अल्काझींची कारकीर्द तर या पुस्तकातून उलगडतेच शिवाय फारसे माहीत नसलेले अल्काझीही समजतात.. 

‘कधी येणारेय पुस्तक?’ इब्राहिम अल्काझींच्या लेकीला, अमाल अल्लाना यांना, गेल्या सहा-सात वर्षांत हा प्रश्न सर्वात जास्त विचारला गेला होता. त्याला कारण ठरला होता पुस्तकाचा विषय! अल्काझी (१९२५-२०२०) चालते-बोलते असतानाच अमालने काम सुरू केलं होतं. सिद्धहस्त लेखक नसणाऱ्या अमालसाठी बंध व्यक्तिगत गुणिले व्यावसायिक म्हणून एक तिसरी मिती तयार झालेली. अल्काझी अमुक एक देश-धर्म-भाषा किंवा संस्कृतीत रमणारे, मावणारे नव्हतेच. त्यांच्या निस्सीम वैचारिक क्षितिजाचा वारसा मुलांनाही मिळालेला. अतिशय उत्कटपणे नाटक आणि कला जगणाऱ्या वडिलांबद्दल वस्तुनिष्ठता राखून, अमाल यांना एक बहुआयामी व्यक्तिमत्व शब्दांत उतरवायचं होतं. आणि ‘दि अल्काझीं’वर लिहिण्यासाठी सर्वथा योग्य व्यक्ती आपणच आहोत हेही त्या जाणून होत्या. तरीही पुस्तक अल्काझींच्या कार्याचं मूल्यमापन करण्यासाठी लिहिलेलं नसून एका लेकीनं समधर्मी वडिलांचं केलेलं शब्दांकन आहे हे तिने सुरुवातीलाच स्पष्ट केलं आहे. त्यात आहे एका कलासमृद्ध आयुष्याचं दर्शन घडवणाऱ्या कटू गोड आठवणींचा अक्षरश: खजिना..  अल्काझी नामक जिग-सॉचे बरेच पैलू इथं हाती लागतात. अमाल यांना अवतरणांमधून, त्यांची टिपणं, डायऱ्या, खासगी पत्रव्यवहार, फोटो चाळताना गवसले तसे !

स्वातंत्र्योत्तर भारतीय रंगमंचाचा वटवृक्ष उभा करण्यासाठी इ. स. पूर्व ४३१ मधल्या युरिपिडसच्या ‘मीडिआ’ (ग्रीक पुराणकथा) पासून ते धर्मवीर भारतींच्या ‘अंधा युग’ (महाभारत) पर्यंतच्या नाटय़संस्कृतींचा प्रवास मुळापर्यंत जाऊन करणं आधुनिक भारतीय नाटय़सृष्टीचे जनक मानल्या जाणाऱ्या अल्काझींच्याच आवाक्यातलं. अल्काझींबद्दल कागदोपत्री फारशी माहिती उपलब्ध नाही हे खरं, पण त्यासाठी त्यांचा स्वभावही कारणीभूत होता. जगभरात आत्मभान बाळगून वावरणारे अल्काझी, प्रसिद्धीलोलुप नव्हते. उलट नाटक किंवा कला प्रदर्शन समजायचा वकूब नसणाऱ्या किंवा ते अर्धवट पाहून घाईघाईत त्यांच्याशी बोलायला येणाऱ्या पत्रकारांवर ते डाफरत असत. या दबदब्यामुळे त्यांना बोलतं करू शकणारे विरळाच. त्यांच्या कामाची नेमकी जाण असणारे वेगवेगळय़ा संस्कृतीतले चित्रकार सूझा, जे. स्वामीनाथन, एम. एफ. हुसेन, गीव्ह पटेल असे त्यांचे अनेक मित्र होते. त्यांना अपवाद होता कवी निसीम इझिकेल! विशीत दोघांनी मिळून सादर केलेल्या ‘हॅम्लेट’पासूनच त्यांच्या तारा जुळल्या होत्या. 

हेही वाचा >>>विज्ञाननिष्ठेचा प्रवास..

