अश्विनी भिडे देशपांडे
शनिवार १८ मे २०२४ रोजी कोल्हापूर येथील सुप्रसिद्ध ‘गायन समाज, देवल क्लब’ या संस्थेनेबांधलेल्या अद्यायावत ‘गोविंदराव टेंबे रंगमंदिरा’चेलोकार्पण होणार आहे. या महोत्सवात तदनंतर ‘माणिक भिडे स्मृती संगीत महोत्सव’ होणार आहे. त्यानिमित्त माणिकताईंच्या ‘शिष्य’ आणि ‘गुरू’ या भूमिकांचा आलेख त्यांच्या शिष्येच्या शब्दांत…

माझी आई आणि गुरू माणिक भिडे ही गानसरस्वती किशोरी आमोणकर ऊर्फ ताईंची पट्टशिष्या. ताईंना मी पाहिलं, ऐकलं, अनुभवलं ते आईच्याच चष्म्यातून! ताईंचं गाणं हा माझा देव, जो मला दाखवला आईनं!

swami samarth guru purnima marathi news
गुरूपौर्णिमेला स्वामी समर्थ दर्शनासाठी अक्कलकोटमध्ये भाविकांची मांदियाळी
what sanjay Raut Said About Shankaracharya ?
“शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना आशीर्वाद दिला म्हणून…”, संजय राऊत यांचं वक्तव्य
What Suresh Wadkar Said About Anand Dighe?
सुरेश वाडकर यांचं वक्तव्य, “आनंद दिघेंना पाहिलं की भीती वाटायची, पण..”
Swami Avimukteshwaranand Said This Thing about Modi
शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांचं वक्तव्य, “नरेंद्र मोदी आमचे शत्रू नाहीत, पण…”
Shankaracharya Swami Avimukteshwaranand on Kedarnath Gold Scam
Swami Avimukteshwaranand alleges Kedarnath Gold Scam : ‘केदारनाथ धाम मंदिरात २२८ किलो सोन्याच्या जागी पितळ बसवलं’, शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांचा आरोप
Swami Avimukteshwaranand met Shiv Sena UBT leader Uddhav Thackeray
Swami Avimukteshwaranand : ‘विश्वासघातकी लोक हिंदू कसे?’, शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांचा घणाघात; म्हणाले, “उद्धव ठाकरे पुन्हा..”
Shukra Gochar 2024 in Kark
लक्ष्मी नारायण योग पुढील २३ दिवस ‘या’ ५ राशींना देईल प्रचंड धन-दौलत; नशिबात राजासारखं जीवन जगण्याची संधी
Alandi, Dnyaneshwar Mauli,
आळंदी: संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उपस्थिती, टाळ- मृदंगाच्या गजरात वारकरी तल्लीन

कबीरानं गुरुमाहात्म्य सांगताना एका दोह्यात म्हटलंय,

गुरु गोविंद दोनों खडे,

मै काके लागू पाय

बलिहारी मै गुरुनकी,

जिन गोविंद दीनो दिखाय…

साक्षात परमेश्वर आणि गुरू असे दोघेही समोर उभे ठाकले, तर मी कुणाच्या पाया पडायचं? अर्थात गुरूच्या, कारण त्यांनीच तर मला परमेश्वर दाखवला!

