राघव रविंद्र जोशी
सध्या भारतात ‘गांधी’ आणि ‘गांधीविचार’ यांभोवती रोज काही ना काही राजकारण घडताना दिसत आहे. गांधी या व्यक्तीच्या ऐतिहासिक आणि नैतिक महत्त्वाला सत्ताधारी पक्षाच्या वैचारिक पूर्वसरींनी जाणीवपूर्वक नकारात्मक लेबल लावल्यामुळे गांधींच्या प्रतिमेवर सातत्याने आघात होत आहेत. परिणामी, समाजात एक प्रकारचा संघटित “गांधीविरोधी सूर‘ निर्माण झालेला दिसतो.
मात्र हे विसरून चालणार नाही की गांधीजी देखील एक व्यक्तीच होते- इतर सामान्य माणसांप्रमाणे. त्यांच्यातही चांगल्या-वाईट मूल्यांचा, योग्य-अयोग्य निर्णयांचा मिश्रण दिसत होते. तरीसुद्धा गांधींना असामान्यत्व प्राप्त झाले, ते त्यांनी समाजाच्या सामूहिक जाणिवेत रुजवलेल्या दोन वैश्विक मानवी मूल्यांमुळे- ‘सत्य’ आणि ‘अहिंसा’. या लेखाचा उद्देश गांधींना ‘चांगले’ किंवा ‘वाईट’ रंगवून दाखवणे हा नसून, गांधी ह्या व्यक्तीचा विविध अंगांनी घेतलेला वेध आहे- जो प्रस्तुत लेखकाला आकळलेला गांधी आहे.
मला वाटते, ‘गांधी समजणे कठीण आहे; पण त्यांना अमलात आणणे जवळजवळ अशक्य आहे.’ या विधानातील सत्य या लेखाच्या वाचनानंतर वाचकाला निश्चितच जाणवेल. मुळात भारतीय समाजाला ‘खिसा फाटेस्तोवर त्यात गांधीप्रतिमा असलेली’ चालते; मात्र त्यांच्या सत्य-अहिंसेच्या तत्त्वांशी प्रत्यक्ष सामना करावा लागला की लोक नाक मुरडतात.
हीच तर गांधींची सर्वात मोठी विसंगती आहे. अशी विरोधाभासी प्रतिमा असलेली व्यक्ती भारतीय इतिहासात कदाचित एकमेव असेल. त्यामुळेच आजच्या तरुण पिढीसाठी गांधी ही ‘meme material’ म्हणून उरलेली एक गोष्ट बनत चालली आहे. अनेक अर्वाच्य भाषेतील सुविचार गांधींच्या नावाने सर्रास खपवले जातात. हा फक्त व्यक्तीद्वेष नसून मूल्यद्वेष आहे का, असा विचार करण्याची वेळ आली आहे. अनेक बीभत्स प्रतिमांमध्ये गांधीजींचा उपयोग केला जातो. इतर देशांत आपल्या राष्ट्रपुरुषांचे किंवा सामान्य नेत्यांचे असे सार्वजनिक वाभाडे क्वचितच काढले जात असतील, पण भारतीय तरुण मात्र याबाबतीत पुढे आहेत. गोलमेज परिषदेत धोतर नेसून गेलेला हा माणूस सर्व मान्यवरांसमोर ठीक सहाच्या ठोक्याला सभा सोडून ‘प्रार्थना’ म्हणायला बाहेर पडतो-याला त्याची ‘मूल्यनिष्ठा’ म्हणायचे की “मंत्रचाळपणा’, हे ज्याने त्याने ठरवावे.
