डॉ. पल्लवी कुलकर्णी
या वर्षीच्या ‘जागतिक वसुंधरा दिनी’ (२२ एप्रिल) जागतिक हवामान बदलांचा वेग कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याचे सामान्य जनतेला आवाहन करण्यात आले होते. पण त्यासाठी मूळ समस्या काय आहे, हे आपल्याला माहीत असायला हवे. म्हणूनच वेगवेगळ्या हवामानविषयक अहवालांचा आढावा, आजच्या (५ जून) पर्यावरण दिनानिमित्त-
या वर्षी कमी पाऊस पडेल या वैज्ञानिक भाकिताने सगळ्यांची झोप उडवली आणि उन्हाच्या चटक्यांनी आता हवामान बदल आपल्या पायरीपाशी येऊन बसला आहे, याची जाणीव करून दिली. म्हणूनच ‘जागतिक पर्यावरण दिनाच्या’ (५ जून) पार्श्वभूमीवर आपल्या घराघरांत जाणवणार्या हवामान बदलांचे जागतिक स्वरूप सांगणारे काही अहवाल सारांश रूपात इथे मांडत आहे.
या वर्षाची सुरुवात झाली ती म्हणजे जागतिक आर्थिक मंचाच्या (वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम) ‘जागतिक जोखीम अहवालाने’ (ग्लोबल रिस्क्स रिपोर्ट २०२६). हा अहवाल मुख्यत्वे येत्या काही वर्षांत कोणत्या प्रश्नांमुळे आपल्याला आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागेल यावरील लोकांचे मत दर्शवतो. या अहवालानुसार लोकांच्या मते येत्या दोन वर्षांत आर्थिक अस्थिरतेच्या प्रमुख कारणांमध्ये अतितीव्र हवामानीय घटनांचा चौथा क्रमांक लागतो. यातील पहिली तीन कारणे भू-अर्थकारणीय संघर्ष, दिशाभूल करणारी चुकीची माहिती आणि समाजातील ध्रुवीकरण ही आहेत. परंतु पुढील दहा वर्षांचा विचार करता पर्यावरणीय बदल ही आर्थिक संकटांमागील प्रमुख जोखीम असेल असे सर्वाधिक लोकांना वाटते. सर्वेक्षणात सहभागी तीन-चतुर्थांश लोकांना येत्या १० वर्षांतील पर्यावरणीय बदल हे मनुष्यावर ‘खळबळजनक (टब्र्युलंट)’ किंवा ‘वादळी (स्टॉमी)’ परिणाम करतील असे वाटते. एकूण ३३ प्रकारच्या जोखिमा विचारल्या गेल्या असता लोकांना येत्या १० वर्षांत अतितीव्र हवामनीय घटना ही प्रथम क्रमांकाची जोखीम वाटते तर दुसर्या क्रमांकावर जैवविविधतेचे नुकसान आणि तिसर्या स्थानावर पृथ्वीच्या प्रणालीतील अपरिवर्तनीय गंभीर बदल हे आहेत. येत्या १० वर्षांत नैसर्गिक साधन संपत्तीची कमतरता ही लोकांना सहाव्या क्रमांकाची जोखीम वाटते.
नैसर्गिक साधन संपत्तीचा प्रमुख भाग असलेल्या पाण्याची कमतरता मात्र आपल्याला आत्ताच जाणवू लागली आहे. पाण्याच्या संकटाचे गांभीर्य जानेवारी २०२६ मध्ये प्रसिद्ध झालेल्या संयुक्त राष्ट्र विद्यापीठाच्या पाणी, पर्यावरण आणि आरोग्य संस्थेच्या (वठव- कठहएऌ) ‘जागतिक जल-दिवाळखोरी अहवाला’ने दाखवून दिले. पाण्याची समस्या पाण्याच्या कमतरतेपर्यंत मर्यादित न राहता आता आपण पाण्याच्या दिवाळखोरीत निघालो आहोत असे हा अहवाल सांगतो. पाण्याची दिवाळखोरी म्हणजे अशी परिस्थिती जिथे पाण्याची उपलब्धता पूर्ववत करणे शक्य नाही. उदाहरणार्थ भूजलाच्या अधिक उपश्यामुळे खचलेली जमीन पुन्हा वर घेऊन भूजलधारकाची पाणी साठवण्याची क्षमता पूर्ववत करणे. अशा समस्या सोडविण्यासाठी अति प्रगत तंत्रज्ञानाची आवश्यकता असते आणि हे तंत्रज्ञान अतिशय महागही असते. तसेच याद्वारे गोष्टी पूर्ववत होण्यास मनुष्याच्या आयुर्मानापेक्षा जास्त कालावधी लागू शकतो. त्यामुळे बर्याच काळापासून चालत आलेल्या पाणी संवर्धनाच्या संकल्पना आता आपल्याला पाण्याच्या दुर्भिक्षापासून वाचवू शकणार नाहीत असे हा अहवाल सुचवितो. तसेच जल संवर्धनाच्या आणि नियोजनाच्या नवीन पद्धती आता शोधायला हव्यात याची जाणीव करून देतो. याचबरोबर तो असे सुचवितो की सध्या आपण अनुभवत असलेले दुष्काळ हे फक्त आपल्या वाईट नशिबामुळे, जलचक्र बिघडल्यामुळे निर्माण झालेले नाहीत तर यातील बरेचसे दुष्काळ हे मानवनिर्मित आहेत.
