शफी पठाण

मराठी साहित्य संमेलन हे सर्जनाचे नितळ क्षितिज निर्माण करणारे सशक्त साधन आहे, भोवतालच्या समाजजीवनाचे चिंतनात्मक प्रतिबिंब या संमेलनात उमटत असते व त्याद्वारे तत्त्वचिंतनाची एक नवी वाट साहित्यप्रेमींना गवसत असते, असा एक मतप्रवाह आजच्या नवमाध्यमांच्या जगातही कायम आहे. म्हणूनच मागच्या ९५ वर्षांच्या परंपरेप्रमाणे याहीवर्षी असे एक संमेलन गांधी- विनोबांच्या कर्मभूमीत अर्थात वर्धेला ‘सर्जनात्मक’ पद्धतीने पार पडले. परंतु, आता या संमेलनाची ‘सर्जनात्मकता’च सर्वाधिक चर्चिली जात आहे. अशी संमेलने वर्तमानात नि:संदर्भ आणि अर्थहीन होत चालली असताना त्यांना सर्जनाचे नितळ क्षितिज निर्माण करणारे सशक्त साधन म्हणायचे का, असाही एक प्रश्न या चर्चेतून उपस्थित होऊ लागला आहे. या प्रश्नाला वर्धेच्या संमेलनातील अस्वस्थ करणाऱ्या काही घटनांनी पूरक बळच पुरवले आहे. या घटनांचाच ऊहापोह…

There is a possibility of a code of conduct for the upcoming Lok Sabha elections
पिंपरी: आचारसंहितेच्या शक्यतेने राजकारण्यांप्रमाणेच प्रशासकांचीही धावपळ; तब्बल ‘इतक्या’ कोटींच्या कामांना मंजुरी
dwarka pm modi
प्राचीन द्वारका नगरीच्या दर्शनातून पंतप्रधान मोदींचा अहिर समुदायाला संदेश
Death threat to Deputy Chief Minister devendra Fadnavis on social media case filed in Santacruz police station
उपमुख्यमंत्री फडणवीस यांना समाज माध्यमांवर ठार मारण्याची धमकी, सांताक्रुझ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Sharad pawar on loksatta agralekh
“मी फक्त लोकसत्ताचा अग्रलेख वाचला”, अजित पवारांच्या ‘त्या’ पत्रावरून शरद पवारांचा खोचक टोला, काय लिहिलंय अग्रलेखात?

वर्धा येथे ९६वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार हे जाहीर झाल्यापासून या संमेलनाबाबत साहित्यप्रेमींची उत्कंठा वाढली होती. गांधी-विनोबांच्या कर्मभूमीत संमेलन होत असल्याने ते पुरेशे गांभीर्याने होईल व नेहमीच्या वाद-विवादाला फारसे स्थान मिळणार नाही, असाही विश्वास साहित्य वर्तुळातून व्यक्त केला जात होता. परंतु, या विश्वासाला पहिला तडा गेला तो संमेलनाध्यक्षांच्या निवडीवरून. संमेलनाध्यक्षपदासाठी ज्येष्ठ लेखक आणि विचारवंत सुरेश द्वादशीवार यांच्या नावाची केवळ घोषणा शिल्लक असताना शेवटच्या क्षणी काहीतरी वेगळे घडले आणि द्वादशीवार थेट स्पर्धेतूनच बाद झाले. द्वादशीवारांच्या बाद होण्याला सरकारी हस्तक्षेप कारणीभूत असल्याच्या बातम्या समोर आल्या आणि या संमेलनाकडे आस्थेने पाहण्याची अनेकांची दृष्टीच बदलली. समाजामध्ये माणूसपण हरवत असताना व त्या हरवण्याची दखल साहित्य संमेलनामध्ये अभावानेच का होईना पण घेतली जात असताना ती संधीसुद्धा साहित्यिकांकडून हिसकावून घेणाऱ्या या कृतीचे पडसाद साहित्य वर्तुळात उमटायला लागले. दुसऱ्या गटाकडून त्याचे खंडन करणारा सूर जोरकसपणे व्यक्त होऊ लागल्याने हे संमेलन वाङ्मयीन कारणाशिवायच गाजणार याचे संकेत मिळायला लागले आणि घडलेही तसेच. पण, एकच वाद संमेलनभर पुरेल तर ते संमेलन कसले? त्यामुळे रोज नवनवीन वादाची भर पडत गेली. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत विदर्भवाद्यांनी संमेलनाच्या मांडवात जोरदार घोषणाबाजी केल्याने पोलिसांनी संमेलनाचे जणू पोलीस छावणीत रूपांतर करून टाकले. सुरक्षेच्या नावावर सुरू झालेला पोलिसांचा अतिरेक इतक्या टोकाला पोहोचला की खुद्द संमेलनाध्यक्षांनाही दारावर अडवण्यात आले. ज्या संमेलनाध्यक्षांना राज्य अतिथीचा दर्जा देण्याची घोषणा सरकारने केली त्याच सरकारच्या अखत्यारीतील पोलिसांनी संमेलनाध्यक्षांचा अवमान केला. हा आयोजकांसाठी अतिशय नामुष्कीचा क्षण होता.

