काल्पनिक कालयानातबसून आपण भारतातच भूतकाळात जाऊन एका स्नातकाची हकीकत पाहू, महाकवी कालिदासाने रघुवंशातल्या पाचव्या सर्गात सांगितलेली कौत्स या स्नातकाची ती गोष्ट. गुरूकडून- वरतन्तुकडून विद्यार्जन करून कौत्स रघुराजाकडे येतो. त्याचे स्वागत करून रघू येण्याचे प्रयोजन विचारतो.

तवार्हतो नाभिगमेन तृप्तं मनो नियोगकृययोत्सुकं मे।

अप्याज्ञया शासितुरात्मना वा प्राप्तोऽसि संभावयितुं वनान्माम्।।

‘आपणासारख्या पूज्य व्यक्तीच्या केवळ आगमनानेच माझे मन तृप्त झाले नाही. आपली सेवा करायची आहे. आपण वनातून माझ्याकडे येण्याची कृपा केलीत ती आपल्या गुरूच्या आज्ञेने की स्वत:च्या इच्छेने हे जाणण्याची उत्सुकता आहे.’

कौत्स त्याला आपल्या येण्याचे प्रयोजन सांगतो. विद्यादान पूर्ण झाल्यावर ‘मी आपणाला काय गुरुदक्षिणा देऊ’ असे विचारता कौत्साला त्याच्या गुरूने सांगितले, ‘तू माझी निरंतर भक्तिभावाने केलेली सेवा हीच गुरुदक्षिणा…’ परंतु कौत्साचे समाधान न होऊन त्याने काही तरी देण्याचा आग्रहच धरला तेव्हा संतापून वरतन्तूने प्रत्येक शिकवलेल्या विद्योसाठी एक कोटी अशा तऱ्हेने चौदा कोटी सुवर्णमुद्रा आणण्यास सांगितले. इतकी धनराशी एकदम कुठून आणणार? रघूची दानशूरता सुप्रसिद्ध असल्याने कौत्स त्याच्याकडे मदत मागण्यासाठी येतो.

परंतु रघूने विश्वजित यज्ञात सर्व काही दान करून टाकले असल्याने मातीच्या भांड्याने कौत्साची पूजा-अर्चना केलेली असते. या निर्धन दात्याकडून अपेक्षापूर्ती होणार नाही असे वाटून कौत्स म्हणतो…

तदन्यतस्तावदनन्यकार्यो गुर्वर्थमाहर्तुमहं यतिष्ये स्वस्त्यस्तुते निर्गलिताम्बुगर्भ शरद्धनं नार्दति चातकोऽपि ।।

‘गुरूसाठी म्हणून मला हवी असलेली गोष्ट आता मी दुसऱ्या कोणाकडून मागेन. कारण पाणी संपून गेलेल्या शरदाच्या मेघाकडे चातकदेखील याचना करीत नाही.’ मात्र, रघू कौत्साला रिक्त हस्ताने जाऊ देत नाही. पृथ्वी जिंकून झाली असल्याने त्याला हवी असलेली धनराशी कुबेराकडून आणायला तो स्वारीची तयारी करतो. परंतु सकाळी त्याला कळते की, रात्री कुबेराने सुवर्णवृष्टी करून रघूच्या हल्ल्याची आवश्यकताच नाहीशी केली. सोन्याचा ढीग चौदा कोटी सुवर्णमुद्रांहून जास्त होता, तरी सर्वच्या सर्व मुद्रा रघूने कौत्साला देऊ केला. कौत्साने गुरुदक्षिणेपुरताच भाग उचलला.

या आख्यानात आपल्याला अनेक आदर्श पाहायला मिळतात. कौत्सासारख्या तरुण स्नातकाला राजदरबारी मिळालेला मान. वरतन्तूची गुरुदक्षिणेची अपेक्षा नसणे. स्वत:चा खजिना रिता असूनही याचकाने रिक्तहस्ताने परत जाऊ नये यासाठी रघूची स्वर्गापर्यंत स्वारीची तयारी हा दातृत्वाचा आदर्श आणि रघूच्या शौर्याचा दबदबा असा की, कुबेराने युद्ध टाळण्यासाठी त्याची अपेक्षा पूर्ण करावी. कुबेराने दिलेल्या संपत्तीचा अपेक्षेपेक्षा जास्त भाग कौत्स आणि रघू दोघांनाही नको होता हा निर्लोभीपणाचा एक आदर्श.

