प्रा. डॉ. मयूर पाटील
शिक्षण ही मानवी प्रगतीची पायाभरणी आहे. ‘सा विद्या या विमुक्तये’ म्हणजेच ‘विद्या ती जी मुक्त करते’ असे आपल्या संस्कृतीने मानले आहे. मात्र, आजच्या २१व्या शतकातील झपाट्याने बदलणाऱ्या जगात आपली शिक्षण व्यवस्था खरोखरच विद्यार्थ्यांना मुक्त करत आहे, की त्यांना एका साचेबद्ध यंत्रणेचा भाग बनवत आहे हा कळीचा प्रश्न झाला आहे. आज आपण पदव्यांचा महापूर पाहत आहोत, परंतु त्या पदव्यांच्या मागे असलेले सखोल ज्ञान आणि प्रगल्भता कुठे तरी हरवताना दिसते. केवळ गुणांच्या शर्यतीत धावताना आणि तांत्रिक सोपस्कार पूर्ण करताना विद्यार्थ्यांमधील ‘विद्यार्थीपण’ लोप पावत आहे, ही वस्तुस्थिती नाकारून चालणार नाही.

सेमिस्टर पद्धत- धावणारा अभ्यासक्रम आणि हरवलेले आकलन

शिक्षण क्षेत्रातील सुधारणांच्या नावाखाली स्वीकारलेली ‘सेमिस्टर पद्धत’ (सहामाही सत्र पद्धत) ही मुळात पाश्चात्य शैक्षणिक प्रारूपाचे अनुकरण होती. या पद्धतीचा मुख्य उद्देश हा वार्षिक परीक्षेचा ताण विभागणे आणि विद्यार्थ्यांचे सातत्यपूर्ण मूल्यमापन करणे हा होता. मात्र, भारतीय शैक्षणिक वास्तव आणि उपलब्ध संसाधनांच्या पार्श्वभूमीवर या पद्धतीने ज्ञानाच्या प्रक्रियेतील सर्वांत महत्त्वाचा घटक अर्थात वेळ हिरावून घेतला आहे. कागदावर एका सेमिस्टरचा कालावधी सहा महिन्यांचा दिसत असला, तरी प्रत्यक्षात तो एक काळाचा आभास ठरत आहे. शैक्षणिक सत्राची सुरुवात आणि प्रत्यक्ष अध्यापन यांच्यात मोठी दरी असते. प्रवेश प्रक्रियेतील विलंब, कागदपत्रांची पूर्तता आणि सुरुवातीचे दिशादर्शन यातच सत्राचा पहिला दीड-दोन महिन्यांचा काळ खर्ची पडतो. भारतीय संस्कृतीतील सण-उत्सव आणि सुट्ट्यांचा विचार करता, प्रत्यक्ष वर्गात होणारे अध्यापन जेमतेम ९० ते १०० दिवसांवर येऊन ठेपते. महाविद्यालयीन सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा आणि वार्षिक स्नेहसंमेलने यांमुळे प्रत्यक्ष शैक्षणिक वेळापत्रक अधिकच संकुचित होते. शिक्षणाची प्रक्रिया ही केवळ माहितीचे संक्रमण नसून ती बौद्धिक मशागत आहे. सेमिस्टर पद्धतीतील वेळेच्या अभावामुळे विषयाची सखोल ओळख करून घेण्याऐवजी केवळ धावती ओळख करून घेण्यावर भर दिला जातो. एखाद्या कठीण संकल्पनेवर वर्गात सविस्तर चर्चा करणे, त्यातील बारकावे समजून घेणे आणि त्यावर स्वतःचे मत मांडणे यासाठी जो वेळ हवा असतो, तो या धावपळीत पूर्णपणे नष्ट झाला आहे. वेळेअभावी शिक्षक केवळ परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे मुद्दे अधोरेखित करतात. परिणामी, विद्यार्थ्यांची विषयाबाहेरील संदर्भग्रंथ वाचण्याची किंवा स्वतंत्र संशोधन करण्याची वृत्ती संपुष्टात येते. सेमिस्टर पद्धतीमुळे आपण अनवधानाने परीक्षा-केंद्रित पिढी घडवत आहोत. एका परीक्षेचा निकाल लागण्यापूर्वीच दुसऱ्या परीक्षेचा फॉर्म भरण्याची वेळ येते. यामुळे विद्यार्थ्यांची मानसिकता ही केवळ पुढील अडथळा पार करणे अशी बनली आहे. विद्यार्थी केवळ सहा महिन्यांपुरता अभ्यास करतात. एकदा परीक्षा झाली की त्या विषयाशी असलेले त्यांचे नाते तुटते. वार्षिक पद्धतीत विषयाचे वर्षभर होणारे परिशीलन ज्ञानाला दीर्घकालीन स्मृतीमध्ये साठवण्यास मदत करत असे, जे आता दुरापास्त झाले आहे. सातत्यपूर्ण अंतर्गत मूल्यमापनामुळे गुणांची टक्केवारी वाढली असली, तरी त्या प्रमाणात विद्यार्थ्यांच्या ज्ञानाची पातळी उंचावलेली नाही. केवळ विद्यार्थ्यांवरच नव्हे तर शिक्षकांवरही या पद्धतीचा विपरीत परिणाम झाला आहे. अभ्यासक्रम पूर्ण करण्याच्या डेडलाईनमुळे शिक्षकांना त्यांच्या अध्यापन कौशल्याचा पूर्ण वापर करता येत नाही. शिक्षकांना रटाळपणे अभ्यासक्रम पूर्ण करावा लागतो. विषयातील नवनवीन प्रवाह सांगण्यासाठी किंवा विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी लागणारा वेळ सबमिशन गोळा करण्यात आणि रेकॉर्ड ठेवण्यात खर्च होतो. वर्षभर चालणाऱ्या परीक्षा, घटक चाचण्या आणि प्रात्यक्षिके यामुळे शिक्षकांचा जास्तीत जास्त वेळ पेपर तपासण्यात जातो ज्यामुळे त्यांच्या स्वतःच्या वाचनावर आणि संशोधनावर मर्यादा येतात. सेमिस्टर पद्धतीमुळे शिक्षणाची गती वाढली असली, तरी त्याची व्याप्ती आणि गहनता कमी झाली आहे. आपण अशा एका व्यवस्थेत अडकलो आहोत जिथे आपण पदव्यांचे वितरण तर जलद गतीने करत आहोत, पण त्या पदवीला साजेसे प्रगल्भ ज्ञान मात्र विद्यार्थ्यांकडे नाही. जर शिक्षणाचा मूळ हेतू केवळ साक्षर करणे नसून सुजाण बनवणे असेल, तर आपल्याला या पद्धतीतील त्रुटींवर गांभीर्याने विचार करून वेळ आणि गुणवत्ता यांचा समतोल साधणारी नवी चौकट उभारावी लागेल.

