मिलिंद कोकजे
जॉर्ज फर्नांडिस या बेफाम व्यक्तिमत्त्वाची (एकतर्फी) ओळख झाली पत्रकारितेत येण्यापूर्वी खूप खूप आधी, शाळेत साधारण तिसरी-चौथीत असताना. मुलुंड उपनगरात तेव्हा वसंत व्याख्यानमाला व्हायची आणि त्या व्याख्यानांना जायचं हा घरचा प्रघात होता. १९६७च्या निवडणुकीत स. का. पाटलांसारख्या (‘अनक्राऊन्ड किंग ऑफ मुंबई’ म्हणून प्रसिद्ध) काँग्रेस नेत्याचा दक्षिण मुंबईत पराभव करून ‘जायंट किलर’चं लेबल मिरवत मुंबईतल्या अनेक प्रकारच्या कामगारांचा नेता जॉर्ज लोकसभेत निवडून आला होता. त्यामुळे वसंत व्याख्यानमालेच्या चोखंदळ आयोजकांनी त्याचं भाषण ठेवलं होतं.
जॉर्ज (वयाने, पदाने कितीही मोठी असला तरी आमच्या पिढीकरता जॉर्ज हा जॉर्जच, मि. फर्नांडिस वगैरे नाही.) आपली पत्नी लैला यांच्याबरोबर आला. आम्ही मुलं पुढे बसलो होतो. लैला नेमक्या माझ्या शेजारीच येऊन बसल्या. जॉर्जचं भाषण सुरू झालं आणि त्यानं काय गारुड केलं ते कळलचं नाही. पण भाषण संपलं तेव्हा ग्रेट माणूस आज आपण ऐकला हीच भावना मनात होती. त्या भाषणातला अजूनही आठवणारा तपशील म्हणजे त्यानं तोंडी गणित करून लोकसभेत प्रत्येक खासदाराला बोलायला सरासरी किती वेळ मिळतो ते मांडलं होतं.
खरं तर घरचं राजकीय वातावरण समाजवाद्यांच्या बाजूचं नाही. त्यामुळे जॉर्ज अगदी शत्रू नसला तरी फार प्रियही नाही. पण वातावरण काँग्रेसधार्जिणं असल्यानं घरात राजकीय मोकळेपणा होता. काँग्रेसविराधी जॉर्जला नेता मानायला वडलांचा विरोध नव्हता. त्यामुळे त्यानंतरही जॉर्ज भेटत राहिला तो बंदच्या रूपानं. मुंबईतला तो पहिला बंदसम्राट. त्याने पुकारलेला बंद म्हणजे जणू काही तो आमचाच बंद इतका जॉर्ज डोक्यात फिट बसला होता.
प्रत्यक्षात नाही तरी तो वर्तमानपत्रांतल्या बातम्यांमधून, फोटोंमधून भेटतच राहिला, कधी भाषण करताना, कधी अटक करवून घेताना, कधी गाडीपुढे आडवा पडून ‘रेल रोको’ करताना. वर्तमानपत्रातला त्याचा रुळावर आडवं पडून रेल्वे गाडी अडवल्याचा आणि त्याला उठवण्याकरता पोलिसांनी लाठ्यांनी जोरदार मारहाण केल्याचा फोटो गाजला होता. त्या प्रसंगाची खूप चर्चा त्या वेळी होती. त्या प्रसंगाने त्याची लोकप्रियता वाढली.
कॉलेजला गेल्यावर तो अरुण साधूंच्या ‘मुंबई दिनांक’ कादंबरीत ‘युनियन लीडर डी कास्टा’च्या रूपात तो भेटला. प्रत्यक्ष उद्योगमंत्र्याची मुलगी ज्याच्या प्रेमात आहे आणि स्मगलिंगविरोधात जोरदार मोहीम उघडउघड बिनधास्तपणे जो चालवतो अशा डी कास्टावरचं कादंबरीतलं प्रकरण परत परत वाचायला मजा यायची. वृत्तपत्रविद्येचं शिक्षण घेताना दिल्ली ट्रिपच्या वेळी लोकसभा दाखवायला नेलं तेव्हा शून्य प्रहरात जॉर्ज जोरजोरात कोणता तरी मुद्दा मांडताना दिसला. पण प्रत्यक्ष भेट मात्र झाली नाही.