आयुष्याच्या पूर्वार्धात (१९४६-७५) वेगवेगळय़ा संस्कृतींमधून आलेल्या ५० नाटय़कृती, आणि उत्तरार्धात (१९७७-२०१०) तेवढय़ाच समर्थपणे ६४२ पेंटिंग्ज आणि फोटोग्राफीची प्रदर्शनं समर्थपणे सादर करणारे ‘सेल्फ मेड’ अल्काझी, घडले कसे? याचं उत्तर त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर पडत गेलेल्या कलांच्या मिश्र प्रभावात आणि भरपूर मेहनतीत असावं. पुण्यात आलेल्या बगदादी व्यापारी कुटुंबात त्यांचा जन्म झाला होता. (त्यांचा पिंड ‘इंटरनॅशनल बुक डेपो’ वर पोसलेला होता.) शालेय जीवनातच त्यांना नाटय़ाभिनयाची आवड होती. मुंबईत प्रथम इप्टा आणि नंतर सधन, सुसंस्कृत पदमसी कुटुंबातल्या भाऊ-बहिणीने सुरू केलेल्या थिएटर ग्रूपमधला प्रत्यक्ष अनुभव त्यांच्याकडे होता. नाटय़कर्मी सुलतान पदमसी (बॉबी) अल्काझींचा प्रिय मित्र आणि मेंटॉर. चित्रकलेचा रस्ता सोडून ते नाटकाकडे वळले, ते यांच्यामुळेच. २१ व्या वर्षी व्यवसायाची दिशा ठरण्याआधीच घरच्यांचा प्रखर विरोध पत्करून बॉबीच्या बहिणीशी, रोशनशी त्यांनी लग्न केलं होतं. समंजस मैत्रीवर आधारित प्रेम आणि पुढल्याच वर्षी उमा ऊर्फ अमालच्या जन्मामुळे, आलेल्या वाढत्या जबाबदारीनंतरही नाटकासंबंधी त्यांची उत्कटता ओसरली नाही. बॉबीने  अचानक केलेल्या आत्महत्येमुळे तिघांनी मिळून उभारलेल्या थिएटर ग्रूपची जबाबदारी अल्काझींवर आली आणि पुढचा मार्ग ठरला.

प्रतिकूलतेशी झगडत मिळवलेल्या शिक्षण आणि प्रशिक्षणातून, लंडनच्या अँग्लो फ्रेंच आर्ट सेंटर (फारच लवकर भ्रमनिरास झालेला असला तरी) आणि रॉयल अकॅडमी ऑफ ड्रॅमॅटिक आर्ट्स (राडा) मधून कमावलेले व्यावसायिक रंगभूमीचे संस्कार. ‘राडा’मध्ये दोन वर्षांचा अभिनयाचा कोर्स करायला पुरेसे पैसे नव्हते, रोशनलाही वेशभूषेचा अभ्यास करायचा होता. अल्काझींची प्रवेशासाठी चाचणी आणि मुलाखत इतकी प्रभावी होती की त्यांना ताबडतोब प्रवेश मिळाला आणि आर्थिक अडचण मांडताच शिष्यवृत्तीही मिळाली. लंडनमध्येही चित्रमालिका रंगवणं सुरूच होतं. सूझांच्या मते रेषेवरील पकड आणि मिनिमलिस्टिक शैली अतिशय वेधक होती. त्यानंतर त्यांनी ‘ब्रिटिश ड्रामा लीग’ (ब्रिटिश थिएटर एसोसिएशन) मधून आधुनिक नाटय़निर्मितीचा कोर्स केला. इतकंच नाही तर दोन्ही संस्थांमधून सन्मानही मिळवले. नाटय़शिक्षणाची सांगता ‘अमेरिकन एक्सपेरिमेंटल थिएटर’च्या चार महिन्यांच्या कोर्सने झाली. देशोदेशीच्या कलावंतांशी संबंध जुळत गेले. वाचन चौफेर, पण हलाखी इतकी की समुद्रमार्गे परतीच्या तिकिटासाठीही उधारी करावी लागली. लंडनमधलं नाटय़शिक्षण संपवून परतल्यावर बॉबी आणि अल्काझींनी मिळून बसवलेलं टागोरांचं ‘चित्रा’ हे अल्काझींना भारतीय भाषांमधल्या नाटकांकडे वळवणारं पाहिलं नाटक ठरलं. बॉबीनं त्यात त्यांच्याकडून एक भूमिकाही करून घेतली होती!

