जल्लोष ‘लोकसत्ता लोकांकिका’चा.. राज्यभरात प्राथमिक फेरीची नांदी | Great response from the Loksatta Lokankika Loksatta Lokankika 2022 Intercollegiate competition amy 95 | Loksatta

जल्लोष ‘लोकसत्ता लोकांकिका’चा.. राज्यभरात प्राथमिक फेरीची नांदी

करोनामुळे आलेल्या दोन वर्षांच्या खंडानंतर झालेल्या ‘लोकसत्ता लोकांकिकां’ना मिळणारा उदंड प्रतिसाद हा परीक्षकांसह खुद्द सहभागी झालेल्या महाविद्यालयीन कलाकारांसाठीही आश्चर्याचा सुखद धक्का ठरला.

जल्लोष ‘लोकसत्ता लोकांकिका’चा.. राज्यभरात प्राथमिक फेरीची नांदी
(ठाणे विभागाची ‘लोकसत्ता लोकांकिके’ची प्राथमिक फेरी ठाण्यातील सरस्वती सेकंडरी शाळेच्या सभागृहात उत्साहात झाली. (छाया- दीपक जोशी))

करोनामुळे आलेल्या दोन वर्षांच्या खंडानंतर झालेल्या ‘लोकसत्ता लोकांकिकां’ना मिळणारा उदंड प्रतिसाद हा परीक्षकांसह खुद्द सहभागी झालेल्या महाविद्यालयीन कलाकारांसाठीही आश्चर्याचा सुखद धक्का ठरला. राज्यभरात विविध केंद्रांवर प्राथमिक फेरीच्या रुपाने ‘लोकसत्ता लोकांकिका’ या आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेची नांदी जल्लोषात झाली आहे. ‘अरे आव्वाज कुणाचा..’ या आरोळीने दणाणलेले आणि तिसऱ्या घंटेनंतर उत्साही युवा रंगकर्मीच्या आत्मविश्वासपूर्ण वावराने बहरून गेलेला रंगमंच असा आनंदाचा-उत्साहाचा माहौल या स्पर्धेच्या निमित्ताने अनुभवायला मिळतो आहे. समाजातल्या विविध स्तरांतील माणसांच्या जगण्याच्या गोष्टी आणि त्यातील नाटय़ विद्यार्थ्यांनी एकांकिकांतून उलगडत सामाजिक जाणिवेचे दर्शन घडवले. इतक्या कमी वेळात विद्यार्थ्यांनी ज्या पध्दतीने विविध विषय हाताळले त्याबद्दल परीक्षकांनी आनंद व्यक्त केला. प्राथमिक फेरीतील सादरीकरणातील त्रुटींबाबत विद्यार्थी रंगकर्मीनी परीक्षकांशी संवाद साधून त्यांचे मार्गदर्शनही घेतले. आता विभागीय अंतिम फेरीसाठी महाविद्यालयीन कलाकार सज्ज झाले आहेत.

कोल्हापूर
‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेची प्राथमिक फेरी कोल्हापुरातील विवेकानंद कॉलेज येथे दोन दिवस पार पडली. पोरीने शिकावं यासाठी मातेचा त्याग. पुत्रप्राप्तीसाठी कुटुंबियांची होणारी तगमग. समाजातील बिघडलेल्या परिस्थितीवर वेडय़ाच्या मनात व्यक्त होणारी उलथापालथ.. अशा भिन्न आशयाच्या दमदार एकांकिका कोल्हापूर केंद्रात सादर झाल्या. राजारामबापू इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी महाविद्यालयाने ‘तुम्ही ऑर नॉट टू मी’, शिवाजी विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजीने ‘विषाद’, डी. डी. शिंदे सरकार कॉलेज कोल्हापूर यांची ‘अजून करा प्रयत्न’ ही नर्मविनोदी एकांकिका, रा. शि. गोसावी कलानिकेतन कोल्हापूर यांनी ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ ही एकांकिका, ‘फराळ’ ही आर्टस अँड कॉमर्स कॉलेज, नागठाणे अशा एकांकिका सादर झाल्या.