संमेलनात संमेलनाध्यक्षांना काय स्थान असते, हे आयोजकांना माहीत नसेल काय? माहीत असेल तर त्यांनी तो मान जपण्यासाठी काय प्रयत्न केले? उपमुख्यमंत्री मंचावर असताना संमेलनाध्यक्ष त्यांना तिकडे नको होते काय? तसे नसेल तर त्यांनी पोलिसांच्या बंदोबस्ताचा अतिरेक होतोय, हे स्पष्ट दिसत असतानाही संमेलनाध्यक्ष विनाअडथळा मंचावर पोहोचतील, अशी व्यवस्था का केली नाही? संमेलनाच्या तीनही दिवसांसाठी संमेलनाध्यक्षांसोबत एक अधिकृत अधिकारी का नेमला नाही? हे सर्व प्रश्न साहित्यात आस्था ठेवणाऱ्या कुणालाही अस्वस्थ करतील असेच आहेत. पण, आयोजकांना या प्रश्नांनी एका क्षणालाही अस्वस्थ केल्याचे संमेलनाच्या समारोपापर्यंत तरी जाणवले नाही. संमेलनाध्यक्षांच्या या अवमानाला त्यांच्या कन्येनेच समाजमाध्यमांवर वाचा फोडली. त्यावर प्रतिक्रियांचा चौफेर पाऊसही पडला. पण, आयोजकांनी मात्र या खेदजनक प्रकाराबद्दल जाहीर दिलगिरी व्यक्त करण्याचे सौजन्य दाखवले नाही. जिथे संमेलनाध्यक्षांचाच अवमान होतो तिथे इतरांचे काय, असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. संमेलनाच्या मांडवातील मान्यवर वलयांकित असो वा नसो त्यांची प्रतिष्ठा जपलीच गेली पाहिजे. दुर्दैवाने वर्धेत असे चित्र नव्हते. ज्या मान्यवरांना प्रमुख अतिथी म्हणून सन्मानाने संमेलनाला बोलावले गेले त्यांचीही अप्रत्यक्ष अवमानना आयोजकांनी केली. ज्येष्ठ हिंदी कवी व समीक्षक डॉ. विश्वनाथप्रसाद तिवारी, प्रसिद्ध हिंदी कवी डॉ. कुमार विश्वास यांना या संमेलनासाठी विशेषत्वाने आमंत्रित करण्यात आले होते. मागच्या काही वर्षांपासून संमेलनात इतर भाषेतील सारस्वतांना मानाचे पान दिले जाते. मराठीचे इतर भाषांसोबतचे ऋणानुबंध अधिक घट्ट व्हावे, आपल्या भाषेतील जे जे काही वंदनीय, अभिनंदनीय आहे ते त्यांना सांगता यावे. त्यांच्या भाषेतील श्रेष्ठ गोष्टी मराठी जणांना कळाव्या, असा यामागचा उदात्त हेतू आहे. यासाठी या मान्यवरांना विस्ताराने बोलता यावे, अशी कार्यक्रम पत्रिकेची रचना केली जाते. वर्धेत मात्र या परंपरेला फाटा देण्यात आला. संमेलनात आलेल्या राजकारण्यांना जास्त बोलता