डॉ. सुनील भारोडकर
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या सुधारणांचा आणि जागतिक सत्तासंतुलनाचा प्रश्न पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. २६ ऑक्टोबर २०२६ रोजी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत भारताचे स्थायी प्रतिनिधी राजदूत हरीश पर्वतनेनी यांनी नव्या कायमस्वरूपी सदस्यांना व्हेटो पॉवर म्हणजेच नकाराधिकार न देण्याच्या प्रस्तावाला विरोध दर्शविला. नकाराधिकाराची तरतूद कायम असेल, तर सर्व कायमस्वरूपी सदस्यांना समान अधिकार मिळाले पाहिजेत, अशी भारताची ठाम भूमिका राहिली आहे.

जगात शांतता प्रस्थापित करण्यासाठी निर्माण झालेल्या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या निर्णयप्रक्रियेवर मोजक्या महासत्तांचे नियंत्रण असेल, तर त्या संस्थेच्या लोकशाही स्वरूपाबद्दल प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर १९४५ मध्ये स्थापन झालेल्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेपुढे आज हाच मूलभूत प्रश्न उभा आहे. एकीकडे जगाची राजकीय, आर्थिक आणि सामरिक रचना आमूलाग्र बदलत आहे. दुसरीकडे आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेबाबत निर्णायक अधिकार असलेल्या सुरक्षा परिषदेची मूलभूत सत्तारचना मात्र ऐतिहासिक परिस्थितीच्या चौकटीत अडकलेली आहे. या पार्श्वभूमीवर, सुरक्षा परिषदेच्या कायमस्वरूपी सदस्यत्वाचा विस्तार करताना नव्या सदस्यांना नकाराधिकार (व्हेटो पॉवर) न देण्याच्या प्रस्तावाला भारताने विरोध केला आहे. नकाराधिकाराची तरतूद अस्तित्वात असेपर्यंत सुधारित सुरक्षा परिषदेतील सर्व कायमस्वरूपी सदस्यांना समान अधिकार मिळाले पाहिजेत, अशी भारताची ठाम भूमिका आहे.

२६ ऑक्टोबर २०२६ रोजी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत सुरक्षा परिषदेतील नकाराधिकारासंबंधीच्या चर्चेदरम्यान भारताचे संयुक्त राष्ट्रांतील कायमस्वरूपी प्रतिनिधी राजदूत हरीश पर्वतनेनी यांनी ही भूमिका मांडली. नव्या कायमस्वरूपी सदस्यांना नकाराधिकारापासून वंचित ठेवल्यास त्यांना दुय्यम दर्जाचे सदस्यत्व मिळेल आणि विद्यमान पाच महासत्तांचे निर्णयप्रक्रियेवरील वर्चस्व कायम राहील, असा भारताचा युक्तिवाद आहे. ही भूमिका केवळ भारताच्या कायमस्वरूपी सदस्यत्वाच्या आकांक्षेपुरती मर्यादित नाही. ती जागतिक सत्तावाटप, आंतरराष्ट्रीय संस्थांची वैधता आणि न्याय्य बहुपक्षीय व्यवस्थेच्या भवितव्याशी संबंधित आहे. याच वेळी भारताने निवेदनात संयुक्त राष्ट्रसंघाच्या इतिहासात नकाराधिकाराचा ३३१ वेळा वापर झाल्याचा आणि सुमारे २०० ठरावांशी संबंधित नकाराधिकाराच्या नोंदींचा उल्लेख केला. नकाराधिकार हा सुरक्षा परिषदेतील सर्वाधिक वादग्रस्त अधिकारांपैकी एक असे याबाबत विवेचन केले.

सुरक्षा परिषद : जागतिक महासत्तांच्या वर्चस्वाचे व्यासपीठ

संयुक्त राष्ट्रसंघाची सुरक्षा परिषद ही आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षिततेची जबाबदारी सांभाळणारी प्रमुख संस्था आहे. आंतरराष्ट्रीय संघर्ष, सशस्त्र संघर्षांमुळे निर्माण होणाऱ्या परिस्थिती, आर्थिक निर्बंध आणि जागतिक सुरक्षेला असलेल्या धोक्यांबाबत या परिषदेची भूमिका महत्त्वाची असते. काही परिस्थितींमध्ये तिचे निर्णय संयुक्त राष्ट्रांच्या सदस्य राष्ट्रांवर बंधनकारक ठरू शकतात.

