scorecardresearch

Premium

सर्वकार्येषु सर्वदा : विशेष मुलांची ‘मनाली’

मानसिकदृष्टय़ा अपंग मुलांच्या संगोपनातील अडचणी आणि पालकांपुढील आव्हानांचे गांभीर्य लक्षात आले. त्यातूनच ‘मनाली बहुउद्देशीय सेवा संस्थे’चा जन्म झाला.

ngo manali bahuudeshiya seva sanstha in nashik
मनाली बहुउद्देशीय सेवा संस्था

चारुशीला कुलकर्णी

विशेष बालिकेचे पालक म्हणून नाशिकच्या दीपक आणि कल्पना मालपुरे या दाम्पत्याला अनेक प्रश्न सतावू लागले. त्यांची उत्तरे शोधता शोधता मानसिकदृष्टय़ा अपंग मुलांच्या संगोपनातील अडचणी आणि पालकांपुढील आव्हानांचे गांभीर्य लक्षात आले. त्यातूनच ‘मनाली बहुउद्देशीय सेवा संस्थे’चा जन्म झाला.

Gajkesari 2023
गजकेसरी योग बनताच ‘या’ राशींचे लोक होणार प्रचंड श्रीमंत? धनलाभासह व्यवसायात यश मिळण्याची शक्यता
womens sexual desire feminist perspectives on sex cultural suppression of female sexuality
ग्रासरूट फेमिनिझम : ‘अंग झिम्माड झालं, हिरव्या बहरात..’
ngo manali bahuudeshiya seva sanstha work for mentally handicapped children
मानसिकदृष्टय़ा अपंग बालकांच्या पंखांना अर्थबळ हवे! नाशिकच्या मनाली संस्थेची साद
nandadeep foundation information
सर्वकार्येषु सर्वदा : मनोरुग्णांचा ‘नंददीप’

आपले मूल चारचौघांसारखेच असावे. अभ्यासात हुशार नसले तरी व्यावहारिक जगात त्याला तग धरता आली पाहिजे, अशा सामान्य अपेक्षा कोणतेही दाम्पत्य बाळगून असते. प्रत्येकाच्या त्या अपेक्षा पूर्ण होतातच असे नाही. परंतु काही वेळा जन्माला येणारे अपत्य आपल्यासमवेत अशा गोष्टी घेऊन येते, ज्यामुळे आईवडिलांना याचे पुढे कसे होईल, असा प्रश्न पडतो. दीपक आणि कल्पना या मालपुरे दाम्पत्यास मनाली झाल्यानंतर असाच प्रश्न पडला होता.   

मानसिकदृष्टय़ा अपंग असलेल्या मुलीचा सांभाळ करताना येणाऱ्या अडचणी, पालक म्हणून उभ्या राहणाऱ्या समस्या, समाजाचा अशा बालकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन, हे सर्वकाही आवानात्मक होते. त्याला तोंड देताना मालपुरे दाम्पत्याच्या लक्षात आले की, असे मूल झालेली इतरही अनेक दाम्पत्ये असतील.. त्यांनाही अशाच समस्यांना सामोरे जावे लागत असेल. मित्रांशी चर्चा करताना अशा बालकांसाठी काहीतरी करावे, या विचारातूनच ‘मनाली बहुउद्देशीय सेवा संस्था’ जन्माला आली. ही संस्था म्हणजे मालपुरे दाम्पत्याचे दुसरे अपत्यच.  

हेही वाचा >>> सर्वकार्येषु सर्वदा : मनोरुग्णांचा ‘नंददीप’