राज्य नाटय़ स्पर्धा जशी नाटकांसाठी आहे तशी ‘लोकांकिका’ने एकांकिका प्रकाराला पाठबळ दिले आहे. नव्या विषयांना मुक्त, धाडसीपणाने भिडण्याचे तरुणाईला हक्काचे रंगपीठ मिळाले आहे. करोनानंतरच्या प्रदीर्घ अवधीनंतर उत्साहाने विद्यार्थी यात भाग घेत आहेत.- डॉ. अनिल बांदिवडेकर, परीक्षक
आजच्या तरुणाईत उत्साह आहे. वेगळय़ा विषयांना भिडण्याचे धाडस आहे. पण त्याला सामोरे जाताना, कलाकृतीत रंग भरताना सांघिक कामगिरीकडे लक्ष दिले पाहिजे. त्यातूनच ती अधिकाधिक खुलत जाते. – संजय सातपुते, परीक्षक

कोविडनंतर पुन्हा लोकांकिका स्पर्धा होते आहे. याचा खूप आनंद वाटतो. आयरिश प्रॉडक्शनचा प्रतिनिधी म्हणून एकांकिका बघत असताना विभागातील गुणवत्ता पाहून मनस्वी आनंद झाला. प्रत्येक एकांकिकेतून एक, दोन, तीन, पाच असे कलावंत हे लक्ष्यवेधी होते. त्यांना भविष्यात उत्तम संधी मिळेल, अशी आशा वाटते.– प्रसाद ठोसर, क्रिएटिव्ह हेड, आयरिस प्रॉडक्शन.

नाशिक
जु. स. रुंगटा विद्यालयात झालेल्या प्राथमिक फेरीत शहर तसेच ग्रामीण भागातील महाविद्यालयांनी सहभाग घेतला. हं. प्रा. ठा कला महाविद्यालयाच्या वतीने मी आणि माझी कविता, लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालयातर्फे युगांत तांडव, इगतपुरी येथील कला व वाणिज्य महाविद्यालयातर्फे दृष्टी – दृष्टिकोन बदलण्याची, के.टी.एच.एम. महाविद्यालयातर्फे तुला देतो पैसा, बी. वाय, के वाणिज्य महाविद्यालयातर्फे पाहिजे म्हणजे पाहिजे, एस.व्ही.के.टी. महाविद्यालयातर्फे राधा, बिंदु रामराव देशमुख महाविद्यालयाच्या वतीने बळीराजाचा बळी आणि सौ. स्मिताताई हिरे कॉलेज ऑफ परफॉर्मिग आर्टच्या वतीने हर्लेक्युईन या एकांकिका सादर झाल्या.

विभागीय अंतिम फेरीत दाखल एकांकिका
हर्लेक्युईन – सौ. स्मिताताई हिरे कॉलेज ऑफ परफॉर्मिग आर्ट्स

तुला देतो पैसा – के. टी. एच. एम. महाविद्यालय युगान्त तांडव – लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालय मी आणि माझी कला हं. प्रा. ठा कला महाविद्यालय

सामाजिक समतेचे महत्त्व अधोरेखित करणारे भाष्य एकांकिकांच्या माध्यमातून केले गेले. ही महाविद्यालयीन मुलांमधील जाणीव महत्त्वाची आहे. – नीलकंठ कदम ,ज्येष्ठ रंगकर्मी

आज मुले रिल्स किंवा १० सेकंदांच्या चित्रफिती बनवण्यात अडकली असताना त्यांना त्यातून बाहेर काढण्याचे काम ही स्पर्धा करते आहे. स्पर्धेच्या सातत्यामुळे लोकांकिका वेगळी ठरते. या स्पर्धेतून नाटय़ क्षेत्राला झळाळी मिळेल हा विश्वास वाटतो. – चिन्मय उद्गीरकर अभिनेता, आयरिस

पुणे
सुखद गारव्याच्या वातावरणात रविवारी सकाळी नवी पेठेतील छत्रपती संभाजी महाराज प्राथमिक प्रशालेत ‘लोकसत्ता लोकांकिका’च्या पुणे विभागीय प्राथमिक फेरी उत्साहात पार पडली. सिद्धिविनायक महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींच्या ‘‘ती’चा प्रवास’ या एकांकिकेच्या सादरीकरणाने पुणे विभागीय प्राथमिक फेरीची सुरुवात झाली. स्त्रीच्या व्यथा या एकांकिकेतून मांडण्यात आल्या होत्या. पहिल्याच एकांकिकेतून समस्याप्रधान विषयाने सुरुवात झाल्यावर उत्तरोत्तर स्पर्धा रंगत गेली. रस्त्यावर राहणाऱ्या लोकांच्या जगण्यापासून नाटय़गृहातील सहायकांच्या आयुष्याचे चित्र रंगमंचावर मांडले गेले. विषयाला पूरक नेपथ्य मांडणी, भूमिका प्रभावी करण्यासाठीची वेशभूषा आणि पार्श्वसंगीताच्या माध्यमातून एकांकिकांचे परिणामकारक सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले. आता पुणे विभागीय अंतिम फेरी ९ डिसेंबरला टिळक स्मारक मंदिर येथे रंगणार आहे.

