समीर गोडबोले
काही दशकांपूर्वीपर्यंत ग्रीनलँड हे जगाच्या नकाशावरचे एक शांत, शुभ्र आणि दुर्लक्षित राष्ट्र होते. बर्फाने वेढलेले, मानवी गजबजाटापासून दूर, आणि जागतिक घडामोडींच्या परिघावर नीरवपणे उभे राहिलेले. आज मात्र ग्रीनलँडच्या अस्तित्वाची जाणीव जागतिक महासत्तांच्या धोरणात्मक चर्चामध्ये, ऊर्जा संक्रमणाच्या अहवालांमध्ये आणि संरक्षण अर्थशास्त्राच्या मांडणीत वारंवार होऊ लागली आहे. कारण ह्या शांत प्रदेशाच्या पोटात केवळ बर्फ नव्हे, तर भविष्यातील सामर्थ्याचा स्रोत दडलेला आहे.

हवामान बदलः पर्यावरणीय संकटातून संधी?

हवामान बदल म्हटले की प्रामुख्याने, वितळणारे हिमनग, वाढती समुद्रपातळी आणि पर्यावरणीय आपत्तींचे चित्र डोळ्यांसमोर उभे राहते. पण ग्रीनलँडच्या बाबतीत तो एका वेगळ्याच वास्तवाकडे निर्देश करतो. गेल्या दोन दशकांत ग्रीनलँडच्या हिमावरणात झालेली घट ही आता फक्त पर्यावरणीय बाब न राहता आर्थिक आणि भूराजकीय समीकरणांना कलाटणी देणारा बदल ठरली आहे.

वाढणाऱ्या तापमानामुळे हिमावरण सरत असतानांच त्यांखाली दडलेले वैभव जगासमोर उघड होऊ लागले आहे. ग्रीनलँडमध्ये रेअर अर्थ एलिमेंट्स (REEs) म्हणजेच दुर्मीळ खनिजसंयुगे तसेच इतर अनेक ‘क्रिटिकल मिनरल्स’चे लक्षणीय साठे आहेत. ही खनिजे विविध क्षेत्रांमध्ये, विशेषतः संरक्षण, ऊर्जा आणि वाहन उद्योगासह अनेक उ‌द्योगांमध्ये, अत्यावश्यक, आणि काही प्रसंगी अपरिहार्य  भूमिका बजावतात. रेअर अर्थ एलिमेंट्स, लिथियम, ग्रॅफाइट, निओबियम, टायटॅनियम आणि क्रिटिकल मिनरल्स हे शब्द तांत्रिक वाटतात, पण आजच्या जगात ह्याच मंडळींच्या आधारावर इलेक्ट्रिक वाहनं, पवनचक्क्या, सौर पॅनेल्स, सेमीकंडक्टर्स, संरक्षण प्रणाली आणि अंतराळ विज्ञान ही तंत्रज्ञानं उभी आहेत. इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटऱ्यांपासून पवनचक्क्यांच्या चुंबकांपर्यंत, सौर पॅनेल्सच्या कार्यक्षमतेपासून सेमीकंडक्टर्सच्या अचूकतेपर्यंत, तसेच संरक्षण आणि अंतराळ तंत्रज्ञानातील अत्याधुनिक क्षमतांपर्यंत, सगळ्यांची मुळे याच खनिजांमध्ये दडलेली आहेत.

‘क्रिटिकल मिनरल्स’ म्हणजे काय?

आजच्या जागतिक अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा पाया अशा खनिजांवर अवलंबून आहे जी दुर्मिळ असून ज्यांची पर्यायी उपलब्धता देखील अत्यंत कमी आहे. तसेच त्यांचा पुरवठा राजकीयदृष्ट्या अतिशय अस्थिर आणि संवेदनशील समजला जातो. ही खनिजे विविध उ‌द्योगांसाठी अपरिहार्य असून, त्यांच्या अभावामुळे अनेक अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि रणनीतिक क्षेत्रांचा विकास अपूर्ण राहतो. यामुळेच या खनिजांना ‘क्रिटिकल मिनरल्स’ असे गंभीर स्थान प्राप्त झाले आहे, जे केवळ आर्थिकच नव्हे, तर भूराजकीय दृष्टिकोनातूनही अत्यंत निर्णायक आहे.

