मिनी चंद्रन
‘युलिसिस’च्या लिओपोल्ड ब्लूमने घराबाहेर पाऊल ठेवले, त्या १६ जून रोजी इंग्रजी कादंबरीनेही व्हिक्टोरियन काळाचा उंबरा ओलांडला..




१६ जून १९०४.. डब्लिनमधील एक सर्वसामान्य मध्यमवर्गीय माणूस (त्याचं नाव लिओपोल्ड ब्लूम) घराबाहेर पडतो. शहरातील गल्लीबोळांतून फिरताना त्याच्या डोक्यात तुमच्या- आमच्याप्रमाणेच विचारचक्रं फिरू लागतात. त्यात आंघोळीसाठी कोणता साबण विकत घ्यावा, अशा दैनंदिन जीवनातल्या प्रश्नांपासून, मुलाचा मृत्यू, पत्नी विश्वासघात करत असल्याचा संशय असे अनेक गंभीर प्रश्नही असतात. हा लिओपोल्ड ब्लूम १६ जून ते १७ जून या अवघ्या २४ तासांत जे जे पाहातो आणि जाणतो, ते वाचकांना सांगितलं जातं. एरवी या अगदी साध्यासुध्या घटना, मात्र त्यातून आधुनिक काळातील एक उल्लेखनीय कादंबरी आकारास येते- ‘युलिसिस’! जॉइस यांची ही कादंबरी १९२२ साली प्रसिद्ध झाली आणि आजच्या काळातील महाकाव्य म्हणून नावारूपाला आली. तिच्या शतकमहोत्सवी वर्षांत, ‘१६ जून’ या तारखेला तिची आठवण येणे साहजिकच!
‘युलिसिस’ ही मूळची ग्रीक महाकाव्यातली दंतकथा. देवानं अडथळे आणले तरी मानवी प्रयत्न जिंकतात, याचा प्रत्यय देणारी. अर्थात जॉइसच्या कादंबरीचा नायक लिओपोल्ड ब्लूमची बरोबरी ग्रीक दंतकथेतल्या युलिसिसशी होऊ शकत नसली, तरीही या कादंबरीमुळे पाश्चिमात्य साहित्यविश्वाचे चित्र पालटले हे मात्र नक्की. त्याला कारण ठरले ते कांदंबरीत प्रतिबिंबित झालेले सामान्य माणसात दडलेले असामान्यत्व आणि कोणत्याही मध्यस्थाशिवाय किंवा निवेदकाशिवाय या सामान्य माणसाचा विचारप्रवाह थेट वाचकांपर्यंत पोहोचवण्याची क्रांतिकारी शैली. पण वाचकांसाठी हा वाचनानुभव गोंधळून टाकणारा ठरला. या शेकडो पानांच्या कथानकातील एका विचारावरून दुसऱ्या विचारावर अचानक उडय़ा मारणाऱ्या पात्रांनी वाचकाला गोंधळात पाडले. यातील सर्वाधिक भरकटलेला भाग म्हणजे ब्लूमची पत्नी मॉलीचे स्वगत. प्रस्थापित लेखननियम झुगारून लिहिलेले हे विचार मॉलीच्या मानसिक स्थितीचे वर्णन करतात. कोणतीही अपराधी भावना न बाळगता ती स्वत:च्या विवाहबाह्य संबंधांचा विचार करते. स्वत:पुरत्याच असलेल्या या अत्यंत खासगी विचारांदरम्यान तिने जे शब्द वापरले आहेत, ते एखाद्या सभ्य समाजात उघडपणे उच्चारणे शक्यच नाही. पुढे अनेक स्त्रीवादी विचारांच्या व्यक्तींनी मॉली ब्लूमचे संवाद ही भाषेतील पितृसत्ताक वृत्तीला चपराक असल्याचे मत मांडले आणि क्रांतिकारी पात्र म्हणून तिचा गौरव केला. मात्र त्यातूनच पुढे या वर्गावर महिलांना व्यभिचारासाठी प्रोत्साहन देणारा वर्ग म्हणून टीकाही झाली.
या कादंबरीचे वैशिष्टय़ म्हणजे, तिने साहित्यातील अश्लीलतेच्या कायदेशीर व्याख्येवर पुनर्विचार करण्यास भाग पाडले. सुरुवातीला १९१८ पासून ती ‘द लिट्ल रिव्ह्यू’ या नियतकालिकात क्रमश: प्रसिद्ध झाली होती आणि तेव्हापासूनच तिच्यावर अश्लीलतेचे आरोप होऊ लागले होते. ‘लेस्ट्रिगॉनियन्स’, ‘स्कायला अॅण्ड चार्डिब्डीस’ आणि ‘सायक्लोप्स’ही प्रकरणे ज्या अंकांत प्रसिद्ध झाली होती, ते अंक अमेरिकेतील टपाल कार्यालयाने जप्त करून जाळले होते. १९२०च्या मध्यावर आलेल्या अंकात ‘नॉसिका’ हा लेख प्रकाशित झाला होता. त्यावरून मोठा गदारोळ झाला. ‘सोसायटी फॉर द सप्रेशन ऑफ व्हाइस’ या अतिउजव्या गटाच्या न्यूयॉर्क शाखेने यासंदर्भात तक्रार दाखल केली होती. त्या प्रकरणात विशेष सत्र न्यायालयाने ‘लिट्ल रिव्ह्यू’च्या संपादकांना दोषी ठरविले होते.
