– संजय कळमकर
नवी दिल्लीच्या जंतरमंतरवर गेल्या आठवड्यात जे काही घडले, ते केवळ एका राजकीय पक्षाचे आंदोलन नाही; तर तो सामान्य नागरिकांनी व्यवस्थेला विचारलेला अत्यंत अस्वस्थ करणारा प्रश्न आहे. सीजेपी आणि विरोधकांनी जे आंदोलन सुरू केले तो विषय प्रशासकीय पातळीवर गांभीर्याने घेतला जावा यासाठी देशातील तरुण धडपडत आहेत, मात्र आता विचारलेल्या प्रश्नांना सामोरे जाण्याऐवजी पलायनवादी मार्ग स्वीकारण्याची प्रथा पडली आहे.
निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत हे आंदोलन पुकारले गेले, परंतु या मागणीवर चर्चा होण्याआधीच राजधानीत जे दृश्य पाहायला मिळाले, त्याने लोकशाहीच्या मूळ संकल्पनेलाच धक्का बसला आहे. आंदोलकांना आंदोलनस्थळावर पायही ठेवू दिला जात नाही. बस, रेल्वे आणि मेट्रो स्थानकांवरूनच लोकांना ताब्यात घेतले जात आहे. पिवळेधमक लोखंडी बॅरिकेड्स, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आणि लाठीचा धाक दाखवून आवाज दाबण्याचा हा प्रयत्न सुरू आहे.
एकीकडे अभिजित दिपके आणि नेहा बोरा यांसारखे तरुण नेते, ध्रुव राठीसारखे डिजिटल विश्लेषक निवडणूक प्रक्रियेतील त्रुटींवर सातत्याने प्रश्न उपस्थित करत आहेत. दुसरीकडे राहुल गांधी, खासदार संजय सिंग, अरविंद केजरीवाल आणि ममता बॅनर्जी यांच्यासारखे राजकीय नेते या लढ्याला रस्त्यापासून संसदेपर्यंत आवाज देत आहेत. जेव्हा पत्रकार, विश्लेषक, राजकीय नेते आणि सामान्य नागरिक एकाच सुरात निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेवर बोट ठेवतात, तेव्हा समजून घेतले पाहिजे की जमिनीवर असंतोष खदखदतो आहे.
भारतीय संविधानात शांततापूर्ण विरोध हा गुन्हा नाही. घटनेने प्रत्येक नागरिकाला शांततेने एकत्र येण्याचा आणि आपले मत मांडण्याचा मूलभूत अधिकार दिला आहे. निवडणुका जिंकून सत्तेवर आलेले सरकार देशाचा मालक नसते, तर विश्वस्त असते. मग जेव्हा नागरिक संसदेपासून हाकेच्या अंतरावर येऊन आपली नाराजी नोंदवू पाहतात, तेव्हा त्यांना गुन्हेगारांसारखे का वागवले जाते? विरोधी पक्षांनी विचारलेल्या प्रश्नांना सामोरे जाण्याऐवजी निलंबनाचा मार्ग का निवडला जातो?
जर देशात शांततेने उभे राहून जाब विचारण्याची मुभा नसेल, तर नागरिकांकडे आपली व्यथा मांडण्यासाठी नेमकी कोणती जागा शिल्लक आहे याचे उत्तर शासनाने दिले पाहिजे. शासनातील धोरणकर्ते सहजपणे सांगून मोकळे होतात की लोकांनी रस्त्यावर उतरू नये. पण प्रश्न असा पडतो की, मग असंतोष, विरोध कुठे आणि कधी व्यक्त करायचा? की त्यासाठी दर पाच वर्षांनी होणाऱ्या निवडणुकांची वाट पाहायची? आणि त्याही निष्पक्ष होत नसतील तर?
पारंपरिक माध्यमांत: मुख्य प्रवाहातील वृत्तवाहिन्या जनतेचे प्रश्न मांडण्याऐवजी सत्तेची तळी उचलण्यात मग्न आहेत. म्हणूनच आज लोकांना ध्रुव राठी सारख्या डिजिटल विश्लेषकांकडे वळावे लागते आहे. आज देशात एक अत्यंत विचित्र परंपरा रूढ झाली आहे- सामान्य माणसाला प्रत्येक साध्या गोष्टीसाठी थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घ्यावी लागते. प्रशासनात साध्या अर्जांची उत्तरे वेळेत मिळत नाहीत, जनसुनावण्या कागदावरच राहतात. शिवाय विधिमंडळातून दुर्लक्ष होते, माध्यमांतून आवाज दाबला जातो आणि प्रशासकीय टेबलवरून हाकलून लावले जाते, तेव्हा सामान्य माणूस काय करणार? रस्त्यावर उतरून घोषणा देणे हा काही त्याचा छंद नसतो; तर ती त्याची अखेरची, हतबल पण घटनात्मक गरज असते. पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून घेण्यासाठी कोर्टात जा, शांततापूर्ण मोर्चाच्या परवानगीसाठी उच्च न्यायालयात जा, निवडणूक आयोगाने मतदानाची अचूक आकडेवारी जाहीर करावी म्हणून जनहित याचिका करा. आजकाल न्यायालयात जे खटले चालतात, त्यातील बहुतांश खटले हे प्रशासकीय अपयशाचे द्योतक आहेत.