१९८१ साली पत्रकारितेत- ‘फ्री प्रेस’मध्ये आलो आणि एक दिवस जॉर्जच्या प्रत्यक्ष भेटीचं स्वप्न पूर्ण झालं. दत्ता सामंतांचा जगप्रसिद्ध गिरणी संप सुरू झाला होता. जॉर्ज कोणत्या तरी मोर्चाकरिता आझाद मैदानावर आला होता. मी पुढे होऊन ओळख करून दिली आणि सहज गिरणी संपाबद्दल विचारलं. तर त्यानं थेट हेडलाइनच दिली. गरज पडली तर सामंतांना पाठिंबा द्यायला महानगरपालिकेचा आणि टॅक्सीवाल्यांचा संप घडवून आणेन. ‘फ्री प्रेस’ बुलेटीननंही दुसर्या दिवशी ‘जॉर्ज, सामंत ॲक्सिस टू क्रिपल दी सिटी’ अशी जोरदार हेडलाइन देऊन ती छापली. आणि तेव्हापासून मग जॉर्ज प्रत्यक्षच भेटू लागला. प्रत्येक वेळी त्याची काही तरी जोरदार घोषणाच असायची. ही त्याची खासियत होती. तो दणकून बोलायचा, सडकून टीका करायचा, पण कधीच मी असं बोललो नव्हतो वगैरे म्हणायची पाळी त्याच्यावर त्यानं येऊ दिली नाही. पत्रकारांशी संबंध इतके चांगले की एखाद्या सभेच्या आधी जाऊन त्याला सांगितलं की डेडलाइन आहे, तर चक्क सभेत आपण काय बोलणार आहोत, हे आधीच सांगायचा.
पुढे चांगली ओळख झाली. तोही नावाने ओळखू लागला. त्याचे मुंबईतले सहकारी रणजित भानू यांच्या घरी किंवा अरुण नाईक यांच्या वडाळ्याच्या प्रेसमध्ये भेटी होत. नाही तर पत्रकार परिषदा, जाहीर सभा असायच्याच. त्याच्या दिल्लीच्या बंगल्यातही भेटी झाल्या. एकदा पीटीआयकरता त्याची मुलाखत हवी होती. त्याने मोठा बंद पुकारला होता. त्याच्या आदल्या दिवशी तो मुंबईत येणार होता. त्याने नेपियन सी रोडवरच्या भानूंच्या घरी जेवायला बोलावले. जेवणापूर्वी भानूंच्या गॅलरीत बसून मुलाखत दिली. गॅलरीतून खाली कुठली तरी एक झोपडपट्टी दिसत होती. तो म्हणाला, खरी मुंबई या इमारतीत, फ्लॅटमध्ये राहत नाही, त्या झोपडपट्टीत राहते. त्याच मुलाखतीत त्यानं सणसणीत बातमी दिली की, उद्याच्या बंदमध्ये रेल्वे सुरू राहिली तर तो दादरला रेल्वेसमोर आडवा पडून सत्याग्रह करणार.
दुसर्या दिवशी सकाळी दिनू रणदिवे, जगन फडणीस, प्रकाश अकोलकर (हेही सगळे जॉर्ज फॅनच) अशा ज्येष्ठांसह अनेक वार्ताहर दादर स्टेशनवर हजर होते. पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त होता. इतक्या बंदोबस्तात जॉर्ज बाहेरून येणार कुठून. तो रुळापर्यंत पोहोचायच्या आतच पोलीस पकडतील अशी खात्री होती. इतक्यात त्याच्या सहकार्याने निवडक पत्रकारांना हळूच सांगितले की अमुक अमुक प्लॅटफार्मवर जा. सर्व जण त्या प्लॅटफॉर्मवर एकदम पुढे जाऊन उभे राहिले.
उत्तरेकडे बाहेरगावी जाणारी एक गाडी नऊच्या सुमारास आली. त्याच्या एका डब्याच्या संडासातून एकदम जॉर्ज बाहेर आला, पटकन दरवाजा उघडून प्लॅटफॉर्मच्या विरुद्ध बाजूला गाडी आणि रेलिंगच्या फटीतून खाली उतरून पोलिसांच्या लक्षात यायच्या आत धावत जाऊन इंजिनापुढे आडवा पडला. परत एकदा तो जुनाच सीन. पोलीस धावले, त्यांनी प्लॅटफॉर्मवरून रुळावर खाली उड्या मारल्या आणि त्याला उचलून बाजूला करायला लागले. त्यात त्याचे कपडे फाटले. जे पूर्वी केवळ फोटोत पाहिलं होतं ते दृश्य प्रत्यक्ष पाहायला मिळालं.
नंतर एकदा तो नाशिकला जाणार होता. एक दिवस आधी मला विचारलं, येतोस का. दुसर्या दिवशी भानूंच्या गाडीतून पुढे मी आणि ड्रायव्हर, मागे जॉर्ज आणि नितीश कुमार असे नाशिकला गेलो आणि दुसर्या दिवशी परतलो. तिथल्या सभेत त्याने जैन हवाला डायरीतल्या मजकुरासंबंधीचा आरोप केला. शंकरराव चव्हाण गृहमंत्री असताना दिल्लीत ते बंगल्याबाहेर पडण्यापूर्वी सुरक्षा व्यवस्था आजूबाजूच्या सर्व बंगल्यांचं फाटक लावून घेऊन कोणालाही बाहेर पडण्यास बंदी करत असे. त्यात जॉर्जचा ३, कृष्ण मेनन मार्ग हा बंगलाही होता.
