नीला आपटे
त्रिभाषा सूत्र आणि पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीची केल्याबद्दलची चर्चा सर्वत्र सुरू आहे. याबाबतीत थोडा वेगळ्या दिशेने विचार व्हायला हवा असे वाटते. मी कर्नाटकमधील बेळगाव येथे मराठी माध्यमाच्या शाळेत काम करते. आमच्या इथे पहिलीपासून तीन भाषा शिकवल्या जातात. माध्यम भाषा म्हणून प्रथम भाषा – मराठी, राज्यभाषा म्हणून द्वितीय भाषा – कन्नड आणि ज्ञानभाषा म्हणून तृतीय भाषा – इंग्लिश. या तीनही भाषांचे व्याकरण, लिपी आणि सर्वच गुणवैशिष्ट्ये पूर्णपणे वेगळी आहेत. त्यामुळे मुलांना पहिल्या इयत्तेत तीन भाषांच्या तीन लिपी शिकाव्या लागतात.

मानसशास्त्रीय आणि शैक्षणिक दृष्टीने हे खूपच आव्हानात्मक आहे हे आम्ही सर्व शिक्षक अनुभवतच आहोत. पण याला विरोध करायला हवा असं आजपर्यंत आम्हाला कधी वाटलं नाही. त्रिभाषा सूत्रानुसार हे करावं लागेलच असं स्वीकारून आम्ही आहे त्या परिस्थितीत भाषाशिक्षण प्रभावी कसं करता येईल यासाठी प्रयत्न करत आहोत. परंतु आता त्रिभाषा सूत्रावर चर्चा सुरू झाल्यानंतर याविषयी थोडा वेगळा विचार मनात पुढे आला आहे.

याबाबतीतले विनोबांचे विचार मला खूप महत्त्वाचे वाटतात. त्यांनी स्वतः १६ भाषा अवगत केल्या होत्या. विनोबा म्हणतात की लिपीचा अडसर ठेवला नाही, तर भाषा शिकणे अवघड जात नाही. भाषेच्या शिक्षणाला लिपीची अट लावणं हे भाषा शिक्षणाला मर्यादा आणणारं आहे. माझ्या लहानपणी बेळगावमधील काही मराठी भाषिक सर्वोदयी लोकांच्या घरांमध्ये देवनागरी लिपीत कन्नड भाषा लिहिलेली वृत्तपत्रे मी पाहिलेली आहेत. ते देवनागरीमधून कन्नड वाचत आणि त्यांना व्यावहारिक कन्नड भाषा चांगली अवगत होती. मी स्वतः एकदा मल्याळी भाषा शिकण्याचा प्रयत्न करत होते, तो ही देवनागरी लिपीतूनच ! आणि हे अगदी सहज घडत होतं. कदाचित आपल्यापैकी अनेकांनी जर नवीन भाषा शिकण्याचा प्रयत्न केला असेल तर हाच मार्ग अवलंबला असेल.

दुसरी गोष्ट, एखाद्या कुटुंबामध्ये बहुभाषिक वातावरण असेल तर त्या घरातील लहान मुले लहानपणापासूनच सर्व भाषा सहजपणे बोलू लागतात. परिसरात वेगळी भाषा बोलली जात असेल तर ती आपल्याला नकळत कळायला लागते, बोलताही येते. बेळगावातील बहुतेक सर्व लोक – सुशिक्षित किंवा निरक्षर – अशाच प्रकारे कन्नड आणि मराठी या दोन्ही भाषा बोलतात, त्यातून व्यवहार करतात. पण भाषा लिहिता वाचता येत नाहीत. म्हणजेच त्यांना त्या भाषेची लिपी येत नाही. भाषा शिकायची असेल तर लिहायला – वाचायला शिकण्याची अट नसेल तर भाषा शिकणं सोपं जातं. कारण भाषा ही ‘भाषा’ असते ती केवळ ‘लिपी’ नसते.

मातृभाषा आणि इंग्रजी व्यतिरिक्त अन्य कोणतीही भाषा जेव्हा आपण शिकतो तेव्हा त्या भाषेतील साहित्य, ग्रंथ संपदा, यांचे वाचन करण्यापेक्षा त्या भाषेचा व्यावहारिक उपयोग करता येणं यावर आपला जास्त भर असतो. असायला हवा. हाच विचार शालेय शिक्षणात त्रिभाषा सूत्र अवलंबताना करायला हवा.

बहुतेक सर्व भारतीय भाषा फोनेटिक आहेत (ज्यांचा उच्चार आणि अक्षरे सारखीच असतात). त्यामुळे एक भारतीय लिपी शिकली तर त्या लिपीतून कोणतीही भारतीय भाषा शिकता येऊ शकते. त्याचप्रमाणे रोमन लिपी शिकली तर इंग्रजी सोबत अनेक परदेशी, विशेषतः युरोपीय भाषा शिकता येऊ शकतात (अनेक युरोपीय भाषांची लिपी रोमनच आहे). शालेय शिक्षणात पहिलीपासून एक परिसर भाषा – मातृभाषा किंवा माध्यम भाषा आणि दुसरी इंग्रजी भाषा लिपीसह म्हणजेच लेखन – वाचन कौशल्यसह शिकवावी व तृतीय भाषा फक्त भाषा म्हणून मौखिक स्वरूपात शिकवावी. लेखी शिकायचीच असल्यास परिचित लिपीचा वापर करण्याची मुभा असावी. नवीन भाषा शिकताना लिपी शिकायचा अडथळा दूर करायला हवा. भाषा शिकणे आणि लिपी शिकणे यात आपण फरक करायला हवा. हा भाषा शिक्षणाचा मध्यम मार्ग असू शकेल असे वाटते. यामुळे लिपी नसलेल्या भाषा (काही आदिवासी भाषाही) तृतीय भाषा म्हणून शिकणे शक्य होईल. भाषा शिक्षणाविषयी विनोबांनी खूप मूलभूत आणि क्रांतीदर्शी विचार केला आहे. भाषा शिक्षणाची वेगळी दिशा दाखविली आहे. तीन भाषा शिकण्याच्या धोरणाला विरोध करण्याऐवजी भाषा आणि लिपीचा असा वेगळा पर्यायी विचार केला तर शाळेमध्ये तीन पेक्षा जास्त भाषा शिकणेही शक्य होईल.

गेली अनेक वर्ष शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहे. सध्या मराठी विद्यानिकेतन, बेळगाव या शाळेत शिक्षण संयोजक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

neeluapte512@gmail.com