नागरिकांना न्याय देणे, त्यांच्या तक्रारी वेळेत सोडवणे आणि पारदर्शकता ठेवणे हे निवडून आलेल्या सरकारचे आणि नोकरशाहीचे प्राथमिक कर्तव्य आहे. सर्वोच्च न्यायालय ही संविधानाची शेवटची ढाल आहे, ती देशातील प्रत्येक प्रशासकीय त्रुटी भरून काढणारी दैनंदिन महापालिका नाही.
प्रशासकीय अधिकाऱ्यांना आणि घटनात्मक पदांवर बसलेल्या व्यक्तींना दिले जाणारे वेतन हे देशातील सामान्य करदात्याच्या घामाच्या पैशातून येते. हे वेतन त्यांना सत्तेची मर्जी राखण्यासाठी नाही, तर संविधानाचे रक्षण करण्यासाठी दिले जाते. परंतु आज वास्तवात काय दिसते? बड्या उद्योगपतींचे हजारो कोटींचे कर्ज एका फटक्यात पुनर्रचित होते, माफ होते. सत्ताधाऱ्यांच्या राजकीय सभांना हजारो पोलिसांचे संरक्षण मिळते; पण दुसरीकडे, निवडणूक प्रक्रियेतील संशयावर जाब विचारणाऱ्या कार्यकर्त्यांवर लाठ्या उगारल्या जातात. यात काय चुकीचे आणि काय खरे आहे हेच कळण्यापलीकडचे आहे.
नोकरशाही आज लोककल्याणकारी न राहता सत्तारूढांची बटीक झाली आहे. निवृत्तीनंतर मिळणाऱ्या पदांच्या मोहापायी अनेक वरिष्ठ अधिकारी आपल्या घटनात्मक जबाबदाऱ्या विसरत आहेत. जर प्रशासनाला केवळ मर्जीतल्या लोकांसाठीच काम करायचे असेल, तर जनतेने या व्यवस्थेचा आदर का करावा हा प्रश्न उपस्थित होतो.
लाठ्या उगारून, अश्रुधूर सोडून आणि उचलबांगडी करून खोट्या कारवायांनी असंतोष कधीही शमत नाही, तो फक्त अधिक खोलवर रुजतो. हा असंतोष कमी करायचा असेल, तर शासनाला आणि प्रशासनाला तात्काळ काही पावले उचलावी लागतीलच!
मुख्य निवडणूक आयुक्तांवर जेव्हा संशय निर्माण होतो, तेव्हा आयोगाने स्वतःहून पुढे येऊन सर्व शंकांचे निरसन केले पाहिजे. व्हीव्हीपॅटच्या पावत्यांची पारदर्शकता आणि मतदान आकडेवारीतील तफावतीबाबत खुली चर्चा घडवली पाहिजे. त्यात जनतेला सामावून घेतले पाहिजे.
जंतरमंतरवरील लोखंडी बॅरिकेड्स हटवून आंदोलकांशी प्रत्यक्ष संवाद साधला पाहिजे. मंत्र्यांनी किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वतः जाऊन आंदोलकांची निवेदने स्वीकारणे हा मानापमानाचा प्रश्न बनवू नये, पण बहुतेक सरकारला समस्येवर तोडगा काढण्यात स्वारस्यच नाही!
अधिकाऱ्यांनी केवळ राजकीय आदेश पाळण्यापेक्षा संविधानाशी निष्ठा ठेवली पाहिजे. कायदेशीर चौकटीत राहून समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेतलाच. लोकांच्या समस्या न सोडविल्यास पदाला धक्का बसू शकतो असा धाक निर्माण झाला पाहिजे. लोकशाही म्हणजे केवळ दर पाच वर्षांनी होणारे मतदान नव्हे; ती दररोज नागरिकांच्या हक्कांचे रक्षण करणारी एक जिवंत व्यवस्था आहे. सीजेपीचे आंदोलन असो वा रस्त्यावर उतरणारा कोणताही सामान्य माणूस; सत्तेने त्यांना शत्रू समजू नये. ते आपल्याच देशाचे नागरिक आहेत.
प्रशासनाने लाठीचा धाक दाखवणे बंद करून संवादाचा हात पुढे केला, तरच जंतरमंतरवरील आक्रोश शांत होईल आणि भारतीय संविधानाचा आत्मा सुरक्षित राहील.
kalamkarsanjay@gmail.com
