scorecardresearch

जगणं, पाहणं, नोंदवणं, लिहिणं..

गेल्या काही वर्षांत हळूहळू लोकप्रिय होत चाललेल्या कादंबरीचा प्रकार म्हणजे ‘फॅक्ट फिक्शन’.

Annie Arni
(अ‍ॅनी अर्नो)

शशिकांत सावंत

‘नोबेल’ मानकरी अ‍ॅनी अर्नोच्या चार कादंबऱ्यांची ही धावती ओळख; स्वत:कडे ती कसं पाहाते याचा वेध घेणारी..

गेल्या काही वर्षांत हळूहळू लोकप्रिय होत चाललेल्या कादंबरीचा प्रकार म्हणजे ‘फॅक्ट फिक्शन’. ज्यात लेखक/लेखिका स्वत:च्या आयुष्यातील प्रसंग अगदी ओळखू येतील, इतक्या सहज वापरतात. अ‍ॅनी अर्नो आता ८३ वर्षांच्या आहेत. या लेखिकेच्या ज्या १०-१२ कादंबऱ्या आहेत, त्यांची लांबी ८०-९० पाने ते सव्वाशे-दीडशे इतकीच आहे. अनेकदा त्या डायरीसारख्या वाटतात. पुन्हा आईवर, वडिलांवर आणि स्वत:च्या तरुणवयातल्या, म्हणजे १९५८ साली –  म्हणजेच १६व्या-१७व्या वर्षी केलेल्या प्रेमावर अनेक कादंबऱ्या लिहिल्या.  तशाच इतरही कादंबऱ्याही भोवतालचा समाज, मित्र, नातेवाईक याला धरूनच लिहिलेल्या आहेत. साहजिकच हे वाचून वाचकांना, विशेषत: मराठी वाचकांना प्रश्न पडू शकतो की, त्याऐवजी तिनं आत्मचरित्रं का नाही लिहिलं? आणि दुसरं म्हणजे यात कादंबरी म्हणून वेगळं काय आहे? ‘मुदलातच कादंबरी हा समाजाकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन म्हणूनच तो अभारतीय आहे’, हे व्ही. एस. नायपॉलचं वाक्य भालचंद्र नेमाडे काही वर्षांपूर्वी उद्धृत करत. स्वत: नायपॉल यांनी भारतीय कादंबरी आणि आत्मपर पुस्तकं यांची गांधीजींचं आत्मकथन किंवा  ‘गोधूली’ सारखी कादंबरी आणि पुरोहित स्वामींचं आत्मकथन ही उदाहरणं घेऊन,  माणसं पाहण्यात भारतीय कसे अपुरे पडतात, हे दाखवलं आहे. या तुलनेत अ‍ॅनी आर्नोच्या ज्या काही कादंबऱ्या आताही उपलब्ध आहेत,  ज्यात  पाहणं, पाहणं आणि पाहणंच आहे.

आईवरची कादंबरी आईच्या मृत्यूपासून सुरू होते. ती, तिचा माजी नवरा, मुलं हे सगळे आईला निरोप देतात आणि अ‍ॅनी आर्नो एकच वाक्य लिहिते, जो कादंबरीचा हेतू आहे, असं वाटतं. ते वाक्य असं आहे : ‘आता माझी आई गेलीच आहे तर मला तिला या जगात आणणं भाग आहे.’ इथून पुढे, ती लहान-मोठय़ा तपशिलाने आई आपल्यासमोर मूर्तिमंत जिवंत करते. तशी थोडीशी कनिष्ठ मध्यमवर्गातून आलेली, नंतर दुकान चालवणारी आई, सतत कामात असणारी, पण स्वत:ला काही काळात म्हणजे ४०च्या दशकात ‘अपडेटेड’ ठेवण्याचा प्रयत्न करणारी, उच्चभ्रू मासिक वाचणारी, सतत स्वत:च्या वर्गाबद्दल सजग असणारी. हे वाचताना आपल्यासमोर युद्धकाळ आणि युद्धानंतरचा काळही समोर येतो. लेखिका सांगते, युद्दकाळापेक्षा युद्धानंतरचा काळ अधिक कठीण होता. म्हणजे लेखिकेचे वडील चक्क बंदुकीच्या गोळय़ांनी तयार झालेली भोकं बुजवायचं काम करत. फ्रान्समधल्या युद्धग्रस्त नर्मडी प्रांतातल्या छोटय़ाशा गावात वाढलेल्या लेखिकेला हळूहळू आईच्या दुकानात येणारे ग्राहक माहीत होतात. अनेकदा आई लेखिकेला दुकानात बसवून ठेवते. कायमच ग्राहकांवर लक्ष ठेव, असं लेखिकेला सांगताना ती ग्राहकांना साशंकतेने बघत असते, हेही लेखिका नमूद करते. त्यामुळेच सगळय़ांत महत्त्वाची बाब जाणवते म्हणजे, लेखिकेची आईची आपण ज्या वर्गात जन्मलो, त्या वर्गापासून लेखिकेला दूर नेण्याची धडपड. त्यामुळे ती तिला चांगल्या शाळेत टाकते, तिच्या शिक्षणावर, कपडय़ांवर, सगळय़ा गोष्टींवर खर्च करण्याचा प्रयत्न करते. ती जेव्हा खाऊन पिऊन सुखी अशा आणि थोडय़ाशा उच्चभ्रू घरातल्या मित्राशी लग्न करायला निघते, तेव्हा आई सूचना देते की, लक्षात ठेव- ते काही आपल्यासारख्या पार्श्वभूमीतून आलेले नाहीत. तू नीट वागली नाहीस तर ते तुला परत पाठवतील. हे वाक्य वाचताना स्तिमित व्हायला होतं. सगळय़ाच आया इकडून तिकडून सारख्याच असतात की काय, असं वाटू लागतं.

