प्रा. दिक्षा कदम
भारत स्वतःला जगातील सर्वांत मोठी लोकशाही म्हणवतो, परंतु लोकशाही ही केवळ निवडणुकांची प्रक्रिया नसून ती विवेक, असहमती आणि घटनात्मक नैतिकतेवर उभी असलेली एक जीवनपद्धती आहे. धर्म, हा माणसाच्या श्रद्धा आणि संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. तो जेव्हा राजकीय सत्तेच्या केंद्रस्थानी येतो, तेव्हा लोकशाहीचे स्वरूप हळूहळू बदलू लागते. भारतीय समाजातील धार्मिक विविधता, ऐतिहासिक जखमा आणि सामाजिक विषमता लक्षात घेतली, तर धर्म आणि राजकारण यांचे नाते अधिक संवेदनशील आणि गुंतागुंतीचे ठरते. त्यामुळे आजचा प्रश्न केवळ राजकीय न राहता तो नैतिक आणि घटनात्मक स्वरूप धारण करतो- धर्माच्या सावलीत उभ्या असलेल्या भारतीय लोकशाहीची दिशा नेमकी कोणती आहे? लोकशाहीचा इतिहास हा केवळ सत्तेच्या हस्तांतराचा इतिहास नाही; तो मानवी प्रतिष्ठा, समता आणि स्वातंत्र्य यांसाठी चाललेल्या संघर्षाची कहाणी आहे. भारताच्या संदर्भात पाहिले, तर हा संघर्ष अधिक खोलवर रुजलेला आणि ऐतिहासिकदृष्ट्या गुंतागुंतीचा आहे. जात, धर्म, भाषा, प्रदेश आणि लिंग यांवर आधारित तीव्र सामाजिक विषमता असलेल्या समाजात लोकशाहीची उभारणी करणे हे मुळातच एक मोठे आव्हान होते. म्हणूनच भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा उद्देश केवळ राजकीय स्वातंत्र्यापुरता मर्यादित नव्हता. त्या चळवळीने सामाजिक न्याय, समता आणि मानवी प्रतिष्ठेवर आधारित समाजरचनेचे स्वप्न पाहिले होते. याच ऐतिहासिक जाणीवेतून भारताच्या संविधानात लोकशाही मूल्यांबरोबरच धर्मनिरपेक्षता, सामाजिक न्याय, मूलभूत हक्क आणि घटनात्मक नैतिकता यांना केंद्रस्थान देण्यात आले.

प्रबोधनकाळातील पाश्चिमात्य विचारवंतांप्रमाणेच भारतातही विवेक, तर्क आणि मानवी मूल्यांवर आधारित विचारांची समृद्ध परंपरा होती—बुद्ध, कबीर, फुले आणि आंबेडकर यांची परंपरा. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्टपणे मांडले की, केवळ राजकीय लोकशाही पुरेशी नाही; सामाजिक लोकशाही रुजल्याशिवाय स्वातंत्र्य अपूर्णच राहते.

धर्मनिरपेक्षता : भारतीय अर्थ आणि वैशिष्ट्य

भारतीय धर्मनिरपेक्षता ही पाश्चिमात्य संकल्पनेची सरळ नक्कल नाही. ती ‘धर्माचा संपूर्ण निषेध’ न करता सर्व धर्मांपासून राज्याचे समदूरीकरण (principled distance) मान्य करते. भारतीय संविधान प्रत्येक नागरिकाला धर्मस्वातंत्र्य देते; मात्र राज्य कोणत्याही धर्माला प्राधान्य देत नाही- हाच त्याचा गाभा आहे.

इतिहासाने वारंवार दाखवून दिले आहे की, जेव्हा धर्म आणि सत्ता एकमेकांत मिसळतात, तेव्हा बहुसंख्याकवाद, बहिष्कार आणि हिंसा वाढते. भारतातील फाळणीचा अनुभव, सांप्रदायिक दंगली आणि अल्पसंख्याक समुदायांचे असुरक्षित स्थान ही याची ठळक उदाहरणे आहेत. म्हणूनच धर्मनिरपेक्षता ही केवळ घटनात्मक संकल्पना न राहता भारतीय लोकशाहीच्या अस्तित्वासाठी अनिवार्य अट ठरते.

धर्म आणि राजकीय विचारसरणी : भारतीय वास्तव

भारतातील राजकीय विचारसरणी धर्माशी वेगवेगळ्या पातळ्यांवर संवाद साधतात. काही विचारप्रवाह धर्माला सांस्कृतिक ओळख म्हणून मांडतात, तर काही थेट धार्मिक राष्ट्रवादाकडे झुकतात. ओळखआधारित राष्ट्रवादात धर्म आणि राष्ट्रीयत्व एकरूप केले जाते, ज्यातून “खरे नागरिक” आणि “इतर” असा धोकादायक भेद निर्माण होतो. धर्माचा वापर जेव्हा राजकीय साधन म्हणून होतो, तेव्हा तो नैतिक मार्गदर्शक न राहता सत्तेचे शस्त्र बनतो. निवडणूक राजकारणात धार्मिक भावनांचे ध्रुवीकरण, इतिहासाचे पुनर्लेखन आणि बहुसंख्याकांच्या भावनांना उद्देशून धोरणे आखणे- या सगळ्यामुळे लोकशाही संवाद अधिकाधिक संकुचित होत जातो.

याविरुद्ध, धर्मनिरपेक्ष आणि समाजन्यायाधारित राजकारण नागरिकत्व, समानता आणि घटनात्मक मूल्यांवर भर देते. फुले–आंबेडकर परंपरेतील राजकीय विचार धर्माच्या नावाखाली होणाऱ्या अन्यायाला थेट आव्हान देतात आणि विवेकाधारित समाजरचनेचा आग्रह धरतात.

