अपूर्वा सिरसीकर देऊळगावकर
रात्री उशिरा अमितचा घसा दुखायला लागला आणि हलका तापही आला. दुसऱ्या दिवशी ऑफिस असल्यामुळे त्याने डॉक्टरांकडे जाण्याचा विचार पुढे ढकलला. मोबाईल हातात घेतला आणि इंटरनेटवर सर्च केलं. “घसा दुखणे आणि ताप कोणत्या आजाराचे लक्षण आहे?” आणि काही सेकंदांत अनेक उत्तरे त्याच्यासमोर आली. काही वेबसाइट्स औषधांची नावे सांगत होत्या, काही ठिकाणी घरगुती उपाय होते, तर काही ठिकाणी गंभीर आजारांची शक्यता मांडली होती. योगायोगाने त्याचे लक्ष व्हॉट्सअॅपवर मित्राने पाठवलेला एक “नक्की उपाय” असलेला मेसेजवर गेले ज्यात सोप्या सोप्या भाषेत, “तात्काळ आराम मिळेल” असा दावा करणारा एक संदेश होता.
अमितने विचार न करता घरात उपलब्ध असलेले औषधे घेतली. दोन दिवसांत त्याला थोडा आराम मिळाला आणि त्याला वाटलं—आता सगळं ठीक आहे. पण काही दिवसांनी तोच त्रास पुन्हा सुरू झाला—यावेळी अधिक तीव्र. डॉक्टरांकडे गेल्यावर समजलं की चुकीच्या आणि अपूर्ण उपचारांमुळे संसर्ग पूर्णपणे बरा झाला नव्हता, फक्त काही काळासाठी दडपला गेला होता।
अर्थात दोन दिवसांत मिळालेला आराम हा नेहमीच योग्य उपचाराचा पुरावा नसतो. कधी कधी फक्त “हा उपाय काम करेल” या विश्वासामुळेही शरीराला तात्पुरता आराम मिळतो—यालाच वैद्यकीय भाषेत प्लेसिबो प्रभाव (प्लेसिबो इफेक्ट) म्हणजेच विश्वासामुळे निर्माण होणारा तात्पुरता परिणाम किंवा खोटा आराम. पण हा आराम बहुतांश वेळा भ्रामक असू शकतो तसेच कधीकधी याचं उलटही घडतं. एखाद्या लक्षणाबद्दल नकारात्मक माहिती वारंवार वाचली की तोच त्रास अधिक तीव्र वाटू लागतो याला नोसीबो प्रभाव (नोसीबो इफेक्ट) म्हणजेच नकारात्मक अपेक्षेमुळे वाढणारा त्रास किंवा खोटी भीती. म्हणजेच, आजार जितका शरीरात असतो, त्यापेक्षा कधी कधी तो मनात जास्त वाढतो.
अमितची ही गोष्ट साधी, वरवर वाटत असली तरी आजच्या काळाचं कटू वास्तव दाखवते. आज “डॉक्टर” फक्त क्लिनिकमध्ये नाही—तर तो गूगल आणि व्हॉट्सअॅपच्या रूपात प्रत्येक व्यक्तीच्या हातात आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही. माहिती मिळवणं इतकं सोपं झालं आहे की काही सेकंदांत आपण कोणत्याही प्रकारचा आजार, त्याची लक्षणं आणि संभाव्य उपचार याबद्दल वाचू शकतो. पण इथेच एक सूक्ष्म बदल घडतो आणि आपण माहितीला ज्ञान समजू लागतो।
सुरुवात बहुतेक वेळा गूगलपासून होते. लक्षणं शोधली जातात, विविध आजारांच्या शक्यता वाचल्या जातात. पण खरी खात्री अनेकदा व्हॉट्सअॅपवर तयार होते. ओळखीच्या व्यक्तीकडून आलेला साधा मेसेज—“हा उपाय करून बघा”, “नक्की फायदा होतो” मनावर जास्त परिणाम करतो।
एकच माहिती पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या लोकांकडून आली की ती सत्यासारखी वाटू लागते. माहिती विश्वासात बदलते… आणि विश्वास खात्रीत. मग त्या खात्रीवर कृती सुरू होते—औषधे, उपाय, प्रयोग बहुतेक वेळा योग्य मार्गदर्शनाशिवाय. आजच्या डिजिटल जगात आणखी एक शांत पण गंभीर बदल घडतो आहे. लक्षणं दिसली की हात आपोआप गूगलकडे जातो. दोन-तीन लेख वाचले की मन निष्कर्ष काढायला लागतं… आणि व्हॉट्सअॅप त्या निष्कर्षाला पुष्टी देतो. हळूहळू एक पॅटर्न तयार होतो—शरीर काहीतरी वेगळं सांगायचा प्रयत्न करतो आणि मेंदू त्याला “धोका” समजतो।