या अहवालानुसार जागतिक पातळीवर सुमारे २.२ अब्ज लोकांना अजूनही पिण्याचे स्वच्छ पाणी उपलब्ध नाही आणि अंदाजे चार अब्ज लोकांना वर्षातील किमान एक महिना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. जगातील ७० टक्के भूजलधारकातील पाणी हळूहळू कमी होत चालले आहे. भूजलाच्या अति उपश्यामुळे साधारण जगाच्या एकूण भूभागापैकी पाच टक्के जमीन खचली आहे ज्यामध्ये सुमारे सहा दशलक्ष चौ.कि.मी. क्षेत्र हे शहरांनी व्यापलेले आहे. आपण पाण्याच्या दिवाळखोरीपर्यंत पोहोचण्याचे कारण म्हणजे पाऊस, नद्या, तळी, जमिनीतील ओलावा याद्वारे मिळणार्या पाण्याच्या उत्पन्नापेक्षा अधिक प्रमाणात केलेला पाण्याचा खर्च आणि त्याचबरोबर पाण्याच्या बचत खात्यातून म्हणजेच भूजल आणि हिमनद्यांच्या पाण्याचाही केलेल्या वारेमाप वापर. समुद्र किंवा सरोवरापर्यंत पोहचण्याआधीच नद्या कोरड्या पडणे, तळी आणि पाणथळी कोरड्या पडणे किंवा अदृश्यच होणे, भूजलाच्या अधिक उपश्यामुळे जमीन खचणे, जंगलांचे सुकणे आणि सतत वणवे लागणे हे आपण पाण्याच्या दिवाळखोरीत निघाल्याचे लक्षण आहे.
पाण्याच्या संदर्भातील संयुक्त राष्ट्राने प्रसिद्ध केलेला दुसरा अहवाल म्हणजे ‘जागतिक जल विकास अहवाल’. हा अहवाल यावर्षी मार्चमध्ये ‘सर्वांसाठी पाणी, समान हक्क आणि संधी’ या नावाने ‘जागतिक जल दिन’’च्या निमित्ताने प्रसिद्ध झाला. या अहवालाने दाखवून दिले की जागतिक स्तरावर पाणी भरण्यासाठी महिला आणि मुलींचे दर दिवशी २५० दशलक्ष तास खर्ची पडतात. यामुळे मुलींच्या शिक्षणातही खंड पडतो. पाणी आणायला जाताना त्यांना बर्याचदा असुरक्षित वातावरण आणि हिंसेलाही सामोरे जावे लागते. हा अहवाल असेही नमूद करतो की हवामान बदलाचा परिणाम हा महिला आणि पुरुषांवर वेगवेगळ्या प्रमाणात होतो. महिला प्रमुख असणार्या घराचे सरासरी वार्षिक उत्पन्न अधिक तास काम करूनही हवामान बदलामुळे कमी होऊ शकते. तसेच कामाच्या शोधात घरातील पुरुष मंडळी आधीच स्थलांतरित झाल्यामुळे आणि आपत्तीच्या वेळी घ्यावयाच्या काळजीची नीट माहिती नसल्यामुळे पूर, चक्रीवादळ अशा नैसर्गिक आपत्तीमध्ये स्त्रियांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक असते. बदलते हवामान पाहता, वातावरणातील हे असे बदल ्त्रिरयांना अधिक भेडसावतील हे वेगळे सांगायला नको.
याशिवाय पृथ्वीचे वाढणारे तापमान, वितळणार्या हिमनद्या, समुद्राची वाढणारी पातळी, जैवविविधतेचा र्हास, अतितीव्र आपत्तीचे वाढलेले प्रमाण आणि या सर्वांमुळे होणारी मानवी जिवाची हानी हेदेखील वातावरण बदलाचेच परिणाम आहेत. परंतु हवामान बदलत आहे याचा वैज्ञानिक आधार काय, याची स्पष्टता देतो मार्च २०२६ मध्ये प्रसिद्ध झालेला जागतिक हवामान संस्थे (हटड)चा जागतिक हवामान अहवाल २०२५. याआधी या अहवालामध्ये वातावरणातील कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण, पृथ्वीच्या पृष्ठभागाजवळील तापमान, महासागरातील उष्णता, महासागरांचा पीएच (हायड्रोजनची संभाव्यता) स्तर, हिमनद्यांच्या वस्तुमानातील असमतोल आणि समुद्री बर्फाचा विस्तार यातील बदलांचा आढावा घेतला जायचा. यावर्षी पृथ्वीचा ऊर्जा असमतोल (अर्थ्स एनर्जी इम्बॅलन्स) यामध्ये मांडला आहे. पृथ्वीला सूर्यापासून मिळणारी ऊर्जा आणि पृथ्वीने पुन्हा अवकाशात सोडलेली ऊर्जा यातील फरक म्हणजे तिचा ऊर्जा समतोल. पृथ्वीने अवकाशात सोडलेली ऊर्जा मिळविलेल्या ऊर्जेपेक्षा जास्त असते तेव्हा तिला नकारात्मक, तर सोडलेली ऊर्जा कमी असेल तर त्याला सकारात्मक ऊर्जा असमतोल असे म्हणतात. सकारात्मक ऊर्जा असमतोल पृथ्वीने सोडलेली ऊर्जा बाहेर जाऊ न देता तिला उष्णतेच्या स्वरूपात इथेच साठवून ठेवल्याचे दर्शवतो.