सबमिशनचा डोंगर- लेखनिक की अभ्यासक?

आजच्या शिक्षण व्यवस्थेतील सर्वांत जाचक आणि वेळखाऊ गोष्ट म्हणजे सबमिशन (प्रकल्प आणि असाइनमेंट्स). प्रात्यक्षिक ज्ञानासाठी प्रकल्प असणे गरजेचे आहे, यात शंका नाही. मात्र, सध्या या उपक्रमाचे स्वरूप केवळ नक्कल करण्यापुरते मर्यादित राहिले आहे. विद्यार्थी शेकडो पाने लिहून काढतात, जर्नल्स पूर्ण करतात पण त्यातील आशय त्यांच्या मेंदूपर्यंत पोहोचतो का? हा मोठा प्रश्न आहे. इंटरनेटवरून माहिती कॉपी करणे आणि ती कागदावर उतरवणे यात विद्यार्थ्यांचा बहुमोल वेळ खर्च होत आहे. ज्या वेळेत विद्यार्थ्यांनी प्रयोगशाळेत प्रयोग करायला हवे होते किंवा ग्रंथालयात संदर्भग्रंथ वाचायला हवे होते, तो वेळ केवळ लिहिण्याच्या तांत्रिक कामात वाया जात आहे. या ओझ्याखाली विद्यार्थ्यांची सर्जनशीलता दडपली जात असून ते केवळ एक कुशल लेखनिक होत आहेत.

अभिरुचीचा ऱ्हास- शिक्षणाची ओढ की सक्ती?

जेव्हा शिक्षण हे केवळ परीक्षा आणि गुणांशी जोडले जाते, तेव्हा त्यातील आनंद निघून जातो. आजच्या विद्यार्थ्यांमध्ये विषयाबद्दलची नैसर्गिक आवड किंवा अभिरुची कमी होताना दिसत आहे. वर्गात बसणे, हजेरी लावणे आणि नोट्स काढणे हे एक कर्तव्य म्हणून केले जाते, इच्छा म्हणून नाही. शिक्षणाचे बाजारीकरण आणि स्पर्धात्मक वातावरणामुळे विद्यार्थ्यांच्या मनावर सतत एक अदृश्य दडपण असते. ज्या शिक्षणामुळे मनाचा विकास व्हायला हवा होता, तेच शिक्षण आता तणावाचे कारण ठरत आहे. विषयाची गोडी लागण्याऐवजी, हा विषय कधी एकदा संपतोय आणि मी कधी परीक्षेतून मोकळा होतोय अशी भावना विद्यार्थ्यांमध्ये बळावत आहे. ही वृत्ती भविष्यातील संशोधक किंवा विचारवंत घडवण्यासाठी घातक आहे.

