सुवर्णा बेडेकर
जगातल्या शक्तिशाली महिलांमध्ये अव्वल असलेल्या इंद्रा नूयी यांनी एका ताज्या मुलाखतीत भारत, अमेरिका, चीन यांच्याविषयी आपली काही मतं व्यक्त केली आणि समाज माध्यमांवर प्रतिक्रियेचा पाऊस नव्हे, महापूरच आला. वास्तविक, इंद्रा नूयी फार काही वावगं बोलल्या असं नाही. तरीही आपल्याकडं काहीजणांचं देशप्रेम येतंच की उफाळून. परंतु कुणीतरी असं बोलण्याचीही काहीवेळा गरज असते. सदोदित आपण आपलं गुणगान करायचं आणि ऐकायचं, हे बरं नव्हे. आता बऱ्याचजणांना इंद्रा नूयी यांचं ताजं वक्तव्य माहिती नसेल म्हणून देते… ‘‘अमेरिकेत मेरिट खऱ्या अर्थानं ओळखलं जातं. तुम्ही स्त्री आहात की पुरुष, तुमची जात कोणती, धर्म कोणता हे काही पाहिलं जात नाही. तुमच्याकडे गुणवत्ता आहे, मग त्याचं मूल्य चोख वाजवून घेता येतं. मला ‘सीईओ‘ म्हणून इतकी उत्कृष्ट कामगिरी अमेरिका सोडून इतर कोणत्याही देशात करता आली नसती. चीन आणि भारत यांची तुलना करताना भारत फार गोंधळलेला देश आहे…” अशा आशयाचं बरंच काही इंद्राबाई म्हणाल्या.
मुळात ‘हूव्हर इन्स्टिट्यूट’च्या ज्या जाहीर मुलाखतीच्या कार्यक्रमात इंद्रा नूयी बोलल्या तो ‘ओन्ली इन अमेरिका’ या नावाचा होता आणि तोही अमेरिकेच्या स्वातंत्र्य- जाहीरनाम्याला २५० वर्षं झाल्याच्या पार्श्वभूमीवर होता. त्यामुळे यामध्ये अमेरिकनांना वादग्रस्त असं काही वाटत नसलं, तरीही काही भारतीय चिडले. एरवी इंद्राबाई आपल्याच आहेत, अमेरिका कर्मभूमी स्वीकारून जवळपास चार दशकं झाल्यानंतरही त्या कारणपरत्वे साडीत वावरत असतात, भारतीय संस्कृती त्यांनी आपल्या अलिशान बंगल्यातही कशी छान जपली आहे, या बातम्यांची चविष्ट वर्णनं वाचलेल्या मंडळींना तरी नूयीबाईंनी भारताला नावं ठेवू नये, असं वाटतं. या वाटण्याला काहीच अर्थ नाही. हे खरं असलं तरी, अगदी आपल्या सख्ख्या मावशीनं ( इथं आता आजीनं म्हणायलाही हरकत नसावी) जाहीरपणे भाचरांना/नातवडांना नावं ठेवली की, कसं जरा जास्तच वाईट वाटतं, तसंच काहीसं झालं.
भारत -चीन राहिले बाजूला, मात्र अमेरिका आणि भारत अशी तुलना होऊ लागली. अहो, अमेरिका खूप मोठ्ठा देश, तुलनेनं लोकसंख्या कमी, त्यामुळं तो कसा- चकाचक दिसतो. आमचा भारत महान आणि आमची लोकसंख्याही रग्गड ! त्यामुळं अस्वच्छता आहे खरं. अशी कबुली द्यायला काहीच हरकत नाही. इथंच सगळं घोडं पेंड खातं पहा. आपला देश स्वच्छ नाही, यामागं कारण म्हणजे भरमसाठ लोकसंख्या असं म्हटलं की, देश स्वच्छ ठेवण्याची आपली कुणाचीही जबाबदारी नाही, असं आपण स्वतःला वारंवार बजावतो. आणि मग ऑटो, टॅक्सी या साधनांनी उदरभरणासाठी आपलं कर्म करताना मुक्त मनानं लाल पिचकाऱ्या टाकणाऱ्या मंडळीसह सगळेच खपून जातात. माझं घर आणि अंगण लख्खं ठेवताना सु(?)गृहिणी किंवा त्यांच्या मदतनीस कचरा प्लॅस्टिकच्या पिशवीतून रस्त्याच्या कडेला टाकण्याचा आपला हक्क बजावतात.‘ मग काय बिघडलं?’ असा सर्वांच्या मनातला प्रश्न, परंतु त्याला उत्तर नाहीच. तिथं गाई, कुत्री, डुकरं पोट भरण्यासाठी येतात. बरेचदा गोमाता प्लॅस्टिक पिशवीही गिळंकृत करते. हे चित्र आपल्यापैकी कुणालाही नवीन नाही. पण हे काम तर स्थानिक प्रशासनाचं, म्हणजे सगळा दोष त्यांचाच की हो! अर्थात प्रशासनही गेंड्याची कातडी पांघरून कार्यरत (?) आहे. त्याला तुम्ही-आम्ही कुणी काहीच करू शकत नाही.
