चिन्मय पाटणकर

भूगर्भात होत असलेल्या घडामोडींमुळे एडनच्या आखाताचे विस्तारीकरण होत आहे. तुर्कस्तान, सीरियामध्ये झालेल्या भूकंपांमागे भूगर्भातील प्रस्ताराच्या (प्लेट) घर्षणातून निर्माण झालेल्या ताणासह एडनच्या आखाताच्या विस्तारीकरणाचा परिणामही असण्याची शक्यता आहे.

survival of marine species in danger due to ocean warming
विश्लेषण : महासागर तापल्याने प्रवाळ पडू लागलेत पांढरेफटक… जलसृष्टीचे अस्तित्वच धोक्यात?
Russian missile attack kills 13 in Ukraine
रशियन क्षेपणास्त्र हल्ल्यात युक्रेनमधील १३ जण ठार
economic confidence china japan company
जर्मन कंपन्या चीनमधून पुन्हा जपानमध्ये का जात आहेत?
Loksatta explained North Korea also has a destructive hypersonic missile
उत्तर कोरियाच्या हाती लवकरच विध्वंसक हायपरसॉनिक क्षेपणास्त्र… पण या छोट्या, मागास देशाकडे हे तंत्रज्ञान आले कसे?

पश्चिम आशियातील तुर्कस्तान, सीरिया या देशांना ७.८, ७.६ आणि ६.० रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेच्या भूकंपांचे धक्के बसले. या दोन देशांसह ४५६ किलोमीटरवरील सायप्रस, ८७४ किलोमीटरवरील लेबेनॉन, एक हजार ३८१ किलोमीटरवरील इस्रायल, एक हजार ४११ किलोमीटरवरील इजिप्त या देशांमध्येही या भूकंपाचा परिणाम जाणवला इतकी या भूकंपाची भीषण तीव्रता होती. दक्षिण-मध्य तुर्कस्तानातील गाझियानटेप या शहराजवळ या भूकंपाचा केंद्रबिंदू आहे. या शहरात सुमारे वीस लाख नागरिक राहतात. त्यात २०११ पासून सीरियात सुरू असलेल्या युद्धामुळे पळून आलेल्या सीरियन निर्वासितांची संख्या मोठी आहे. भूकंपाच्या पहिल्या धक्क्यानंतर जवळपास ४० धक्के बसले. त्यातील काहींची तीव्रता ही ६.७ रिश्टर स्केल होती. गेल्या १०० वर्षांत बसलेल्या भूकंपांच्या धक्क्यांमधील हा सर्वांत मोठा धक्का असल्याचे मानले जाते. आतापर्यंत आठ हजारांहून अधिक नागरिकांचा या भूकंपामुळे मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. भूकंपांमुळे इमारती कोसळल्यानंतर त्याखाली अडकलेले नागरिक, लहान मुलांना बाहेर करण्यासाठी यंत्रणा प्रयत्नशील आहे. मात्र तुर्कस्तानातील पाऊस आणि थंडीमुळे मदतकार्यात अडथळे येत आहेत. तर सीरियामध्येही मोठे नुकसान झाले असून, दीड हजारांपेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तसेच अनेक इमारती कोसळल्या आहेत.

युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हेने दिलेल्या माहितीनुसार या भूकंपाचे केंद्रस्थान १८ किलोमीटर खोल आहे. गाझियानटेप शहराच्या परिसरातील इमारती काँक्रीट विटांपासून बांधलेल्या आहेत. भूकंपाच्या धक्क्याने या इमारती कोसळल्या. गाझियानटेप आणि काहरामनमारास प्रांतातील जवळपास एक हजारांहून अधिक इमारती कोसळल्याची माहिती तुर्कस्तान प्रशासनाने दिली. इमारतींसह रस्ते, वाहने, विमानतळाचेही प्रचंड नुकसान झाले. गाझियानटेप जवळच्या दहा शहरांना या भूकंपाचा फटका बसला. गाझियानटेपमधील टेकडीवर असलेला २२०० वर्षे जुना किल्ला कोसळला. रोमन काळापासून या किल्ल्याचा वापर निरीक्षणासाठी केला जात होता. या किल्ल्याच्या भिंती आणि टॉवर कोसळला आहे. त्याशिवाय तेराव्या शतकात बांधलेली येनी मशीद कोसळली.

