वैशाली चिटणीस

आपण राहतो ती पृथ्वी फक्त आपली नाही, तर इथल्या प्रत्येक जीवाची आहे, याची जाणीव हरवलेला माणूस विकासाच्या हव्यासापोटी अनर्थ करायला निघाला आहे. त्याचा परिणाम पृथ्वीच्या सगळ्याच वातावरणावर होतो आहे. या विनाशाला आपल्या सकारात्मक कामातून उत्तर देणाऱ्यांचा सन्मान म्हणजे पृथ्वी वाचवणाऱ्यांचा सन्मान. जगभरात तो वेगवेगळ्या पातळ्यांवरून केला जातो. ग्रेटर ॲडज्युटंट स्टॉर्क या आसामच्या परिसरात आढळणाऱ्या हरगिला या पक्ष्याच्या करकोच्याच्या एका प्रजातीच्या (त्याला आपल्याकडे मोठा करकोचा या नावाने ओळखले जाते.) संरक्षणासाठी आपले आयुष्य देणाऱ्या भारतीय वन्यजीवशास्त्रज्ञ पूर्णिमा देवी बर्मन यांचा सन्मान नुकताच संयुक्त राष्ट्रसंघाने केला तो ‘चॅम्पियन्स ऑफ द अर्थ’ हा पुरस्कार देऊन. निसर्गाच्या जपणुकीच्या, संवर्धनाच्या त्यांच्या कामाला मिळालेली ही जागतिक पोचपावतीच आहे.

sunil tatkare and ajit pawar devendra fadnavis morning oath
अजित पवारांच्या पहाटेच्या शपथविधीवर सुनिल तटकरेंचा मोठा खुलासा; म्हणाले, “आम्ही दोन्ही…”
Jayant Patil on Ajit Pawar comparision to Modi- Shah
‘तुलना कुणाशी करायची, याचं भान…’, अजित पवारांच्या ‘त्या’ दाव्यानंतर जयंत पाटील यांचा टोला
patanjali ayurved marathi news, patanjali ayurved supreme court notice marathi news, baba ramdev supreme court notice marathi news
विश्लेषण : रामदेव बाबांच्या पतंजलीचे दावे फसवे आहेत का? सर्वोच्च न्यायालयाने कशाबद्दल फटकारले?
dwarka pm modi
प्राचीन द्वारका नगरीच्या दर्शनातून पंतप्रधान मोदींचा अहिर समुदायाला संदेश

पूर्णिमा देवी बर्मन या एक भारतीय वन्यजीव शास्त्रज्ञ असून त्या आसाममध्ये हरगिला म्हणजेच मोठा करकोचा या पक्ष्यांच्या संरक्षणासाठी कार्यरत आहेत. वयाच्या पाचव्या वर्षी त्या आसाममधील ब्रह्मपुत्रा नदीच्या परिसरातील त्यांच्या आजी-आजोबांच्या गावी गेल्या होत्या. तिथे त्या काही काळ त्यांच्यासोबत राहिल्या. त्यांची आजी शेती करत असे. ती पूर्णिमा देवी यांना आपल्याबरोबर शेतावर आणि आसपासच्या भागांत नेत असे. तिथल्या भातशेतीत आणि दलदलीच्या जमिनीत वावरताना पूर्णिमा देवी यांना हे हरगिला पक्षी सतत दिसत. आजीकडून त्यांच्याबद्दलच्या विविध गोष्टी समजत. त्यातून पूर्णिमा देवी यांच्या मनात या स्थानिक पक्ष्याविषयी एक विशेष ओलावा तयार झाला.

