रवींद्र ठिपसे
न्या. महादेव गोविंद रानडे यांचे व्यक्तिमत्त्व बहुआयामी होते. अर्थकारण, उद्योग आणि व्यापार, राजकारण, समाजकारण, धर्मकारण, इतिहास, इंगजी भाषा आणि साहित्य, मराठी भाषा आणि साहित्य, संत वाङ्मय यांच्या अध्ययन व अध्यापनामुळे त्यांची बुद्धी, लेखणी आणि वाणी लीलया विहार करत असे. समाज सुधारणांबाबत त्यांचे विचार आणि आचार सुस्पष्ट होते. न्या. रानडे यांनी स्थापन केलेल्या शतायुषी संस्था आजही त्याच उद्दिष्टांनी कार्यरत आहेत. न्याय आणि सामाजिक क्षेत्रात त्यांनी दिलेल्या भरिव योगदानाचा मागोवा त्यांच्या सव्वाशेव्या स्मृतिदिनी घेणे अगत्याचे…

न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील निफाड या गावी १८ जानेवारी १८४२ रोजी झाला. बालपण निफाड येथेच गेले. शालेय शिक्षण कोल्हापूर येथे झाले. प्राथमिक शिक्षणानंतर त्यांना कोल्हापूर येथेच १८५३ मध्ये नव्याने सुरू झालेल्या इंग्रजी शाळेत घालण्यात आले. ही शाळा म्हणजेच हल्लीचे राजाराम हायस्कूल. शालेय जीवनात रानडे ग्रंथांचेही भरपूर वाचन केले. वाचलेल्या ग्रंथांचा गोषवारा ते टिपून ठेवत. रानडे यांना तल्लख स्मरणशक्तीचे वरदान लाभलेले होते. १८५९ मध्ये मुंबई विद्यापीठाने घेतलेल्या पहिल्या मॅट्रिकच्या परीक्षेस २१ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी फक्त ७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. रानडे यांनी उत्तम गुण संपादन केल्यामुळे त्यांना दरमहा ७० रुपयांची शिष्यवृत्ती प्राप्त झाली. या घवघवीत यशानंतर महादेव रानडे यांनी १० जून १८५८ रोजी एल्फिस्टन महाविद्यालयात प्रवेश घेतला.

महाविद्यालयात वामन आबाजी मोडक, रामकृष्ण गोपाळ भांडारकर, बाळ मंगेश वागळे इत्यादी त्यांचे सहाध्यायी होते. महाविद्यालयीन जीवनात रानडे यांनी अभ्यासाला पूरक अशा सुमारे ३४ ग्रंथांच सखोल वाचन केले. १८६२ साली मुंबई विद्यापीठाने घेतलेल्या पहिल्या बी. ए. पदवीच्या परीक्षेत रानडे प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. इतिहास आणि अर्थशास्त्र हे दोन विषय घेऊन त्यांनी बी. ए. ऑनर्सची परीक्षा दिली. या परीक्षेत मात्र त्यांना दुसरा वर्ग मिळाला. तरी त्यांची अभ्यासूवृत्ती आणि बुद्धिमत्ता जाणून परीक्षकांनी स्वत:हून वर्गणी काढून त्यांना एक सुवर्णपदक आणि दोनशे रुपयांची पुस्तके भेट दिली.

रानडे यांनी १८६५ मध्ये एल.एल.बी.ची परीक्षा दिली. या परीक्षेत रानडे आणि त्यांचे वर्गमित्र वागळे हे दोनच विद्यार्थी बसले होते. दोघेही प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. लगोलग दिलेल्या एल. एल. बी. ऑनर्सच्या परीक्षेत रानडे प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. विद्यापीठाने रानडे यांची फेलो म्हणून नेमणूक केली. याचवर्षी रानडे एम. ए. झाले. १८७१ मध्ये रानडे यांनी ॲडव्होकेटच्या परीक्षेत प्रथम श्रेणीत सफलता प्राप्त केली. ‘कला’ आणि ‘कायदा’ शाखेतील दिलेल्या सर्व परीक्षेत प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबद्दल त्यांना ‘पदवीधर मुकुटमणी’ (प्रिन्स ऑफ ग्राज्युएट्स) अशी सार्थ बिरुदावली बहाल करण्यात आली. मॅट्रिकच्या परीक्षेत मिळविलेल्या प्रविण्यामुळे त्यांना ‘दक्षिणा फेलोशिप’ प्राप्त झाली होती. या बहुमानामुळे अध्ययन करीत असताना कनिष्ठ वर्गांना अध्यापन करण्याची संधी त्यांच्याकडे चालून आली. अध्यापनाची जबाबादारी त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण होई तो पार पडली.

