ज्युलिओ एफ. रिबेरो
आपल्या पोलीस दलात प्रामाणिक आणि स्वच्छ चारित्र्याचे अधिकारी कमी असतील, पण ते आहेत हे नक्की. संजय पांडे हे त्यापैकी एक होते, पण कारकीर्दीमधला एखादा मोहदेखील त्यांना ‘ईडी’पर्यंत पोहोचवणारा ठरला. यातून सर्वानीच शिकायला हवा तो संयमाचा धडा!
मुंबई शहर पोलीस दलात संजय पांडे यांच्याबद्दल खूप सहानुभूती आहे. ‘मोदींना हे कळणार नाही आणि जर त्यांना सांगितले तर ते नक्कीच त्रास देणार नाहीत’ अशी भावना आहे.. विशेषत: मुंबईतील अनेक पोलीस कर्मचाऱ्यांना वाटते की ‘ते’ (मोदी) परमबीर सिंह यांच्यासारख्या ‘स्खलनशील’ अधिकाऱ्याला संरक्षण देत असून एका प्रामाणिक पोलीस अधिकाऱ्याला विनाकारण टार्गेट करत आहेत!
संजय पांडे यांची प्रतिमा पोलीस सेवेत असताना स्वच्छ होती हे मी मान्य करतो. मी कबूल करतो की, माझ्यासारखे अनेक वरिष्ठ सेवानिवृत्त अधिकारी आहेत ज्यांना संजय पांडे यांच्या सध्याच्या दुर्दशेबद्दल सहानुभूती आहे. पण ‘नॅशनल स्टॉक एक्स्चेंज’ (एनएसई)च्या तब्बल ९१ कर्मचाऱ्यांचे दूरध्वनी वा ईमेल संभाषण संबंधितांच्या परवानगीविना ऐकण्याचे वा ‘रेकॉर्ड’ करण्याचे – थोडक्यात फोन टॅिपगसारखेच- उघडच बेकायदा ठरणारे कृत्य अशा एका प्रामाणिक समजल्या जाणाऱ्या व्यक्तीने का केले असावे? ‘सायबर ऑडिट’ करणारी कंपनी स्थापली होती त्यांनी. तिच्यामार्फत या दूरध्वनी वा ईमेल संभाषणांवर पाळत ठेवली गेली, असे म्हणतात.
आता हे खरे आहे की, सायबर ऑडिटचे कंत्राट (मधल्या काळात स्थापलेल्या कंपनीमार्फत) घेतले तेव्हा काही संजय पांडे हे पोलीस दलाच्या सेवेत नव्हते. परंतु त्या गुपचूप ठेवल्या गेलेल्या पाळतीबद्दलची काहीएक कागदपत्रे त्यांनी मागे सोडली आणि ही कागदपत्रे, ‘ईडी’ म्हणून सर्वज्ञात असलेल्या ‘सक्तवसुली संचालनालया’ने केवळ हस्तगतच केली असे नव्हे तर, ईडीने ही कागदपत्रे प्रसारमाध्यमांनाही पाहू दिली- त्यांविषयीच्या बातम्यांचा बभ्रा सर्वदूर होऊ दिला. कागदपत्रे जे काही सांगताहेत, त्यावर पांडे यांच्यासारखी, ‘प्रामाणिक अधिकारी’ म्हणून ओळखली जाणारी व्यक्ती तरी काय स्पष्टीकरण देणार? कोणी सांगितले होते त्यांना ही संभाषणे नोंदवण्याचे काम? कागदपत्रे सांगताहेत की, ‘कोणीही नाही’! जे काही साडेचार हजार कोटींचे कंत्राट ‘नॅशनल स्टॉक एक्स्चेंज’ने या संजय पांडे यांच्या कंपनीला दिलेले होते ते केवळ सायबर- लेखापरीक्षणापुरतेच मर्यादित होते!