तुर्कस्तान हा भूकंपप्रवण क्षेत्रातील देश आहे. एकट्या २०२० या वर्षात ३३ हजार भूकंपांची नोंद झाली होती. त्यातील ३३२ भूकंप ४.० रिश्टर स्केल आणि त्यापेक्षा जास्त तीव्रतेचे होते. १९३९ ते २०२३ या काळात तुर्कस्तानने सहा मोठे भूकंप अनुभवले. १९०० पासून आतापर्यंत तब्बल ७६ भूकंपांमध्ये जवळपास एक लाखापर्यंत नागरिक भूकंपाचे बळी ठरले आहेत. तुर्कस्तानची भूकंपप्रवण स्थिती त्याच्या टेक्टोनिक स्थानावरून समजते. पृथ्वीच्या सर्वात बाहेरील थरात सुमारे १५ प्रमुख प्रस्तर असतात. त्यांना ‘टेक्टोनिक प्लेट्स’ असे म्हटले जाते. या प्लेट्समधील सीमांमध्ये अचानक होणाऱ्या हालचालींमुळे भूकंप होऊ शकतो. तुर्कस्तान ॲनाटोलियन टेक्टोनिक प्रस्तरावर स्थित आहे. तुर्कस्तानच्या उत्तरेला युरेशियन प्रस्तर आहे. युरेशियन आणि ॲनाटोलियन टेक्टोनिक प्रस्तार यांचा मीलनबिंदू हा विनाशकारी म्हणून ओळखला जातो. या प्रस्तरांमध्ये होणाऱ्या वारंवार घर्षणामुळे या भागात सातत्याने भूकंप होतात. काही भूगर्भ शास्त्रज्ञांच्या मते तुर्कस्तानमधील जवळपास ९५ टक्के भूभागाला भूकंपाचा धोका आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि ज्येष्ठ भूशास्त्रज्ञ डॉ. नितीन करमळकर हिमालयाचे अभ्यासक आहेत. त्यामुळे त्यांनी त्यांच्या अभ्यासाच्या अनुषंगाने इराण, तुर्कस्तान परिसरांतही काम केले आहे. या भूकंपाच्या अनुषंगाने डॉ. करमळकर यांनी वेगळा मुद्दा मांडला. गेल्या दहा वर्षांत तुर्कस्तान, सीरियामध्ये दरवर्षी भूकंप झाल्याचे दिसून येते. तुर्कस्तान हा देश अरेबियन प्रस्तर आणि ॲनाटोलियन टेक्टोनिक प्रस्तराच्या सांध्यावर आहे. या दोन्ही प्रस्तर दरवर्षी सरकत आहेत. त्यात अरेबियन प्लेट ०.५६ इंचांनी उत्तरेकडे सरकत आहे, तर ॲनाटोलियन टेक्टोनिक प्रस्तर ०.२२ इंचांनी पश्चिमेकडे सरकत आहे. प्रस्तरांच्या हालचालींचा अभ्यास केला असता या प्रस्तरांमधील ताणनिर्मितीची प्रक्रिया गेल्या ३०० वर्षांत झालेली असू शकते. त्यामुळे हा ताण मोठ्या भूकंपाच्या रूपाने बाहेर पडला. झालेल्या हानीचा विचार केल्यास भूकंपाची तीव्रता जास्त आहे, म्हणून जास्त हानी झाली असे म्हणता येत नाही. तर भूकंपप्रवण क्षेत्र असूनही तेथील इमारती भूकंपरोधी बांधकामाच्या नाहीत. परिणामी भूकंपाचा मोठा फटका बसला. भूगर्भातील बदलांची प्रक्रिया लाखो वर्षांची असते. एडनचे आखात विस्तारणे ही प्रक्रिया अशीच आहे. काही लाख वर्षांपूर्वी भूगर्भीय घडामोडींमुळे मादागास्कर भारतीय उपखंडापासून वेगळा झाला. तशीच प्रक्रिया पूर्व आफ्रिकेचा भूभाग आणि समुद्रात होत आहे. तर एडनच्या आखातामध्ये ‘मॅग्माटिक ॲक्टिव्हिटी’ (पृथ्वीच्या अंतर्भागातील द्रावापासून अग्निजन्य खडक तयार होण्याची प्रक्रिया) होत आहे. ही संपूर्ण प्रक्रिया भूशास्त्रीयदृष्ट्या ताजी किंवा अलीकडची आहे. त्यामुळे तुर्कस्तान, सीरियातील भूकंपामागे भूगर्भीय घडामोडींचा परिणामही असू शकतो. त्यामुळे भूकंप होण्यामागे वेगवेगळ्या भूगर्भीय शक्यता असू शकतात, असे डॉ. करमळकर यांनी सांगितले.

chinmay.patankar@expressindia.com