त्यांना मराठी भाषेविषयी आत्यंतिक जिव्हाळा होता. विद्यापीठात मराठी भाषेला स्थान मिळाले पाहिजे ही त्यांची आंतरिक तळमळ होती. इंग्रज आमदानीतील तत्कालीन विद्याखात्याचे संचालक सर अलेक्झांडर ग्रँट यांनी १८१८ ते १८६४ या कालावधीतील मराठी पुस्तकांची एक तालिका प्रसिद्ध केली होती. या तालिकेत उल्लेख केलेल्या पुस्तकांच्या परिशिलनातून न्या. रानडे यांनी एक निबंध तयार करून तो रॉयल एशियाटिक सोसायटी ऑफ बॉम्बे ब्रांचच्या सभेत वाचला. निबंधात त्यांनी मराठी साहित्याचा धांडोळा घेतलेला आहे. स्वदेशी भाषा समृद्ध झाल्याशिवाय परकीय भाषांची वृद्धी होणार नाही या विचारांवर ते ठाम होते. विद्यापीठ स्तरावर मराठी भाषेला स्थान मिळाले पाहिजे, याविषयी ते आग्रही होते. त्यांच्या निधनानंतर मुंबई विद्यापीठात मराठी भाषेला अभ्यासक्रमात स्थान मिळाले. १८६६ मध्ये त्यांनी मराठी अनुवादक, दक्षिणा प्राइज कमिटी सभासद आणि मराठी भाषेचे परीक्षक अशी तिहेरी भूमिका बजावली.

न्या. रानडे यांना पुण्याविषयी विशेष प्रेम होते. महर्षी धोंडो केशव कर्वे म्हणतात, “१८७१ नंतरचा २२ वर्षांपर्यंतचा पुण्याचा इतिहास हा रानडे यांच्या कर्तृत्वाचा इतिहास आहे”. न्या. रानडे यांच्याशी निगडीत पुणे येथील काही महत्त्वाच्या घटना आणि त्यांनी स्थापन केलेल्या संस्थांचा थोडक्यात परिचय खालीलप्रमाणे.

न्यायाधीशपदी कार्य

१८७१ ते १८९३ या कालावधीत न्या. रानडे हे पुणे येथे न्यायाधीशपदी कार्यरत होते. प्रथम वर्ग सबजज, पुण्याचे सदर अमीन, लघुवाद न्यायालयाचे न्यायाधीश, लॉ मेंबर ऑफ बॉम्बे लेजिस्लेटिव्ह असेंब्ली, मेम्बर फायनान्स कमिटी, डेक्कन रायट्स रिलीफ ॲक्टसाठी विशेष जज या जबादाऱ्या त्यांनी पुण्यात असताना पार पडल्या.

सार्वजनिक सभा

२ एप्रिल १८७० रोजी गणेश वासुदेव जोशी उर्फ सार्वजनिक काका यांनी सार्वजनिक सभेची स्थापना केली. सरकार आणि जनता यांच्यामधील दुवा होवून सर्वच सार्वजनिक प्रश्नांची तड लावणे तसेच प्रचलित कायदे आणि नव्याने केले जाणारे कायदे यांची हिंदुस्थानातील लोकांच्या दृष्टिकोनातून फायद्या–तोट्याची चिकित्सा करणे हे सभेचे उद्दिष्ट होते. याच दरम्यान १८७१ साली न्या. रानडे प्रथम वर्ग सबजज या पदावर पुण्यात आले. त्यांना सार्वजनिक सभेचे व्यासपीठ आणि सार्वजनिक काकांसारखा सहकारी मिळाला. पुढील एक दशकभर न्या. रानडे सार्वजनिक सभेशी निगडीत कामांत (उदा. इंग्लंडच्या संसदेकडे जबाबदार राज्यपद्धतीची मागणी करणारा अर्ज, दुष्काळ निवारण, इग्लंडच्या राणीला द्यावयाचे मानपत्र, दक्षिणेतील दंगे, शेत-जमीनविषयक कामे, इ. सहकार्य करीत राहिले. सार्वजनिक सभेचे त्रैमासिक, ‘द क्वार्टरली जर्नल ऑफ द सार्वजनिक सभा’ यात रानडे नियमित लेखन करत असत.

