रघुनंदन भागवत
आणखी एक रविवार, आणखी एक भारत पाकिस्तान सामना, आणखी एकदा भारतातील अव्यवहार्य राष्ट्रवादाचे प्रदर्शन आणि भारताचा आणखी एक विजय. तेच ते आणि तेच ते. सप्टेंबर २०२५ च्या आशिया चषक स्पर्धेपासून हाच सिलसिला सुरू आहे. भारताने कोलम्बोतील गट साखळीतील सामना ६१ धावांनी जिंकून आत्तापर्यंतचा टी २० विश्वचषक स्पर्धेतील पाकिस्तानवरचा सर्वांत मोठा विजय नोंदवला. पण या विजयात मग्न होऊन आत्मसंतुष्ट राहण्यात अर्थ नाही. सुपर ८ मध्ये भारताबरोबर पाकिस्तान सुद्धा क्वालीफाय होईल आणि बाद फेरीतही परत एकदा भारत पाकिस्तान एकमेकांना भिडतील, ही शक्यतादेखील गृहित धरावी लागेल. मग परत एकदा पाकिस्तानबरोबर खेळू नका म्हणून भारतात आक्रोश होईल. हे थांबणार आहे की नाही?

यावेळी पाकिस्तानने आधी भारताशी सामना न खेळण्याचे ठरवले होते पण ऐन वेळी त्यांनी यू टर्न घेतला आणि हा सामना संपन्न झाला कारण न खेळून आपण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारत आहोत याचे भान पाकिस्तानला आले. कल्पना करा की हा सामना न खेळता आपण पाकिस्तानला बहाल केला असता तर भारताचे हक्काचे २ गुण तर गेले असतेच पण नेट रन रेट वरही प्रतिकूल परिणाम झाला असता आणि कोणी सांगावे भारत गट साखळीतच बाद झाला असता तर?

भारताची प्रतिष्ठा एक अंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकल्यामुळे वाढेल की पाकिस्तानविरुद्ध न खेळण्याने वाढेल? पाकिस्तान आपले शत्रूराष्ट्र आहे ते अगदी १९४७पासूनच. तरी सुद्धा ठराविक कालावधी नंतर भारत पाकिस्तान एकमेकांशी क्रिकेट खेळतच होते. २६ नोव्हेंबर २००८ नंतर भारत पाकिस्तान द्विपाक्षीय क्रिकेट खेळत नाहीतच. (अपवाद २०१२-१३ची एक दिवसीय मालिका). भारत आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्येच फक्त पाकिस्तानविरुद्ध खेळतो यात काय गैर आहे? पुन्हा विरोधाभास असा की महिला क्रिकेट संघ अथवा आपला ज्युनिअर क्रिकेट संघ अंतरराष्ट्रीय स्पर्धेत पाकविरुद्ध खेळले तर कोणाचा काही आक्षेप नसतो. उर फक्त तेव्हाच बडवला जातो जेव्हा पुरुष संघाचा पाकविरुद्ध सामना असतो. असे करून आपण आपल्या खेळाडूंवरही अन्याय करतो याची जाणीव होत नाही का? भारताच्या खेळाडूंची देशभक्ती तुमच्या आमच्याइतकीच प्रखर असते. त्यांचेही हात पाकला धूळ चारण्यासाठी शिवशीवत असतातच ना म्हणून तर ते जिंकत आहेत. १९८०-९०च्या दशकात पाकिस्तानकडून आपले जेवढे पराभव झाले त्याची सव्याज परतफेड भारताचा सध्याचा संघ करत असताना त्यांचे पाय ओढण्याचा नतद्रष्टपणा करू नये, एवढेही भान या स्वयंघोषित राष्ट्रवाद्यांना असू नये याचा विषाद वाटतो.

पाकशी क्रिकेट खेळून आपण सीमेवर लढणाऱ्या आपल्या भारतीय सैनिकांशी प्रतारणा करतो असे एक ‘मिथ्यक’ पसरवले जाते. वस्तुस्थिती उलट आहे. जेव्हा भारत पाकिस्तानावर विजय मिळवतो तेव्हा भारतीय सैनिकांची मान उंचावते. कित्येक सैनिक सांगतात की भारताचा विजय झाला की सीमेवर जोरदार फायरिंग करून हा विजय साजरा केला जातो.

१९९९ च्या कारगिल युद्धाच्या वेळी विश्व कप स्पर्धेत भारताने पाकिस्तानला हरवले होते. स्पर्धा संपल्यावर जेव्हा कुंबळे, अजय जडेजा भारताच्या जखमी सैनिकांना भेटायला गेले तेव्हा त्या जखमी जवानांच्या चेहऱ्यावर भारताच्या विजयाचा आनंद ओसंडून वाहात होता आणि त्या आनंदात त्यांना आपल्या जखमांचा विसर पडला होता.

पाकिस्तान आता आपल्याशी कुठल्याही क्षेत्रात स्पर्धा करण्याच्या स्थितीत नाही. भारत कितीतरी पुढे गेला आहे. असे असताना पाकिस्तानविरुद्ध निदर्शने करून, पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा करून पाकिस्तानला अनावश्यक महत्व देण्याची गरज काय? भारत पाक क्रिकेट सामन्याचा निषेध करण्यात, भारत सरकारवर टीकेची झोड उठवण्यात तथाकथित सुशिक्षित राष्ट्रप्रेमीजन आघाडीवर असतात. वास्तविक भारत पाकिस्तानला सतत हरवत असल्याने, पाकिस्तानच्या विजयानंतर फटाके फोडणारे, हा सामना होऊ नये म्हणून ओरडले तर नवल वाटू नये कारण त्यामुळे पाकिस्तानची झाकली मूठ सव्वा लाखाची राहू शकते. पण घडते उलटेच.

भारतीयांनो, आता परिपक्व व्हा. इतर कुठल्याही देशासारखाच पाकिस्तानविरुध्दचा सामना असतो. भारताची मान तेव्हा ताठ होते जेव्हा मैदानात भारत पाकिस्तानला पराभूत करतो. भारत न खेळता पाकिस्तानला जिंकून देतो, तेव्हा नव्हे. इथे हेही लक्षात ठेवले पाहिजे की ‘एव्हरी डे इज नॉट संडे’. एखाद्या सामन्यात पाकिस्तान भारताचा पराभवही करू शकतो, पण म्हणून भारत कम अस्सल ठरत नाही. भारताने आता इतर दिग्गज संघाबरोबरच्या लढतींवर लक्ष केंद्रित करावे व विश्व चषक आपल्याकडेच राहील यासाठी नियोजन करावे.
raghunandan.bhagwat@gmail.com