आज सुरक्षा परिषदेत एकूण १५ सदस्य असून त्यांपैकी चीन, फ्रान्स, रशिया, ब्रिटन आणि अमेरिका हे पाच कायमस्वरूपी सदस्य आहे. याच पाच देशांकडे नकाराधिकार ज्याला आपण विशेष अधिकार म्हणतो. उर्वरित दहा सदस्यांची निवड दोन वर्षांच्या कालावधीसाठी केली जाते. मात्र त्यांना नकाराधिकार नाही. सुरक्षा परिषदेच्या मतदान व्यवस्थेनुसार, प्रक्रियात्मक नसलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयांसाठी आवश्यक मतांच्या अटींबरोबरच कायमस्वरूपी सदस्यांच्या नकारात्मक मताचा प्रश्न निर्णायक ठरतो. एखाद्या कायमस्वरूपी सदस्याने अशा ठरावाविरुद्ध नकाराधिकार वापरल्यास, इतर सदस्यांचे बहुमत त्या ठरावाला पाठिंबा देत असले तरी तो मंजूर होऊ शकत नाही. अशा प्रकारे एका देशाला संपूर्ण परिषदेच्या निर्णयप्रक्रियेवर प्रभाव टाकण्याचा विशेष अधिकार मिळतो.

दुसऱ्या महायुद्धानंतरच्या राजकीय परिस्थितीत या व्यवस्थेमागे व्यावहारिक तर्क होता. जागतिक शांतता टिकवण्यासाठी त्या काळातील प्रमुख शक्तींना नव्या आंतरराष्ट्रीय व्यवस्थेत सहभागी ठेवणे आवश्यक होते. परंतु ऐतिहासिक परिस्थितीतून निर्माण झालेली व्यवस्था कायमस्वरूपी न्याय्य ठरतेच असे नाही. १९४५ मधील जागतिक सत्तासमीकरणे आणि २०२६ मधील जागतिक वास्तव यांच्यात मोठे अंतर निर्माण झाले आहे. आज आशिया, आफ्रिका आणि लॅटिन अमेरिकेतील देशांचे महत्त्व वाढले आहे. जागतिक अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान, व्यापार, हवामान बदल, ऊर्जा सुरक्षा आणि प्रादेशिक संघर्ष यांचे स्वरूपही बदलले आहे. मग जागतिक निर्णयप्रक्रियेतील प्रतिनिधित्वाची रचना मात्र प्रामुख्याने दुसऱ्या महायुद्धानंतरच्या व्यवस्थेवर आधारित का असावी? शिवाय याच विशेष अधिकारांचा उपयोग मानवी कल्याणासाठी न करता सत्ता स्पर्धेसाठी होतो असे किती दिवस चालणार? हेच प्रश्न सुरक्षा परिषदेच्या सुधारणांच्या केंद्रस्थानी आहे.

‘दुय्यम दर्जाचे कायमस्वरूपी सदस्य’ भारताच्या आक्षेप

सुरक्षा परिषदेचा विस्तार करण्याबाबत आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चा सुरू असताना नव्या कायमस्वरूपी सदस्यांना स्थान द्यावे, परंतु त्यांना विद्यमान पाच सदस्यांप्रमाणे नकाराधिकार देऊ नये, असा एक पर्याय चर्चेत आहे. मात्र, या पर्यायामुळे परिषदेतील प्रतिनिधित्व वाढू शकते. मात्र, अधिकारांच्या दृष्टीने विचार केला तर ही व्यवस्था अनेक प्रश्न निर्माण करते.