व्यापारासंबंधी व्याख्याने

न्या. रानडे यांनी ऐन तरुणपणात पुणे येथे व्यापारासंबंधी दोन व्याख्याने दिली होती. पहिले व्याख्यान फडतरे वाड्यात दि. ८ डिसेंबर १८७२ रोजी राजकीय व्यवस्थेमुळे दिलीजाणारी खंडणी या मध्यवर्ती विषयावर पहिले व्याख्यान बेतलेले होते. तर दुसरे व्याख्यान विश्रामबाग वाड्यात २२ फेब्रुवारी १८७३ रोजी ‘हिंदुस्थानच्या व्यापाराची स्थिती’ यावर दिले होते. ही दोनही व्याख्याने न्या. रानडे यांच्या अर्थशास्त्रीय विचारांचा विकास कसा झाला हे पाहण्यासाठी उपयुक्त आहेत. हिंदुस्थानच्या अर्थशास्त्राचे जनक ही बिरुदावली त्यांना लावण्यात येत असे.

दयानंद सरस्वती यांची पुणे भेट

१ जुलै ते ऑगस्ट अखेर १८७५ असा दोन महिने स्वामी दयानंद सरस्वती यांचा मुक्काम पुण्यात होता. न्या. रानडे, लोकहितवादी, महादेव मोरेश्वर कुंटे यांच्या पुढाकाराने बुधवार पेठेतील भिडे वाड्यात दयानंद सरस्वती यांनी १५ व्याख्याने दिली. समारोपाच्या भाषणानंतर त्यांची हत्तीवरून मिरवणूक काढण्यात आली. सनातन्यांनी याच मिरवणुकीत दयानंदाचे प्रतिक म्हणून गर्दभाला पिवळा फेटा घालून व भरजरी शाल पांघरून समांतर मिरवणूक काढून दयानंदाच्या मिरवणुकीवर दगडफेक, चिखलफेक करून अश्लाघ्य वर्तन केले. न्यायालयात खटला भरला गेल्यावर सुधारकांच्या बाजूने निकाल लागला. मोठ्या शिक्षेच्या भयाने सनातन्यांनी बिनशर्त माफी मागितल्यामुळे न्या. रानडे व इतरांनी त्यांना माफ केले.

अमोघ वक्तृत्त्व

न्या. रानडे स्थापित ‘वक्तृत्त्वोत्तेजक सभे’च्या विद्यमाने १८७५ पासून दरवर्षी मे महिन्यात वसंत व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येते. व्याख्यानमालेचे पहिले पुष्प प्रा. केरूनाना छत्रे यांच्या अध्यक्षतेखाली व न्या. महादेव गोविंद रानडे यांच्या पुढाकाराने बेलबागेनजिकच्या रामजी नाईक भिडे यांच्या वाड्यात गुंफले गेले. न्या. रानडे यांच्याच पुढाकारातून १५ मे १८८९ रोजी हिराबागेतील वसंत व्याख्यानमालेच्या व्यासपीठावरून पहिल्या महिला वक्त्या पंडिता रमाबाई यांचे व्याख्यान झाले. व्याख्यानाचा विषय होता ‘अमेरिकी स्त्रियांचे पराक्रम’. कालानुरूप बदल होत आजही वसंत व्याख्यानमाला सुरू आहे.

वेदशास्त्रोत्तेजक सभा

मोदी गणपती मंदिरात ३१ ऑगस्ट १८७५ रोजी झालेल्या सभेत न्या. म. गो. रानडे, रावसाहेब महादेव मोरेश्वर कुंटे, रावबहादूर सीताराम विश्वनाथ पटवर्धन आणि धोंडो मोरेश्वर साठे यांनी वेदशास्त्रोत्तेजक सभेची स्थापना केली. वेदाध्यायन-अध्यापन आणि इतर प्राचीन भारतीय शास्त्रे यांचे अध्ययन, संवर्धन आणि जतन करणे ही वेदशास्त्रोत्तेजक सभेची प्रमुख उद्दिष्टे आहेत. आजही या उद्दिष्टांपासून न ढळता संस्थाचे हे कार्य लोकाश्रयावर अव्याहतपणे सुरू आहे.

