– मृदुला भाटकर
राम वनवासातून अयोध्येत परतल्यावर तोरणे, गुढी उभारून प्रजेने स्वागत केल्याचा उल्लेख रामायणात आहे. पूर्वी राजे-महाराजे, त्यानंतरच्या काळात पुढारी, अधिकार पदावरील महनीय व्यक्ती यांच्या स्वागतासाठी कमानी, पताका, तोरणं बांधली जात असत. काही वर्षांपर्यंत निवडणुका आल्या की, उमेदवार/पुढार्यांची छायाचित्रं, फलक, भित्तीपत्रकं इ. सार्वजनिक ठिकाणी बघण्याची सवय होती. पण आता गेल्या काही वर्षांत निवडून आल्यावर नेतेमंडळींच्या तसंच त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींच्या वाढदिवसाचे मोठमोठे फलक/जाहिराती आपणा सर्वांना बघायला मिळतात. यातील विनोदाचा भाग म्हणजे त्या फलकावर/जाहिरातीत ज्याचा वाढदिवस त्याचं छायाचित्र, त्याला शुभेच्छा असतात, पण त्याबरोबर जो शुभेच्छुक आहे त्याचे आणि अनेक असतील, तर त्या सर्वांचे छोटे – छोटे फोटो, नाव हे सर्व झळकत असतं. अगदी खेड्यातल्या गल्लीबोळांपासून ते मुंबई महानगराच्या मेट्रोमार्गांपर्यंत सर्वत्र असे फलक/जाहिराती आजकाल बघायला मिळतात. त्यातही ज्याचा फलक जास्त आडवा, जास्त उंच, ज्याचा चेहरा जास्त मोठा तो अधिक ‘पॉवरफुल’. त्यामुळे या जाहिराती, फलकांचे आकार दिवसेंदिवस अधिकाधिक मोठमोठे होत आहेत. रस्त्यांच्या कडेला, फूटपाथ अडवून, इतकंच नाही तर रस्त्याच्या मध्यभागीसुद्धा ते लावलेले असतात. हे सर्व झळककाम रात्रीत होतं.
खरं तर कायद्याने अशा बेलगाम प्रदर्शनाला मान्यता नाही. नगरपालिका कायद्यामध्ये, तसंच महाराष्ट्र मुंबई पोलीस अधिनियमानुसार याला बंदी आहे. कारण विशिष्ट आकाराच्या जाहिराती व फलक लावण्यास महानगरपालिकेच्या किंवा नगरपालिकेच्या आयुक्तांची लेखी परवानगी घ्यावी लागते. मुंबई महानगरपालिका अधिनियम १८८८ मधील कलम ३२८, ३२८ (अ) आणि महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ मधील कलम २४४, २४५ नुसार न वागणं, विद्रुपीकरण प्रतिबंंधक कायद्याचं पालन न करणं हा कायदेशीर गुन्हा असतो. यासंदर्भात जाहिरातबाजीचा प्रश्न आजचा नाही, तो २०१६ सालीसुद्धा काही जागृत संस्थांनी मुंबई उच्च न्यायालयाकडे दाद मागून तो धसाला लावण्याचा प्रयत्न केला होता. पीआयएल १५५/२०११ – सुराज्य फाऊंडेशन, सातारा विरुद्ध जिल्हाधिकारी सातारा आणि इतर, न्यायनिर्णय ३१.०१.२०१७ नुसार खंडपीठाने खटले ऐकून जनहित याचिकांवर निकाल दिला आणि त्यात त्यांनी जिल्हाधिकारी, आयुक्त आणि पोलिसांना बरेच आदेश दिले आहेत.
मला सर्वांत चिंताजनक वाटते ती अशा प्रकारचे फलक आणि जाहिरातबाजी करणार्या लोकांची मानसिकता. खरं तर लाचार, विकृत मानसिकता हे याचं मूळ असून ही सर्व जाहिरातबाजी व फलक हे त्याचं दृश्यस्वरूप आहे. भारतात अभिमान वाटावा अशी लोकशाही आहे. पण काही लोकांसाठी ती अनिर्बंध लोकशाही असते. संविधानातील मूलभूत हक्क हे नागरिकांना जगण्यासाठी, वाढण्यासाठी, व्यक्त होण्यासाठी आवश्यक व पोषक आहेत. तसेच दुसर्या नागरिकासही तेच हक्क मिळण्याचं स्वातंत्र्य आणि अधिकार हाही अधोरेखित आहे. म्हणून प्रत्येक मूलभूत हक्काला न्याय्य निर्बंधांची चौकट आहे. स्वागत, वाढदिवस, शुभेच्छा, केलेल्या कामाचा जल्लोष या सगळ्यांचा असा वर्षाव बेकायदेशीर आहे.
