहे ‘आम्ही महिलांना त्रास देत नाही. मग आम्ही का ऑफेन्ड व्हावं? आम्ही तर या आंदोलनाला सपोर्ट करतो.’ ही भूमिका महत्त्वाची आहे. आज खरं तर स्त्रीसुरक्षिततेच्या प्रश्नाला पुरुषांनी केवळ ‘सर्व पुरुष जातीवर आरोप का?’ या चौकटीतून न पाहता, ‘माझ्या आजूबाजूच्या स्त्रियांना सुरक्षित वाटतंय का?’ या नजरेतून पाहण्याची गरज आहे. जर एखादा पुरुष स्वतःला या घोषणांचं लक्ष्य समजत नसेल, कारण तो महिलांचा आदर करतो, त्यांच्या संमतीचा आदर करतो आणि हिंसाचाराला विरोध करतो, तर या अशा घोषणांवर रागावण्याऐवजी तो ‘ही घोषणा संपूर्ण पुरुष जातीविरुद्ध नसून त्या वर्तनाविरुद्ध आहे, ज्यामुळे महिलांना पुरुषांवर विश्वास ठेवताना भीती वाटते.’ कदाचित हीच या संपूर्ण चर्चेची अधिक सकारात्मक दिशा असू शकते.
पण ‘सगळे पुरुष सारखे’ म्हणणं योग्य आहे का? इथे मात्र टीकेला जागा आहे. एका संपूर्ण लिंगाला एकाच रंगात रंगवणं हा न्याय्य मार्ग नाही, असं अनेकांचे म्हणणं आहे. समाजमाध्यमांवरील चर्चांमध्ये काहींनी स्पष्टपणे सांगितलं आहे की महिला सुरक्षेच्या मागणीला समर्थन असले तरी ‘सर्व पुरुषांवर अविश्वास’ असा संदेश देणाऱ्या या घोषणांबद्दल अस्वस्थता वाटते. ही टीका दुर्लक्ष करता येण्यासारखी नसली तरी त्यामागची भावना विचारात घेण्यासारखी आहे. आंदोलनातील घोषणा नेहमी समाजशास्त्रीय संशोधन पत्रासारख्या अचूक असतील, अशी अपेक्षाही करता येणार नाही. अनेकदा त्यात भावनेचा उद्रेक असतो. ज्यांनी वर्षानुवर्षे ‘मुलगी म्हणून जपून राहा’, ‘रात्री बाहेर जाऊ नको’, ‘कपडे नीट घाल’, ‘कुणावर विश्वास ठेवू नको’ हे ऐकलं आहे, त्या मुली जेव्हा एक दिवस उलट प्रश्न विचारतात ‘सगळ्या सूचना आम्हालाच का?’ तेव्हा त्या प्रश्नात केवळ पुरुष जातीविषयीचा राग नसून स्वातंत्र्याची मागणी असते.
जेन-झीचा विरोध वेगळा का दिसतो?
पूर्वी आंदोलन म्हणजे बॅनर, घोषणा, मोर्चा आणि निवेदन असं स्वरूप असे, पण जेन-झी साठी आंदोलन तिथे संपत नाही. मोर्चातील एक घोषणा काही मिनिटांत रील बनते. एखादा फलक मीम बनतो. एखादं वाक्य हजारो लोकांच्या स्टोरीवर जातं. आणि मग ज्यांनी आंदोलन पाहिलंही नाही, तेही त्यावर चर्चा करू लागतात. त्यामुळे आंदोलनाची भाषा बदलली आहे. ‘कचोरी-सोमसा’सारखी घोषणा ऐकून लोक हसतात; पण त्याच वेळी महिला सुरक्षिततेचा प्रश्न त्यांच्या मोबाइलच्या स्क्रीनवर पोहोचतो.
हा जेन-झीचा संवादाचा मार्ग आहे. त्यात विनोद आहे पण राग आहे; विरोध आहे, पण त्यात सर्जनही आहे. आंदोलकांनी समाजमाध्यमांवर प्रसिद्धी मिळवण्यासाठीच हे आंदोलन केल्याची टीकाही झाली आहे, ती ‘आम्ही इन्स्टाग्राम रील्ससाठी पावसात आंदोलन केलेलं नाही’ असं सांगत मुलींनी ती फेटाळून लावली.
‘एक कचोरी, दोन समोसा…” हे वाक्य खटकतं. पण त्याआधीचा प्रश्न आपल्याला ऐकू येतो का? एका मुलीला रात्री घरी परतताना भीती का वाटते? तिला स्वतःच्या कपड्यांपेक्षा समोरच्या पुरुषाच्या नजरेची चिंता का वाटते? तिच्या सुरक्षिततेसाठी तिच्या स्वातंत्र्यावरच निर्बंध का येतात? मुलीला ‘कुठे आहेस?’ विचारण्याबरोबर मुलाला ‘तुझं वर्तन कसं आहे?’ हा प्रश्न आपण कधी विचारतो का? कदाचित ‘बेटी की लोकेशन नहीं, बेटे का इंटेंट चेक करो’ ही घोषणा आपल्याला या आंदोलनाचा गाभा सांगेल.
आणि पुरुषांचीही एक भूमिका आहे…
या आंदोलनात पुरुषांनी स्वतःला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्याची गरज नाही. पण स्वतःला या समस्येपासून पूर्णपणे वेगळं समजण्याचीही गरज नाही. कारण सुरक्षित समाज ही केवळ महिलांची मागणी नाही. एक पुरुष या लढ्याचा विरोधक नसून तो या लढ्याचा भागीदार असू शकतो. जो पुरुष ‘मी तसा नाही. त्यामुळे मला या घोषणेचा राग नाही; मला त्या मुलीचा राग समजून घ्यायचा आहे’ असे म्हणतो, तो या चर्चेला नवी दिशा देतो. आणि ज्यावेळी स्त्री ‘माझा राग पुरुषांविरुद्ध नसून त्या वर्तनाविरुद्ध आहे ज्यामुळे पुरुषांवर विश्वास ठेवताना भीती वाटते,’ म्हणते – त्यावेळी ती संवादाची दारं उघडते.
शेवटी हा लढा ‘मुली विरुद्ध मुलं’ असा नाहीच. तो सुरक्षितता विरुद्ध हिंसा, संमती विरुद्ध जबरदस्ती आणि स्वातंत्र्य विरुद्ध भीती असा आहे. आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे तो पुरुषांविरुद्ध स्त्री असा नसून वाईट वर्तनाविरुद्धचा लढा आहे. म्हणूनच पुढच्या वेळी एखादी जेन-झी मुलगी हातात फलक घेऊन म्हणेल ‘इन मर्दों का क्या भरोसा?’ तेव्हा प्रत्येक पुरुषाने त्यात स्वतःचा अपमान शोधण्याआधी एक क्षण थांबून विचारावं, ‘असा अविश्वास वाटण्याची वेळ तिच्यावर का आली?’ कारण शेवटी लढ्याचा उद्देश पुरुषांना हरवण्याचा नाही तर महिलांना ‘सुरक्षित वाटावं, घाबरून जगावं लागू नये, एवढाच आहे. ‘सुरक्षित वाटणं’ हा अधिकार सगळ्यांना समान प्रमाणात मिळाला पाहिजे. तो प्रत्येकाचा हक्क आहे.