बुधवार वाडा आणि विश्रामबाग वाडा

बुधवार वाडा आणि विश्रामबाग वाडा १३ मे १८७८ रोजी आगीच्या भक्षस्थानी पडला. या आगीत न्या. रानडे यांचा संबंध असावा असा संशय ब्रिटिश अधिकाऱ्यांना होता. वास्तविक आगीच्या घटनेशी रानडे नामक दुसऱ्या एका व्यक्तीचा संबंध होता. केवळ कुलनाम सादृश्यामुळे न्या. रानडे यांच्यावर बालंट आले आणि त्यांची बदली धुळे येथे करण्यात आली. कालांतराने ही बाब लक्षात आल्याबर रानडे यांची बढतीवर बदली करण्यात आली.

पंचहौद मिशनमधील चहापान

१४ ऑगस्ट १८९० रोजी पंच हौद मिशनच्या कार्यालयात व्याख्यानानिमित्त पुण्यातील लोकमान्य टिळक, न्या. रानडे इत्यादी समाजधुरीण गेले होते. तिथे काहींनी चहाचा कप घेऊन चहा न पिता कप तसाच टेबलावर ठेवला. गोपाळराव जोशी (डॉ. आनंदीबाई जोशी यांचे यजमान) यांनी ‘पुणे वैभव’ या वर्तमानपत्रात एक लेख लिहून तिथे गेलेल्यांनी चहा प्राशन केला म्हणजे धर्माज्ञा भंग झाली, म्हणून त्यांच्यावर बहिष्कार घालावा असे मत प्रदर्शित केले. चहा न पिताही केवळ बरोबर गेले होते म्हणून न्या. रानडे यांना प्रायश्चित घेऊन या घटनेवर पडदा टाकावा लागला.

डॉ. पेंटीकॉस्ट यांची व्याख्याने

प्रसिद्ध मिशनरी डॉ. पेंटीकॉस्ट यांची १८९१ मध्ये पुणे शहरात १५ व्याख्याने आयोजित करण्यात आली होती. भाषणांचा विषय ख्रिस्त धर्म आणि त्याची महती हाच होता. न्या. रानडे यांनी बहुतेक व्याख्याने ऐकली होती. आभाराच्या भाषणात न्या. रानडे यांनी ख्रिस्ती, मुसलमान धर्मांसह इतर धर्मांचा इतिहास सांगून हिंदू धर्मातील पंथोपपंथांचे निर्माते आणि कार्य यावर गुणदोषांसह विवेचन केले. ख्रिस्ती धर्मातील उणीवांवर प्रकाश टकून हिंदू धर्म कसा सर्व श्रेष्ठ आहे हे डॉ. पेंटीकॉस्ट यांना ऐकविले.

महादेवोत्सव

न्या. रानडे यांची १८९३ मध्ये मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नेमणूक झाल्यावर रानडे पुणेकरांच्या भेटीसाठी आले होते. हिराबागेत करण्यात आलेला सत्कार अभूतपूर्व होता. सत्काराला येताना वाटेत ठिकठीकाणी त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. हिराबागेत दिपोत्सवासारखी आरास केलेली होती. फटाक्यांची आताषबाजी करण्यात आली. रानडे यांचे वरिष्ठ न्या. पोलन यांनी रानडे यांचा उल्लेख ‘पुण्याचा अनभिषिक्त राजा’ अशा शब्दांत केला होता. या समारंभाला ‘महादेवोत्सव’ असे संबोधले गले.

महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था

२९ ऑक्टोबर १८९४ रोजी न्या. रानडे यांच्या पुढाकारातून ‘डेक्कन व्हरनॅक्युलर ट्रान्सलेशन सोसायटी’ची स्थापना झाली. डॉ. रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांची अध्यक्षपदी तर न्या. म. गो. रानडे, नारायणभाई दांडेकर आणि श्रीराम भिकाजी जठार यांची कार्यकारिणी तयार झाली. मराठी भाषेच्या अभिवृद्ध्यर्थ विविध विषयांवरील इतर भाषांतील ग्रंथाचे मराठीत भाषांतररूपाने किंवा स्वतंत्रपणे ग्रंथ तयार करावेत. तसेच प्रकाशित इतर वैचारिक ग्रंथांना पारितोषिके द्यावीत. मराठी भाषेतून विद्याप्रसारास उत्तेजन द्यावे या प्रमुख उद्देशाने संस्थेची स्थापना करण्यात आली होती. स्वतंत्र्यानंतर १९४८ मध्ये संस्थेच्या नावात ‘महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था’ असा बदल करण्यात येऊन आजपावेतो संस्थेचे कार्य अव्याहत आणि त्याच उद्देशाने सुरू आहे.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ११ वे वार्षिक अधिवेशन २७ ते ३० डिसेंबर १८९५ रोजी सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे भरले होते. न्या. म. गो. रानडे हे या अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष होते. त्या भाषणात त्यांनी एकराष्ट्रीयत्वाचा पुरस्कार केला. रानडे यांच्या नेतृत्वातील सामाजिक परिषदेला काँग्रेसच्या मंडपात जागा देऊ नये असा एक मतप्रवाह होता. काँग्रेसच्या १३ समित्यांपैकी ९ समित्यांनी जागा देण्यास काही हरकत नाही असे मत मांडले. परंतु काँग्रेसच्या अधिवेशनात गोंधळ नको म्हणून न्या. रानडे यांनी सामाजिक परिषदेचे अधिवेशन दुसऱ्या जागी भरवून यशस्वी करून दाखविले.

डेक्कन सभा

सार्वजनिक सभेची सूत्रे न्या. रानडे यांच्या हातातून निसटत्ल्यावर त्यांच्या काही सहकाऱ्यानी ४ नोव्हेंबर १८९६ रोजी डेक्कन सभेची स्थापना केली. न्या. रानडे यांचा डेक्कन सभेला पाठिंबा होता त्यामुळे सार्वजनिक हिताच्या कार्यासाठी नेमस्तपणा आणि उदारमतवादाचा पुरस्कार हेच धोरण ठरविले गेले. सार्वजनिक सभेचे कामकाज याचा मार्गाने चालले होते.

न्या. माधवराव रानडे मेमोरियल होमिओपॅथिक हॉस्पिटल

‘महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन सोसायटी’ संचलित ‘न्यायमूर्ती माधवराव रानडे मेमोरियल होमिओपॅथिक रुग्णालय व संशोधन केंद्रा’ची स्थापना १९७१ साली करण्यात आली. धोंडूमामा साठे होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न रुग्णालय म्हणून ही संस्था कार्य करीत आहे.

सामाजिक परिषदेची शताब्दी

१८८७ साली न्या. रानडे, सर टी. माधवराव दिवाण आणि रावबहादूर रघुनाथ राव यांनी सामाजिक परिषदेची स्थापना केली. सामाजिक परिषदेचे पहिले अधिवेशन चेन्नई (मद्रास) येथे झाले. सामाजिक परिषदेची अधिवेशने काँग्रेसच्या अधिवेशनाला जोडूनच होत असत. १६ व १७ जानेवारी १९८८ रोजी डॉ. बाबा आढाव आणि केसरीचे तत्कालीन संपादक डॉ. शरच्चंद्र गोखले यांच्या पुढाकारातून सामाजिक परिषदेचा शतसांवत्सरिक कार्यक्रम पुणे येथे करण्यात आला होता.

मराठी साहित्य संमेलन

पुढील वर्षी म्हणजे २०२७ मध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे शतकमहोत्सवी अधिवेशन पुणे येथे साजरे होणार आहे. त्यांची मुहूर्तमेढ न्या. रानडे यांनीच ११ मे १८७८ रोजी भरविलेल्या पहिल्या ग्रंथकार संमेलनाच्या रूपाने पुण्यातच रोवली गेलेली होती. त्यादृष्टीने साहित्य संमेलनाचा शताद्बीमहोत्सव पुण्यात होणे समयोचित आहे.

प्रत्युतपन्नमती लाभलेले न्या म. गो. रानडे यांची न्या. काशिनाथ त्रिंबक तेलंग यांच्या निधनानंतर २३ नोव्हेंबर १८९३ रोजी मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीशपदी नेमणूक झाली. वयाच्या ५९व्या वर्षी दि. १६ जानेवारी १९०१ रोजी मुंबई येथे देहावसान होईपर्यंत ते न्यायासनावर कार्यरत होते. न्या. महादेव गोविंद रानडे यांच्या सव्वाशेव्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन.

(लेखक पुणे शहराच्या इतिहासाचे अभ्यासक आणि पुण्यावरील ग्रंथांचे संग्राहक आहेत.)
इ-मेल: thipse.ravindra@gmail.com