बापू राऊत

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय समाजाला उद्देशून म्हणाले होते की, धर्म हा तुमचा आवडता विषय आहे, त्यामुळे तुम्ही हिंदू धर्मीय लोकाजवळ धार्मिक व सामाजिक हक्काची मागणी करता. परंतु तुम्हास ते अधिकार देण्यास तयार नाहीत. ज्या हिंदू धर्मात तुम्ही आहात त्याच धर्माचे लोक तुमचा द्वेष करतात. तुम्हाला शत्रू मानतात. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही तुमच्यासाठी नवा मार्ग चोखाळला पाहिजे. निष्कारणपणे हिंदू लोकांचे चरण धरून व विनविण्या करून तुम्ही तुमच्या माणुसकीला कमीपणा आणू नका. जे धर्म तुमच्या सामाजिक सुधारणा व उन्नतीकडे लक्ष देतात त्या धर्मासबंधी विचार करा. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या धर्मांतराच्या ६६ वर्षानंतरही हिंदू धर्म, तिची संस्कृती व धर्ममार्तंड लोकांच्या स्वभावगुणधर्मात आजही बदल झालेला दिसून येत नाही. रोज कोठे ना कोठे काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटना घडत आहेत. त्यामुळे मागासवर्गीय समाजात अस्वस्थेतून हिंदू धर्म सोडून इतर धर्मात जाण्याचे प्रमाण वाढले असून ज्यांना मानवतेची कास आहे अशा अनेक सुपरिचित व्यक्तींनी सुध्दा बौध्द धर्माची दीक्षा घेतलेली दिसते.

readers reaction on loksatta editorial
लोकमानस: बाबा शक्तिशाली झाले त्यात आश्चर्य ते काय?
Supreme Court ban Patanjali from advertising
अग्रलेख : बाबांची बनवेगिरी !
loksatta kutuhal article about perfect artificial intelligence
कुतूहल : परिपूर्ण बुद्धिमत्तेचे धोके
singer suresh wadkar praises pm narendra modi
उलटा चष्मा : दिव्यत्वाची प्रचीती…

धर्मांतराच्या घटना

भारतातील पहिले मोठे धर्मांतर हे नागपूर येथे १४ ऑक्टोबर १९५६ रोजी झाले. या धर्मांतराचे मुख्य प्रवर्तक असलेल्या बाबासाहेब आंबेडकर यांचेसोबत ५ लाख लोकांनी धर्मांतर केले होते. हिंदू धर्मात मिळालेल्या वाईट अनुभवामुळे “मी हिंदू म्हणून जन्मलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही,” अशी घोषणा करीत “जन्म कोठे घ्यावा हे माझ्या हातात नव्हते परंतु मी कोणत्या धर्मात मरावे हे माझ्या हातात आहे” असे त्यांनी म्हटले होते. आज संपूर्ण देशात बऱ्याच ठिकाणी बौद्ध धर्मात धर्मांतरित होण्याचे प्रमाण वाढले आहे. हे धर्मांतर लपवाछपवी न करता शासकीय यंत्रणाकडे नोंद करून केले जात आहे. यात आमिष, पैसा व बळजबळी दिसत नसून त्यात धर्मवादी छळवणुकीच्या मानसिकतेतून बाहेर पडल्याची भावना त्यांच्या प्रतिक्रियेतून दिसून येते. बौद्ध धम्म हा भारताच्या भूमीत जन्मलेला धर्म असून आजच्या बहुसंख्य जनतेचे पूर्वज हे बौद्धधर्मीय होते. हा दावा नाकारता येण्यासारखा नाही.

माजी खासदार उदित राज यांनी २००१ मध्ये दिल्ली येथे दहा हजार लोकासोबत बौद्धधर्म स्वीकारला होता. गुजरातमधील ऊना येथे ३०० हिंदूनी (वर्ष २०१६) गाय रक्षक तुकडीने मारल्याच्या निषेधार्थ बौद्ध धर्माची दिक्षा घेतली. सहारनपुर (वर्ष २०१७) येथे १८० हिंदूंनी तर २०१८ मध्ये उत्तर प्रदेशातील बहराइचच्या माजी खासदार सावित्रीबाई फुले यांनी कानपूर येथे दहा हजार जणांसोबत बौद्धधर्म स्वीकारला. विशेषत: २०२१-२२ मध्ये धर्मांतराचे प्रमाण अधिक वाढलेले दिसते. राजस्थान राज्यातील बांरा येथे २५० लोकांनी, भुलोन येथे एका कुटुंबातील १२ सदस्यांनी तर भरतपूर जिल्ह्यातील सामूहिक विवाह मेळ्यात ११ नवविवाहित जोडप्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला. हिंदू धर्मात अपमान व उपहासाव्यतिरिक्त काहीही मिळाले नाही असे सांगून १७ ऑक्टोबर २०२२ रोजी कर्नाटकातील शोरापूर येथे ४५० स्त्रीपुरुषांनी बौद्धधर्म प्रवेश केला. उत्तराखंड येथील काशीपुर येथे ३००, तर लखनऊ येथेही २२ प्रतिज्ञाचे उच्चारण करीत बौद्ध धम्म दीक्षा घेतली. गुजरात राज्यातील बालासिनोर, अहमदाबाद, दानालीपाडा, कलोल आणि सुरेंद्रनगर येथील ३९६ व्यक्तींनी बौद्ध धम्म दीक्षा घेतली. विशेष म्हणजे यातील काही लोकांनी धर्मांतरानंतर आपापल्या घरातील देवी-देवतांच्या मूर्ती व चित्रे नदी पात्रात सन्मानाने विसर्जित केल्या.

