कुलदीप आंबेकर
साधारण पंधरा-वीस वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात एक नवं स्वप्न जन्माला आलं होतं. घराघरांत दोनच शब्द घुमत होते. “डॉक्टर” आणि “इंजिनिअर”. यशाची व्याख्या इतकी संकुचित झाली होती, की जणू या दोन शब्दांपलीकडे आयुष्यच नाही. गावाकडच्या शेतकऱ्यापासून शहरातील मध्यमवर्गीय नोकरदारापर्यंत प्रत्येक पालकाला वाटू लागलं, “माझं मूल डॉक्टर किंवा इंजिनिअर झालं, तरच आयुष्याचं सार्थक.” आणि याच भावनेतून महाराष्ट्रात, विशेषतः मराठवाड्यात, जेईई-नीटचा महापूर आला.

 ग्रामीण भागातील लाखो मुलं स्वप्नांच्या ओझ्याखाली लातुर, कोटा, हैदराबादसारख्या शहरांकडे धावू लागली. कोणाच्या वडिलांनी शेती गहाण ठेवली, कोणाच्या आईने दागिने विकले, कोणीतरी कर्ज काढलं, तर कोणीतरी प्रतिष्ठेच्या नादात स्वतःला संपवलं.कारण समाजाने एक भयंकर समज निर्माण केला होता, “हुशार तोच, जो नीट-जेईईमध्ये यशस्वी होतो.” बाकीच्यांचं काय, त्यांच्या स्वप्नांचं काय, त्यांच्या क्षमतांचं काय, याची कोणालाच फिकीर नव्हती.

मुलांना स्वतःला काय आवडतं, त्यांची क्षमता कोणत्या क्षेत्रात आहे, त्यांची वैचारिक ताकद कुठे आहे, हे कोणी विचारलंच नाही. डॉक्टर व्हा, इंजिनिअर व्हा, नाहीतर आयुष्य वाया गेलं. इतकी निर्दयी मानसिकता समाजात रुजली होती. आज मागे वळून पाहिलं, तर अनेक अस्वस्थ करणारे प्रश्न उभे राहतात. त्या तथाकथित “टॉपर” मुलांचं पुढे काय झालं? रात्रंदिवस रट्टा मारून, लाखोंच्या क्लासेसमध्ये बसून, शेकडो मार्क मिळवणारी मुलं आज कुठे आहेत? देशातील सर्वोच्च संशोधन संस्था, जागतिक विद्यापीठं, सामाजिक नेतृत्व किंवा नवसर्जनाच्या केंद्रस्थानी हीच मुलं मोठ्या प्रमाणावर का दिसत नाहीत?

अपवाद असतील, पण मोठ्या प्रमाणावर दिसते ती एक थकलेली, भावनाहीन आणि यंत्रवत जगणारी पिढी. कारण शिक्षण हे ज्ञानासाठी उरलं नव्हतं; ते व्यवहार बनलं होतं. पालकांनी पैसा गुंतवला होता आणि मुलांनी आयुष्य. आता त्यातून परतावा हवा होता. म्हणूनच डॉक्टरकी सेवा राहिली नाही; ती व्यवसाय बनली.

 इंजिनिअरिंग नवसर्जन राहिलं नाही; ते पॅकेजचं गणित बनलं. मुलं माणूस म्हणून घडलीच नाहीत; ती स्पर्धेची उत्पादनं बनली. याहून भयंकर वास्तव म्हणजे या प्रवासाने हजारो मुलांचं मानसिक आरोग्य उद्ध्वस्त केलं.अनेकांनी अपयश सहन न झाल्याने आत्महत्या केल्या, काही नैराश्यात गेले, तर काहींनी स्वतःला कायमचं अयोग्य समजायला सुरुवात केली.

कारण समाजाने त्यांना कधी शिकवलंच नाही, की डॉक्टर-इंजिनिअर यांच्यापलीकडेही आयुष्य असतं. कला, साहित्य, समाजकार्य, संशोधन, शेती, पत्रकारिता, उद्योजकता, प्रशासन, क्रीडा, पर्यावरण, भाषा, तंत्रज्ञान अशा शेकडो क्षेत्रांत करिअर आहे, सन्मान आहे, यश आहे. पण आपण मुलांना स्वप्नं दाखवली नाहीत; आपण त्यांना भीती दाखवली.

आज जेईई-नीटच्या कोचिंग उद्योगाभोवती आर्थिक गैरव्यवहार, पेपरफुटी, जाहिरातींचं राजकारण, खोट्या यशकथा आणि पालकांच्या भावनांचं व्यापारीकरण यावर चर्चा सुरू आहे. पण सर्वात मोठा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. “आपण मुलांना खरंच समजून घेतो का?” मुलं ही पालकांच्या अपूर्ण स्वप्नांची गुलाम नसतात. त्यांचं आयुष्य हे समाजाच्या प्रतिष्ठेचं प्रदर्शन नसतं आणि करिअर म्हणजे केवळ पगाराचा आकडा नसतो.

प्रत्येक मूल वेगळं असतं, त्याची आवड वेगळी असते, त्याची दिशा वेगळी असते. पण आपण अजूनही प्रत्येक मुलाला एका अरुंद स्पर्धेच्या नळीतून ढकलत आहोत. आज गरज आहे ती थांबण्याची, स्वतःला विचारण्याची आपण मुलांना घडवत आहोत, की त्यांना मोडत आहोत?

 कारण प्रत्येक मूल डॉक्टर होऊ शकत नाही; पण प्रत्येक मूल चांगला माणूस नक्की होऊ शकतो. समाजाने आता “मार्क”पेक्षा “माणूस” मोठा मानायला शिकायला हवं. पालकांनी आपल्या मुलांच्या डोळ्यातील भीती ओळखायला हवी आणि शिक्षण व्यवस्थेने यशाची व्याख्या बदलायला हवी. नाहीतर पुढच्या पंधरा वर्षांनी पुन्हा हाच प्रश्न समाजासमोर उभा राहील. “इतकी मुलं धावली… पण नेमकं पोहोचलं कोण?” वेळ अजून गेलेली नाही. पालकांनो… आता तरी शहाणे व्हा.

संस्थापक, स्टुडंट हेल्पिंग हँड्स

kuldeepambekar123@gmail.com