मानवी समाजात एका टप्प्यावर राज्य यंत्रणा निर्माण झाली. हा टप्पा म्हणजे साधारण शेतीच्या रूपात स्थायी संपत्ती निर्माण होणे मानला जातो. तेव्हापासून आजपावेतो या राज्य यंत्रणेचे स्वरूप उत्पादन संबंधानुरूप तसेच स्थळकाळानुरूप बदलत गेले. पण त्यातील प्रमुख घटक कोणत्याही काळात, कुठेही सारखेच होते. ते घटक म्हणजे कायदे निर्मिती, त्यांची अंमलबजावणी, त्याआधारे न्यायदान आणि राज्याचे आंतरिक तसेच बाह्य संकटांपासून संरक्षण. राज्यशास्त्राच्या विकासानंतर या घटकांना राज्य यंत्रणेचे स्तंभ म्हटले जाऊ लागले. सरंजामदारी व्यवस्थेपर्यंत यासर्व स्तंभांचे प्रमुखपद एकाच व्यक्तीकडे राहात असे. त्यामुळे त्या व्यक्तिच्या मताप्रमाणेच सर्व कारभार चालत असे. पण भांडवलशाही अर्थव्यवस्थेच्या उदयानंतर संसदीय लोकशाही म्हणून जी राज्यव्यवस्था निर्माण झाली, त्यात मात्र हे सर्व स्तंभ स्वतंत्र आणि एकमेकांचे नियंत्रक असतील, असे मानले गेले. तसेच संरक्षण करणारी यंत्रणा ही अंमलबजावणी यंत्रणेचा भाग मानली गेली. पुढे या व्यवस्थेच्या विकासादरम्यान प्रसारमाध्यमं ही चौथा स्तंभ म्हणून ओळखली जाऊ लागली. प्रत्यक्षात मात्र संरक्षणासाठी असलेली यंत्रणा म्हणजेच खडी सेना हादेखील राज्य यंत्रणेचा प्रमुख स्तंभ होय.

१० ऑक्टोबर २०२६ रोजी कॉकरोच जनता पार्टी आणि इतर विद्यार्थी संघटनांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीत जंतर मंतर या निदर्शनासाठी निर्धारित ठिकाणी आंदोलनाची घोषणा करताच, दिल्लीला जे स्वरूप प्राप्त झाले; ते पाहता राज्य यंत्रणेचे खरे रूप समोर आले. लोकशाहीची जननी म्हणवून घेताना तसेच आपण तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आणि विकसित राष्ट्र होण्याच्या उंबरठ्यावर आहोत; असा कितीही जयघोष केला, तरी प्रत्यक्षात प्रचंड आर्थिक संकटात आहोत. तरुणांना रोजगार देऊ शकणे तर दूरच; भ्रष्टाचाराच्या बजबजपुरीमुळे साध्या परीक्षादेखील मुक्त आणि निष्पक्षपणे घेणे दुरापास्त झाले आहे. त्याविरोधात देशभरात विविध ठिकाणी शांततापूर्ण आंदोलनं सुरू आहेत. आपण निवडणुका निःपक्षपणे घेऊ शकत नाही. मतदारांनी सरकार निवडायचे तर सरकारच मतदार निवडते आहे, हे उघड झालेले आहे. यामुळे त्रस्त झालेली युवा पिढी आपल्या न्याय्य हक्कांसाठी शांततापूर्ण आंदोलन करण्यासाठी राजधानीत येते, तर तिच्यावर तुटून पडण्यासाठी पोलीस आणि अर्ध सैनिक दलांचा जो वापर करण्यात आला, त्यांने सत्ताधाऱ्यांचे आणि त्यांच्या यंत्रणांचे खरे रूप प्रकट झाले. १० ऑक्टोबर २०२६ रोजी नवी दिल्लीत झालेले व्यापक आंदोलन चिरडण्यासाठी राज्य यंत्रणेने या दलांचा ज्या अभूतपूर्व पद्धतीने वापर केला, तो आधुनिक लोकशाहीतील नागरिक अधिकार आणि राज्यसंस्थेचे वाढते नियंत्रण यांमधील संघर्षावर प्रकाश टाकणारा आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी आणि निवडणूक प्रक्रियेतील एसआयआर व मतदार याद्यांमधील त्रुटींच्या विरोधात कॉकरोच जनता पार्टी आणि विविध युवा, विद्यार्थी संघटनांनी या आंदोलनाची हाक दिली होती. देशातील तरुण आणि ‘जेन झीं’चा वाढता सहभाग पाहता या आंदोलनाने मोठ्या जनआंदोलनाचे रूप घेतले होते. परंतु, प्रशासनाने या आंदोलनाला ‘बेकायदा’ ठरवून परवानगी नाकारली आणि दिल्लीला एका अभेद्य किल्ल्यात रूपांतरित केले. आंदोलन प्रत्यक्ष सुरू होण्यापूर्वीच राज्य यंत्रणेने आपल्या खड्या सेनेला राजधानीच्या रस्त्यांवर उतरवले होते. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार, दिल्ली पोलीस आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या कंपन्यांमधील सुमारे २३ हजार ते २६ हजार जवान दिल्लीच्या विविध भागांत तैनात करण्यात आले होते. शिवाय उत्तर प्रदेश पोलीस आणि हरियाणा पोलीस दलासह सुमारे ४० हजार जवानांचे कडे उभारण्यात आले होते. संपूर्ण नवी दिल्ली परिसरात बहूपदरी सुरक्षा कडे घालण्यात आले. रस्त्यांवर लोखंडी साखळ्यांनी वेढलेले आणि वेल्डिंग केलेले बॅरिकेड्स उभे करून प्रचंड फौजफाटा आणि नाकेबंदी करण्यात आली. जंतर-मंतरकडे जाणारे सर्व रस्ते पूर्णपणे बंद करण्यात आले होते.