पुढे प्राणिशास्त्रात पदव्युत्तर पदवी प्राप्त केल्यानंतर, बर्मन यांनी हरगील पक्ष्यांवर पीएचडीचा अभ्यास करायला सुरुवात केली. हे पक्षी नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याचे पाहून त्यांनी आपला पीएचडीचा प्रबंध पुढे ढकलला आणि हरगिला ही मोठ्या करकोच्याची प्रजाती जिवंत ठेवण्यावर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला. त्याचाच भाग म्हणून त्यांनी २००७ मध्ये हरगिला पक्ष्यांच्या संरक्षणासाठी मोहीम सुरू केली. त्यासाठी त्यांनी जिथे पक्षी सर्वाधिक संख्येने होते, त्या आसामच्या कामरूप जिल्ह्यातील गावांवर लक्ष केंद्रित केले. त्या कामरूप जिल्हा परिसरातील गावांमध्ये कार्यरत असलेल्या हरगिला आर्मी या संघटनेच्या संस्थापक आहेत आणि एविफौना रिसर्च अँड कन्झर्व्हेशन डिव्हिजन, आरण्यकच्या वरिष्ठ प्रकल्प व्यवस्थापक आहेत. त्यांना याआधी ग्रीन ऑस्कर पुरस्कारही मिळाला आहे.

ग्रेटर ॲडज्युटंट स्टॉर्क म्हणजेच मोठा करकोचा उर्फ हरगिला पक्षी ही करकोच्याच्या जातीतील दुर्मीळ प्रजाती आहे. त्यांचे नैसर्गिक अधिवास झपाट्याने नष्ट होत असल्यामुळे त्यांची संख्या आज जेमतेम १२०० वर आली आहे. ही संख्या एका शतकापूर्वीच्या त्यांच्या संख्येच्या एक टक्क्यापेक्षाही कमी आहे. त्यांची संख्या झपाट्याने कमी होण्यामागे वेगवेगळी कारणे आहेत. एक तर ग्रामीण भागात झपाट्याने नागरीकरण होत आहे. हरगिला पक्षी जिथे वाढतात, वावरतात अशा दलदलीच्या जमिनींचा निचरा झाला आहे. त्यांच्या अधिवासांच्या परिसरात अनेक ठिकाणी इमारती उभारल्या गेल्या आहेत. रस्ते बांधले गेले आहेत आणि मोबाइल टॉवर्स उभे राहिले आहेत. त्यामुळे हे पक्षी झपाट्याने नामशेष होऊ लागले आहेत. निसर्गाच्या साखळीतील एक कडी ढासळली, तरी संपूर्ण निसर्गाचा समतोल बिघडायला वेळ लागत नाही, हे सगळ्यांनाच माहीत आहे. त्यामुळे हरगिला पक्षी नामशेष होणे ही बाब गंभीर असल्याचे पूर्णिमा देवी यांना जाणवले. म्हणूनच हातातल्या सगळ्या गोष्टी सोडून त्यांनी हरगिला पक्ष्याच्या या प्रजातीचे संरक्षण आणि संवर्धन करण्याचे काम हातात घेतले.

वरवर पाहता साधेसोपे वाटले तरी हे काम तसे सोपे नव्हते. त्यातला सगळ्यात मोठा अडथळा होता, स्थानिक लोकांच्या हरगिला पक्ष्याविषयीच्या समजुतींचा. हरगिला पक्षी रोगवाहक असतो, तो दिसणे हा अपशकुन किंवा दुर्दैव सूचित करणारे असते असा आसाममधील लोकांमध्ये समज होता. आसाममध्ये मुळातच हा पक्षी ‘हरगिला’ (म्हणजे ‘हाड गिळणारा’) या नावाने ओळखला जातो. त्यामुळेही त्याच्याबद्दल या समजुती होत्या. या गोष्टी हरगिला पक्ष्याच्या मुळावर उठल्या होत्या. त्या बदलणे आवश्यक होते. त्यासाठी पूर्णिमा देवी यांनी गावातील महिलांना एकत्र आणायचे ठरवले आणि त्यासाठी प्रयत्न केले. खास महिलांचे म्हणून ओळखले जाणारे वेगवेगळे सण, उत्सव यात त्या हजेरी लावत. धार्मिक कार्यक्रमांना जाऊन महिलांना जोडून घेत. पाककृतीच्या स्पर्धा आयोजित करत. त्याशिवाय पथनाट्य, सामुदायिक नृत्य अशा सगळ्या माध्यमांतून त्यांनी या परिसरातील स्त्रियांमध्ये आपला वावर वाढवला. त्यांना हरगिला पक्ष्याचे निसर्गचक्रामधले महत्त्व समजावून सांगितले. त्यांचा विश्वास संपादन केला आणि त्यातून उभी राहिली हरगिला आर्मी. हळूहळू ती वाढत गेली. आज दहा हजारांहून अधिक महिला या मोहिमेशी जोडल्या गेल्या आहेत.

