पहलगाम हल्ल्यानंतर भारताचे ‘ऑपरेशन सिंदूर’ एकीकडे सुरू असताना, देशांतर्गत हेरगिरीचाही शोध सुरू झाला. यातून एक नाव बातम्यांमध्ये आले ते म्हणजे प्रसिद्ध यूट्यूबर व्लॉगर ज्योती मल्होत्रा. हरियाणा पोलिसांनी तिला पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे.
हिस्सार येथे राहणारी ज्योती राणी मल्होत्रा हिने सुरुवातीला काही खासगी कंपन्यांमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून नोकरी केली. लॉकडाऊन काळात नोकरी गेल्यावर तिने स्वतंत्र करिअर म्हणून यूट्यूबची निवड करून, यूट्यूबवर ती छोटे – मोठे व्लॉग अपलोड करू लागली. लॉकडाऊन संपल्यानंतर तिने आपला मोर्चा ट्रॅव्हल व्लॉगकडे (व्हीडिओ ब्लॉग) वळवला. हळूहळू तिचे व्लॉग प्रेक्षकांच्या पसंतीस उतरू लागल्याने तिचे सबस्क्रायबरदेखील झपाट्याने वाढू लागले. ट्रॅव्हल व्लॉगला जास्त रीच येऊ लागल्यावर तिने तिचे जुने काही व्हिडिओ हटवले. नंतरच्या व्हिडिओमध्ये ती कधी मनाली, कधी होलसेल शॉपिंग मार्केटचे व्हिडिओ तर कधी भारतातील वेगवेगळ्या राज्यातील पर्यटनस्थळे, देवस्थाने यांना भेट देऊन त्या ठिकाणांचे व्हिडिओ बनवू लागली. ते यूट्यूब प्रेक्षकांच्या पसंतीसही उतरले. पण एवढ्यावर ती शांत बसली नाही कारण तिला पाहिजे तसा प्रतिसाद यूट्यूबवरून मिळत नव्हता. अर्थातच सब्स्क्रायबर वाढवून प्रसिद्धी मिळवणे हा हेतू तर होतच त्यचबरोबर यूट्यूबवरून मनासारखी कमाई होत नसल्याने तिने परदेशी दौऱ्याचे व्हिडिओ बनवण्याचे ठरवले. पासपोर्ट काढल्यावर सर्वात स्वस्त आणि मस्त म्हणून तिने पाकिस्तानला जाण्याचा निर्णय घेतला.
पाकिस्तानच्या पहिल्या भेटीतील तिचा पहिला व्लॉग ‘इंडियन गर्ल व्हिजिटेड लास्ट व्हिलेज ऑफ पाकिस्तान’ या नावाने दिसू लागला. या व्हिडिओला आत्तापर्यंत जवळपास १.८ लाख व्ह्यूज मिळाले आहेत. नंतर तिने संयुक्त अरब अमिराती, थायलंड, बांग्लादेश, पाकिस्तान, चीन, नेपाळ असे अनेक परदेश दौरे केले. एकूण सर्व व्हिडिओंपैकी तिच्या पाकिस्तान आणि बांग्लादेशच्या व्हिडिओजना काही दशलक्ष व्ह्यू मिळाले आहेत.
तपास यंत्रणांकडून समजलेली माहिती अशी की, पाकिस्तानला भेट देण्यासाठी कायदेशीर बाबी पूर्ण करताना तिची भेट शीख गुरुद्वारा समितीचे कर्मचारी असलेल्या हरकिरत सिंग यांच्याशी झाली. त्यांनीच पुढे तिची ओळख पाकिस्तानी उच्चायुक्त अधिकारी दानिश याच्याशी करून दिली. पुढे या ओळखीचे रुपांतर मैत्रीमध्ये झाले. वैयक्तिक नंबर शेअर होऊन गप्पा गोष्टी होऊ लागल्या. दानिशने याचा फायदा घेत ज्योतीचे ब्रेनवॉश करून तिला हनीट्रॅपमध्ये अडकवून तिचा पाकिस्तानसाठी फायदा करून घेतला, असा प्राथमिक अंदाज आहे. त्याची पुष्टी अद्याप झाली नसली तरी हे खरे की, यानंतर तिने जेव्हा जेव्हा पाकिस्तानचे दौरे केले तेव्हा तेव्हा तिने व्हिडिओतून पाकिस्तानचे सकारात्मक चित्र जगासमोर सादर करण्याचा पूरेपूर प्रयत्न केला. तिने जेव्हा पाकिस्तानचे व्हिडिओ अपलोड केले होते तेव्हाच ते पाहताना असा प्रश्न पडायचा की ज्योती ना सरकारी अधिकारी, ना कोणती राजकीय व्यक्ती, ना कोणी सेलिब्रिटी तरीसुद्धा तिला एवढी सुरक्षा कशी काय मिळते पाकिस्तानमध्ये! पाकिस्तानमधील तिचा रेल्वेप्रवासाचा व्हिडिओ तर तुफान व्हायरल झाला होता. तिचे बोलणे किंवा ती ज्या लोकांच्या मुलाखती घेत होती ते पाहून भारतीय लोकही भाळून गेले होते. काहीजणांनी सकारात्मक प्रतिक्रिया नोंदवल्या होत्या.