हेही वाचा >>>बौद्ध-दलित ‘शहाणे’ आहेतच, हे श्रेय प्रकाश आंबेडकरांनीही मान्य करावे!

५० हून अधिक नाटकांचं निर्देशन करणारे अल्काझी म्हणजे दर्जेदार नाटय़निर्मितीमधला अखेरचा शब्द. त्यांची प्रत्येक निर्मिती जीव ओतून, तर्कशुद्ध परिश्रमांतून उभारलेली. जबाबदारीचं भान ठेवून, दर प्रयोगच नव्हे तर तालीमही आधीच्यापेक्षा सरसच असली पाहिजे हा ध्यास बाळगून प्रत्येकाला घडवत नेणारी अशी त्यांची कामाची पद्धत होती. काम करणाऱ्यांना शिस्त अंगी बाणवण्याला पर्याय न देणारी आणि हे सगळं कमीत कमी शब्दांत! या मुशीत घडलेले श्याम बेनेगल, गिरीश कार्नाड, नसिरुद्दीन शाह, ओम पुरी, रोहिणी हट्टंगडी, मनोहर सिंग, विजया मेहता, सई परांजपे, एम. के. रैना, ओम पुरी, उत्तरा बावकर, ओम शिवपुरी, सत्यदेव दुबे यासारखे अनेक श्रेष्ठ कलाकार/ निर्माते/ दिग्दर्शक सिनेसृष्टीतही गाजले. नाटक आणि सिनेमा हा तोलही त्यांनी ताकदीने सांभाळला. १९६२-७७ दरम्यान एनएसडीचं संचालन करणाऱ्या अल्काझींनी १५ वर्षांच्या कारकीर्दीत अभिजात ग्रीक आणि शेक्सपिअरच्या रूपांतराखेरीज ज्यां अनुईचं ‘अँटिगनी’, सोफोक्लीसचं ‘ओडिपस रेक्स’, बेकेटचं ‘वेटिंग फॉर गोदो’, इब्सेनची ‘हेडा गॅब्लर’, स्ट्रिंडबर्गची ‘मिस ज्यूली’, धर्मवीर भारतींचं ‘अंधा युग’, मोहन राकेशचं ‘आधे अधुरे’ आणि ‘आषाढ का एक दिन’ गिरीश कार्नाडांचं ‘तुघलक’, महेश एलकुंचवारांच्या एकांकिका आणि ‘वाडा चिरेबंदी’चे दोन भाग यांसारखी ताकदीची नाटकं बसवली आणि आधुनिक भारतीय रंगमंचाचा पाया घातला. जगातील तसंच भारतातील वेगवेगळय़ा भाषांमधली नाटकं हिंदीत आणून भारतीय रंगमंचाची जागतिक पातळीवर ओळख निर्माण करायची हा एकच ध्यास या सगळय़ा नाटय़कृतींमागे होता. त्यांच्याच भगीरथ प्रयत्नांनी एनएसडीला एक संस्था म्हणून स्वायत्तता, बहावलपूर हाऊसच्या प्रशस्त प्रांगणात जागा, सराव तसंच सादरीकरणासाठी एक खुला आणि एक छोटेखानी रंगमंच हे सगळं मिळालं. एनएसडीच्या कार्यकाळात अल्काझींचं कर्तृत्व देशात नाटक आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेने सिद्ध होत राहिलं. पण तरीही त्यांच्या वंशाचं भांडवल करून, त्यांच्या संपन्न, आंतरराष्ट्रीय दृष्टीला परकीय ठरवून, भारतीय अभिजात नाटकं आणि लोककलांना जोडण्याचे त्यांचे प्रयत्न दुर्लक्षित करून, त्यांच्या भारतीयतेवर आक्षेप घेतले गेले. दुसरीकडे त्यांना प्रत्येक ‘पद्म’ सन्मानही दिला गेला. असे अनेक विरोधाभास त्यांच्या जीवनात होते. ज्या विद्यार्थ्यांमध्ये ते भारतीय रंगमंचाचं भविष्य पाहत होते, त्यातल्या एका गटानं वाढती विखारपेरणी केल्याचं दु:ख सहन न होऊन त्यांनी राजीनामा दिला. सरकार आणि सत्तेच्या राजकारणासमोर न हरलेल्या या माणसाने त्याच्या प्रिय विद्यार्थ्यांच्या दुफळीतून बाहेर पडणं स्वीकारलं. एखाद्या ग्रीक शोकांतिकेच्या धीरोदात्त नायकानं घ्यावी तशी शांत, गंभीर एक्झिट घेतली!