यावे म्हणून चक्क डॉ. विश्वनाथप्रसाद तिवारी व डॉ. कुमार विश्वास यांना केवळ पाच-पाच मिनिटांचा वेळ देण्यात आला. डॉ. विश्वनाथप्रसाद तिवारी व डॉ. कुमार विश्वास उत्तम वक्ते आहेत. ते दुहेरी संवादाच्या मोठ्या तयारीने संमेलनाला आले होते. श्रोत्यांनाही त्यांना मनसोक्त ऐकायचे होते. परंतु, आयोजकांच्या भाषणबंदीने त्यांना पाच मिनिटातच ध्वनिक्षेपक सोडावा लागला. राजकारणी मात्र अर्धा-अर्धा तास सरकारी योजनांच्या प्रसिद्धीचे गुणगान करीत असतानाही त्यांना कुणी डायसमागून चिठ्ठी पोहोचवल्याचे स्मरत नाही. ही झाली मंचावरील मान्यवरांच्या अवमानाची गोष्ट. मंचाखालीही असे प्रकार अनेकदा घडले. प्रकाशकांना तर पदोपदी उपेक्षेचा सामना करावा लागला. ग्रंथ दालनात अनंत अडचणी होत्या. सुरक्षेच्या अतिरेकामुळे ग्रंथप्रेमींना थेट ग्रंथ दालनात येता येत नव्हते. वळसा मारून जायचे म्हटले तर अंतर खूप जास्त हाेते. याचा फटका ग्रंथविक्रीला बसला. आयोजनात त्रुटी होत्या. पण, म्हणून संमेलनात सगळे वाईटच घडले असे अजिबात नाही. अनेक आदर्श व संमेलनाच्या पारंपरिक चौकटीबाहेरच्या गोष्टींसाठीही वर्धेचे संमेलन आठवणीत राहील. त्यातील पहिली व अभिनंदनीय गोेष्ट ही की संमेलनाध्यक्ष माजी न्या. नरेंद्र चपळगावकर हे स्वत: या संमेलनाच्या प्रतीकात्मक विरोधासाठी आयोजिलेल्या विद्रोही साहित्य संमेलनाच्या मांडवात गेले. आपण मागच्या १७ वर्षांपासून ज्याविरुद्ध विद्रोहाचा बिगुल फुंकतोय त्या संमेलनाच्या सर्वोच्च स्थानी असलेली व्यक्ती आपल्या मांडवात आली हे बघून विद्रोहीचे आयोजकही भारावले व सौहार्दाच्या सुगंधाने दरवळणारे हारतुरे घेऊन चपळगावकरांच्या स्वागताला सामोरे गेले. दोन विचारधारांच्या समरसून झालेल्या या भेटीने साहित्याचे हे ‘सुंदरबन’ मोहरून गेले. शंभराव्या वर्षाकडे प्रवास करणाऱ्या संमेलनाच्या इतिहासात चपळगावकरांची ही कृती सोनेरी अक्षरांनी लिहिली जावी, अशीच आहे. आता संमेलन संपले आहे. परंतु, वर्धेच्या या संमेलनात जे काही चांगले व वाईट पायंडे घातले गेले त्याचे कवित्व मात्र पुढच्या संमेलनापर्यंत सुरूच राहणार आहे.

shafi000p@gmail.com