अधिकार, विश्वास आणि सन्मान या ब्रीद वाक्यानुसार ‘मनाली बहुउद्देशीय सेवा संस्थे’चे काम सुरू आहे. तपपूर्तीकडे वाटचाल चालू असलेल्या या संस्थेने मानसिकदृष्टय़ा अपंग बालकांसाठी शाळा सुरू केली. शाळा सुरू करण्यापूर्वी मालपुरे दाम्पत्याला अक्षरश: वणवण करावी लागली. एकाचवेळी जागा आणि विद्यार्थी अशा दोन्हींचा शोध सुरू होता. नाशिक शहरालगत असलेला गावठाण भाग रायगड नगर, राजुर बहुला, वाडीवऱ्हे, गौळाणे, पिंपळदसह शहरातील शांतीनगर, गौतमनगर या झोपडपट्टय़ा, पाथर्डी फाटा आदी भागांत सर्वेक्षण करण्यात आले. अशा विशेष असलेल्या शाळाबाह्य मुलांचा शोध घेण्यात आला. पालकांमध्ये अशा बालकांविषयी कितपत जागरूकता आहे, याची पाहणी करण्यात आली. त्यातून अशा बालकांविषयी समाजासह पालकांमध्ये असणारी अनास्था प्रकर्षांने समोर आली. अशा बालकांची शाळा म्हणजे ‘वेडय़ांची शाळा’ असा गैरसमज पालकांमध्ये आढळला. या पार्श्वभूमीवर पालकांशी सातत्याने संवाद साधत या बालकांसाठी शिक्षण किती महत्त्वाचे आहे, त्यांना स्वत:च्या पायावर उभे राहून स्वावलंबी होणे किती गरजेचे आहे, हा विश्वास पालकांमध्ये निर्माण करण्यासाठी मनाली संस्थेच्या संपूर्ण चमूने जीवतोड कष्ट घेतले. फिजिओ थेरेपिस्ट सुनया जाधव, दोन मानसोपचारतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ यांची मदत घेण्यात आली. आरोग्य शिबिरे भरविण्यात आली. अखेर सर्व प्रयत्नांना यश आले आणि नाशिकजवळील विल्होळी येथे २०११मध्ये विशेष मुलांची ‘मनाली शाळा’ सुरू झाली.

दिव्यांग कल्याण आयुक्तालयाने २७ ऑगस्ट २०१३ रोजी शाळेला कायमस्वरूपी विनाअनुदानित तत्त्वावर मान्यता दिली. मान्यता मिळाल्यानंतरचा प्रवास अधिक खडतर असल्याची जाणीव संस्थेच्या कार्यकर्त्यांना झाली. शाळेत प्रारंभी चारच विद्यार्थी होते. ही विशेष बालके झोपडपट्टी परिसरातील. त्यामुळे त्यांना शाळेपर्यंत सोडणे, परत घेऊन जाणे, हे काम कोणतेही पालक करणे शक्य नव्हते. त्यांना आर्थिकदृष्टय़ा ते परवडणारेही नव्हते. त्यामुळे संस्थेने या बालकांना घरापासून शाळेपर्यंत ने-आण करण्यासाठी मोफत वाहन सुविधा उपलब्ध करून दिली. शाळा विल्होळीनजीक असलेल्या एका टेकडीवर भरत होती. पावसाळय़ात तेथे जाण्यासाठी शिक्षक, विद्यार्थ्यांना अडचणी येऊ लागल्या. त्यामुळे शाळा नाशिक शहरातच एखाद्या ठिकाणी भरविता येईल काय, या विचारातून संस्थेने जागेचा शोध सुरू केला. अखेर सिडकोत अश्विन नगरातील मिहद्रा कॉलनीजवळील एका बंगल्याची जागा शाळेला मिळाली. आता ही शाळा म्हणजे विशेष मुलांचे दुसरे घरच आहे. शाळेत सध्या १८ वर्षांखालील ५० विद्यार्थी-विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत. त्यांना आर्थिकदृष्टय़ा सक्षम करण्याचा संस्थेचा संकल्प आहे. संस्था, विशेष मुलांचे पालक आणि समाज आदी घटकांनी एकत्रित प्रयत्न केल्याशिवाय विशेष मुलांचा सर्वागीण विकास अशक्य आहे, हे संस्थेने जाणले आहे. 