आजच्या शिक्षण, राजकीय क्षेत्रात हे आख्यान कसे असेल? वरतन्तूच्या महाविद्यालयाच्या जबरदस्त ‘कॅपिटेशन फी’साठी अर्थसहाय्य मागायला आलेल्या कौत्साची दाद मंत्रालयात लागेल का? वशिला लावून दाद लागली तरी राज्य शासनाचा पैसा संपला असल्याने अनुदान देता येत नाही हे उत्तर नोकरशहांकडून मिळेल. त्याने मुख्यमंत्री रघुरावजींकडे मजल मारलीच तर मुख्यमंत्र्यांना त्यासाठी केंद्राकडून पैसे आणायची इच्छा होईल का? झालीच तर त्यांचा केंद्रात इतका दबदबा असेल का की, मुख्यमंत्र्यांनी दिल्लीत ठाण मांडण्यापूर्वीच वित्तमंत्री कुबेरनाथ अनुदान ताबडतोब पाठवतील? गरजेपेक्षा जास्त अनुदान नाकारण्याची सचोटी कोण दाखवू शकेल? पुराणकाळी समाजात, राजदरबारी आणि देवांकडेसुद्धा विद्वानाचा आदर होत असे. आज तशी परिस्थिती नाही. विद्योपेक्षा पैसा, अधिकार मोठे मानले जातात.

अपवाद सोडल्यास आपल्या आजच्या विद्वानांची प्रतिमा अशी आहे का की, समाजाने त्यांना मान द्यावा? विद्योसाठी झटणे, विद्यादानात आनंद मानणे, उत्कृष्टतेची कदर करणे आणि धन-सन्मानांबद्दल नि:स्पृह असणे हे गुण आजच्या किती विद्वानांत आढळतात? राजकारणापासून भारतातील कुठलेही विद्यापीठ मुक्त नाही. राष्ट्रीय संशोधन संस्थांतही अधिकारशाही, लालफीत, आत्मसंतुष्ट वृत्ती आणि निष्क्रियता दिसते. गुरुजनांचा हा आदर्श पाहिला की विद्यार्थीदेखील तोच कित्ता गिरवू पाहतात.

कोणी म्हणेल की, रघू आणि कौत्साचे आख्यान त्रेतायुगातले होते. कलियुगात हे असेच चालायचे. मला हे पटत नाही. आजच्या स्नातकांनी परिस्थिती बदलण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे त्यासाठी मी काही आशादायक उदाहरणे मांडणार आहे.

पाच-सहा दशकांपूर्वी केंब्रिज विद्यापीठात गेलो असताना माझी एका सह-अध्यायीशी चर्चा झाली. ब्रिटनमध्ये जातीभेद नसला तरी वर्गभेद आहे असे त्याचे म्हणणे. त्याने ब्रिटनच्या जनतेचे चार वर्ग पाडले. सर्वोच्च वर्ग राजकुटुंबाचा. दुसऱ्या वर्गात राजकीय पुढारी, शासकीय उच्चपदस्थ, उद्याोगपती, विद्यापीठातील प्राध्यापक इत्यादी. तिसऱ्यात ‘पांढरी कॉलरवाले’ आणि दुकानदार तर चौथ्या वर्गात कामगार. मला या गोष्टीचे आश्चर्य वाटले की, त्याने प्राध्यापकांना इतके महत्त्वाचे स्थान दिले. इंग्लंडमधील वास्तव्यात मला त्याची सत्यता पटली. प्राध्यापकांची प्रतिमा तेथील समाजात उज्ज्वल आहे. एखाद्या विषयात काही विशेष घडले तर प्रसारमाध्यमे त्यावर टिप्पणी करण्यासाठी विद्यापीठातील त्या क्षेत्रातील अध्यापकाला बोलावतात. आपल्या विषयावर अधिकारवाणीने बोलणारा अभ्यासक अशी त्याची प्रतिमा असते आणि ती खरीही असते. रशियात नॅशनल अकॅडमीच्या फेलोला ‘अति महत्त्वाच्या व्यक्ती’चा बहुमान मिळतो. फ्रेंच अकॅडमी, रॉयल सोसायटी इत्यादी संस्थांना समाजात जी प्रतिष्ठा आहे ती केवळ उत्कृष्टतेमुळे.