एखाद्या देशाला कायमस्वरूपी सदस्यत्व देण्यात आले, परंतु जागतिक सुरक्षेच्या निर्णायक प्रश्नांवर त्याला विद्यमान सदस्यांइतका अधिकार मिळाला नाही, तर त्या सदस्यत्वाचा प्रत्यक्ष उपयोग किती? नव्या सदस्यांना चर्चेत सहभागी होता येईल, प्रस्ताव मांडता येतील आणि मतदान करता येईल; परंतु विद्यमान पाच सदस्यांपैकी कोणताही देश नकाराधिकार वापरून निर्णय रोखू शकत असेल, तर सत्तेचे मूलभूत संतुलन बदलणार नाही.
भारताच्या आक्षेपाचा मुद्दा हाच आहे, की कायमस्वरूपी सदस्यत्वाच्या नावाखाली अधिकारांची दोन स्वतंत्र श्रेणी निर्माण करणे म्हणजे प्रतिनिधित्व वाढविल्याचा आभास निर्माण करणे; प्रत्यक्ष सत्तावाटपात मात्र जुनी विषमता कायम ठेवणे. तथापि, या प्रश्नाकडे आणखी एका दृष्टिकोनातून पाहण्याची गरज आहे. नकाराधिकाराचा विस्तार झाल्यास तो केवळ समानतेचे साधन ठरेल की निर्णयप्रक्रियेला आणखी गुंतागुंतीचे बनवेल? अधिक देशांना नकाराधिकार दिल्यामुळे परिषदेतील निर्णय रोखण्याची शक्यता वाढू शकते. त्यामुळे भारताच्या भूमिकेतील समानतेचा आग्रह आणि नकाराधिकाराच्या व्यापक वापरामुळे निर्माण होणारे व्यावहारिक धोके या दोन्ही बाबींचा विचार करणे आवश्यक आहे. म्हणूनच सुरक्षा परिषदेची सुधारणा ही केवळ सदस्यसंख्या वाढविण्याची प्रक्रिया असू शकत नाही. अधिकारांचे स्वरूप, निर्णयप्रक्रियेची कार्यक्षमता आणि जागतिक प्रतिनिधित्व यांच्यात संतुलन निर्माण करणे हे तिचे खरे उद्दिष्ट असले पाहिजे.

सुरक्षा परिषदेच्या इतिहासात १९६५ मध्ये या परिषदेमधील निवडून येणाऱ्या सदस्यांची संख्या सहावरून दहा करण्यात आली होती. परिणामी, एकूण सदस्यसंख्या अकरावरून पंधरा झाली; मात्र कायमस्वरूपी सदस्यांची संख्या पाचच राहिली. भारताच्या मते, या बदलामुळे कायमस्वरूपी आणि निवडून येणाऱ्या सदस्यांमधील संख्यात्मक प्रमाण बदलले, पण नकाराधिकार असलेल्या देशांचे विशेष स्थान कायम राहिले. त्यामुळे केवळ निवडून येणाऱ्या सदस्यांची संख्या वाढवून सुरक्षा परिषदेतील मूलभूत विषमता दूर होऊ शकत नाही. संस्थेची सदस्यसंख्या वाढविणे आणि तिच्या निर्णयप्रक्रियेतील सत्तेचे पुनर्वाटप करणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. पहिल्यामुळे प्रतिनिधित्व वाढू शकते; दुसऱ्यामुळे प्रत्यक्ष निर्णयक्षमता आणि अधिकारांचे संतुलन बदलू शकते.

जागतिक पटलावर भारताच्या बाबतीत रशियाचा भारताच्या सुरक्षा परिषदेतील कायमस्वरूपी सदस्यत्वाच्या मागणीला मिळालेल्या प्रमुख राजनयिक पाठिंब्यांपैकी एक ठरतो. विशेषतः २०२४ च्या भारत-रशिया वार्षिक शिखर परिषदेत भारत-रशिया संयुक्त निवेदनात हा पाठिंबा अधिकृतपणे नोंदविण्यात आला. सप्टेंबर २०२५ मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत रशियाने भारत आणि ब्राझीलच्या उमेदवारीचे समर्थन केल्याची बाब सुद्धा नोंद घेण्यासारखी ठरते. आज सुरक्षा परिषदेच्या सुधारणांबाबतही हीच कसोटी लागू होते. केवळ नव्या सदस्यांना स्थान देणे पुरेसे नाही. त्यांना कोणते अधिकार मिळतील, प्रादेशिक प्रतिनिधित्व कसे सुनिश्चित केले जाईल आणि विद्यमान महासत्तांचे वर्चस्व कितपत कमी होईल, हे प्रश्नही तितकेच महत्त्वाचे आहेत.