आंदोलकांना दिल्लीत येण्यापासून रोखण्यासाठी सरकारने वाहतूक व्यवस्थेचाच गळा आवळला. ४५ मेट्रो स्थानकांचे प्रवेश आणि निकास मार्ग बंद करण्यात आले. नवी दिल्ली आणि निजामुद्दीन रेल्वे स्टेशनकडे देशभरातून येणाऱ्या शेकडो रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या. दिल्लीच्या सर्व वेशींवर प्रचंड नाकेबंदी करून वाहनांची तपासणी करण्यात येत होती. सर्वोच्च न्यायालयाने आदल्या दिवशीच दिलेल्या निर्देशला कचऱ्याची टोपली दाखवत हे सर्व करण्यात आले. इतकेच नव्हे तर हे सर्व घडल्यावर त्या संदर्भातील एका याचिकेची सुनावणी करण्याकरिता रविवारीदेखील न्यायालय सुरू ठेवून पुन्हा जे आदेश दिले, त्यानंतर काही तासांतच त्याच दिवशी या आदेशाचेदेखील सर्रास उल्लंघन केले गेले. याशिवाय, आंदोलकांवर पाळत ठेवण्यासाठी सुरक्षारक्षकांनी ड्रोन आणि बॉडी कॅमेरे वापरले, जेणेकरून गर्दीवर मानसिक दबाव निर्माण करता येईल. काही संवेदनशील भागांत इंटरनेट सेवाही खंडित करण्यात आली. अशा प्रकारे दळणवळणावर निर्बंध आणि तांत्रिक पाळत ठेवण्यात आली होती.

आंदोलनाचा मुख्य दिवस उजाडण्यापूर्वीच, ९ ऑक्टोबरच्या रात्रीपासूनच प्रमुख नेत्यांना, कार्यकर्त्यांना आणि जनमानसातील प्रभावी चेहऱ्यांना त्यांच्याच घरात नजरकैदेत ठेवण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व करणारे सौरव दास, अभिजीत दिपके आणि आशुतोष रांका यांसारख्या प्रमुख नेत्यांना प्रतिबंधात्मक कारवाईअंतर्गत विमानातूनच ताब्यात घेण्यात आले. १० ऑक्टोबरला जंतर-मंतर किंवा कॅनॉट प्लेस परिसरात पोहोचण्याचा प्रयत्न करणाऱ्या सात हजारांहून अधिक लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यामध्ये महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचाही समावेश होता. अनेक पत्रकारांना देखील ताब्यात घेण्यात आले. त्याचवेळी सरकारच्या समर्थनार्थ काहीजण लाठ्याकाठ्यांसह आंदोलकांवर हल्ले करताना अनेक व्हिडीओत दिसले. पण त्यांच्याकडे हे सशस्त्र बल सोईस्कर दुर्लक्ष करताना दिसले.