पूर्णिमा यांनी दुसरे पाऊल उचलले ते ‘हरगिला’ पक्ष्यांना त्यांची अंडी उबविण्यासाठी सुरक्षित जागा मिळवून देण्याचे. त्यासाठी बांबूच्या बनात घरटी बांधायला हरगिला आमीर्ने सुरुवात केली गेली. या घरट्यांमध्ये हरगिला पक्ष्यांनी अंडी घालायला सुरुवात केली. त्या घरट्यांमध्ये त्यांची पिल्ले जन्माला यायला लागली. मग हरगिला आर्मीने परिसरातील गावागावांतील लोकांमध्ये जागृती करायला सुरुवात केली. हळूहळू त्यांचीही मदत मिळायला लागली. मग हरगिला पक्षी अंडी घालत त्या परिसरात झाडे लावायला या सगळ्यांनी सुरुवात केली. त्यांनी त्या दलदलीच्या प्रदेशात तब्बल ४५ हजार झाडे लावली आहेत. हरगिला पक्ष्यांना चांगला अधिवास मिळावा यासाठी पुढील काळात ६० हजार झाडे लावण्याची त्यांची योजना आहे. याशिवाय हरगिला आर्मी नद्यांच्या काठांवर आणि पाणथळ प्रदेशात स्वच्छता मोहीम आयोजित करते. नद्यांमधील प्रदूषण कमी करण्याचा त्यांचा हा प्रयत्न आहे. पूर्णिमा यांनी हे काम करायला सुरुवात केल्यानंतर कामरूप जिल्ह्यातील दादरा, पचारिया आणि सिंगिमरी या गावांमध्ये हरगिला पक्ष्यांच्या घरट्यांची संख्या २८ वरून २५० च्या वर गेली आहे. पूर्णिमा यांच्या या हरगिला संवर्धन कार्यक्रमामुळे हा परिसर हा मोठा करकोचा या प्रजातीची जगातील सर्वात मोठी प्रजनन वसाहत ठरला आहे.

पूर्णिमा यांच्या या हरगिला आर्मीमध्ये आज दहा हजारांहूनही अधिक महिलांचा समावेश आहे. हरगिला पक्ष्यांच्या घरट्यांचे रक्षण करणे, घरट्यांमधून घसरून जखमी झालेल्या हरगिला पक्ष्यांवर उपचार करणे ही त्यांची कामे आहेत. ज्या पक्ष्याला एके काळी अशुभ समजले जात होते, त्याच्या पिल्लाच्या आगमनाची चाहूल लागली की आता परिसरात उत्सव साजरा केला जातो. बर्मन यांनी या परिसरातील स्थानिक महिलांना यंत्रमाग चालवायला आणि सूत विणायला शिकवून स्वयंपूर्ण व्हायला मदत केली आहे. त्या आता ‘हरगिला’चे चित्र असलेले कापड विणून विकतात. हरगिलाचे मुखवटे तयार करून विकतात. यातून हरगिला पक्ष्यांबाबत जनजागृती आणि या महिलांचे आर्थिक स्वावलंबन या दोन्ही गोष्टी साध्य होतात.

हरगिला म्हणजेच मोठा करकोचा या पक्ष्यावर आज जी वेळ आली आहे, तीच निसर्गातील इतरही अनेक घटकांवर म्हणजे प्राणी, पक्षी, कीटक, वनस्पती यांच्यावरही आली आहे. यातील अनेक घटकांचे अधिवास झपाट्याने नष्ट होत आहेत. ते दुर्मीळ या श्रेणीत मोडत आहेत. त्यांना वाचवण्यासाठी झपाट्याने पावले उचलण्याची गरज आहे. हरगिला पक्ष्यांना जशा पूर्णिमा देवी मिळाल्या, तशाच आणखी अनेक पूर्णिमा देवी इतरही नैसर्गिक घटकांना मिळाव्यात. पुढच्या पिढ्यांसाठी ही पृथ्वी अशीच सुंदर राहण्यासाठी त्याची फार गरज आहे.