‘खेड्यांकडे चला’ हा गांधींचा संदेश आपण कदाचित ‘खेड्यांना शहरांकडे घेऊन चला’ असा चुकीचा ऐकला असावा. त्यामुळेच आज खेडी आपली स्वायत्तता गमावत चालली आहेत. पुणे-मुंबईसारखी मोठी शहरे आपल्या आजूबाजूची सर्वच खेडी गिळंकृत करत आहेत – हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. विवेकानंद म्हणतात, ‘शेवटचे तीन मिनिटे मैदानात कुणीही शौर्य गाजवू शकतो. एखाद्या वेळी तलवार हातात न पकडता येणारा माणूससुद्धा उन्मादाने तलवार नाचवू शकतो. पण खरे शौर्य कशात असेल, तर ते चित्तवृत्तींच्या विरोधात आहे- संयमात, शिस्तीत आणि विवेकाचा वापर करण्यात आहे. कारण हे करायला प्रचंड मानसिक शक्ती व भावनांवर नियंत्रण लागते, जे फक्त अंगात शौर्य असलेला माणूसच करू शकतो.’
हेच गांधींनी करून दाखवले. प्रवाहाच्या विरुद्ध पोहणे हे महाकठीण काम आहे. फक्त एवढेच नाही, तर साधी राहणी, उच्च विचारसरणी, सत्य आणि अहिंसा या व्रतांचे कठोर पालन करणे- हे या उपभोगवादी व चंगळवादी जगात जमते आहे का, हे पाहावे लागेल. पण आपल्याला ‘वैयक्तिक गांधी’ हवा आहे, असे बरेच लोक म्हणतील. म्हणजे सत्य, अहिंसा, वैचारिक सहिष्णुता यांचे पालन ज्याने त्याने आपल्या आयुष्यात करावे. आपण जगाला ज्ञान शिकवायला जाऊ नये. लोक त्यांना हवे तसे जगतील, कुणालाही न दुखावता. हा प्रतिवाद तसा योग्यच म्हणावा लागेल. कुठलीही विचारसरणी लादली गेली नाही पाहिजे. पण मग प्रश्न असा उरतो की, गांधींनी त्यांची विचारसरणी इतरांवर लादली का? याचे उत्तर अर्थातच नकारार्थी आहे. लोकांनी ती स्वतःहून अंगीकारली होती, कारण त्यात एक मानवतावादी व वैश्विक जाणीव होती.
मात्र बाहेरच्या जगात वावरताना ‘दोन घ्यावे आणि दोन द्यावे’ लागतात. तिथे फक्त दोन घेऊन काहीच उपयोग नाही- ती तर आत्महत्या ठरेल. समोरची व्यक्तीही गांधी व बुद्ध विचारांची असेल, तेव्हाच ही विचारसरणी कामात येईल, because everything is a trade-off. परंतु जर आपण एखाद्या मूल्यांवर ठाम राहिलो, त्यावर आचरणनिष्ठा ठेवली आणि तिचे प्रामाणिकपणे व काटेकोरपणे पालन केले, तर जग त्यानुसार बदलते आणि ती मूल्ये आपणहून अंगिकारते – हे गांधींनी दाखवून दिले.
गांधींनी लोकांचा विचार केला नाही, तर लोकांसाठीचा विचार केला. लोकांना काय हवे आहे, समाजातील भेदभाव कसा दूर करता येईल, देशाला स्वातंत्र्य तसेच सुराज्य कसे मिळवता येईल, याचे त्यांनी सातत्याने चिंतन केले. त्यामुळेच ग्रामस्वराज्य, नई तालीम, सत्याग्रह यांसारखे उपक्रम व चळवळी उभ्या राहिल्या.
गांधी ही अशी व्यक्ती होती जिने स्वतःच्या कमजोरीला स्वतःची सर्वात मोठी ताकद बनवली. कृश शरीर, हातात काठी आणि गरजेपुरते अंग झाकणारे कपडे- ही प्रतिमा एखाद्या स्वातंत्र्यसैनिकाची किंवा रणांगणावर कर्तृत्व गाजवणाऱ्या योध्याची कशी असेल? पण गांधींची तीच प्रतिमा होती, कारण त्यांनी तत्त्वांनी व मूल्यांनी मोठ्या प्रमाणात जनाधार मिळवला होता. त्यांची साधी व प्रामाणिक जीवनशैली ही त्या तत्त्वांचे व मूल्यांचे प्रत्यक्ष दर्शन लोकांना देत होती. आणि त्याच लोकांचा पाठिंबा गांधीजींचे सर्वात मोठे स्वातंत्र्यलढ्याचे शस्त्र बनले, ज्यामुळे ब्रिटिशांविरोधात अनेक चळवळी पुढे आल्या.