हेही वाचा >>> सर्वकार्येषु सर्वदा : सन्मानाने जगण्याची ‘आकांक्षा’

संस्थेतील मुलांना शिक्षणासह आरोग्य सेवाही विनामूल्य पुरवली जाते. शिक्षणात तांत्रिक, क्रमिक आणि कौशल्य शिक्षणाचाही समावेश आहे. विशेष मुलांच्या पालकांचे समुपदेशनही संस्था करते. अशी बालके असलेल्या दाम्पत्यांना पुन्हा असे बालक होऊ नये, यासाठी काय करता येईल, याविषयीही जनजागृती करण्यात येत आहे. शाळेच्या वतीने मुलांना संगणक, वाद्ये, इलेक्ट्रॉनिक साहित्य, खेळणी, लेखन साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. या मुलांच्या भोजनाची व्यवस्थाही संस्थाच करते.  

मुलांच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी वेगवेगळय़ा प्रकारचे मैदानी खेळ घेणे, दृकश्राव्य शिक्षण पद्धतीचा अवलंब करणे, वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करणे असे उपक्रम संस्थेच्या वतीने राबवण्यात येतात. रोप मल्लखांब, जलतरण, गोळाफेक आदी खेळांमध्ये मुलांनी बऱ्यापैकी प्रगती केली आहे. जिल्हास्तरीय अपंगांच्या क्रीडा स्पर्धातही त्यांनी बाजी मारली आहे. ‘ग्रेप सिटी जेसीज’ने ‘मनाली शाळे’ला विशेष पुरस्काराने सन्मानित केले आहे.

जिच्या नावाने संस्था सुरू झाली, त्या मनालीचे वडील दीपक मालपुरे हे संस्थेचे समन्वयक आहेत. त्यांना पत्नी कल्पना मालपुरे यांच्यासह देवेंद्र कुकडे, संदीप आहेर, विशेष शिक्षक रमण भंडारी, ज्योती गायकवाड, दीपक धात्रक, सागर सोनवणे, नरेश पुजारी, प्रिया गोराणे, पंकज भटेवरा या खंद्या शिलेदारांची साथ आहे. ही सर्व मंडळी म्हणजे जणूकाही या विशेष बालकांचे पालकच आहेत.

विशेष मुलांचा निरंतर शोध घेत राहणे. त्यासाठी वेगवेगळय़ा भागांत सर्वेक्षण करणे हे काम संस्था अखंडपणे करीत असते. त्यामुळे संस्थेच्या कार्याचा विस्तार होत आहे. त्यातूनच जागेची मोठी अडचण उभी राहिली आहे. याविषयी संस्थेचे देवेंद्र कुकडे यांनी माहिती दिली. संस्थेने नाशिकमध्ये जागा मिळविण्यासाठी प्रयत्न केले. तत्कालीन महापालिका आयुक्तांशी चर्चाही झाली होती. निधीची जमवाजमव सुरू असताना करोनाची जागतिक साथ आली. संस्थेच्या कामावर परिणाम झाला. पुढची वाट बिकट दिसत असताना बालकांच्या निरागस हास्याने संस्थेला पुन्हा उभे राहण्याचे बळ दिले. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी जागेबाबत महापालिका आयुक्तांशी अलीकडेच पुन्हा चर्चा केली. आयुक्तांनीही जागेबाबत अनुकूलता दर्शविली आहे, असे कुकडे यांनी सांगितले.

‘मनाली शाळे’त सध्या सहा शिक्षक, तीन मदतनीस कार्यरत आहेत. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे मानधन, विद्यार्थ्यांची ने-आण करण्यासाठी दोन वाहने आहेत. त्यांचे महिन्याचे भाडे ३० हजार रुपये आहे. याशिवाय इतर किरकोळ खर्च मिळून दरमहा दोन ते अडीच लाख रुपयांचा खर्च भागवण्याचे आव्हान संस्थेपुढे असते. तो संस्थेचे सभासद, मित्र परिवाराने दिलेल्या देणगीतून कसाबसा भागवला जातो.

संस्था सुरू होऊन १२ वर्षे पूर्ण होत आली आहेत. संस्थेत प्रांरभी दाखल झालेली काही मुले आता १८ वर्षांची झाली आहेत. त्यांना व्यवसाय प्रशिक्षण देण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे. पणत्या रंगविणे, शोभेच्या वस्तू तयार करणे, रंग तयार करणे, उदबत्त्या बनविणे आदी प्रशिक्षण मुलांना देण्यात येत आहे. मुलांना त्यांच्या पायावर उभे करण्यासाठी संस्थेला स्वत:च्या जागेची नितांत गरज आहे.  

