डॉ. केशव पवार
शिक्षण हे मानवी उन्नतीचे सर्वात प्रभावी साधन आहे, हे प्राचीन काळापासूनच अनेक विचारवंतांनी अधोरेखित केले आहे. बुद्ध, चार्वाक यांच्यापासून ते सॉक्रेटिस, प्लेटो आणि ॲरिस्टॉटलपर्यंत — पूर्व आणि पश्चिम या दोन्ही परंपरांनी औपचारिक-अनौपचारिक शिक्षणातून मानवी कल्याणाचा मार्ग दाखवला. पुढे स्वामी विवेकानंद, जॉन ड्यूई, आणि रवींद्रनाथ टागोरांनी ज्ञान व मुक्तीची नवी संकल्पना मांडली. परंतु भारतीय समाजाचे वास्तव वेगळे होते- वैदिक चातुर्वर्ण्य व्यवस्थेने शूद्र, स्त्रिया आणि अतिशूद्र बहुजनांना शिक्षणापासून शतकानुशतके वंचित ठेवले होते. या अन्यायाविरुद्ध महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्णायक लढा देऊन ज्ञानाची दारे बहुजनांसाठी खुली केली. त्याच परिवर्तनवादी परंपरेत कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्था उभारून शिक्षणाला लोकचळवळीचे रूप देत खऱ्या अर्थाने शिक्षणक्रांती घडवली.
स्वातंत्र्यपूर्व कालखंडात भारतीय समाज अज्ञान, अंधश्रद्धा आणि दारिद्र्याने ग्रासलेला होता आणि परकीय सत्तेच्या गुलामीत होता. कर्मवीर भाऊराव पाटील म्हणत असत की, समाजातील अनिष्ट रूढी, अज्ञान आणि सामाजिक विषमता हेच भारताचे खरे शत्रू आहेत. म्हणूनच, जोपर्यंत बहुजन समाज सुशिक्षित होणार नाही, तोपर्यंत देशाला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळणार नाही आणि स्वातंत्र्याची फळे त्यांना चाखता येणार नाहीत. धर्मांध व्यवस्थेने हजारो वर्षे बहुजनांना शिक्षणापासून वंचित ठेवल्यामुळे भारतीय समाज अज्ञान आणि गुलामगिरीत होता. या दुहेरी गुलामगिरीतून समाजाला मुक्त करायचे असेल, तर शिक्षण हाच एकमेव उपाय आहे, हे त्यांनी जाणले. म्हणूनच ते म्हणत, “माझ्या दाढीला जेवढे केस आहेत, तेवढ्या शाळा सुरू करून बहुजन समाजातील मुलांना शिकवेन आणि विषमतावादी अन्यायी व्यवस्थेच्या छाताडावर थयाथया नाचायला लावेन.” हाच ध्येयवाद घेऊन त्यांनी खेड्यापाड्यांमध्ये शेकडो शाळा-महाविद्यालये सुरू केली. कर्मवीर भाऊराव पाटील म्हणजे बहुजन समाजाला ज्ञानाचा प्रकाश देणारा ज्ञानसूर्य, म्हणून २२ सप्टेंबर या त्यांच्या जयंतीदिनी त्यांना अभिवादन केले जाते.
कर्मवीर जेव्हा विद्यार्थीदशेत होते, तेव्हा शाहू महाराजांनी बहुजन समाजातील मुलांसाठी वसतिगृहे आणि शाळा सुरू केल्या होत्या. १९०२ ते १९०९ दरम्यान भाऊराव जैन वसतिगृहात राहत होते. एकदा भाऊराव शाहू महाराजांनी अस्पृश्य मुलांसाठी सुरू केलेल्या ‘मिस क्लार्क हॉस्टेल’ मधील भाषण ऐकण्यासाठी गेले, म्हणून त्यांना आंघोळ केल्याशिवाय जैन वसतिगृहात प्रवेश नाकारण्यात आला. तरुण भाऊरावांनी अस्पृश्यता मान्य नसल्यामुळे हा आदेश मानला नाही. त्यामुळे त्यांचे दप्तर आणि अंथरूण खिडकीतून फेकून दिले गेले. निर्भीड बाण्याचे तरुण भाऊराव थेट शाहू महाराजांकडे गेले. महाराजांनी भाऊरावांची तक्रार ऐकून घेऊन त्यांना राजवाड्यात राहून शिक्षण घेण्याची संधी दिली. शाहू राजांच्या सहवासातच भाऊरावांना सामाजिक समतेची खरी शिकवण मिळाली.
कर्मवीर भाऊराव पाटील हे महात्मा फुले आणि राजर्षी शाहू महाराजांच्या सत्यशोधक चळवळीचे सक्रिय कार्यकर्ते होते. १९०९ मध्ये त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने ‘दुधगाव विद्यार्थी आश्रम’ सुरू केला. ४ ऑक्टोबर १९१९ रोजी त्यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. काले या ठिकाणी संस्थेने एक वसतिगृह, एक प्राथमिक शाळा आणि एक रात्रशाळा सुरू करून शैक्षणिक कार्याला सुरुवात केली. १९२४ साली त्यांनी सर्व जाती-धर्माच्या विद्यार्थ्यांसाठी ‘श्री छत्रपती शाहू महाराज बोर्डिंग हाऊस’ सुरू केले. १९२७ मध्ये महात्मा गांधींनी या वसतिगृहाला भेट दिली आणि सर्व जाती-धर्माची मुले एकत्र जेवतात आणि काम करून शिक्षण घेतात, हे पाहून “साबरमती आश्रमात मला जे शक्य नाही, ते तुम्ही येथे यशस्वीरित्या करून दाखवले” अशा शब्दांत त्यांचे कौतुक केले. आज रयत शिक्षण संस्थेच्या ७८९ शाळा, महाविद्यालये आहेत.