उत्कृष्टतेचा मार्ग सोपा नसतो. त्यासाठी जिद्द, सचोटी आणि महत्त्वाकांक्षा लागते. विसाव्या शतकाच्या दुसऱ्या दशकात माऊंट विल्सन वेधशाळेत शंभर इंच व्यासाची एक दुर्बीण बांधली जात होती. त्यासाठी खेचरावरून सामान वाहून नेले जात होते. खेचरे हाकणाऱ्यांपैकी एका अल्पशिक्षित तरुणाला दुर्बिणीबद्दल कुतूहल निर्माण झाले. इतक्या दुर्गम ठिकाणी दुर्बीण बांधायचा अट्टहास कशासाठी? त्यातून काय दिसते? त्याचा अर्थ कसा लावायचा?… अशा प्रश्नांपायी त्याने खेचरे हाकणे सोडून टेलिस्कोपच्या रखवालदाराची नोकरी पत्करली. तो टेलिस्कोप वापरणाऱ्या खगोलशास्त्रज्ञांना मदत करू लागला. पुढे त्याने स्वत: वेध घेण्यास सुरुवात केली. त्यासाठीचे शिक्षण आत्मसात केले. ‘विश्व प्रसरण पावत आहे’ हा निष्कर्ष ज्याच्याबरोबर केलेल्या निरीक्षणातून एडविन हबल याने काढला तोच हा मिल्टन हमसन. खगोल निरीक्षणांच्या उत्कृष्टतेने त्याला आकर्षित केले. ही सहजसाध्य गोष्ट होती का?

नाही! उत्कृष्टता राबवायला कणखरपणा लागतो. केंब्रिज विद्यापीठाने पाच वर्षांपूर्वी आपला आठशेवा वाढदिवस साजरा केला. या दीर्घकाळात हे विद्यापीठ अग्रस्थान का टिकवून आहे? कारण या विद्यापीठात प्रवेशाचे निकष अवघड आहेत. अधिक गुणवत्ता असल्याशिवाय इथे प्रवेश मिळत नाही. लोकशाहीत सर्वांना सारखी संधी द्यावी. पण विशेष गुणवत्ता असलेल्यांना अधिक शिकायची विशेष सोय उपलब्ध झाली पाहिजे, हे केंब्रिजचे उदाहरण सांगून जाते.

आजही आपल्याकडे थोडेफार पण खरे विद्वान आहेत. विज्ञान, कला आणि वाणिज्य या तीनही क्षेत्रांत ज्यांना समाज आदराने वागवतो. त्यामुळे उत्कृष्टतेची कदर करण्याइतकी जाण समाजात आहे, ही जमेची गोष्ट. अशा विद्वानांपैकी एखादा गुरू म्हणून लाभणे हे विद्यार्थ्यांचे भाग्य म्हटले पाहिजे. आज अशा गुरुजनांची आठवण ठेवा. कारण स्नातक पदवीच्या रूपाने गुणवत्ता मिळवतो त्यामागे गुरुजनांची पुण्याई असते.

ज्यांनी उत्कृष्टतेचे ध्येय ठेवले असेल, ज्यांनी त्या ध्येयाच्या दिशेने थोडी फार मजल मारली असेल आणि जे त्या पुढेही जाऊ इच्छितात, अशांना मी सुयश चिंतितो. हा मार्ग सोपा नाही. पण तो सोडू नये. बाकीच्यांना एवढीच विनंती की, त्यांनी उत्कृष्टतेच्या मार्गाने जाणाऱ्यांची कदर करावी, त्यांना मागे खेचू नये.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या २०१५ साली झालेल्यादीक्षांत समारंभात केलेल्या भाषणाचा संपादित भाग)