आजच्या जागतिक खनिज बाजारपेठेत चीनचा दबदबा, विशेषतः रेअर अर्थ एलिमेंट्सच्या प्रक्रिया आणि पुरवठा साखळीवर, अतिशय प्रगल्भ आणि व्यापक आहे. चीन हा केवळ या खनिजांचा प्रमुख उत्पादक नाही, तर त्यांच्या संपूर्ण मूल्यसाखळीवर नियंत्रण राखणारा महत्त्वाचा केंद्रबिंदूही आहे. त्यामुळे अमेरिका आणि युरोपसाठी ही केवळ एक व्यापारी समस्या नसून, ती एक गंभीर भूराजकीय व रणनीतिक असुरक्षिततेची चाहूल आहे. या दबावामुळे त्यांच्या उद्‌द्योगक्षेत्रांच्या स्थैर्यावर आणि राष्ट्रीय सुरक्षेवर दीर्घकालीन परिणाम होण्याचा धोका त्यांना जाणवत आहे. अशा परिस्थितीत, त्यांच्याकरता, पुरवठा साखळीतील अवलंबित्व कमी करण्यासाठी आणि सक्षमता वाढविण्यासाठी व्यापक आणि धोरणात्मक उपाययोजना करणे अनिवार्य झालं आहे.

याच पार्श्वभूमीवर ग्रीनलँडचे महत्त्व अधोरेखित होते. संशोधनानुसार, युरोपियन युनियनने ‘क्रिटिकल’ म्हणून वर्गीकृत केलेल्या बहुतेक खनिजांचे साठे ग्रीनलँडमध्ये आढळतात. म्हणजेच, ऊर्जा संक्रमणाचा झेंडा फडकावणाऱ्या पाश्चात्य जगासाठी ग्रीनलँड हा केवळ एक भौगोलिक प्रश्न नाही, तर पुरवठा साखळीच्या स्वायत्ततेची आणि सुरक्षिततेची एक महत्त्वपूर्ण संधी आहे.

खाणकामः स्वप्न आणि वास्तव

डेनमार्क आणि ग्रीनलँड भूवैज्ञानिक सर्वेक्षण संस्था (GEUS) आणि अमेरिकेतील भूवैज्ञानिक सर्वेक्षण संस्था (USGS) यांच्या माहितीनुसार, या प्रदेशात अंदाजे ३६.१ दशलक्ष मेट्रिक टन हलक्या आणि जड रेअर अर्थ एलिमेंट्सचे साठे आहेत. मात्र यापैकी फक्त १.५ दशलक्ष टन संसाधने पुराव्याने सिद्ध झालेली आहेत. USGS च्या माहितीनुसार, ग्रीनलँडमध्ये जगातील आठव्या क्रमांकावरच्या प्रमाणात सिद्ध रेअर अर्थ एलिमेंट्सचे साठे आहेत, परंतु ग्रीनलँडमध्ये अजूनपर्यंत कोणतीही रेअर अर्थ एलिमेंट्सची सक्रिय उत्पादने होत नाहीत. रेअर अर्थ एलिमेंट्स व्यतिरिक्त, GEUS च्या अंदाजांनुसार, ग्रीनलँडमध्ये मॉलिब्डेनम, ग्रॅफाइट, हॅफ्नियम, निओबियम, प्लॅटिनम गटातील धातू, टॅटलम आणि टायटॅनियम यांसारख्या खनिजांचेही मोठे संभाव्य साठे आहेत. या बेटात युरेनियमचेही लक्षणीय साठे आहेत, मात्र त्याच्या खाणकामावर २०२१ मध्येच सरकारने बंदी घातली आहे.