खरेतर या घडामोडींनंतर या कादंबरीच्या प्रकाशनाची शक्यता शून्यच होती, मात्र पॅरिसमधील प्रसिद्ध पुस्तकालय- ‘शेक्सपिअर अॅण्ड कंपनी’च्या साहित्यप्रेमी मालक सिल्व्हिया बीच यांच्या प्रयत्नांनी तिला तारले. आज जी घटना एका ऐतिहासिक पुस्तकाचा प्रकाशन सोहळा म्हणून गणली जाते, तो खरेतर पॅरिसमध्ये झालेला एक छोटेखानी कार्यक्रम होता. योगायोगाने हा सोहळा जॉइस यांच्या वाढदिवशी म्हणजे २ फेब्रुवारी १९२२ रोजी झाला. कठोर सेन्सॉरशिप कायद्यांमुळे ‘युलिसिस’ इंग्लंड-अमेरिकेपर्यंत पोहोचू शकली नाही, पण या बंदीमुळेच वाचकांचे कुतूहल जागे झाले आणि त्याने कादंबरीच्या प्रसिद्धीचे काम सुकर केले. ‘रॅण्डम हाऊस पब्लिशर्स’ने १९३० मध्ये ही संपूर्ण कादंबरी प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला, तोपर्यंत तिची ओळख वादग्रस्त ‘अनधिकृत वाङ्मय’ अशीच राहिली.
अपेक्षेप्रमाणे कादंबरी अश्लीलतेची सबब देत जप्त करण्यात आली, मात्र तिच्यावरला खटला साहित्यातील अश्लीलतेविषयीच्या दृष्टिकोनाच्या चर्चेमुळे जगभरातील सेन्सॉरशिप खटल्यांमधील मैलाचा दगड ठरला. एखाद्या पुस्तकामुळे वाचकांवर होणाऱ्या परिणामांवरून त्याचे विश्लेषण कसे केले जावे, याचा वस्तुपाठही या खटल्याने घालून दिला.
कादंबरी अश्लील आणि ईश्वरिनदा करणारी आहे; जॉइस हे अश्रद्ध असून त्यांनी कॅथलिक चर्चविरोधी विचार मांडले आहेत, असा आरोप सरकार पक्षाने केला. जॉइस यांचे (बचाव पक्षाचे) वकील मॉरिस अर्न्स्ट यांनी ‘अश्लीलता ही काळ आणि संदर्भावर अवलंबून असलेली सापेक्ष संकल्पना आहे,’ असा प्रतिवाद केला. अश्लीलतेची संकल्पना व्यक्तिगणिक बदलत जाते आणि त्यामुळे या संज्ञेची सर्वसमावेशक व्याख्या करणे कठीण आहे. पण एक मुद्दा केवळ याच प्रकरणात नव्हे, तर त्यानंतरच्या साहित्यातील अश्लीलतेविषयीच्या अनेक खटल्यांत पथदर्शी ठरला- ‘साहित्याचे अश्लीलतेसंदर्भातील मूल्यमापन करताना त्यातील केवळ काही भाग विचारात न घेता संपूर्ण कादंबरीचा समग्र विचार केला जावा, कादंबरीतील केवळ एका प्रकरणावरून पूर्ण कादंबरीवर अश्लीलतेचा ठपका ठेवणे अन्यायकारक आहे,’ असा प्रतिवाद अर्न्स्ट यांनी केला.
अखेर या कादंबरीत सामान्यपणे आक्षेपार्ह मानली गेलेली शब्दयोजना असली, तरीही कादंबरी अश्लील नाही, असा निकाल न्यायाधीश वुस्ली यांनी दिला. हे आक्षेपार्ह शब्द आक्षेपार्ह संदेश देण्यासाठी वापरलेले नाहीत. कादंबरीतून स्त्री आणि पुरुषाच्या अंतर्मनातील आंदोलनांवर अतिशय समर्पक भाष्य करण्यात आले आहे, असे निरीक्षण त्यांनी नोंदविले.
या निकालामुळे अश्लीलतेचा आरोप असलेल्या पुस्तकांविषयीच्या न्यायालयीन दृष्टिकोनात मोठा बदल झाला. त्याचे पडसाद भारतातही उमटले आणि अश्लीलतेच्या आरोपातून अरुंधती रॉय यांच्या ‘द गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज’वरही खटला भरला गेला तेव्हा ‘युलिसिस’चा आधार भक्कम ठरला. ज्या शब्दांवरून तेव्हा मोठा गदारोळ झाला होता, ते पुढे चित्रपट आणि टीव्हीसारख्या लोकप्रिय माध्यमांतही अधिक मोकळेपणाने वापरले जाऊ लागले.
थोडक्यात काय, तर लिओपोल्ड ब्लूमने ज्या १६ जून या दिवशी घराबाहेर पाऊल ठेवले, त्या दिवशी इंग्रजी कादंबरीनेही व्हिक्टोरियन नीतिमूल्यांचा उंबरठा ओलांडून स्वातंत्र्याच्या मोकळय़ा हवेत श्वास घेतला.