फुले शाहू आंबेडकर आणि कर्मवीरांनी बहुजनांना शिक्षण मिळावे यासाठी संघर्ष केला; पण आजचे समाज वास्तव पाहता या महामानवांना अपेक्षित असलेली शिक्षण व्यवस्था अस्तित्वात आहे का हा प्रश्न निर्माण झालेला आहे. एकविसाव्या शतकात प्रगत राष्ट्रे शिक्षणावर भरघोस खर्च करून नेत्रदीपक प्रगती करत आहेत. स्वातंत्र्यानंतर भारतीय संविधानानुसार प्रत्येक बालकाला शिक्षण उपलब्ध करून देण्याची तरतूद असूनही विश्वगुरू होऊ पाहणाऱ्या भारताचे शिक्षणाकडे किती लक्ष आहे हा संशोधनाचा मुद्दा आहे. संविधानाने दिलेला शिक्षणाचा हक्क आजही बहुजन, शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या मुलांपर्यंत पोहोचलेला नाही. स्वातंत्र्य मिळून साठ वर्षांनी ‘राइट टू एज्युकेशन’ हा कायदा आला असला तरी, अजूनही २० टक्के भारतीय निरक्षर आहेत.नवीन शैक्षणिक धोरणानुसार (एनईपी) शिक्षणावर जीडीपीच्या ६ टक्के खर्च अपेक्षित असताना, प्रत्यक्षात केंद्र व राज्य सरकारांचा खर्च जेमतेम २.५ ते २.९ टक्क्यांवरच घुटमळत आहे. महाराष्ट्रातही शिक्षणाचा अर्थसंकल्पीय हिस्सा सातत्याने घटत आहे. या अनास्थेपोटी देशभरात ‘क्लस्टर’च्या नावाखाली सुमारे एक लाख, तर महाराष्ट्रात हजारो जिल्हा परिषद शाळा बंद करण्याचे किंवा खासगीकरणाच्या घशात घालण्याचे धोरण राबवले जात आहे. भरतीवरील निर्बंधांमुळे हजारो पदे रिक्त असून शाळा ‘एक शिक्षकी’ बनल्या आहेत. कार्यरत शिक्षकांवर विविध सर्वेक्षणे आणि अशैक्षणिक कामांचे इतके ओझे लादले आहे की अध्यापनच दुय्यम ठरले आहे. परिणामी, प्राथमिक शाळांमधील ५० टक्के विद्यार्थ्यांना साधे मराठी वाचन आणि अंकगणितही येत नसल्याचे ‘असर’ अहवाल सांगतो. शासनाचे प्राधान्यक्रम हा सर्वांत मोठा विरोधाभास आहे.
सरकारी शाळा, शिक्षक आणि मध्यान्ह भोजनासाठी निधीची वानवा असल्याचे सांगितले जाते; मात्र दुसरीकडे धार्मिक उत्सवासाठी सरकार हजारो कोटी रुपयांची तरतूद करीत आहे. या निधीचा अल्प हिस्सा जरी शाळांच्या सक्षमीकरणासाठी वापरला असता, तर हजारो मराठी शाळा टिकून ठेवून अद्यावत करता आल्या असत्या. बहुजनांना शिक्षण देऊन दारिद्र्यातून मुक्त करण्याऐवजी, सरकार भक्तांच्या पापक्षालनासाठी कुंभमेळे भरवण्यात धन्यता मानत आहे. सरकारी शिक्षण संपवून खासगी शाळांच्या अनिर्बंध नफेखोरीला पायघड्या घातल्याने कष्टकऱ्यांची मुले शिक्षणातून बेदखल होत आहेत. महात्मा फुलेंनी शिक्षणाला सर्वांगीण विकासाचे सूत्र मानले आहे. म्हणून शिक्षण हाच कोणत्याही सशक्त राष्ट्राचा कणा असतो. आज शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार आणि धोरणकर्त्यांची अनास्था ही चिंताजनक बाब समोर आली आहे. म्हणून अर्धशिक्षित आणि दिशाहीन पिढीच्या बळावर देश महासत्ता होऊ शकत नाही. बहुजन समाजाला दर्जेदार शिक्षण मिळणे हे राष्ट्रीय उद्दिष्ट म्हणून निश्चित होणे गरजेचे आहे.
कर्मवीर अण्णांनी रयतेच्या शेवटच्या घटकापर्यंत शिक्षणाची गंगा नेली; तो प्रवाह कायम वाहाता ठेवायचा तर शिक्षणाचे बाजारीकरण रोखून ‘समान शाळा पद्धती’ (वन नेशन, वन एज्युकेशन) अंतर्गत सर्वांना मोफत व दर्जेदार शिक्षण मिळणे हीच काळाची गरज आहे. कर्मवीर अण्णा म्हणत शिकलेल्या माणसाला अन्यायाची चीड आणि न्यायाची चाड असली पाहिजे. म्हणून भारताच्या भावी पिढीला दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी जाती धर्माच्या राजकारणातून समाजाने जागृत होऊन जबाबदार आणि दर्जेदार शिक्षण व्यवस्था निर्माण करण्यासाठी शासनाला जाब विचारला पाहिजे. यासाठी शिक्षणक्रांतीची नवी लोकचळवळ उभी करणे, हीच कर्मवीरांना खरे अभिवादन ठरेल!
लेखक कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या सातारा येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालयात इंग्रजी विभाग प्रमुख आहेत.
ईमेल : keshavpawarsocial@gmail.com
