पी. टी. उषा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

खेळांसाठी अर्थसंकल्पीय तरतुदीत भारत सरकारने केलेली वाढ या यशामागील एक महत्त्वाची प्रेरक शक्ती राहिली आहे. परिणामी पायाभूत सुविधा, प्रशिक्षण कार्यक्रम आणि खेळाडूंचे कल्याण यांमध्ये वाढ होऊ लागली आहे, हा मोदी सरकारच्या नऊ वर्षांमध्ये झालेला मोठा बदल!

एक खेळाडू म्हणून आपल्या प्रवासाचा विचार करून आणि आता भारतीय ऑलिम्पिक संघाची पहिली महिला अध्यक्ष म्हणून अभिमान आणि इतिकर्तव्यतेच्या भावनेने मी भारून गेले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली गेल्या नऊ वर्षांत भारतीय क्रीडा क्षेत्रामध्ये झालेले बदल खरोखरच आश्चर्यकारक म्हणावे लागतील. परिवर्तनकारक पायाभूत सुविधांच्या विकासापासून विशेष लक्ष केंद्रित करणारे प्रशिक्षण कार्यक्रम आणि निधीची तरतूद करण्यापर्यंत आपल्या देशाने क्रीडा क्षेत्रातील कामगिरींमध्ये अभूतपूर्व वाढ पाहिली आहे.

भारतीय क्रीडा क्षेत्रातील हे बदल, विशेषत: ग्रामीण आणि वंचित पार्श्वभूमीमधून आलेल्या महिला खेळाडूंनी केलेली अविश्वसनीय कामगिरी सर्वाधिक उल्लेखनीय पैलूंपैकी एक आहे. अनेक आव्हानांना तोंड देऊनही या महिलांनी असामान्य दृढसंकल्प आणि विपरीत परिस्थितीत टिकून राहण्याच्या क्षमतेचे दर्शन घडवले आहे. ॲथलेटिक्स, हॉकी, बॅडिमटन, टेबल टेनिस, कुस्ती, भारोत्तोलन आणि मुष्टियुद्ध यांसारख्या खेळांमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांचे यश यातून त्यांची अदम्य भावना आणि असामान्य समर्पित वृत्ती दिसून येते.

पंतप्रधान मोदी यांचे खेळाडूंसोबत वैयक्तिक स्वरूपात जोडले जाणे खरोखरच प्रेरणादायी राहिले आहे. खेळाडूंच्या कल्याणासाठी त्यांचे अविचल पाठबळ आणि वास्तविक रुची यामुळे खेळाडूंमध्ये विश्वासाची आणि प्रेरणेची एक मजबूत भावना विकसित झाली आहे. खेळाडूंबरोबर वेळोवेळी पंतप्रधानाचा होणारा संवाद, मनोधैर्य वाढवणारे त्यांचे शब्द आणि खेळाडूंच्या प्रगतीमध्ये त्यांची सखोल रुची यामुळे क्रीडा समुदायामध्ये अभिमानाची आणि जबाबदारीची भावना निर्माण झाली आहे. या व्यक्तिगत जिव्हाळय़ाने, भारतीय खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवण्यात आणि विजेता बनण्याची मानसिकता तयार करण्यात एक मोठा पल्ला गाठला आहे.

खेळांसाठी अर्थसंकल्पीय तरतुदीत भारत सरकारने केलेली वाढ या यशामागील एक महत्त्वाची प्रेरक शक्ती राहिली आहे. खेळांमध्ये परिवर्तनकारक शक्ती आहे हे ओळखून, सरकारने खेळांसाठी निधीची तरतूद करण्याला सातत्याने प्राधान्य दिले आहे. परिणामी पायाभूत सुविधा, प्रशिक्षण कार्यक्रम आणि खेळाडूंचे कल्याण यांमध्ये वाढ होऊ लागली आहे. वाढत्या आर्थिक साहाय्यामुळे खेळाडूंना कोणत्याही आर्थिक अडचणीविना सर्वोत्तम स्तरावर स्पर्धा करण्यासाठी आवश्यक संसाधने उपलब्ध करून देण्यात आली आहेत आणि यामुळे त्यांचे लक्ष केवळ खेळामध्ये उत्कृष्टता साध्य करण्यावरच केंद्रित व्हावे हेदेखील सुनिश्चित झाले आहे.

‘खेलो इंडिया’ हा उपक्रम क्रीडासंस्कृतीला चालना देण्यासाठी आणि तळागाळात एक मजबूत पाया तयार करण्यामध्ये महत्त्वाचा ठरला आहे. या कार्यक्रमाने केवळ खेळांमध्ये सहभाग वाढवण्यासाठीच प्रोत्साहन दिले नाही तर युवा खेळाडूंना महत्त्वपूर्ण पाठबळ आणि मार्गदर्शन मिळवून दिले आहे. आंतर-शालेय आणि आंतर-महाविद्यालयीन स्पर्धाचे आयोजन करून खेलो इंडियाने देशाच्या कानाकोपऱ्यातील सुप्त कलागुणांना समोर आणण्यात यश मिळवले आहे. या कार्यक्रमाने युवा खेळाडूंना मोठी स्वप्ने पाहण्यासाठी आवश्यक असलेला विश्वास दिला आणि व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे, या स्पर्धेने खेळाविषयीचे आकर्षण निर्माण केले आहे आणि भविष्यातील चॅम्पियन खेळाडू घडवण्याचा मार्ग मोकळा केला आहे.