माझ्या आईचं माहेर कोल्हापूरचं, संगीतप्रेमी पोतनीस घरातलं… जी भूमी म. उ. अल्लादियाखाँसाहेबांच्या वास्तव्यानं पुनीत झाली, अन् जिथं त्यांच्या मागेही जयपूर अतरौली घराण्याची गायकी अनुरणन पावत होती, तिथलं! साहजिकच लग्नापूर्वी आईचं संगीतशिक्षण या घराण्यात पं. मधुकरराव (नानासाहेब) सडोलीकर यांच्याकडे झालं होतं. लग्न होऊन ती भिडे या गानलुब्ध घराण्याची सून म्हणून मुंबईला आली. भिडे परिवाराचे स्नेही व हितचिंतक पं. वामनराव देशपांडे गानतपस्विनी मोगूबाईंचे शिष्य होते. भिड्यांच्या नव्या सुनेला तिच्या घराण्याची तालीम सुरू राहावी म्हणून माईंना भेटवायला ते गोवालिया टँकच्या ‘अशर मॅन्शन’मध्ये घेऊन गेले. माई घरी नव्हत्या, पण ताई होत्या. ‘‘या नव्या मुलीला – माणिकला – आपल्या घराण्याची तालीम हवीय’ असं वामनरावांनी म्हणताच, ताईंनी आईला ‘गाऊन दाखव’ म्हणून फर्मावलं, आणि तिचं गाणं संपल्यावर ‘उद्यापासून माझ्याकडे शिकायला ये’ म्हणून सांगितलं!

रोज तालीम जोरात सुरू झाली. हे वर्ष असावं १९६३. ताई त्या वेळी गोवालिया टँकला माईंच्या घरात राहत असत, आणि आई नाना चौकात!. ताईंच्या कारकीर्दीचा हा चढतीचा काळ होता. रोजच्या तालमीला घरी आणि जिथे कार्यक्रम असेल तिथे आई ताईंच्या मागे स्वरसाथीला असायची. माझ्या लहानपणच्या एका आठवणीत गिरगावातल्या ‘ट्रिनिटी क्लब’मध्ये कार्यक्रम ऐकायला गेलेल्या ताई ‘मी गायला बसते’ म्हणाल्या तेव्हा रात्री एक वाजता गाडी पाठवून, झोपेतून उठवून आईला साथीसाठी नेलं होतं!

हेही वाचा >>>मतपेटीसाठी लोकसंख्येचा बागुलबुवा

तीनेक वर्षं ताईंचा आवाज चिप्प बसला होता, त्या काळात – तालीम होत नव्हती तरी – आई रोज त्यांच्याकडे ग्रँट रोडहून अंधेरीला जात असे. (त्या वेळी ताई अंधेरीला जयविजय सोसायटीत राहायच्या, नंतर आई शिवाजी पार्कला राहायला आली आणि ताई प्रभादेवीला!). आईची ताईंकडची तालीम इतकी नियमित असे, की रोज शिवाजी पार्क ते प्रभादेवी बसप्रवास करणाऱ्या माझ्या आईला पाहून लोक समजायचे की हिची प्रभादेवीला नोकरी आहे! नोकरी केली नसली, तरी आईनं या काळात ‘शिष्यपणाची करिअर’ केली.

१९६३-१९८१ हा जवळजवळ १६-१७ वर्षांचा कालखंड! ज्या काळात आईनं ताईंची सावलीसारखी सोबत केली, तो काळ ताईंचा सुवर्णकाळ म्हणावा लागेल. जयपूर अत्रौली घराणेदार गायकीपासून अलग अशी ताईंची स्वत:ची गायकी निर्माण होण्याचा काळ!

‘‘मला त्यांचं गाणं कळायचंच नाही गं! डोक्यावरून जायचं. आज एक गायच्या, तर उद्या दुसरंच!’’ असं आई सुरुवातीच्या तालमीच्या दिवसांचं वर्णन करायची. ‘‘आज एक तर उद्या दुसरंच’’ हे त्यांचं तत्त्व तर शेवटपर्यंत कायम होतं. स्वत:चं वळण त्यांनी कधीच गिरवलं नाही. भूपाची ‘‘प्रथम सुर साधे’’ किंवा ‘सहेला रे!’’ या नितांतसुंदर बंदिशी, किंवा ‘म्हारो प्रणाम’, ‘‘अवघा रंग एक जाला’’ अशा एकापेक्षा एक सरस संतरचना स्वत:च्या मैफलीत त्यांनी स्वत: नाहीच मांडल्या! मुखडा किंवा पहिली ओळदेखील त्या सातत्यानं बदलत. इतकी, की पेटीवादक हैराण होऊन विचारी, ‘‘याची ‘ओरिजिनल’ काय? मी काय रिपीट करू?’’ अशा वेळी ताईंच्या गाण्याला त्यांच्या बरोबरीनं साथ देत असतानाच कल्पनेच्या अवकाशात उत्तुंग भराऱ्या घेणाऱ्या त्यांच्या प्रतिभाविलासाच्या पतंगाच्या दोरीचं काम जमिनीवर पाय घट्ट रोवलेली माझी आई करे.