ज्योतीचे सर्व व्हिडिओ पाहिले तर तिने पाकिस्तानच्या भेटीचा जो व्हिडिओ अपलोड केला होता तिथून तिला अधिकाधिक प्रसिद्धी मिळत गेल्याचे दिसून येते. पाकिस्तान भेटीच्या व्हिडिओला मिळत असलेला सकारात्मक प्रतिसाद पाहून पाकिस्तानी यंत्रणांनी पैशाचे तसेच वेगवेगळे आमिष दाखवून तिला पुन्हा पुन्हा पाकिस्तानचे व्हिडिओज बनवण्यासाठी तयार केले असावे आणि त्या व्हिडिओमधून वाढत जाणाऱ्या सबस्क्राईबर आणि व्ह्यूच्या आकड्यांमुळे ज्योतीला देखील आपण जे करतो ते योग्य आहे असे वाटले असावे. रील, सोशल मिडियाच्या आभासी दुनियेत रमणारी ज्योतीने झटपट प्रसिद्धी, पैशाची श्रीमंती, ऐषारामाचे आयुष्य जगण्याच्या नादात खऱ्याखुऱ्या आयुष्यात पुरती फसली, असे म्हणावे का?
हे फक्त ज्योतीबाबतच घडले आहे असे नाही. पाकिस्तानने ज्योतीसारखेच अजून काही देशातील इन्फ्लुएन्सर, यूट्यूबरना आमिष देऊन आपल्या जाळ्यात ओढले असावे. यामध्ये नेदरलँडची फ्लोरा गोनिंग, अमेरिकेची वॅली बी, ऑस्ट्रेलियाची इरिना यामिन्स्का, स्कॉटलंडचे ॲलन अँड शॅनन हे यूट्यूबर्स आहेत. या सर्वांच्या व्हिडिओमधून सारखीच कहाणी आहे ती म्हणजे पाकिस्तानची स्वच्छ प्रतिमा निर्माण करणे. फक्त व्हिडिओमधले चेहरे वेगळेवेगळे आहेत.
पाकिस्तानी आयएसआय ने सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचीच निवड करण्याची कारणे स्पष्टच आहेत. सोशल मीडियाचा वापर हा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यात कंटेन्ट क्रिएटरनादेखील झटपट प्रसिद्ध होण्याचे खूळ डोक्यात घुसलेले असते. जितके जास्त फॉलोअर्स तितकी जास्त प्रसिद्धी आणि त्यातून पैसा. त्यातही ट्रॅव्हल व्लॉगकडे प्रेक्षकांचा जास्त कल असतो. हे लक्षात घेऊन पाकिस्तानी आयएसआय ने त्यांचा मोर्चा सोशल मीडियाकडे वळवला आणि त्याचा फायदा त्यांनी पूरेपूर उचलला.
ही फक्त एकट्या ज्योतीची कहाणी नाही. असे अनेक व्लॉगर आहेत जे पर्यटन करताना व्ह्यूजसाठी संवेदनशील ठिकाणी जाऊन व्लॉग बनवतात तेथील कर्मचाऱ्यांच्या मुलाखती घेत असतात. तसेच आपल्या देशातील इलेक्ट्रॉनिक मीडिया देखील तितकाच जबाबदार आहे. कारण ब्रेकिंग न्यूज, टीआरपी वाढवण्यासाठी ते देखील अनेकदा अशाच अनेक संवेदनशील ठिकाणी जाऊन बातमीच्या नावाखाली संपूर्ण ठिकाणाची माहिती देत असतात तिथे बंदोबस्तला असलेल्या जवानांकडून प्रत्येक गोष्टीची सविस्तर माहिती घेत असतात. म्हणजे एखाद्या लष्करी तळावर जाऊन तेथील जवानांकडून प्रत्येक गोष्टीची खोलवर माहिती घेणे किंवा देशाने कोणतेही नवीन मिशन हाती घेतले तरी इत्थंभूत वर्णन करून सांगतात. यामार्फत देखील शत्रू राष्ट्रांना आपल्या देशात काय घडामोडी चालल्या आहेत याची माहिती पोहोचते.
त्यामुळे सरकारने माध्यमांवर सरसकट राजकीय दबाव आणण्याचे थांबवून, देशहिताच्या दृष्टीने या ट्रॅव्हल व्लॉगर आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाशी संबंधितांवर कडक नियमावली आखली पाहिजे. संवेदनशील ठिकाणचे व्लॉग बनवणे, ब्रेकिंग न्यूज, टीआरपीसाठी तिथे जाऊन वार्तांकन करण्यावर कडक निर्बंध आणले पाहिजेत. तरच अशा प्रकरणांना आळा बसेल.
((समाप्त))