सिगरेटच्या थोटकांचे हौद!
आता इथं अमेरिकेत याची देही, याची डोळा पाहिलेली स्थिती मला आठवली. न्यूयॉर्कमधल्या जगप्रसिद्ध टाइम स्क्वेअर भागात फेरफटका सुरू असताना ५० पावलं चाललं की लोखंडी सळयांचा पदपथ येई. चालताना साहजिकच लक्ष खाली गेलं, या सळयांच्या खाली सिगरेटच्या थोटकांचे प्रचंड हौद नाही तर विहिरीच आहेत, असं जाणवलं. त्या मोठाल्या लोखंडी सळयांतून काय काय दिसत होतं? अपेयपान करून टाकलेल्या लहान बाटल्या, वेफर्स, स्नॅक्स, बिस्किटांसह नको त्या वस्तूंचे रॅपर्स, यांचा अक्षरशः खच पडला होता. अमेरिकेत भटकंती करताना अनेक शहरांमधल्या दृश्यांनी तर डोकं चक्रावून गेलं. गर्दीची वेळ संपून थोडी सामसूम झाली की, अनेकजण आपल्या गाड्यांच्या डिकी (अमेरिकी भाषेत ट्रंक) उघडून गाडीत किंवा रस्त्याच्या कडेला गाद्या घालून पथारी पसरतात. नाहीतर गाडीचं रूपांतर रात्रीपुरते घरामध्ये करतात. पेट्रोल पंपाजवळच्या सुपर शॉपी परिसरात तसंच सार्वजनिक सुविधांच्या आसपास तर हे दृश्य सर्रास दिसत होतं. श्रीमंत, समृद्ध देशातली ही गरीबी. या लोकांकडे रहायला घर नाही, किंवा पैशाअभावी भाड्यानंही त्यांना घर घेता येत नाही. अशावेळी कर्जानं गाडी घ्यायची आणि काम भागवायचं. ही मंडळी इतकी महागडी गाडी वापरतात, कपडे ब्रॅंडेड घेतात, मग त्यांना भाड्यानं लहानसं का होईना घर का घेता येत नाही? या प्रश्नावर माझी कन्या आणि जावई दोघंही हसले. भारतीय पालकांसारखं बचत करण्याचं बाळकडू त्यांना कोणी पाजलं नाही, सरकारनंही उपभोगावर आधारित अर्थव्यवस्था उभी केली. त्याचा हा परिणाम!
तिथं बऱ्याच ठिकाणी प्लॅस्टिकच्या पिशव्यातून भरलेला प्रचंड कचरा, कॅन्स, पाण्याच्या आणि दारूच्या बाटल्या यांचा खच पडलेला दिसायचा. काही स्थानिक लोकांच्या मते हे ‘ब्लॅक’ सगळीकडे अस्वच्छता निर्माण करतात. परंतु त्यात फारसं तथ्य नव्हतं. याचाच अर्थ अमेरिकेतही अस्वच्छता आहे, फक्त त्यावर छान, सुंदर कार्पेट घातलंय. त्या कार्पेटच्या खाली दडलेलं कुणी पहात नाही, त्याविषयी कुणी बोलत नाही, हेच खरं!
तरीही इंद्रा नूयी बोलल्या- अमेरिकेत होते म्हणूनच सुखानं सीईओ झाले! असं का?
भारत आणि अमेरिकेतल्या कार्यसंस्कृतीमध्ये असलेल्या फरकामुळे कामावर नक्कीच परिणाम होतो. आता भारतही बदलतोय. एका साध्या मेसेजनंही काम होवू शकतं, असा अनुभव अनेक भारतीय घेताहेत. वेगवेगळ्या क्षेत्रामधल्या उच्च पदस्थ महिलांनी कर्तृत्वाचा अमिट ठसा उमटवत, इथली कार्यसंस्कृती बदलून नवीन पायंडे पाडले आहेत, हे दुर्लक्षून चालणार नाही.
काही वर्षांपूर्वी इंद्रा नूयी यांनी एका मुलाखतीमध्ये बोलताना सांगितलं होतं, भारतात पायाभूत सुविधांचा अभाव आहे. रस्त्यांचा पत्ता नाही. भारतीय बाजारपेठ अतिशय गूढ आहे. तिथं कोणतं उत्पादन कसं चालेल, याचा अंदाज कुणालाच येत नाही. यानंतर काही वर्षातच पायाभूत सुविधांची कामं धडाक्यात सुरू झाली. जवळपास ८०- ८५ टक्के रस्ते काँक्रीटचे झाले. ‘वंदेभारत‘ ला देशभरातून मागणी वाढली… आता ‘भारत गोंधळलेला आहे‘ असं म्हणून इंद्रा नूयी यांनी भारतीयांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातलंय… सर्वांना ते चांगलंच झोंबावं आणि देश सर्वार्थानं श्रेष्ठ करण्यासाठी स्पर्धा सुरू व्हावी, इतकंच!
suvarnabedekar@gmail.com