पंतप्रधान मोदीं यांनी सुरू केलेल्या ‘फिट इंडिया’ या चळवळीने, देशाचा निरोगीपणा आणि तंदुरुस्तीचे परिदृश्य बदलण्यासाठी उत्प्रेरकाची भूमिका बजावली आहे. एका सक्रिय जीवनशैलीच्या महत्त्वावर भर देऊन, या चळवळीने लाखो भारतीयांना खेळांचा स्वीकार करण्यास आणि स्वत:च्या आरोग्याला प्राधान्य देण्यास प्रवृत्त केले आहे. तंदुरुस्त आणि निरोगी राष्ट्राच्या दिशेने होत असलेल्या या बदलामुळे आपल्या क्रीडापटूंच्या यशात प्रत्यक्ष योगदान दिले आहे. कारण शारीरिक तंदुरुस्ती हा क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्टतेचा पाया असतो.

टार्गेट ऑिलपिक पोडियम (टॉप्स) योजना भारतीय खेळांना नव्या उंचीवर घेऊन जाणाऱ्या सर्वात प्रभावी उपक्रमांपैकी एक आहे. टॉप्सचे कार्यान्वयन एक आमूलाग्र परिवर्तन घडवणारे ठरले आहे, कारण ही योजना देशातील उत्कृष्ट क्रीडा प्रतिभांचा शोध घेते आणि त्यांची जोपासना करते. या योजनेद्वारे, क्रीडापटूंना त्यांच्याकडे जागतिक स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी सर्व आवश्यक संसाधने आहेत याची खातरजमा करून जागतिक दर्जाचे प्रशिक्षण, विशेष प्रशिक्षण आणि आर्थिक साहाय्य दिले जाते. वैयक्तिक लक्ष आणि वैयक्तिक प्रशिक्षण कार्यक्रमांवर लक्ष केंद्रित करण्यामुळे नि:संशयपणे आपल्या क्रीडापटूंच्या उल्लेखनीय कामगिरीमध्ये निर्णायक भूमिका बजावते.

याव्यतिरिक्त, नॅशनल सेंटर्स ऑफ एक्सलन्सच्या स्थापनेमुळे भारतातील क्रीडा परिदृश्यामध्ये क्रांती आणली आहे. या ठिकाणी अत्याधुनिक पायाभूत सुविधा, अत्याधुनिक प्रशिक्षण सुविधा आणि उच्च-स्तरीय प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफ उपलब्ध करून देतात. एनसीओई उत्कृष्टतेची केंद्रे बनली आहेत, जेथे खेळाडूंना जागतिक दर्जाचे प्रशिक्षण मिळते आणि त्यांना आंतरराष्ट्रीय मानकांची माहिती होते. यामुळे त्यांच्या विकासात मोलाचे योगदान दिले आहे आणि त्यांना त्यांची खरी क्षमता ओळखण्यास मदत झाली आहे.

खेळांवर पंतप्रधानांचे अतिशय बारीक लक्ष आणि क्रीडा विकासासाठी सरकारच्या सर्वागीण दृष्टिकोनामुळे भारताने आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये अभूतपूर्व यश प्राप्त केले आहे. आपल्या खेळाडूंनी ऑलिम्पिक, आशियाई खेळ, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आणि जागतिक अजिंक्यपद स्पर्धामध्ये पदके जिंकून आणि विक्रम करून नवीन उंची गाठली आहे आणि विक्रम प्रस्थापित केले. भारतीय खेळांना आता जागतिक पातळीवर मान मिळत आहे आणि आपल्या क्रीडापटूंकडे खरे चॅम्पियन म्हणून पाहिले जाते.

खेळ हे सामाजिक- आर्थिक विकासाचे एक प्रभावी साधन आहे यावर माझा नेहमीच ठाम विश्वास राहिला आहे. देशातील युवकांना खेळांविषयी गोडी निर्माण केल्याने त्यांचे शारीरिक आरोग्य सुधारण्यात आणि चारित्र्य निर्माण करण्यात सुधारणा होईल तसेच यामुळे सामाजिक सुधारणा आणि आपल्या मनुष्यबळात महत्त्वपूर्ण योगदान मिळेल. नुकतीच आपली नऊ वर्षे पूर्ण करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या सरकारसह भारतीय ऑलिम्पिक संघटना हे सुनिश्चित करण्यासाठी एकत्रितपणे काम करत आहे की आपला युवा वर्ग कशा प्रकारे विविध प्रकारच्या खेळांमध्ये अधिकाधिक सहभागी होईल आणि आम्ही एक देश म्हणून ‘सिटियस, आल्टियस, फोर्टियस’ अर्थात अधिक वेगवान, अधिक उंच, अधिक मजबूत या महान ऑलिम्पिक आदर्शाच्या आणखी जवळ जाऊ!

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Infrastructure training programs and sportsmen welfare have started to improve a major change in the nine years of the modi government amy
First published on: 31-05-2023 at 00:16 IST