विभागीय अंतिम फेरीत निवड झालेल्या एकांकिका सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ – ओंजळभर चंद्र
शंकरराव चव्हाण विधी महाविद्यालय – घुंगरू बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय – मध्यांतर
नूतन अभियांत्रिकी महाविद्यालय, तळेगाव – व्यथासार

स्पर्धेतील काही संघांनी प्रथमच नाटक करण्याचा प्रयत्न केला होता. स्पर्धकांनी एकांकिकांतून आत्ताचे विषय मांडले. त्यांचे प्रयत्न स्वागतार्ह आहेत. अभिनयावर काम चांगल्या पद्धतीने केले आहे. मात्र लेखन अधिक कसदार कसे होईल, याकडे लक्ष देण्याची गरज आहे. – प्रदीप वैद्य, परीक्षक
करोनानंतर नवी ऊर्जा घेऊन विद्यार्थ्यांनी एकांकिका सादरीकरणासाठी धडपड करणे खरोखरीच कौतुकास्पद आहे. विद्यार्थ्यांनी त्यांना भावलेले, जाणवलेले विषय एकांकिकांच्या माध्यमातून मांडण्याचे प्रामाणिकपणे प्रयत्न केले. लेखन, दिग्दर्शनाकडे अधिक बारकाईने लक्ष द्यायला हवे. – नितीन धंदुके, परीक्षक

विद्यार्थ्यांनी उत्तम पद्धतीने सादरीकरण केले. त्यातील गुणवान विद्यार्थ्यांना भविष्यात संधी देण्याचा प्रयत्न केला जाईल. – अभय परळकर, आयरिस प्रॉडक्शन

मुंबई
प्रभादेवी येथील रवींद्र नाटय़ मंदिरात दोन दिवस मुंबई विभागीय प्राथमिक फेरीचा जल्लोष पाहायला मिळाला. नर्मदा आंदोलनावरून प्रेरित होऊन प्रगतीच्या नावाखाली विस्थापित केल्या गेलेल्या लोकांच्या सामाजिक परिस्थितीचे वास्तव एकांकिकेतून मांडण्याचा प्रयत्न, अतिशक्तीचा गैरवापर समाजाला विनाशाकडे कसा नेतो त्याचे चित्रण करणारी एकांकिका, कोणत्याही गोष्टीवर योग्य वेळी ताबा नाही मिळवला तर उतू जाऊ शकते याचे चित्रण करणारी एकांकिका, माणूस स्वत:ला निसर्गापेक्षा मोठा समजायला लागला की काय होते, अशा विविध सामाजिक समस्यांवर भाष्य करण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी केला होता. मुंबई विभागीय अंतिम फेरी १० डिसेंबरला रवींद्र नाटय़मंदिरमध्ये पार पडणार आहे.

मुंबई विभागीय अंतिम फेरीसाठी निवड झालेल्या एकांकिका
१ बारम, महर्षी दयानंद महाविद्यालय, परळ
२ काहीतरी अडकलंय, गुरुनानक खालसा महाविद्यालय, माटुंगा
३ अरे ला कारे, रामनारायण रुईया स्वायत्त महाविद्यालय, माटुंगा
४ जन्नत उल फिरदौस, विनायक गणेश वझे महाविदयालय, मुलुंड
५ उकळी, कीर्ती.एम. डोंगरसी महाविदयालय, दादर