यामध्ये मेंदूची एक महत्त्वाची प्रणाली काम करते—मेंदूची लक्ष-नियमन प्रणाली (रेटिक्युलर अॅक्टिवेटिंग सिस्टम). एकदा तुम्ही एखाद्या आजाराबद्दल वाचायला सुरुवात केली की ही प्रणाली त्या संबंधित गोष्टी अधिक ठळकपणे जाणवू देते. त्यामुळे शरीरात आधीपासून असलेले साधे बदलही “लक्षणं” वाटू लागतात. आजार वाढत नाही, पण त्याचं भान मात्र नकळत तीव्र होतं. यालाच मानसशास्त्रात आरोग्याबद्दलची अनाठायी भीती (हेल्थ अॅन्झायटी) म्हणतात. या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणजे माहिती वाढते, पण मनाची शांतता मात्र कमी होत जाते।
याच प्रक्रियेत शरीर आणि मेंदू यांच्यात एक प्रकारचा लक्षणांचा परस्पर-वृद्धी करणारा चक्र (सिम्प्टम लूप) तयार होतो. एखादं साधी संवेदना (सेन्सेशन) जाणवली की आपण त्याचा लगेचच शोध घेतो व त्यातून भीती निर्माण होते, आणि त्या भीतीमुळे शरीरातील संवेदना अधिक तीव्र वाटू लागतात. मग तेच संवेदना पुन्हा लक्षणं म्हणून जाणवतात. हे चक्र सतत चालू राहते. म्हणजेच, कधी कधी आजार वाढत नाही—तो फक्त आपल्या अनावश्यक लक्ष आणि भीतीमुळे अधिक ठळक होत जातो।
यासोबतच आणखी एक सूक्ष्म प्रक्रिया घडते—पूर्वग्रह पुष्टीकरणाची प्रवृत्ती (कन्फर्मेशन बायस). आपण जे आधीच मनात ठरवलं आहे, त्यालाच समर्थन देणारी माहिती आपण जास्त मान्य करतो. दहा पैकी आठ लेख “साधं आहे” सांगत असले तरी दोन लेख “गंभीर असू शकतं” म्हणाले, तर आपलं लक्ष त्याच दोनांवर जातं. हे अगदी स्वाभाविक असून, कधी कधी आपल्या आठवणीही यात हातभार लावतात. याला सहज उपलब्ध उदाहरणांवर आधारित निर्णयप्रक्रिया (अॅव्हेलेबिलिटी ह्युरिस्टिक) म्हणतात. “कोणाला तरी असं झालं होतं” किंवा “मी कुठेतरी वाचलं होतं” अशा आठवणी अचानक जास्त ठळक वाटू लागतात आणि त्या आपल्या निर्णयावर परिणाम करतात।
आपण समजतो गूगल आपल्याला सर्वात योग्य उत्तर देतो. पण तो अनेकदा सर्वात जास्त लोकांनी पाहिलेली किंवा क्लिक केलेली माहिती पुढे आणतो. त्यामुळे भीतीदायक माहिती जास्त दिसते, गंभीर आजार वर येतात आणि साधं दुखणंही मोठं वाटायला लागतं.
याचबरोबर, आपण जे शोधतो त्याच प्रकारची माहिती पुन्हा पुन्हा आपल्या समोर येते. यामुळे एक मर्यादित माहितीचं वर्तुळ तयार होतं, ज्याला आपल्या आधीच्या निवडींनुसार तयार होणारं माहितीचं मर्यादित वर्तुळ (फिल्टर बबल) म्हणतात. परिणामी, आपण नवीन दृष्टिकोन पाहत नाही—फक्त त्याच विचारात अडकत जातो।
याच्या उलट, खरा डॉक्टर फक्त लक्षणांवर उपचार करत नाही. तो व्यक्तीला समजून घेतो, शारीरिक तपासणी, वैद्यकीय इतिहास, जीवनशैली आणि मानसिक अवस्था यांचा एकत्रित विचार करतो. औषध देताना त्याचे दुष्परिणाम, इतर औषधांशी होणारे परिणाम आणि रुग्णाची एकूण परिस्थिती लक्षात घेतो. ही एक जटिल आणि मानवी समजुतीवर आधारित प्रक्रिया आहे, जी कोणतेही सर्च इंजिन किंवा व्हॉट्सअॅप मेसेज देऊ शकत नाही।
आज प्रश्न असा नाही की माहिती उपलब्ध आहे का—ती तर मुबलक आहे. खरा प्रश्न असा आहे की आपण माहिती समजून घेतोय का, की फक्त ती मान्य करतोय?
आज आपण गूगलवर उत्तरं शोधतो, व्हॉट्सअॅपवर खात्री करतो आणि स्वतःवर प्रयोग करतो. पण कधी कधी या सगळ्या प्रक्रियेत आपण एक महत्त्वाची गोष्ट विसरतो—आपलं शरीर “सर्च रिझल्ट” नाही, ते समजून घ्यायची एक जिवंत प्रक्रिया आहे।
आज माहिती कमी नाही… पण स्पष्ट विचार कमी पडतोय।
आपण उत्तरं तर शोधतोय, पण कदाचित प्रश्न विचारणं विसरतोय।
कारण शेवटी, खरी आरोग्य काळजी ही जलद उत्तरांमध्ये नसते… ती योग्य समज, संतुलित विचार आणि योग्य वेळी घेतलेल्या योग्य निर्णयात असते. sirsikarapurva@gmail.com