दुसर्याच्या वाढदिवशी किंवा स्वागतासाठी मनात आनंदाचे तरंग उमटणं, चेहर्यावर हसू येणं, जाऊन भेटणं, पुष्पगुच्छ वा मिठाई देणं किंवा आनंदाने टाळ्या वाजवणं फार स्वाभाविक! या भावनांचं प्रगटीकरण करण्यासाठी कायद्याची ना कोणतीही परवानगी, ना कोणतंही बंधन असतं. मग या भावना आम्हाला अधिकाधिक जोरात व्यक्त कराव्याशा वाटतात. आजकाल तर प्रचंड मोठ्याने कराव्याशा वाटतात. कारण समाजाचं झालेलं कर्कशीकरण आणि मनांचा ठार बहिरेपणा. कानावर येणारी भजनं, गाणी ही सुरेल आणि शांत आवाजात असावी. पण आता ध्वनिक्षेपक असल्याशिवाय ती इतरांच्या कानांपर्यंत पोहोचणार नाहीत असंच लोकांना वाटतं. त्यामुळे ज्याचा आवाज मोठा त्याचा धर्म मोठा, त्याचं कर्म मोठं; पण यात शांत, सुसंस्कृत समाजजीवनाचं मर्म हरवलेलं. हे बटबटीत फलक, जाहिराती डोळ्यांपर्यंत निश्चित पोहोचतात, डी.जे. आणि ध्वनिक्षेपक यांमधले कर्कश आवाज कानापर्यंतही पोहोचतात, पण मनापर्यंत काहीच पोहोचत नाही याची जाण खरं तर संबंधितांना यायला हवी.
इंग्रजी राजवटीतल्या अत्याचाराच्या कहाण्या सांगताना हेही सांगितलं जायचं की, गोर्या साहेबाचे बूट चाटून साफ करण्याची शिक्षा नेटिव्ह-भारतीयांना दिली जात असे. मराठीत एक विशेषणात्मक शब्द वापरला जातो ‘बूटपुश्या’, तर ब्रिटिश राजवटीत माणसांना शिक्षा म्हणून बूटपुशे व्हावं लागे, पण लाचार, लाळघोट्या लोकांची एक जमात या स्वतंत्र भारतात फार मोठ्या प्रमाणात गेल्या १५ – २० वर्षांत वाढताना दिसत आहे.
‘निंदकाचे घर असावे शेजारी’ हे जितकं सत्य तितकंच प्रत्येक माणूस स्तुतीप्रिय असतो, हेही खरं! संशोधनानुसार कौतुुक वा स्तुतीचे चार शब्द ऐकून माणसाच्या मेंदूतील एक दालन कार्यरत होतं आणि डोपामाईन हे संप्रेरक पाझरून त्या माणसाला तात्पुरत्या स्वरूपात आश्वस्त वाटतं. अर्थात, ही भावना सुखावह असते. याचा परिणाम असा होतो की, ज्याची स्तुती होते ती व्यक्ती स्वाभाविकपणे जो स्तुती करतो त्याच्याबद्दल चांगलं मत घेऊन त्याच्यासाठी आपल्याला काय करता येईल असा आपोआप विचार करू लागते. थोडक्यात, ती व्यक्ती ‘गुडबुक्स’ मध्ये जाते.
या जाहिराती, फलक; त्याच्यावरचे पुढारी मंडळींचे छोटे, मोठे, अधिक मोठे, भव्य असे चेहरे; नावं, शुभेच्छांचे आकार हा सगळा अट्टाहास त्या माणसाची स्तुती करण्यासाठी! पण नेतृत्व हा गुण आहे. गुंडगिरी नाही. अर्थात, काही जण म्हणतील की, गुंडांमध्येही नेतृत्व असतं आणि हे मान्य केलं, तरी समाजाचं नेतृत्व करायचं असेल, तर त्याला अभ्यासाचा, सामाजिक काम करण्याचा काहीतरी पाया हवा. खेड्यापाड्यांत, गावोगावी विशिष्ट प्रकारच्या राजकारणाचं तण वाढलेलं दिसतं. पांढरा शर्ट, आखूड – निमुळती काळी पँट, पम्प शूज, हातात एखादा जाड धातू – काळे दोरे यांचं कडं, गळ्यात कुठली तरी माळ, काहींच्या कपाळाला गंध, डोळ्यावर गॉगल, चेहर्यावर एक मुजोर-बेफिकिरी आणि कोणत्यातरी स्थानिक वा राज्य पातळीवरील पुढार्याच्या सतत आगेमागे असलेला राबता… अपवाद वगळता असे अनेक युवक कार्यकर्ते दिसतात. त्यांना या सर्वांत एकजुटीची भावना आणि ‘पॉवरफुल’, ‘फील गुड’ अनुभूती जाणवत राहते. मी साहेबाच्या जास्त जवळ असलो पाहिजे, त्यांच्या किंवा तिच्या नजरेत भरलो पाहिजे, याचं प्रदर्शन मांडण्याचा सोयीस्कर व समाजमान्य मार्ग म्हणजे फलक, जाहिराती आणि त्यामध्ये लिहिलं गेलेलं कार्यकर्त्यांचं नाव, त्यांचे फोटो. या मागे न्यूनगंडांचीही विचित्र भावना असते.