पृथ्वीवरील हरितगृह वायूंचे (कार्बन डायऑक्साइड) प्रमाण वाढल्यामुळे पृथ्वीचा सकारात्मक ऊर्जा असमतोल दिवसेंदिवस वाढतच आहे. पृथ्वीवर राहिलेल्या या अधिकाच्या ऊर्जेच्या ९१ टक्के भाग हा समुद्र, पाच टक्के जमीन, तीन टक्के हिमनद्या आणि समुद्री बर्फ आणि एक टक्का वातावरणाद्वारे शोषून घेतला जातो. परिणामी समुद्राचे तापमान आणि त्यामुळे निर्माण होणार्या चक्रीवादळांची संख्या हळूहळू वाढत आहे. अरबी समुद्रात वाढलेल्या चक्रीवादळांची संख्या हा याचाच एक परिणाम आहे. समुद्र फक्त पृथ्वीवरील अतिरिक्त ऊर्जा शोषून घेत नाही तर येथील वाढलेला कार्बन डायऑक्साइडसुद्धा शोषून घेतो. २०१५ ते २०२४ पर्यंत मानवी क्रियांमुळे निर्माण झालेल्या कार्बन डायऑक्साइडपैकी २४ टक्के कार्बन डायऑक्साइड हा समुद्राने शोषून घेतलेला आहे. त्यामुळे समुद्राचा पीएच (हायड्रोजनची संभाव्यता) देखील कमी आहे. म्हणजेच समुद्राचे पाणी अल्कधर्मी (अल्कलाइन) पासून आम्लधर्मी (ॲसिडिक) बनत आहे. यामुळे समुद्रातील जैवविविधतेला धोका निर्माण झाला आहे. औद्योगिकीकरणाच्या आधीच्या काळाशी तुलना करता सध्या पृथ्वीवरील कार्बन डायऑक्साइची एकाग्रता १५४ टक्के अधिक झाली आहे. वाढलेल्या कार्बन डायऑक्साइड आणि इतर हरितगृह वायूंचा परिणाम म्हणजे पृथ्वीचे जमिनीजवळील वाढलेले तापमान. मागील १७६ वर्षांत २०२४ हे सर्वात जास्त उष्ण वर्ष होते तर २०१५ ते २०२५ ही सर्वाधिक ११ उष्ण वर्षे होती.
हवामान बदलांचे हे परिणाम लक्षात घेऊन संयुक्त राष्ट्राने आपल्या विकासाच्या शाश्वत ध्येयामध्ये ‘हवामान कृती: हवामान बदलाचा सामना करण्यासाठी तात्काळ पावले उचलणे’ हे ध्येय ठेवले. तरीही दर वर्षी होणार्या हवामान बदलांवरील परिषदा बर्याचदा (कॉन्फरन्स ऑफ पार्टीज) नक्की कोणी किती कार्बन निर्माण केला आणि आता निर्माण केलेला कार्बन कुठे आणि कसा विकायचा या भोवतीच फिरतात. कदाचित त्यामुळेच या वर्षीच्या ‘जागतिक वसुंधरा दिना’दिवशी (२२ एप्रिल) जागतिक हवामान बदलांना तोंड देण्यासाठी, किमान त्यांचा वेग कमी करण्यासाठी सामान्य जनतेला आवाहन करण्यात आले. या दिनाचे घोषवाक्य होते ‘माझी ताकद, माझा ग्रह’. म्हणजेच सर्वांनी रोजच्या सवयीत हळूहळू बदल करून हवामान बदलाविरुद्ध खारीचा वाटा उचलायचा. या लहानसहान बदलांनी जागतिक हवामानातील बदल खरेच रोखता येतील का? कदाचित नाही. परंतु हे विश्वची माझे घर असेल तर आपल्यापासून बदल करण्यास काय हरकत आहे? आपल्या प्रयत्नांमुळे आपल्या घरासमोरील जमिनीवर सावली पडून गारवा तरी नक्कीच निर्माण होऊ शकतो.
- सहयोगी संशोधक, भारतीय विज्ञान शिक्षण संशोधन संस्था, पुणे<br>kulkarni.pallavi128 @gmail.com