नव्वदीत, जुन्या मित्र- विद्यार्थ्यांच्या आग्रहाखातर गिरीश कार्नाड यांचं ‘रक्त कल्याण’, लॉर्काचं ‘दिन के अंधेरे में’ (‘हाऊस ऑफ बर्नार्ड अल्बा’) आणि शेक्सपिअरचं ‘ज्यूलिअस सीझर’ या तीन नाटकांसाठी ते एनएसडीत परतले. राजधानीतल्या नाटय़रसिकांसाठी ही पर्वणी होती. मागे वळून बघताना, स्वत:च्या एकाधिकारशाहीचा त्यांनाही पश्चात्ताप होई असाही उल्लेख अमालने केला आहे. सीझरची दीर्घ तालीम घेताना अल्काझींना बघायचं भाग्य आम्हा अकादमीवाल्यांनाही लाभलं होतं. मला तर सीझरमध्ये अल्काझी दिसत. असामान्य कर्तृत्व, पराक्रमी मोहिमा आणि समकालीनांना डाचणारा, घातक आत्माभिमान असणारे..

अल्काझींना ‘एल्क’ म्हटले जात असे. त्यांच्या आयुष्याच्या पहिल्या अंकात पेंटिंग की नाटक हे द्वंद्व योगायोगानं संपून नाटक जिंकलं; पण आयुष्याच्या दुसऱ्या सुदीर्घ अंकात चित्रकलेवरचं प्रेम सर्जनशीलतेला पुनर्जीवित करणारं ठरलं. नाटकांनंतर त्यांनी ‘आर्ट हेरिटेज गॅलरी’ आणि ‘अल्काझी फाऊंडेशन’वर लक्ष केंद्रित केलं आणि वेगवेगळय़ा गॅलरीजमधून मुख्यत: पेंटिंग्ज आणि फोटोग्राफीची प्रदर्शनं मांडण्याचं काम सुरू केलं. त्यांनी हुसेन, सूझा, राम कुमार, तय्यब मेहता, अकबर पदमसी, क्रिशन खन्ना यांसारख्या २३ दिग्गजांचे रेट्रोज दिल्ली आणि मुंबईत सादर केले. त्याचबरोबर नलिनी मलानी, अर्पना कौर, अनुपम सूद, नसरीन मोहम्मदी, लतिका कट्ट, मोना रायसारखे अनेक उभरते चित्रकार हेरून त्यांचं काम पारखी नजरेनं कला रसिकांसमोर मांडलं. या सर्वाच्या कर्तृत्वाची कमान उंचावत जाताना आपण पाहातच आहोत.

अल्काझींची उंच शिडशिडीत देहयष्टी, बहुश्रुत व्यक्तिमत्त्व, कार्यक्षेत्रावर असलेली हुकमत दर्शवणारी देहबोली आणि एकंदरच दबदबा असा की भल्याभल्यांना त्यांच्यासमोर कामाशिवाय तोंड उघडायची हिंमत नसे. कामाच्या संदर्भाबाहेर त्यांच्या मनाचा थांग कुटुंबीयांव्यतिरिक्त कोणाला लागला असेल असं वाटत नाही. म्हणून हे पुस्तक अनेकांची उत्सुकता शमवणारं आहे. पुस्तक सुरुवातीपासूनच वाचकाला आजवर दुरूनच दिसणाऱ्या अल्काझी नामक पर्वताकडे खेचून घेतं. त्या काळाचे साक्षीदार असलेल्या संबंधितांना अनेक कच्चे दुवे पुरवतं, त्यांच्या विद्यार्थी आणि सहकाऱ्यांना एनएसडी आणि त्यांनी स्थापन केलेल्या आर्ट हेरिटेज गॅलरीच्या सुवर्णयुगाची पुन्हा सैर घडवतं.