हेही वाचा >>> सर्वकार्येषु सर्वदा : तिरंदाजांना नव‘दृष्टी’

सध्या ज्या ठिकाणी शाळा सुरू आहे, ती जागा कमी पडू लागली आहे. चार खोल्यांमध्ये शाळेचे वर्ग भरतात. मुलांना शाळेची अनुभूती यावी,  शाळेचेच क्रीडांगण असावे, यासाठी संस्थेला स्वत:च्या इमारतीची गरज आहे. स्वत:ची जागा नसल्याने अनेक उपक्रमांवर मर्यादा येत आहेत. संस्थेला वस्तूंच्या स्वरूपात अनेकजण मदत देऊ करतात. परंतु जागाच नसल्याने संस्थेला ती मदत नाकारावी लागते. शिवाय, जागेअभावी पुढील वर्गाना मान्यता मिळत नसल्याने आणि विविध प्रकारच्या प्रशिक्षणांसारखे उपक्रम राबवताना अडचण येत असल्याने संस्थेला मदतीची गरज आहे. त्यातून जागा घेणे, इमारत उभारणे आणि काही खर्चाची जुळवाजुळव करणे संस्थेला शक्य होणार आहे.

संस्थेपर्यंत कसे जाल?

नाशिक शहरातील सिडको भागातील अश्विन नगरात मिहद्रा कंपनीची वसाहत आहे. तेथील मिहद्रा गेस्ट हाऊस प्रवेशद्वार क्रमांक २ समोरच्या एका बंगल्यात ‘मनाली बहुउद्देशीय सेवा संस्थे’ची  ‘मनाली शाळा’ चालवण्यात येते.

धनादेश या नावाने काढावा

मनाली बहुउद्देशीय सेवा संस्था

Manali Bahuudeshiya Seva Sanstha

ऑनलाइन देणगीसाठी

खाते क्र.  03505010106689

IFC CODE –  COSB0000035

कॉसमॉस बँक, शरणपूर लिंक रोड, नाशिक

(संस्था ८०-जी करसवलतपात्र आहे.) 

धनादेश येथे पाठवा..  एक हजार किंवा त्याहून अधिक रुपयांची देणगी देणाऱ्यांची नावे ‘लोकसत्ता’त प्रसिद्ध केली जातील.

मुंबई कार्यालय

लोकसत्ता, संपादकीय विभाग, मफतलाल सेंटर, सातवा मजला, नरिमन पॉइंट, मुंबई – ४०००२१,  ०२२-६७४४०२५०

महापे कार्यालय  

संपादकीय विभाग, प्लॉट नं. ईएल १३८, टीटीसी इंड. एरिया, एमआयडीसी, महापे, नवी मुंबई – ४००७१०.  ०२२-२७६३९९००

ठाणे कार्यालय     

संपादकीय विभाग, कुसुमांजली बिल्डिंग, तिसरा मजला, गोखले रोड, नौपाडा, ठाणे.  ०२२-२५३९९६०७

पुणे कार्यालय      

संपादकीय विभाग, एक्स्प्रेस हाऊस, प्लॉट नं. १२०५/२/६, शिरोळे रस्ता, पुणे- ४११००४.  ०२०-६७२४११२५

नागपूर कार्यालय       

संपादकीय विभाग, प्लॉट नं. ३८, अ‍ॅडिसन ट्रेड सेंटर, अंबाझरी, नागपूर – ४४००१०, ०७१२ झ्र् २२३०४२१

दिल्ली कार्यालय       

संपादकीय विभाग, द इंडियन एक्स्प्रेस बिल्डिंग, बी१/ बी, सेक्टर १०, नॉएडा- २०१३०१. ०१२०- २०६६५१५००

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Information about ngo manali bahuudeshiya seva sanstha in nashik zws

First published on: 22-09-2023 at 04:25 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×