सादरीकरणावेळीची शिस्त आणि सगळय़ा संघांची विषय निवड उत्तम होती. मला अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या, ज्यांचा मला व्यावसायिक क्षेत्रात उपयोग होईल. – संदेश बेंद्रे (परीक्षक)
या वर्षी पहिल्यांदाच असे जाणवले की विषय जेवढा तगडा आहे, तेवढय़ाच ताकदीने प्रत्येक संघाने तो सादर केला आहे. मुलांचा उत्साह आणि ऊर्जा अफलातून होती. – शिल्पा नवलकर (परीक्षक)
या वर्षीचेही सगळेच विषय हे अतिशय गहन होते. तरुण पिढीला आपले विचार मांडण्यासाठी ‘लोकसत्ताने लोकांकिके’च्या माध्यमातून हे उत्तम व्यासपीठ तयार केले आहे. – रवी मिश्रा (अस्तित्वचे संस्थापक)
करोनाच्या खडतर काळानंतरही स्पर्धेला उदंड प्रतिसाद मिळाला, हे चित्र रंगभूमीसाठी सुखावणारे आहे. लोकांकिकेमधून मनोरंजनसृष्टीला गुणी कलावंत मिळत असतात आणि पुढेसुद्धा मिळत राहतील, याची खात्री यंदाच्या स्पर्धेमधून झाली आहे. – विविध कोरगांवकर (आयरिस प्रोडक्शन)

ठाणे
ठाण्यातील सरस्वती मंदिर ट्रस्टच्या सरस्वती सेकंडरी शाळेच्या सभागृहात प्राथमिक फेरी पार पडली. या फेरीची सुरुवात झाली न्यू पनवेल येथील सी.के. ठाकूर महाविद्यालयाने सादर केलेल्या तुंबई या एकांकिकेने. भाईंदर येथील शंकर नारायण महविद्यालयाने सादर केलेल्या ‘असं कधी होत नाही’ या एकांकितेतून आपली वयात आलेली मुलगी जेव्हा कॉलेजवरून लवकर घरी येत नाही तेव्हा तिच्या कुटुंबीयांची काय अवस्था होते, याचे उत्कृष्ट सादरीकरण केले. उल्हासनगर येथील एस. एस. टी. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ‘इनडीसीसिव्ह’ ही एकांकिका सादर केली. तर ठाण्यातील सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयाने ‘डोक्यात गेलंय’ ही एकांकिका सादर केली. ठाण्याची विभागीय अंतिम फेरी ही गुरुवार, ८ डिसेंबर रोजी गडकरी रंगायतन येथे पार पडेल.

विभागीय अंतिम फेरीसाठी निवड झालेल्या एकांकिका –
डोक्यात गेलंय! -सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय ठाणे.
बिंदी बाजार – आदर्श कला आणि वाणिज्य महाविद्यालय बदलापूर.
फॅम- जॅम – बी. के. बिर्ला महाविद्यालय (स्वायत्त) कल्याण.
असं कधी होत नाही! – शंकर नारायण महाविद्यालय मीरा- भाईंदर.
तुंबई – सी. के. ठाकूर कॉलेज आर्ट्स, कॉमर्स, सायन्स न्यू. पनवेल.

या स्पर्धेच्या माध्यमातून वेगळे विषय आणि सादरीकरणाची वेगवेगळी पद्धत पाहायला मिळाली. भवतालच्या जगात काय घडते आहे याची विद्यार्थी दखल घेत आहेत हे पाहून सकारात्मक वाटले. – हेमंत भालेकर, दिग्दर्शक
विविध विषय आणि त्यांची मांडणी अर्थातच नवे प्रयोग करण्यासाठी आणि कालांतराने सक्षम कलावंत आणि प्रेक्षक निर्माण होण्याची खाण म्हणजे ही स्पर्धा आहे. – विश्वास सोहनी, दिग्दर्शक

प्रायोजक
लोकसत्ता आयोजित ‘सॉफ्ट कॉर्नर’ प्रस्तुत ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धा सहप्रायोजक ‘झी युवा’ आणि ‘टुगेदिरग’च्या सहकार्याने पार पडणार आहे. ही स्पर्धा पॉवर्ड बाय ‘इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड’, ‘केसरी टूर्स’ आणि ‘मे. बी. जी. चितळे डेअरी’तर्फे आहे. सहाय्य ‘अस्तित्व’चे आहे. लोकांकिकेच्या मंचावरील कलाकारांच्या कलागुणांना चित्रपट, मालिकेत संधी देणारे ‘आयरिस प्रॉडक्शन’ टॅलेंट पार्टनर आहेत.


मराठीतील सर्व विशेष लेख ( Features ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-12-2022 at 00:03 IST
Next Story
धारावी पुनर्विकास प्रकल्प हे धारावीकरांसाठी स्वप्न नव्हे, मृगजळच!