हेही वाचा >>>लोकसंख्येचे आकडे समजून घेताना…

ताईंकडे शिकणंच काय पण त्यांच्या सहवासात राहणं हीदेखील मोठी तपश्चर्याच असे! त्यांचं प्रेम आणि त्यांचा राग दोन्ही पराकोटीचे! त्यांच्या प्रखर तेजाची दाहकता त्यांच्या जवळच्यांना सहन करावी लागे. माझी आई इतकी सतत त्यांच्या बरोबर असे, की हे प्रखरतेचे चटके कधी कधी तिच्या सहनशीलतेच्या मर्यादेपलीकडे जात. अशाच एका पराकोटीच्या ताणाच्या क्षणी आईच्या सहनशक्तीचा कडेलोट झाला. वर्ष होतं १९८१. वर्षानुवर्षांच्या रोजच्या तालमीला खीळ बसली. आईच्या दिनचर्येत एकदम भलीमोठी पोकळी निर्माण झाली. पण एव्हाना आईनं मला शिकवायला सुरुवात केली होती. आईला आता नवी साद ऐकू आली. माझ्याबरोबरीनं वंदना, गीतिका, अन्वया, सारंगी वगैरे अन्य मुलींना आई शिकवू लागली. इतकी वर्षं इमानेइतबारे ताईंचं शिष्यत्व निभावलेल्या माझ्या आईनं आता गुरूच्या नव्या भूमिकेत प्रवेश केला.

आईनं ताईंना जी अनेक वर्षं साथ केली, त्यातून तिनं काय वेचलं? सावलीसारखं सतत बरोबर राहून, गाऊनही आईचं गाणं तंतोतंत ताईंच्या गाण्यासारखं वाटलं नाही याचं कारण तिनं गुरूच्या गाण्याची, शैलीची बाह्य वेष्टनं नव्हेत तर मूलतत्त्वं आत्मसात केली. गुरूंच्या गाण्याची कॉपी केली नाही, तर त्यांची शाश्वत सौंदर्यमूल्यं उचलली. ताईंचं गाणं तिनं स्वत:चं केलं आणि मग ते आमच्यात वाटून दिलं. ‘‘शिष्यपणे मेळविले, गुरुपणे सांडिले…’’ तिनं कधीही तिचं किंवा ताईंचं अंधानुकरण आम्हाला करू दिलं नाही, तर त्यांच्या सौंदर्यमूल्यांची दृष्टी दिली. ताईंकडून बाहेर पडल्यानंतरही तिनं सदैव ताईंचीच पूजा केली, दुसऱ्या कोणत्याही संगीताची आस वा कास बाळगली नाही. या अलौकिक गुरू-शिष्यांचं मनोमीलन ३५ वर्षांच्या विरहानंतर त्यांच्या अखेरच्या काळात व्हावं हा दैवी संकेत होता. ताईंच्या अखेरीच्या दीडदोन वर्षांत त्यांचे संबंध पुन्हा मोहरले, हा या गुरू-शिष्य नात्याचा मोठाच सन्मान म्हटला पाहिजे!