आपल्याकडे हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन या सर्व धर्मीयांचे सणांचे फलक लावले जातात. त्यातही अतिप्रमाणात जाहिराती आणि फलक यांचा सुळसुळाट असतो तो गणेश उत्सव व नवरात्रीमध्ये. लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव ज्या हेतूने सुरू केला आणि त्याचं आजचं उत्सवीकरण यात उदास करणारी तफावत आहे. इथे अंतर्मुख होऊन विचार केला, तर लक्षात येतं की, मुंबई महानगरात पारशी लोक बर्याच प्रमाणात आहेत. त्यांचेही पतेतीसारखे सण आहेत, पण त्यांचं एकही पोस्टर बघायला मिळत नाही, ना त्यांच्या सणांचा गाजावाजा दिसतो. अतिशय शांतपणे, कुठलीही जाहिरातबाजी न करता उत्सव कसा साजरा करावा याचा आजही धडा पारशी लोक घालून देतात.
गणेशोत्सवासारख्या उत्सवातील असे बॅनर्स आणि जाहिरातींमध्ये श्री गणेश छोटा असतो आणि पुढारी मोठा असतो. बृहन्मुंबई महानगरपालिकेने २०२४ मध्ये असे ७० हजार बॅनर्स गणेशोत्सवानंतर काढले होते. २०२५ च्या निवडणुकीनंतर लोणावळा शहरातील काढलेल्या बॅनर्सचे आकडे वानगीदाखल तक्त्यात दिले आहे. ते आकडे पाहिल्यावर प्रश्न पडतो की, आपण महानगरपालिका, नगर परिषदेच्या कर्मचार्यांचं काम किती वाढवत आहोत… वास्तविक जे हे फलक लावतात त्यांनीच ते काढायला नको का? जे स्वत:चे झेेंडे, फलक काढू शकत नाहीत, ते वॉर्डातील सफाई कशी करणार?
मुंबई न्यायालय खंडपीठाने दिनांक ३१.०१.२०१७ साली दिलेल्या निकालाद्वारे सर्व नगरपालिका, नगर परिषदा यांतील आयुक्तांना व अधिकार्यांना सुस्पष्ट सूचना केल्या आहेत. तसंच महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ यातील सेक्शन २४४, २४५ व बी. एम. सी. ॲक्ट ३२८ आणि ३२८ (अ), महाराष्ट्र पोलीस ॲक्ट यांनुसार त्यांनी कारवाई करावी आणि हे असे अनधिकृत फलक, जाहिराती यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी एक समन्वय अधिकारी (नोडल अधिकारी) कायमस्वरूपी नेमावा असे आदेशही दिलेले आहेत. परंतु कोणताही राजकीय पक्ष आणि त्यांचे कार्यकर्ते या आदेशाचे पालन करत नाहीतच, उलट त्याचा भंग करतात. त्यामुळे १९.१२.२०२४ रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांच्या खंडपीठाने सर्व राजकीय पक्षांना कोर्टाचा अवमान केल्याच्या नोटिसा पाठविल्या. त्यानंतर नोव्हेंबर २०२५ मध्ये परत न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे यांच्या खंडपीठाने असे फलक किती काढले आणि कसे काढले यासंदर्भातले तपशील प्रत्येक गावातून तसंच जिल्ह्यातून मागविले. त्याबरोबरच सर्व राजकीय पक्षांकडून ते या सर्व नियमांचं पालन करतील अशी हमीपत्रं घेतली. दुर्दैवाने आजही सर्वत्र जाहिरातबाजी आणि फलकबाजी तेवढ्याच प्रमाणात दिसून येते. उलट तिला ऊत आला आहे. यात शहराचं विद्रुपीकरण होत असलं, दृष्टीस व चालण्यास अडथळा येत असला, तरी स्वत:च्या प्रेमात असणारे नेते नार्सिसससारखे स्वत:चे मोठमोठे फलक, जाहिराती लावू देतात आणि त्यांचे कार्यकर्ते त्यांना अशा जाहिरातींद्वारे मुजरा करतात. खरं तर या अशा फलकांची जबाबदारी पूर्णपणे त्या त्या राजकीय नेत्यांवर आणि पक्षावर टाकून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची तरतूद कायद्यात आहे. पण आपले पोलीस, स्थानिक पदाधिकारी यांच्यावर या नेतेमंडळींचा प्रचंड दबाव असतो. तसंच बर्याच वेळा पैशांचा मोहदेखीला यामागे असतो. त्यामुळे दर सणाला, दर वाढदिवसाला न्यायालयाचा अपमान होतच राहणार. कारण ‘माझा वाढदिवस, माझा फलक, माझी जाहिरात हा माझा जन्मसिद्ध हक्क’ आहे आणि आम्ही गप्पच आहोत.
जना सज्जना शुभकामना बॅनेरे चित्रित जावे,
लाळही गळावी, परी शेपूट उंचवावे ।
व्यर्थ चिंता अर्पूनी ‘त्यांना’ स्वस्थ बसावे,
जना तोंडावरी पंजा, तरी भू: भू: करावे ।।
निवृत्त न्यायमूर्ती
jmridula@gmail.com