गांधी विज्ञानविरोधी आहेत, असे एक लेबल त्यांना लावले जाते. हे काही अंशी सत्य आहे, कारण गांधी औद्योगीकरणामुळे किंवा भौतिक प्रगतीमुळे माणूस यंत्र होत चालला आहे, अशा मताचे होते. म्हणून नैतिकतेविरुद्ध जाणारे विज्ञान त्यांना नको होते. (पण त्यामुळे विज्ञानामुळे होणारा सकारात्मक भौतिक बदल आपण दुर्लक्षित करू शकत नाही.) मात्र विज्ञानामुळे होत असलेल्या औद्योगीकरणामुळे पर्यावरणाची हानी होत आहे, हे आपण मान्य केलेच पाहिजे. तसेच दुसऱ्या महायुद्धात विज्ञानाने शोधलेल्या अणुबॉम्बचा वापर करण्यात आला, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी झाली. त्यामुळे गांधीजींचा विज्ञानविरोधी सूर आपल्याला दिसून येतो.
गांधीजी म्हणत की आत्मसंतुष्ट माणूस हा देशासाठी घातक असतो. पण वरवर पाहता गांधीजी स्वतःही आत्मसंतुष्टच वाटतात, ना? कारण त्यांची साधी राहणी व राहणीमान हे भारतातील अगदी गरिबातल्या गरीब माणसासारखे होते. तरीसुद्धा या प्रश्नाचे उत्तर ‘नाही’ असे आहे. कारण आत्मसंतुष्ट म्हणजे फक्त स्वतःच्या परिघाचा विचार करणारा, जो केवळ स्वतःचाच विचार करतो, असा माणूस. पण गांधीजींना समाजाभिमुख माणूस अपेक्षित होता- जो सर्वांना सोबत घेऊन चालेल. भौतिक प्रगतीत तुम्ही आत्मसंतुष्ट राहिलात तरी हरकत नाही, असे गांधीजी म्हणत.
दक्षिण आफ्रिकेमध्ये झुलू बंड झाले होते. तेव्हा गांधीजींनी जखमी लोकांची सुश्रूषा करण्याची जबाबदारी स्वीकारली होती. यामुळे त्यांचा हिंसा व स्वातंत्र्य याविषयी वेगळा दृष्टिकोन तयार झाला. तो असा की हक्क व स्वातंत्र्य हे हिंसेशिवायसुद्धा मिळू शकतात. त्यामुळे त्यांनी अहिंसेचा मार्ग निवडला, ज्याचे रूपांतर पुढे अहिंसक सत्याग्रहामध्ये झाले. त्या काळात गांधीजी ब्रिटिशांना मदत म्हणून त्या कामांमध्ये उतरले होते, हेही वास्तव आहे.
जाता जाता काही प्रश्न उपस्थित होतात. गांधीजींनी त्यांच्या सत्य व अहिंसा या तत्त्वांचा अतिरेक केला का? विशेषतः हिंदू-मुस्लिम प्रश्न हाताळताना? त्यांच्या तत्त्वांनीच त्यांचा घात केला का? त्यांनी परिस्थितीनुसार वाकायला हवे होते का? त्यांनी मुसलमानांना झुकते माप दिले का? फाळणी झाली तेव्हा कोट्यवधी लोकांचे स्थलांतर झाले, लाखो लोक मारले गेले – याला गांधीजी आणि काँग्रेस जबाबदार होते, हा उजव्यांचा दावा कितपत योग्य आहे? गांधींनी फाळणीच्या वेळी अधिक व्यवहार्य भूमिका घ्यायला हवी होती का?
वरील बहुतांश प्रश्नांची उत्तरे काही अंशी होकारार्थी असू शकतात. पण इतिहासाचे उत्तर आणि संशोधन ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे या प्रश्नांचा समंजसपणे पुन्हा एकदा धांडोळा घेणे
लेखक व ब्लॉगर
joshivr20@gmail.com