पोलीस दलातील कारकीर्दीत संजय पांडे यांनी त्यांच्या स्वच्छ आर्थिक व्यवहारांमुळे, कनिष्ठांमध्ये तरी निश्चितच लोकप्रियता मिळवली होती. ‘लोकप्रियता’ याचा खरा अर्थ सर्वसामान्य लोकांना प्रिय असणे असा घेतला तर, जनसामान्यांनाही पांडे यांच्या स्वच्छ चारित्र्याबद्दल कौतुकमिश्रित आदर होताच होता. सेवेतील कर्तव्यालाच नेहमी महत्त्व देणे, प्रामाणिकपणा हेच जणू एखाद्याला ‘होते कुरूप वेडे..’ ठरवण्यास पुरेसे असते. तसेच पांडे यांच्याबाबतही झाले. साहजिकच, समान दर्जाच्या अधिकाऱ्यांशी तसेच वरिष्ठांशी संजय पांडे यांचे नेहमी खटके उडत. बहुधा याचीच परिणती म्हणजे त्यांच्यावर अलीकडे झालेले आरोप.
इथे संजय पांडे यांचे पूर्वसुरी परमबीर सिंह यांचा उल्लेख करणे हे विषयांतर ठरू नये. ‘अंबानींच्या घराजवळ मोटारीत स्फोटके’ सापडल्याचे प्रकरण अंगलट येऊ लागल्यावर, त्यातून सावरण्याच्या धडपडीत असणारे परमबीर सिंह हे भाजपच्या गोटात सामील झाले, त्यानंतर (तत्कालीन) सत्ताधारी महाविकास आघाडीच्या सरकारने संजय पांडे यांच्यात अचानक रस दाखवला! वरिष्ठ पोलीस वर्तुळात अशी बोलवा पसरली होती की परमबीर यांनी अंबानींच्याच पुढल्या पिढीशी सहकार्य करण्याच्या हेतूने हा प्रकार घडवला होता. हा दावा करणाऱ्यांचे सांगणे असे की, अंबानींना त्यांच्या घराच्या छतावर थेट हेलिकॉप्टर उतरण्यासाठी हेलिपॅड बांधण्याची परवानगी हवी होती, पण ‘अँटिलिया’ ही अंबानींची राहती इमारत इतर उंच इमारतींच्या भरवस्तीत असल्यामुळे नागरी हवाई वाहतूक संचालनालयाच्या (‘डीजीसीए’च्या) अधिकाऱ्यांनी ही परवानगी नाकारली होती. त्या अधिकाऱ्यांचे मत बदलावे, यासाठी अंबानींना धोका असल्याचे सिद्ध करून दाखवणे गरजेचेच होते म्हणे!
परंतु परमबीर यांनी ही कामगिरी सोपवली ती, एरवी कलंकित पण परमबीर यांचे मात्र विश्वासू असलेले साहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांच्याकडे.. आणि वाझे यांनी गडबड केली! वाझे यांनी त्यांच्या पूर्वापार कामांमध्ये त्यांना सहकार्य देणाऱ्या एका परिचिताला या कामी जुंपले, पण या परिचिताचा उत्साह कमी पडला. अखेर या ‘कामगिरी’चे िबग फुटले तेव्हा हाच परिचित कमालीचा बेभरवशी ठरला आणि मग वाझे व त्यांच्या साथीदारांनी त्याला कायमचे शांत करून टाकण्याचे ठरवले. हा गोंधळ इथेच थांबत नाही.
ही स्फोटकांची बिलामत राज्याचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यापर्यंत पोहोचण्याआधीच त्यांनी परमबीर यांना पदावरून काढून टाकण्याचा निर्णय घेतल्यामुळे, परमबीर यांना निष्ठा बदलणे भागच पडले.. उद्धव ठाकरे यांना धडा शिकवण्यासाठी तेव्हाचे माजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याखेरीज दुसरा आधार परमबीर यांना कोणता मिळणार होता?