अल्काझी परदेशातून अनेक कलाकारांची पिंट्र्स, पुस्तकं आणि छोटय़ा छोटय़ा वस्तू आणत. त्यांचं घर म्हणजे देशोदेशीच्या सौंदर्याचा गोतावळाच होता. मात्र त्यांना त्यांची पुस्तकं मात्र कधी कोणाला वाचायला द्यायला आवडत नसे. याला अपवाद होते तेवढेच विक्षिप्त, मनस्वी नाटय़कार सत्यदेव दुबे! घराच्या मांडणीत किंवा सेटवरही अल्काझींना निसर्ग आणि मानवनिर्मित सौंदर्याचा मेळ घालायला आवडायचं. मुंबईच्या ८०० चौरस फूट सदनिकेत त्यांनी दोन टनांचा कातळ आणून ठेवला होता. एका कोपऱ्यात दगडांची रास होती. त्याबद्दल अमालने फार छान लिहिलंय.

अमालने अशीच एक आठवण नाटय़पूर्ण शैलीत सांगितली आहे. एनएसडीचे निर्देशक होण्याआधी अल्काझींनी मुंबईच्या घराच्या गच्चीवर उभारलेल्या ‘मेघदूत रंगमंचा’वर संपूर्ण कुटुंबानं आत्यंतिक आर्थिक ओढाताण सोसून नाटकं बसवली. त्यांच्या प्रेमप्रकरणातून हादरलेलं कुटुंब परत नाटय़कलेच्या धाग्यादोऱ्यांनी बांधलं गेलं. प्रत्येक नाटय़कृती, नेपथ्य, वेशभूषा सगळं घरचंच कार्य! ‘मीडिआ’मध्ये संपूर्ण अल्काझी कुटुंब काम करत असे. एक प्रयोग पाहाता-पाहाता हुसेनसाहेबांनी या चौघांचं चित्र काढून अल्काझींना पेश केलं. स्पष्टवक्त्या अल्काझींना ते फार पसंत पडलेलं नाही हे लक्षात येताच ते तिथल्या तिथे फाडून टाकून ‘मी दुसरं काढून आणेन’ असं म्हणून हुसेन निघून गेले. क्षणार्धात घडलेल्या या प्रसंगानं हबकलेल्या कुटुंबानं त्या फाडलेल्या चित्राचे तुकडे सांभाळून ठेवले. नंतर हुसेननं दुसरं चित्र काढून आणलं. त्याला घरात सुंदरशी जागाही मिळाली पण फाडलेलं चित्र आजही अमालच्या संग्रहात आहे.

त्यांच्या विवाहेतर संबंधांबद्दल आता कुठे भारतात द्वेषविरहित, निरोगी विचार सुरू झाला आहे. अल्काझी आणि उमा आनंद यांच्यातलं नातं अमालनं अतिशय स्वच्छ चष्म्यातून निरखलं आणि भावनिक ताकदीनं जगासमोर मांडलं. दोन्ही कुटुंबांत वादळ शमल्यावर आलेली शांतता आणि नात्याचा समजूतदारीनं केलेला स्वीकार, अगदी खराखुरा आहे. हे पुस्तकच टिपिकल ‘अल्काझी’ पद्धतीनं लिहिलेलं आहे.. उदार, परिपक्व दृष्टिकोनातून मांडणी करणारं आणि नि:स्पृह!

इब्राहिम अल्काझी होल्डिंग टाइम कॅप्टिव्ह

लेखिका : अमान अल्लाना

पेंग्विन व्हिंटेज बुक्स

मूल्य : १२९९ रुपये

पृष्ठे : ६७२