दीक्षाभूमी नागपूर (वर्ष २०२२) येथील धर्मदीक्षेत २०० लोकांसोबत नवसृजन ट्रस्टच्या प्रमुख मंजुळा प्रदीप यांच्यासमवेत ९० गुजराती हिंदुचा समावेश होता, तर औरंगाबाद येथे रोजी श्रावण गायकवाड, भारत पाटणकर (सांगली), अच्युत भोईटे (मुंबई), लक्षण घुमरे (बुलढाणा) यांच्यासह ४०७ हिंदूंनी दीक्षा घेतली. छत्तीसगडमधील राजनांदगाव येथे महापौरांच्या उपस्थितीत अनेकांनी बौद्ध धर्मप्रवेश केला. मात्र या सगळ्यात अधिक गाजावाजा झाला तो आम आदमी पक्षाचे मंत्री राजेंद्र पाल यांचा. १४ ऑक्टोबर २०२२ रोजी दहा हजारपेक्षा अधिक लोकांसोबत झालेल्या बुद्धधर्म दीक्षा समारोहात त्यांच्याकडून बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या २२ प्रतिज्ञा म्हणण्यात आल्या. त्यावर भाजपकडून आक्षेप घेण्यात आल्याव, त्यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा घेण्यास केजरीवाल यांस भाग पाडले.

धर्मांतराची कारणे

‘आम्हाला तुमच्यासारखेच माणूस म्हणून जगण्याचे अधिकार आहेत. हिंदू म्हणून तुम्ही जे धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक स्वातंत्र्य उपभागता, तेच स्वातंत्र्य हिंदू म्हणून आम्हास हवे आहे,’अशी दलितांची मागणी आहे. परंतु स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवापर्यंतसुद्धा देशात एका हिंदूकडून दुसऱ्या हिंदूवर अत्याचार चालूच असल्याच्या घटना घडत आहेत. अत्याचारांच्या या घटनांमुळे लोकामध्ये अस्वस्थता वाढून धर्मांतराच्या अनेक घटना घडू लागल्या आहेत. त्यापैकी काही कारणे खालीलप्रमाणे आहेत.

कर्नाटकातील शोरापुर (अमलिहला गाव) येथील स्थानिक मंदिरात दलितांना प्रवेश नाकारण्यात आला. कोलार जिल्ह्यात मंदिरातील देवीच्या खांबाला हात लागल्यामुळे एका व्यक्तीस ६०हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. तर याच तालुक्यातील किरधल्ली गावात दलितांच्या घरी एखाद्याचा मृत्यू झाल्यास अंत्यसंस्कार कार्यासाठी बाहेर गावावरून येणाऱ्या दलितांचा कोणत्याही कारणाने दुकानात येऊन स्पर्श होवू नये यासाठी गावातील सवर्ण आपली सर्व हॉटेले व दुकाने बंद करतात. चामराजनगर जिल्ह्यातील हेगगोतरा गावात (१८ नोव्हेंबर २०२२) एका दलित महिलेने पाणी पिण्यासाठी पाण्याच्या टाकीला हात लावला म्हणून टाकीला गोमूत्राने साफ करण्यात आले. राजस्थानमधील जितेंद्रपाल मेघवाल या दलित युवकाची सोशल मिडीयात मिशावर पीळ देणारा फोटो टाकल्यामुळे हत्या करण्यात आली. तर, जालोर येथील शाळेत इंद्रकुमार मेघवाल या विद्यार्थ्याचा ‘शिक्षकासाठी राखीव’ माठातील पाणी प्यायल्यामुळे शिक्षकाच्या मारहाणीत मृत्यू झाला. एका आयपीएस पोलीस अधिकाऱ्याला दलित असल्यामुळे घोडीवर बसून लग्नाची वरात काढण्यास विरोध करण्यात आला. मध्यप्रदेशातील भिंड (दाबोहा) येथे दिलीप शर्मा नामक व्यक्तीशी विवाद केल्यामुळे पंचायतीकडून दीड लाख रुपये देण्याचे सांगून दोन भावांचे डोके भादरण्यात येऊन गावातून धिंड काढण्यात आली.