नंतर हळूहळू लेखिका आईला दुरावते आणि दुसरीकडे राहायला जाते आणि एक दिवस आई दुकान विकून तिच्याचकडे राहायला येते. एका भल्या मोठय़ा घरात लेखिका, तिचा नवरा राहात असतो, दोन छोटी मुलं असतात. ती येते तेव्हा, तेव्हा लेखिका म्हणते, आता मला यापुढे माझं सगळं आयुष्य हिच्यासमोर काढावं लागणार आहे, या धास्तीने मी खंतावले किंवा मला धडकी भरली. कदाचित हे जाणवल्यामुळेच की काय, आई स्वत: कायम उपयोगी होण्याचा प्रयत्न करते. मुलांना खेळवते, त्यांना बागेमध्ये फिरायला नेते.. भीती वाटत असूनही वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुऊन देते आणि एके ठिकाणी लेखिका लिहिते की, सतत आपला उपयोग, सतत आपण भार बनू की काय, या भीतीने ती सतत बचावात्मक पद्धतीने जगत राहाते. असं काही काळ घडलं की तिला कंटाळा येतो. रोज रोज दिसणारी माणसं तिला दिसत नाहीत, तिचे ग्राहक तिला दिसत नाहीत. तिनं स्वत:चं जग निर्माण केलेलं असतं. आसपासच्या लोकांशी बोलते, नातवंडांबरोबर फिरते. त्यांना वेगवेगळय़ा जागा दाखवते, शहर धुंडाळते. पण तरीही तिचं समाधान होत नाही. आईच्या या कहाणीत एके ठिकाणी  म्हणजे वडलांच्या निधनाचे वर्णन करताना ती म्हणते : ‘ही सगळी कथा मी इतरत्र सांगितली आहे म्हणून इथे सांगत नाही’!

वडिलांची कथा तिने ‘मॅन्स  प्लेस’ या  छोटेखानी  कादंबरीत सांगितली  आहे.  इथे वडिलांच्या वडिलांपासूनची कहाणी येते. याही कादंबरीची सुरुवात वडिलांच्या मृत्यूच्या प्रसंगाने होते आणि हळूहळू लेखिका आठवणीच्या प्रदेशात शिरते. मात्र या कादंबरीच्या सुरुवातीला ज्याँ जेनेचं एक वाक्य येतं – ‘‘ज्यांनी ज्यांनी अपेक्षाभंग केलेला आहे  त्यांच्यासाठी लेखन हाच शेवटचा उपाय’’.

 शेतमजुरीपासून  फॅक्टरीत काम करणारे  वडील आईच्या आग्रहामुळे कॅफे आणि किराणा दुकान चालवायला घेतात,  कमी शिकलेल्या वडिलांना लेखिकेने शिकायला नको असतं आणि या आणि इतर अनेक कारणांमुळे वडील आणि मुलींमध्ये दरी निर्माण होते, वडिलांच्या मृत्यूनंतर याबद्दल लिहायचं ठरवते या प्रकारे वडिलांवरची कादंबरी सुरू होते आणि ८० ते ९० पानांत संपते.  तिरकस, मनमोकळय़ा शैलीत ती  वडिलांचं व्यक्तिचित्र जसंच्या तसं उभं करते किंबहुना तिच्या बहुतेक कादंबऱ्यांत आपल्याला तिच्या जगात प्रवेश केल्यासारखं वाटतं. एके ठिकाणी वडिलांबद्दल ती म्हणते ,‘आर्थिक परिस्थिती सुधारायचा एकच मार्ग त्यांना माहीत होता तो म्हणजे कुठल्यातरी बाईला गरोदर करणे’.

‘हॅपिनग’ ही तिची कादंबरी विशेष गाजलेली आणि अधिक अधिक वाचली गेलेली. याचं कारण अर्थात तिच्यावर चित्रपट बनलेला आहे. संथपणे वाहणाऱ्या तिच्या शब्दप्रवाहाला चित्रपटात मांडण्याचं आव्हान जरा वेगळंच.  कारण त्या चित्रपटाचं वर्णन ‘थ्रिलर’ असं  करण्यात आलेलं  आहे.  मूळ कादंबरीपेक्षा शेवट बदललेला आहे.