या घटनाक्रमावरून हे स्पष्ट होते की, आधुनिक काळात राज्यसंस्थेने आपल्या खड्या सेनेचा वापर करून विरोधाचा आवाज पूर्णपणे दडपून टाकण्याचे तंत्र विकसित केले आहे. जेव्हा एखाद्या लोकशाही देशात शांततापूर्ण निदर्शनांना रोखण्यासाठी थेट सैन्यासारखी तटबंदी उभारली जाते, तेव्हा काही गंभीर प्रश्न उपस्थित होतात. लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणे हा सरकारचा हेतू आहे का? हजारो सशस्त्र जवानांना रस्त्यावर उतरवण्याचा उद्देश केवळ सुव्यवस्था राखणे नसून, सामान्य नागरिकांमध्ये, विशेषतः तरुणांमध्ये आणि जेन झीमध्ये भीती निर्माण करणे हा असतो, जेणेकरून भविष्यात कोणीही सरकारविरोधात आवाज उठवणार नाही. यामुळे लोकांच्या सांविधानिक अधिकारांची पायमल्ली तर होत नाही ना? संविधानाने प्रत्येक नागरिकाला शांततापूर्ण आंदोलनाचा अधिकार दिला आहे. परंतु, परवानगी नाकारणे, रेल्वे-मेट्रो बंद करणे आणि प्रतिबंधात्मक अटक करणे यांमुळे हा अधिकार कागदावरच राहतो. अनेक पत्रकारांनी आणि विश्लेषकांनी या परिस्थितीची तुलना १९७५ च्या आणीबाणीशी केली आहे. संस्थांचे राजकीयीकरण होत आहे का? पोलीस आणि निमलष्करी दलांचा वापर निष्पक्षपणे होण्याऐवजी तो राजकीय पक्षाच्या हितासाठी केला जात असल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे.

या सर्वांच्या मुळाशी असलेले मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी इतर दोन निवडणूक आयुक्तांना अंधारात ठेवून ‘विशेष सखोल सुधारणा’ संदर्भात, अनेक संविधानविरोधी निर्णय घेतल्याचे उघड झाल्यावरदेखील सर्वोच्च न्यायालय त्या संदर्भातील याचिकांबाबत बोटचेपे निर्णय घेताना दिसले. सरकार तर ज्ञानेश कुमारांच्या बचावासाठी पूर्ण ताकदीनीशी उतरलेले दिसले. संसदेत भाजपला बहुमत नसले तरी, ज्यांच्या कुबड्या घेऊन हे सरकार उभे आहे, ते नितीश कुमार, चंद्राबाबू नायडू, चिराग पासवान आदी मंडळी त्यांच्या त्यांच्या हितसंबंधांपायी सरकार विरोधात ‘ब्र’ काढायला तयार नाहीत. बहुतांश (खास करून इलेक्ट्रॉनिक) माध्यमांची स्थिति तर सत्ताधाऱ्यांप्रती ‘घालीन लोटांगण वंदीन चरण’ अशीच आहे. नोकरशाहीदेखील शिद ठेचलेल्या बैलांप्रमाणे स्वतःच जू मानेवर घेऊन कामाला लागते आहे. म्हणजेच कायदे मंडळ, नोकरशाही, न्यायपालिका आणि माध्यमं हे चारही स्तंभ सत्ता टिकवण्यासाठी धडपडत असताना निमलष्करी दलं आणि पोलीस रस्त्यावरची लढाई लढून स्वतःला सत्तेचा खरा ‘आधार स्तंभ’ सिद्ध करत आहेत. आता केवळ सेना उतरवणेच बाकी राहिले आहे. त्यामुळे तथाकथित ‘चेक अँड बॅलन्स’ हे केवळ कागदावरच आहे. जुलै महिन्यातील आंदोलनादरम्यान झालेल्या पोलीस अत्याचारांविरोधात संसदेत विरोधी पक्ष जाब विचारात असताना पंतप्रधान आणि गृहामंत्री संसदेच्या संपूर्ण अधिवेशनातून गायब होते. ते पूर्ण अधिवेशन या एकाच प्रश्नाच्या उत्तरच्या प्रतिपेक्षेत वाया गेले. आता लोक रस्त्यावर येऊन शांततापूर्ण आंदोलन करू पाहतात ते चिरडायला असे भयंकर प्रयोग केले जातात; मग लोकशाहीत आपली मतं मांडायची कशी? हा गहन प्रश्न देशापुढे उभा आहे. स्वतःला लोकशाहीची जननी म्हणणाऱ्यांनी त्याचे उत्तर द्यावे इतकीच किमान अपेक्षा.
kishorejamdar@gmail.com