प्रा. अनिकेत सुळे
या वेळच्या अर्थसंकल्पात खगोल शास्त्रज्ञांसाठी खास घोषणा झाली आहे. दोन नवीन दुर्बिणी, एका महत्त्वाच्या दुर्बिणीचे नूतनीकरण आणि एक नवीन प्रशिक्षण संस्था अधिक तारांगण या घोषणेत अंतर्भूत आहे.

राष्ट्रीय महा दृश्य-अवरक्त प्रकाश दुर्बीण (नॅशनल लार्ज ऑप्टिकल इन्फ्रारेड टेलिस्कोप- एनएलओटी) ही लडाखमधील हान्ले या गावी उभारली जाणार आहे. या दुर्बिणीच्या आरशाचा व्यास हा दहा मीटरहून अधिक असेल. जगभरात सध्या ८-१२ मीटर व्यास असलेल्या दहा ते पंधरा दुर्बिणी कार्यरत आहेत. सर्वांत महत्त्वाचे खगोल संशोधन याच दुर्बिणींच्या साहाय्याने होते. आता तर २५ मीटरहून अधिक व्यासाच्या तीन अतिमहाकाय दुर्बिणींसाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यातील एका (तीस मीटरची दुर्बीण झ्र् थर्टी मीटर टेलिस्कोप- टीएमटी) प्रकल्पात भारताची भागीदारीदेखील आहे. पण आजघडीला भारतातल्या सर्वांत मोठ्या दृश्यप्रकाश दुर्बिणीचा व्यास हा फक्त ३.४ मीटर आहे. जागतिक दर्जाची खगोल निरीक्षणे करण्यासाठी, तसेच टीएमटी तयार होण्यापूर्वी भारतीय खगोल शास्त्रज्ञांना मोठ्या दुर्बिणींवर काम करण्याचा अनुभव देण्यासाठी एक ८-१२ मीटर व्यासाची दुर्बीण भारतात असणे आवश्यक होते.

दुसरी मोठी दुर्बीण म्हणजे राष्ट्रीय महा सौर दुर्बीण (नॅशनल लार्ज सोलार टेलिस्कोप- एनएलएसटी) ही लडाखमधीलच पँगाँग सरोवराकाठी उभारली जाईल. आकाराचा विचार करता सध्या आपली सर्वांत मोठी सौर दुर्बीण ही उदयपूर येथे असून तिच्या आरशाचा व्यास हा साधारण ५० सेंटीमीटर आहे. तर एनएलएसटीचा व्यास त्याच्या पाच पट म्हणजेच अडीच मीटरहून अधिक असेल. सूर्याचे निरीक्षण करताना दुर्बिणीला सतत थंड करावे लागते, म्हणून मोठ्या सौर दुर्बिणी सहसा तलावाकाठीच बांधल्या जातात. पँगाँगचे पाणी हे अधिकच थंड असल्याने त्याचा निरीक्षणांना फायदा होईल. त्याचबरोबर चीन सीमेच्या जवळ बांधल्या जाणार्‍या या मोठ्या प्रकल्पाने भारताचा या क्षेत्रावरील दावाही बळकट होईल.

हान्ले हे भारताचे ‘वेधशाळांचे गाव’ आहे. आता तर तेथे भारतातील पहिले ‘अंधार्‍या आकाशाचे राखीव क्षेत्र’ जाहीर झाले आहे. या हान्लेमध्ये एकवीसाव्या शतकाच्या सुरुवातीला पहिली दुर्बीण उभारली गेली ती म्हणजे दोन मीटर व्यासाची हिमालयीन चंद्रा दुर्बीण (एचसीटी). २५ वर्षांनंतर या दुर्बिणीची यंत्रसामग्री आणि त्यावरील शास्त्रीय उपकरणे जुनी झाली असून त्यांचे नूतनीकरणदेखील या अर्थसंकल्पातली एक महत्त्वाची घोषणा आहे.

आंध्र प्रदेशची नवीन राजधानी अमरावती येथे एका नवीन तारांगणाची, तसेच त्याबरोबरीने खगोल प्रशिक्षण संस्थेची घोषणा करण्यात आली आहे. आपण नेहमी जी तारांगणे पाहतो त्यांत मोठ्या घुमटाच्या आत प्रक्षेपक (प्रोजेक्टर) बसवलेले असतात आणि घुमटाच्या अंतर्भागात आकाश प्रक्षेपित केले जाते. मात्र आता म्हैसुरूमध्ये एक नवीन तारांगण बांधले गेले आहे ज्यात अख्ख्या घुमटभर एलईडीचे पडदे आहेत. त्यामुळे प्रक्षेपकांची गरजच नाही. यातून तयार होणारे आकाशाचे चित्र हे इतर तारांगणांपेक्षा अनेक पटींनी चांगले असते. आता याच नवीन प्रकारचे दुसरे तारांगण अमरावती येथे बांधले जाईल. या सर्व प्रकल्पांतून भारतातील खगोल संशोधनाला नव्याने चालना मिळेल.
प्रा. अनिकेत सुळे
होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र