राष्ट्रीय हितापलीकडे : भारताची भूमिका

भारताची सुरक्षा परिषदेतील कायमस्वरूपी सदस्यत्वाची मागणी त्याच्या वाढत्या आंतरराष्ट्रीय भूमिकेशी संबंधित आहे. भारत हा मोठी लोकसंख्या, व्यापक अर्थव्यवस्था, महत्त्वपूर्ण तांत्रिक क्षमता आणि वाढते सामरिक महत्त्व असलेला देश आहे. आशिया-प्रशांत क्षेत्रातील घडामोडींपासून हिंद महासागरातील सुरक्षेपर्यंत, आंतरराष्ट्रीय व्यापारापासून हवामान बदलापर्यंत अनेक प्रश्नांवर भारताची भूमिका महत्त्वाची ठरते. गेल्या दशकात भारताने आंतरराष्ट्रीय राजकारणात आपले स्थान अधिक बळकट करण्यासाठी बहुपक्षीय सहकार्य, आर्थिक भागीदारी आणि जागतिक प्रश्नांवरील सक्रिय सहभागावर भर दिला आहे. २०१५ मध्ये नवी दिल्ली येथे तिसरी भारत-आफ्रिका मंच शिखर परिषद, २०१६ मध्ये गोवा येथे आठवी ब्रिक्स शिखर परिषद आणि २०१८ मध्ये नवी दिल्ली येथे आंतरराष्ट्रीय सौर आघाडीची पहिली शिखर परिषद आयोजित करण्यात आली. ऑक्टोबर २०२२ मध्ये मुंबई व नवी दिल्ली येथे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या दहशतवादविरोधी समितीची विशेष बैठक झाली. २०२३ मध्ये भारताच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली येथे जी ट्वेंटी शिखर परिषद आणि ऑनलाइन माध्यमातून शांघाय सहकार्य संघटनेची (SCO) शिखर परिषद आयोजित करण्यात आली. याच वर्षी आयोजित ‘व्हॉइस ऑफ ग्लोबल साउथ समिट’च्या माध्यमातून विकसनशील देशांचे प्रश्न जागतिक व्यासपीठावर मांडण्यात आले. जी ट्वेंटी परिषदेत आफ्रिकन संघाला कायमस्वरूपी सदस्यत्व मिळणे हे अधिक समावेशक जागतिक व्यवस्थेच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल ठरले. १२-१३ सप्टेंबर २०२६ ला नवी दिल्ली येथे अठरावी बिक्स शिखर परिषद आयोजित करून भारताने ब्रिक्सचे अध्यक्षपद भूषविले. या घडामोडी भारताचा वाढता राजनयिक प्रभाव आणि जागतिक धोरणनिर्मितीतील सक्रिय सहभाग अधोरेखित करतात. तथापि, भारताच्या जागतिक नेतृत्वाचे मूल्यमापन केवळ परिषदांच्या आयोजनावरून न करता, जागतिक समस्यांवरील ठोस योगदान, विकसनशील देशांच्या हितांचे संरक्षण आणि आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये अधिक न्याय्य प्रतिनिधित्वासाठी केलेल्या प्रयत्नांच्या आधारे करणे आवश्यक आहे.

आज रोजी भारताच्या परराष्ट्र धोरणात धोरणात्मक स्वायत्तता, बहुपक्षीय सहकार्य, विकासशील देशांचे हित आणि आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये अधिक न्याय्य प्रतिनिधित्व या मुद्द्यांना महत्त्व आहे. या पार्श्वभूमीवर सुरक्षा परिषदेतील कायमस्वरूपी स्थानाची मागणी ही भारताच्या वाढत्या जागतिक भूमिकेला संस्थात्मक मान्यता मिळावी, या व्यापक अपेक्षेशी जोडलेली आहे. एकीकडे स्वतःच्या कायमस्वरूपी सदस्यत्वासाठी आंतरराष्ट्रीय समर्थन मजबूत करणे आणि दुसरीकडे सुरक्षा परिषदेच्या व्यापक सुधारणांसाठी विविध प्रादेशिक गटांमध्ये सहमती निर्माण करणे आवश्यक आहे. मात्र, भारताच्या मागणीचे समर्थन केवळ त्याची लोकसंख्या किंवा आर्थिक क्षमता यांवर आधारित असू नये. जागतिक संस्थांमध्ये स्थान मिळविण्याच्या मागणीबरोबरच त्या स्थानाच्या माध्यमातून कोणत्या प्रकारचे जागतिक नेतृत्व दिले जाईल, हाही प्रश्न महत्त्वाचा आहे.