‘हॅपिनग’ ही कादंबरी २०१९ च्या बुकर पारितोषिक लघुयादीपर्यंत गेली होती पण तिला‘बुकर’ मिळालं नाही.  बुकर न  मिळालेल्या  कादंबरीच्या लेखिकेला नोबेल पारितोषिक मिळावं हा एक काव्यगत न्याय म्हणावा लागेल . ही  कादंबरी वाचणं हा एक  वेदनादायक अनुभव आहे. १९६३ मध्ये, वयाच्या  तेविसाव्या वर्षी शिकत असलेल्या आणि गर्भार राहिलेल्या  नायिकेची कहाणी  ती सांगते.

 फ्रान्समध्ये गर्भपातावर बंदी घालणारा १९४८ चा कायदा लागू असतानाचा तो काळ. अगदी १९७५ पर्यंत (म्हणजे आंतरराष्ट्रीय महिला वर्ष साजरं झाल्यानंतरच्या वर्षी) हा गर्भपातविरोधी कडक कायदा लागू होता. गर्भपात करून घेणाऱ्या महिलांना दीर्घकाळ तुरुंगवास किंवा देशाबाहेर रवानगीसारख्या शिक्षा सुनावल्या जात आणि गर्भपाताला मदत करणं हाही गुन्हा होता. साहजिकच कुठलाही डॉक्टर नायिकेला मदत करायला तयार होत नाही अशा परिस्थितीत सोडवणूक करणाऱ्या एका बाईकडून ती एक उपकरण बसवून घेते, जेणेकरून गर्भपात व्हावा. पाच दिवस ते बाळगते.  त्याच्यामुळे  प्रत्यक्षात जेव्हा गर्भपात होतो तो अनुभव अक्षरश: अंगावर काटा आणतो, छोटासा गर्भ हातात धरून नाळ कापू पाहणारी नायिका. हे चित्र कादंबरी संपल्यानंतर आपला पाठलाग करतं.  तिला रुग्णालयात दाखल करावं लागतं. तिथं ती बरी होते. पुढे चारचौघांप्रमाणे संसार करते,  मुलांना जन्म देते पण सतत तिला वाटत राहातं की हे कागदावर यायला हवं .

या आणि इतर कादंबऱ्यांमध्ये ही लेखिका अनेकदा डायरीतल्या नोंदी आणि इतर अनेक तपशील सांगतच कथा पुढे नेते.  ‘हॅपिनग’मध्ये एका प्रसंगात ती, पलीकडे उभा असलेला डॉक्टर जसा दिसत असेल. त्याचे  हात कसे थरथरत असतील किंवा त्याला काय वाटत असेल याचा विचार करत राहाते.  याप्रकारे विविध कोनांमधून समोरचं वास्तव रेखाटत ,क्यूबिस्ट शैलीतल्या चित्रासारखी तिची कादंबरी आकार घेते,

 इथे आपण गेल्या २०-२५ वर्षांतल्या कादंबरीतल्या महत्त्वाच्या थीमपर्यंत येतो : एकाकीपणा!  लेखिकेनं आत्मचरित्र न लिहिता कादंबरी लिहिली, याचं कारणच असं की कदाचित  प्रेम, लग्न, मध्यमवर्गीय जगणं, विवाहबाह्य संबंध.. हे सारं तिच्या जगण्यातलं असूनही तो जीवनानुभव नाही, कुठल्यातरी कादंबरीत ते घडून गेलंय, असं समजून त्या घडामोडी तिला नाकारायच्या होत्या. वास्तवात दिसणारं युद्धोत्तर जग, शिक्षण, ते शिकता न येणाऱ्या छोटय़ा-मोठय़ा अडचणी आणि जगण्यातलं नेहमीचं कंटाळवाणं वास्तव जे सात्र्, कामू यांच्यासारख्या तिच्याच देशात वावरणाऱ्या लेखकांनी साठ-सत्तर वर्षांपूर्वी आणून ठेवलं, त्याचं अनुकरणही तिला नको होतं. त्यामुळेच तिची पुस्तकं वाचताना परत परत जो प्रश्न मनात येतो, की ती कादंबरी का लिहिते, याचं हळूहळू उत्तर मिळत जातंङ्घ की ज्या घटना ‘कथासूत्र’ म्हणून शिळय़ा झाल्या आहेत, त्यांची भूतं तिला थडग्यातून पुन्हा जिवंत करायची आहेत, पण तीही विसाव्या शतकातल्या व आधुनिकतेच्या परिप्रेक्ष्यातच! हे तिचं साहस किती यशस्वी झालं, हे नोबेल पारितोषिकावरून कळतंच. हा सगळा प्रकल्प फसण्याचीही शक्यता होतीच, पण ज्या तटस्थपणे लेखिका जगण्यातल्या विविध अनुभवांची कादंबरी करते, तो तटस्थपणाचा, निस्संग प्रेक्षकपणाचा गुण तिला उपयोगी पडतो. जे काही तिचं तुटपुंज लेखन इंग्रजीत उपलब्ध आहे, ते वाचून ‘जगणं, पाहणं, नोंदवणं, लिहिणं’ या तिच्या लेखनचक्राचा आस तटस्थपणा हाच आहे, हे जाणवत राहातं.

मराठीतील सर्व विशेष लेख ( Features ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 11-03-2023 at 03:01 IST