संकल्पनात्मक आकलनाचा अभाव- पाठांतराची संस्कृती

शिक्षण म्हणजे केवळ माहिती गोळा करणे नव्हे, तर ती माहिती समजून घेणे आणि तिचा वापर करणे होय. मात्र, सध्याची परीक्षा पद्धती ही विद्यार्थ्यांच्या स्मरणशक्तीची परीक्षा घेणारी आहे, त्यांच्या बुद्धिमत्तेची नाही. महत्त्वाचे प्रश्न पाठ करणे आणि ते उत्तरपत्रिकेत उतरवणे, यालाच यश मानले जात आहे. विद्यार्थ्यांना सिद्धांतामागील ‘का’ आणि ‘कसे’ या प्रश्नांची उत्तरे माहिती नसतात. जर परीक्षेतील प्रश्न पुस्तकातील भाषेपेक्षा थोडा फिरवून विचारला, तर अनेक विद्यार्थी गोंधळून जातात. याचे कारण म्हणजे संकल्पनात्मक आकलनाचा अभाव. विषयाचा पाया कच्चा राहिल्यामुळे उच्च शिक्षणात आणि प्रत्यक्ष कार्यक्षेत्रात विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. आपण केवळ पदवीधर निर्माण करत आहोत, पण तज्ज्ञ निर्माण करण्यात अपयशी ठरत आहोत.

कुतूहलाचा अंत- प्रश्न विचारणे थांबले की प्रगती थांबते

प्रश्न विचारणे हे जिवंत मनाचे लक्षण आहे. लहान मुलांमध्ये असलेले कुतूहल जसजसे ते शिक्षण व्यवस्थेत पुढे जातात, तसतसे कमी होत जाते. कुतूहल ही विज्ञानाची आणि प्रगतीची जननी आहे. मात्र, रेडीमेड नोट्स आणि गाईड्सच्या जगात स्वतःहून शोध घेण्याची प्रवृत्ती नष्ट होत आहे. विद्यार्थ्यांना उत्तरे तयार हवी आहेत, पण ती उत्तरे शोधण्यासाठी लागणारा संघर्ष त्यांना नकोसा वाटतो. जेव्हा विद्यार्थ्यांमधील कुतूहल संपते, तेव्हा संशोधनाची आणि नवनिर्माणाची दारे कायमची बंद होतात.

शिक्षण व्यवस्थेतील हा दोष केवळ विद्यार्थी किंवा शिक्षकांचा नाही, तर तो संपूर्ण व्यवस्थेचा आहे. आपल्याला पुन्हा एकदा शिक्षणाच्या मूळ उद्देशाकडे वळण्याची गरज आहे.

• केवळ परीक्षा घेण्यापेक्षा विद्यार्थ्यांना स्व-अध्ययनासाठी वेळ दिला जावा.

• नुसते कागदी प्रकल्प देण्याऐवजी प्रत्यक्ष फिल्ड वर्क किंवा प्रयोगशाळेतील कामाला महत्त्व दिले जावे.

• वर्गात प्रश्न विचारण्याचे स्वातंत्र्य आणि कुतूहल जागृत करणारे वातावरण निर्माण करणे आवश्यक आहे.

• पदवीसोबतच प्रत्यक्ष कार्यक्षेत्रातील कौशल्यांचा अंतर्भाव अभ्यासक्रमात असणे काळाची गरज आहे.

शिक्षण हे केवळ उपजीविकेचे साधन नसून ते जीवन जगण्याची कला शिकवणारे माध्यम असायला हवे. जर आपण वेळेत सुधारणा केली नाही, तर आपण फक्त साक्षर यंत्रे तयार करू, सुजाण आणि ज्ञानवंत नागरिक नाही. शिक्षणातील हरवलेले ‘शिक्षण’ पुन्हा मिळवणे, हेच आपल्या देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वांत मोठे आव्हान आहे.

(लेखक वनस्पतीशात्राचे सहाय्यक प्राध्यापक आहेत)

mayurpatil49@gmail.com