.. वरचे तीन परिच्छेद खरे आहेत वा नाहीत याची पर्वा न करता, ही अशीच चर्चा पोलीस दलातील वरिष्ठ मंडळी करीत आहेत कारण त्यांच्या मते या साऱ्याच गोष्टी अगदी शक्य कोटीतील आहेत! जर एखाद्या हवालदारालाही त्याच्या बदलीसाठी गृहमंत्र्यांना पैसे द्यावे लागतात, हे पोलीस दलातील साऱ्या वरिष्ठ -कनिष्ठांना माहीत असलेले उघडे गुपित असेल आणि जर प्रत्येक पद आणि त्या पदाचे ठिकाण यांची ‘मापे’ ठरवून कुठल्या मापासाठी किती हेही ठरलेले असेल, तर मग पोलीस आयुक्तपदावर नियुक्ती मिळण्यासाठीचा ‘आकडा’ अवाच्या सवाच असणार! हे सारे जर खरे असेल तर खूप पैसा गुंतवूनही तो वाया गेला! बदला घेणे, धडा शिकवणे हे एकच उत्तर होते!
संयम हाच उपाय!
या प्रकरणातून अधिकाऱ्यांनी धडा घ्यावा. वैयक्तिक फायद्यासाठी राजकारण्यांशी संपर्क राखणे हे धोक्याचे आहे. वारा वाहील तशी चटकन शिडे फिरवून दिशा बदलणारे काही हुशार लोकही आहेतच म्हणा, पण असल्या हुशारीपायी स्वत:चा आत्माच गमावण्याची भयावह किंमत मोजावी लागते. ज्यांनी याच कलेमध्ये प्रभुत्व मिळवले आहे त्यांना त्यांच्या स्वातंत्र्याचा आणि स्वाभिमानाचा विचार नाही हे उघड आहे. पण प्रत्येक अधिकारी काही इतका कुटिल-कपटी असू शकत नाही. अनेक प्रामाणिक आणि कर्तबगार लोक आहेत, त्यांना बाजूला ठेवले जाते- वगळले जाते, हे खरेच परंतु त्यांनी संयम कायम ठेवल्यास एक दिवस त्यांचाही येतो, हेही खरे. मुंबईचे विद्यमान पोलीस आयुक्त विवेक फणसळकर हे एक प्रकरण आहे. तो धीर होता!
दुर्दैवाने, संजय पांडे यांच्यासारख्या चांगल्या आणि प्रामाणिक- पण काहीसा विक्षिप्त वाटू शकणाऱ्या- अधिकाऱ्याकडे या संयमाचा अभाव होता, असे म्हणावे लागते. निवृत्त होण्यापूर्वी महत्त्वाच्या पदासाठी पांडे यांनी महाविकास आघाडीतील बडय़ा नेत्यांची गाठभेट घेतली, असे दिसते. इथूनच त्यांचा प्रवास उतरणीकडे सुरू झाला. मग ते सेवानिवृत्त होण्याचा अवकाश, ‘सक्तवसुली संचालनालय’ ऊर्फ ‘ईडी’ वाटच पाहात होते!
जर एखादा अधिकारी राजकीय खेळीत एखादे वेळी उतरलाच, तर त्याने चहुबाजूंनी सुरक्षित राहण्याची काळजी घेतली पाहिजे. स्पॅनिश आणि पोर्तुगीज भाषांमध्ये एक शब्दप्रयोग आहे ‘मॅनोस लिम्पिओस’- याचा शब्दश: अर्थ ‘स्वच्छ हात’- सूचित अर्थ प्रामाणिकपणा आणि सचोटी, हेतुशुद्धता! जर तुम्ही स्वच्छ हातांनी खेळत नसाल तर राजकारण्यांनी खेळलेला खेळ न खेळणेच चांगले. नाही तर दोन्ही पाय चिखलात रुततील.. हा धडा शिकण्यासाठी संजय पांडे यांना किंमत मोजावी लागली आहे.
लेखक मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आहेत.