आधुनिक भारतीय राजकारणात धर्माची भूमिका

आजच्या भारतात धर्माचा प्रभाव केवळ धोरणांपुरता मर्यादित राहिलेला नाही. तो शिक्षण, माध्यमे, कुटुंबव्यवस्था आणि सामाजिक मूल्यांवरही खोलवर परिणाम करतो. धार्मिक संघटनांचा राजकीय दबाव, सार्वजनिक सण-उत्सवांचे राजकीयीकरण आणि धार्मिक प्रतीकांचा सत्तेसाठी होणारा वापर- हे सर्व लोकशाहीच्या आरोग्यासाठी चिंताजनक ठरते.

लिंगन्यायाच्या प्रश्नावर हा प्रभाव अधिक स्पष्टपणे जाणवतो. अनेकदा धार्मिक परंपरांच्या नावाखाली स्त्रियांचे शिक्षण, स्वायत्तता आणि निर्णयस्वातंत्र्य मर्यादित केले जाते. समान नागरी हक्क, लैंगिक समता आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य यांसारख्या मुद्द्यांवर धर्माधारित राजकारण लोकशाही मूल्यांशी संघर्ष करताना दिसते. डॉ. आंबेडकरांनी दिलेला इशारा येथे विशेष अर्थपूर्ण ठरतो- धर्म जर सामाजिक न्यायाच्या विरोधात उभा राहत असेल, तर लोकशाहीला त्याच्याशी संघर्ष करावाच लागतो. हा इशारा आजही तितकाच लागू आहे.

भारतीय लोकशाहीसमोरील आव्हाने

आज भारतासमोरचे मोठे आव्हान म्हणजे विचारसरणीचे वर्चस्व (ideological hegemony). जेव्हा एकच विचारधारा राष्ट्र, धर्म आणि नैतिकतेची एकमेव व्याख्या ठरवू लागते, तेव्हा सार्वजनिक विवेक दुर्बल होतो. टीका देशद्रोह ठरते, प्रश्न विचारणे संशयास्पद बनते आणि लोकशाही हळूहळू औपचारिक उरते.

जागतिकीकरणामुळे टोकाच्या धार्मिक आणि राष्ट्रवादी विचारांचा वेगाने प्रसार होतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून चुकीची माहिती, भीती आणि द्वेष पसरवला जातो. अशा परिस्थितीत धर्मनिरपेक्षतेचे रक्षण हे केवळ न्यायालयांचे नव्हे, तर सजग नागरिकांचे कर्तव्य ठरते.

म्हणूनच शिक्षण व्यवस्थेत घटनात्मक मूल्ये, विवेकवादी विचार आणि चिकित्सक दृष्टिकोन रुजवणे अत्यावश्यक आहे. लोकशाही टिकवायची असेल, तर नागरिकांनी केवळ श्रद्धावान नव्हे, तर जागरूक, प्रश्न विचारणारे आणि जबाबदार नागरिक बनणे गरजेचे आहे.

धर्माच्या नावाने जेव्हा राष्ट्र परिभाषित होऊ लागते, तेव्हा नागरिक हळूहळू अनुयायी बनतात आणि प्रश्न विचारण्याचा हक्क निष्ठेच्या कसोटीवर तपासला जातो. भारताच्या लोकशाहीचे खरे सामर्थ्य तिच्या विविधतेत, असहमतीत आणि संविधानात आहे—कुठल्याही एका श्रद्धेत नाही. आज भारत ज्या टप्प्यावर उभा आहे, तिथे लोकशाहीचे भवितव्य निवडणुकांच्या आकड्यांवर नव्हे, तर विवेक, समता आणि घटनात्मक मूल्यांवर घेतल्या जाणाऱ्या भूमिकांवर ठरणार आहे. धर्म व्यक्तीला अर्थ देऊ शकतो; पण लोकशाहीला दिशा देणारे असते ते संविधान आणि जागरूक नागरिकत्व. या दोनांपैकी आपण नेमके कशाच्या बाजूने उभे आहोत, हाच आजचा निर्णायक प्रश्न आहे.

निष्कर्ष : भारतीय लोकशाहीचे भविष्य

भारतीय लोकशाहीचे भविष्य हे धर्मनिरपेक्षतेशी अविभाज्यरीत्या जोडलेले आहे. धर्म हा व्यक्तीचा खासगी आणि सांस्कृतिक अनुभव असू शकतो; पण शासन, कायदा आणि सार्वजनिक धोरणे ही घटनात्मक विवेकावर आधारित असली पाहिजेत. लोकशाही केवळ निवडणुकांपुरती मर्यादित नसून ती एक नैतिक आणि सामाजिक जीवनपद्धती आहे. धर्मनिरपेक्षता हे त्या जीवनपद्धतीची सुरक्षा कवच आह- जी विविधतेत एकता राखते, दुर्बलांचे संरक्षण करते आणि सत्तेला मर्यादा घालते.

डॉ. आंबेडकरांच्या शब्दांत सांगायचे तर, “घटना कितीही चांगली असली, तरी ती अंमलात आणणारे लोक वाईट असतील, तर लोकशाही अपयशी ठरेल.” म्हणूनच भारतात लोकशाही आणि धर्मनिरपेक्षता टिकवणे म्हणजे केवळ घटनात्मक कर्तव्य नव्हे, तर सतत जागृत राहण्याची सामाजिक जबाबदारी आहे.

deeks10@gmail.com