उपेक्षित राष्ट्रांच्या प्रतिनिधित्वाचा प्रश्न

सुरक्षा परिषदेच्या सुधारणांचा प्रश्न भारतापुरता मर्यादित नाही. आशिया, आफ्रिका आणि लॅटिन अमेरिकेतील अनेक देशांना विद्यमान व्यवस्थेत पुरेसे प्रतिनिधित्व मिळत नसल्याची भावना आहे. विशेषतः आफ्रिका खंडाचा प्रश्न या चर्चेत महत्त्वाचा आहे. जागतिक लोकसंख्येचा मोठा हिस्सा आणि अनेक प्रादेशिक संघर्षांचे ओझे असलेल्या आफ्रिकन देशांना जागतिक सुरक्षेबाबत निर्णय घेणाऱ्या संस्थेत योग्य स्थान मिळावे, ही त्यांची दीर्घकालीन मागणी आहे. भारताने आफ्रिकेच्या भूमिकेशी सुसंगतता दर्शविली आहे. या संदर्भात भारताचा युक्तिवाद असा आहे की, सुरक्षा परिषदेतील सुधारणा करताना केवळ काही देशांना जागा देऊन इतर प्रदेशांच्या प्रतिनिधित्वाकडे दुर्लक्ष करता येणार नाही. नव्या कायमस्वरूपी सदस्यांना अधिकारांच्या बाबतीत दुय्यम स्थान देणारी रचना स्वीकारल्यास विद्यमान विषमता दूर होण्याऐवजी ती अधिक संस्थात्मक स्वरूप धारण करू शकते. विकसनशील देशांना केवळ आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये उपस्थिती नको आहे; तर जागतिक नियमांची निर्मिती, संसाधनांचे वाटप आणि शांतता-सुरक्षेबाबतच्या निर्णयांमध्ये अर्थपूर्ण सहभाग हवा आहे.

आज रोजी सुरक्षा परिषदेची सुधारणा करण्याबाबत व्यापक चर्चा होत असली, तरी तिच्या अंमलबजावणीपुढे गंभीर अडचणी आहेत. विद्यमान कायमस्वरूपी सदस्यांच्या विशेषाधिकारांमध्ये बदल करणे हा त्यांपैकी सर्वांत कठीण प्रश्न आहे. नकाराधिकार असलेल्या महासत्तांनी स्वतःच्या अधिकारांमध्ये कपात करण्यास सहमती दर्शविणे सोपे नाही. याशिवाय, नव्या कायमस्वरूपी सदस्यांमध्ये कोणाचा समावेश करावा, सदस्यसंख्या किती असावी, प्रादेशिक प्रतिनिधित्वाचे प्रमाण कसे ठरवावे आणि नकाराधिकाराच्या वापराबाबत कोणते नियम असावेत, या मुद्द्यांवरही मतभेद आहेत.

जागतिक लोकशाहीची कसोटी

संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेतील सुधारणांचा प्रश्न हा केवळ संस्थात्मक पुनर्रचनेचा विषय नाही. तो एकविसाव्या शतकातील जागतिक व्यवस्थेच्या स्वरूपाचा प्रश्न आहे. जागतिक राजकारणात शक्तिशाली देशांची भूमिका महत्त्वाची असते; परंतु त्याच वेळी लहान आणि विकसनशील देशांच्या सार्वभौमत्वाचा, सुरक्षिततेचा आणि प्रतिनिधित्वाचा आदर होणेही आवश्यक आहे. भारताने मांडलेली भूमिका या व्यापक चर्चेला चालना देते. नव्या कायमस्वरूपी सदस्यांना नकाराधिकार न देण्याचा प्रस्ताव स्वीकारल्यास परिषदेची सदस्यसंख्या वाढेल; परंतु विद्यमान सत्तासमीकरणात किती बदल होईल, हा प्रश्न अनुत्तरित राहील. उलट, सर्व कायमस्वरूपी सदस्यांना समान अधिकार दिल्यास निर्णयप्रक्रियेतील अडथळे वाढण्याची शक्यताही लक्षात घ्यावी लागेल.

जागतिक शांततेची जबाबदारी स्वीकारणाऱ्या संस्थेची विश्वासार्हता ही तिच्या अधिकारांच्या केवळ औपचारिक अस्तित्वावर नव्हे, तर त्या अधिकारांचा वापर किती न्याय्य, उत्तरदायी आणि प्रतिनिधिक पद्धतीने केला जातो, यावर ठरते. जागतिक व्यवस्थेतील बदलत्या वास्तवाला मान्यता देणारी आणि कोणत्याही एका गटाच्या वर्चस्वापेक्षा सामूहिक जबाबदारीला प्राधान्य देणारी सुरक्षा परिषद निर्माण झाली, तरच संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुधारणांना खऱ्या अर्थाने यश मिळेल. अन्यथा, सदस्यसंख्या वाढेल; चर्चांचे फेरे सुरू राहतील; पण जागतिक निर्णयप्रक्रियेतील मूलभूत विषमता कायम राहण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

राज्यशास्त्र विषयाचे शैक्षणिक संयोजक
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक
sunilbharodkar88@gmail.com