सुरक्षा व्यवस्थेच्या या जाचाला कंटाळून जॉर्जने एक दिवस त्याच्या बंगल्याचं फाटकच उखडून टाकलं आणि ते परत लावूच दिलं नाही. एक प्रकारे सुरक्षा व्यवस्थेला आव्हानच दिलं की आता फाटक बंद करून मला बाहेर पडण्यापासून कसे रोखता ते दाखवा. रेल्वेमंत्री असताना रोह्याला अडकलेली कोकण रेल्वे त्याने श्रीधरन यांच्या मदतीने वेगाने पुढे कर्नाटक आणि केरळला नेली. संरक्षणमंत्री असताना सियाचीनच्या दुर्गम भागात सैनिकांना संपर्काकरता सॅटेलाइट फोन देण्याच्या प्रस्तावावर याची गरज काय असा शेरा मारणार्या दिल्लीतल्या कोणा उपसचिवाची खरंच गरज काय हे शोधण्याकरता त्याने थेट सियाचीनलाच बदली केल्याची एक कथा दिल्लीत कानावर आली.
जॉर्जच्या जोरदार वक्तृत्वामुळे अगदी लहानपणापासून त्याचा फॅन झालो. पुढे अनेक सभांत त्याचं ते जोरदार वक्तृत्व परत परत ऐकलं. पण नंतर दोन प्रसंगांत मात्र त्याच्या बोलण्यात एकदम एक विषाद जाणवला. कांडल्याला कारगिल कंपनीला मिठाच्या प्रकल्पाकरता दिलेल्या जमिनीविरुद्ध त्यानं सत्याग्रह संघटित केला होता. रोज (ठिकठिकाणाहून आलेले) काही सत्याग्रही मोर्चा काढून स्वत:ला अटक करून घेत होते. तो सत्याग्रह बघायला मुंबईहून काही पत्रकारांना नेण्यात आलं होतं.
नेमका जॉर्जही त्या दिवशी कांडल्यात होता. जॉर्ज या सर्व प्रश्नाकडे सुरक्षा, बहुराष्ट्रीय कंपनीचा मिठासारख्या साध्या उत्पादनाच्या क्षेत्रात प्रवेश वगैरे व्यापक दृष्टिकोनातून बघत होता. स्थानिक छोट्या मिठागरांचा प्रश्नही त्यात होता. पण स्थानिक लोकांशी बोलल्यावर लक्षात आलं की, त्यांना बाकी कशाचं काही पडलेलं नव्हतं. त्यांना फक्त त्यांच्या मिठागरांना स्पर्धा नको होती. कारगिल दुसरीकडे कुठे गेले तर त्यांचा काही विरोध नव्हता. त्याला अनुषंगून जॉर्जला विचारलं की तुम्ही जे व्यापक मुद्दे मांडता आहात त्या संदर्भात लोकांचं प्रबोधन करण्यात कमी पडलात असं वाटत नाही का. अत्यंत विषादपूर्ण स्वरात जॉर्ज म्हणाला, लोकांचं सोड, आम्ही आमच्या कार्यकर्त्यांचं शिक्षण नीट करू शकलो नाही.
त्यानंतर काही वर्षांनी एका रविवारी दुपारी मुंबईत त्याने अचानक गिरगावातल्या म्युनिसिपल मजदूर युनियनच्या ऑफिसमध्ये पत्रकार परिषद बोलावली होती. रविवार असल्याने आणि अचानक निमंत्रण आल्याने फार पत्रकार नव्हते, अगदी दोन-चारच होते. त्यात एका वृत्तसंस्थेची एक अगदी नवखी वार्ताहर होती. परिषद संपल्यावर चहा पिताना तिची अगदी उस्फूर्त प्रतिक्रिया आली, ही कोणती जागा, इथे कुठे पत्रकार परिषद बोलावली. तिचं बोलणं जॉर्जने ऐकलं आणि तो एकदम म्हणाला, ‘ही कोणती जागा? तुला माहीत नाही, पण एके काळी मुंबई दोनच ठिकाणांहून चालवली जायची. एक महापालिका आयुक्तांचं ऑफिस आणि दुसरं हे युनियनचं ऑफिस. त्याला त्याचा मुंबईतला सुवर्णकाळ बहुधा आठवत असावा. पण या ऑफिसचं ते पूर्वीचं महत्त्व आता पत्रकारांना राहिलेलं नाही, या जाणिवेतून आलेला त्याच्या बोलण्यातला विषाद लपला नाही. जॉर्ज नंतर परत मंत्री वगैरे झाला पण त्याच्यातल्या तडफदार नेत्याचा उत्तरार्ध सुरू झाल्याचं मात्र त्या वेळी जाणवलं होतं.
मुंबईतला जॉर्जचा सुवर्णकाळ जरी त्याच्या हातातून नंतर काहीसा निसटला तरी कामगार विश्वात, विशेषत: महानगरपालिका, बेस्ट कामगार, टॅक्सी चालक आणि राजकारणातही त्यानं केलेल्या कामाची नोंद घेऊन एका महत्त्वाच्या चौकाला त्याचं नाव देऊन त्याच्या मुंबईशी असलेल्या नात्याची स्मृती जपली जात आहे, हे महत्त्वाचं.
kokjemilind@gmail.com