दलित स्त्रिया व तरुणी हा तर अत्याचारास हमखास बळी पडणारा वर्ग ठरला आहे. बरेली जिल्ह्यात बलात्कारित पीडितेच्या आईवडिलांनी समझोत्यास नकार दिल्यामुळे त्यांची हत्या करण्यात आली. त्याच जिल्ह्यात दहावीत शिकणाऱ्या उच्च जातीच्या मुलीसोबत बोलल्यामुळे दलित मुलाच्या गळ्यात चपलांचा हार टाकून गावातून त्याची धिंड काढण्यात आली. द प्रिंट मधील बातमीनुसार, १४ वर्षीय माया या मुलीच्या शाळेमध्ये सवर्ण समाजाच्या विद्यार्थिनी ती दलित असल्यामुळे जवळ बसत नव्हत्या. तू दूर रहा, तू खालच्या जातीची आहेस, असे टोमणे तिला मारले गेले.

मध्यप्रदेशात ‘चाइल्ड राइट्स ऑब्झर्व्हेटरी’ व ‘मध्यप्रदेश दलित अभियान संघ’ या संस्थांमार्फत दहा जिल्ह्यात झालेल्या सर्वेक्षणानुसार ९२ टक्के दलित मुलामुलीना शाळेत पाणी पिऊ दिले जात नाही. ८० टक्के गावांत मंदिरात प्रवेश दिला जात नाही. तर गावात मुलामुलींचे चांगले नाव ठेवल्यास कुटुंबास मारहाण करण्यात येते. दक्षिणेतील तामिळनाडूमध्ये दलित सरपंचाला राष्ट्रध्वज फडकावू दिला गेला नाही. ‘तामिळनाडू अस्पृश्यता निवारण फ्रंट’ने केलेल्या सर्वेनुसार ८६ पंचायतीपैकी २० दलित पंचायती प्रमुखांना खुर्ची उपलब्ध करून दिली गेली नव्हती. तर फलकावरील पंचायती प्रमुखांच्या यादीमध्ये दलित पंचायती प्रमुखांचे नाव टाकले जात नाही. काही शाळांमध्ये केवळ दलित विद्यार्थ्यांनाच मुत्री/शौचालय साफ करायला लावले जाते.

हिंदू यावर कधी विचार करणार ?

खरे तर एक हिंदू दुसऱ्या हिंदुवर एवढ्या क्रूरपणे अत्याचार का करतात? यावर विचार करून ते थांबविण्याची गरज आहे. जे अत्याचार करतात त्यांना न्यायालयामार्फत जबर शिक्षा होण्यासाठी योग्य मार्गाने दबाव टाकला पाहिजे. आपले अधिकार मागणाऱ्यांचे डोके फोडण्यासाठी दगड उचलण्याएवढी असहिष्णुता काही जातीमध्ये कशी जिवंत राहिली यावर मंथन होणे आवश्यक आहे. परंतु यावर उपायांची पायाभरणी होणार नसेल तर धर्मपरंपरेतून सदैव अपमानित करणाऱ्या व मानवी हक्काची मागणी केली तर डोकी फोडण्याच्या संस्कृतीतून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग उरतो, तो म्हणजे धर्मांतर. अशा पीडितांना चिकित्सेतून आपल्यासाठी कोणता धर्म चांगला याचे मूल्यमापन करून नवीन धर्म स्वीकारण्याचे स्वातंत्र्य असले पाहिजे. एकाच धर्मात एकाने मालक बनावे व दुसऱ्याने गुलामासारखी परिस्थिती स्वीकारावी हे कसे चालेल. एखाद्याच्या धर्म स्वातंत्र्याचा विचारच करणार नसाल, तर मग त्यांनी “तुम्ही आमचे मालक बनावे हे तुमच्या हिताचे असेल, परंतु आम्ही तुमचे गुलाम बनावे हे आमच्या हिताचे नाही” असे म्हणत कृती केली तर ते राष्ट्रहितच समजले पाहिजे. कारण समता व मानवी कल्याण हा राष्ट्रहिताचाच सर्वोच्च बिंदू असतो.

लेखक सामाजिक/राजकीय घडामोडींवर नियमित लिखाण करतात. bapumraut@gmail.com