संसाधनांची भरपूर मात्रा असूनही, ग्रीनलँडच्या खाणकाम उ‌द्योगात फारशा कंपन्या सहभागी होत नाहीत. GEUS नुसार, कठीण भौगर्भिक आणि भौगोलिक परिस्थिती, कठोर हवामान, पर्यावरणीय धोके, वाहतूक व्यवस्थेचा अभाव आणि मर्यादित विद्यमान पायाभूत सुविधा यामुळे खाणकाम अत्यंत खर्चिक आणि गुंतागुंतीचे बनते. याउपर, ग्रीनलँडच्या राजकारणात पर्यावरणाला विशेष स्थान आहे. म्हणजेच, जागतिक शक्तींना हवे असलेले खनिज आणि स्थानिक समाजाला हवी असलेली विकासाची दिशा, यांच्यात सुसंवाद साधणे ही एक कसरत असणार आहे. मात्र, काही रेअर अर्थ एलिमेंट्स आणि क्रिटिकल मिनरल्स संबंधित प्रकल्प सध्या अन्वेषणाच्या टप्प्यात असून, उत्पादनाला गती देण्यासाठी सरकारी निधी जमवण्यांत उत्साह दिसून येत आहे.

संपूर्ण जग ‘ग्रीन एनर्जी’, ‘नेट झिरो’ आणि पर्यावरणीय शाश्वततेच्या घोषणांमध्ये गुंग असतांना, त्या हरित भविष्याच्या आकांक्षांसाठी प्रचंड प्रमाणात खाणकाम करणे अपरिहार्य आहे हे भान मात्र ठेवायला हवे. ग्रीनलँडमधील संभाव्य खाणकामे पर्यावरण जपण्याच्या नावाखालीच पर्यावरणावर ताण आणणाऱ्या प्रक्रियांचे स्वरूप घेऊ शकतात. हा प्रश्न केवळ तांत्रिक किंवा आर्थिक नाही, तो नैतिकदृष्ट्याही गंभीर आहे.

ग्रीनलँड नावाची प्रयोगशाळा

तेलावर टिकलेली सत्ताकेंद्रे हळूहळू मागे सरकत असताना, पुढे येत आहे खनिजांच्या अधिष्ठानावर उभा राहणारा, तंत्रज्ञानावर केंद्रित आणि हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर आधारित नव्या स्वरूपाचा भूराजकीय खेळ. ग्रीनलँड या बदलत्या युगाची प्रयोगशाळा आहे.

अलीकडच्या घडामोडींनी हे स्पष्ट केले आहे की ग्रीनलँड आता केवळ संभाव्य खनिजसंपत्तीचा प्रदेश राहिलेला नाही, तर तो थेट जागतिक भूराजकीय स्पर्धेच्या केंद्रस्थानी ठाकला आहे. अमेरिकेची उघड सामरिक उत्सुकता, नाटोची सुरक्षा-संलग्न भूमिका आणि युरोपियन युनियनचा राजकीय पाठिंबा, या सगळ्यांतून ग्रीनलँडचे महत्त्व केवळ आर्थिक नसून रणनीतिक असल्याचे ठळकपणे दिसते.

बर्फ वितळत असताना, खनिजांइतकेच सत्ता-संतुलन, स्वायत्तता आणि जागतिक प्रभावाचे प्रश्नही उघडे पडत आहेत. आणि म्हणूनच ग्रीनलँड आता शांत, अलिप्त राष्ट्र राहिलेले नाही, ते आज जागतिक भूराजकारणाच्या घडामोडींनी व्यापलेले, संवेदनशील आणि निर्णायक केंद्रस्थान बनले आहे.

sameer_godbole@icloud.com