आईनं गुरूच्या भूमिकेत प्रवेश केल्यानंतर मी तिची लौकिकार्थाने पहिलीच शिष्या! ती माझी ‘गुरुमाऊली’! वास्तविक, संगीताच्या वाटेवर चालणे किंवा न चालणे हे सर्वस्वी माझ्या इच्छेवर अवलंबून होते. पण काहीतरी वाट आपल्या मुलीला दिसावी एवढी आईची माफक अपेक्षा असणे साहजिकच होते; कारण तिने स्वत: त्या वेळपर्यंत ताईंबरोबरच्या १३-१४ वर्षांच्या प्रदीर्घ शिष्यत्व आणि सहवासांतर्गत संगीतविद्योचे भव्यदिव्य हिमालय, उत्तुंग गिरिशिखरे, निबीड अरण्ये, अथांग महासागर, खळाळणारे झरे, चमकणारी इंद्रधनुष्ये … पाहिली होती; आणि संगीतविद्योची वाट किती कष्टसाध्य आहे तेही अनुभवले होते. या वाटेवरील रम्य ठिकाणे गवसण्याकरिता किती यातायात करावी लागते ते जवळून पाहिले होते. रत्नांची खाण आपल्या लेकीला मिळावी असे कोणत्याही आईला वाटणे तर स्वाभाविकच आहे. पण त्याकरिता करावी लागणारी यातायात आपल्या मुलीला झेपेल का ही मातृसुलभ काळजीदेखील वाटत होती.

त्याच सुमारास मी टायफॉइडने आजारी पडले होते. आजारातून उठल्यानंतर दोन स्वरही लावता येईनासे झाले होते. आकाशवाणीच्या ‘गुणवत्ता शोध’ स्पर्धां (ज्या अद्यापही दरवर्षी घेतल्या जातात!) साठी फॉर्म भरला होता, स्पर्धा महिन्यावर येऊन ठेपली होती पण माझी काहीच तयारी झाली नव्हती. रोजच्या रियाजाच्या वेळी माझी रडारड होऊ लागली. ‘‘रडतेस काय अशी? मी पाहते कसे गाता येत नाही ते! स्पर्धेपर्यंत रोज माझ्यासोबत गायला बसत जा!’’ हे आईचे त्या वेळचे लढाऊ उद्गार होते.

आईकडे सुरू केलेल्या जयपूर अत्रौली घराण्याच्या ‘घरंदाज गायकी’च्या शिक्षणाचा परिणाम असा झाला, की थोड्याच दिवसांत ‘आपल्याला काय येते’ याऐवजी ‘आपल्याला काय काय येत नाही’ची जाणीव तीव्र होऊ लागली; ‘बेसूर न होणे’ म्हणजे सुरेल गाणे नव्हे, तालात न चुकता सम पकडता येणे म्हणजे लयीत गाणे नव्हे, रागाचे नियम न मोडता शिस्तीत रागबढत केली तरी राग ‘उभा’ राहात नाही याची अनुभूती येऊ लागली, गायनकला किंवा संगीतविद्या हे प्रकरण वाटते तितके सोपे नाही, त्यात किती खाचाखोचा आहेत, वाकडी वळणे आहेत, उतार चढाव आहेत हे जाणवू लागले. घरच्या घरी गुरू लाभून म्हणजे रूढार्थाने ‘गुरू-शिष्य परंपरे’त माझे शिक्षण सुरू झाले. दिवसभर कॉलेज, क्लास किंवा अन्यत्र धडपडून संध्याकाळी किंवा रात्री मी रियाजाला बसत असे. दिवसाच्या कोणत्याही वेळेला गायला बसले, तरी गुरू समोर हजर असे. माझा आवाज आणि आईचा आवाज या दोहोंत महदंतर होते. माझा आवाज कोता, पातळ, आईच्या आवाजापेक्षा उंच पण तरी तानेला जड; आईचा आवाज भरदार, गोल, माझ्या आवाजापेक्षा कमी उंच तरी तानेला चपळ! त्यामुळे गाण्यातली एकच ‘बात’ माझ्या आणि आईच्या आवाजात वेगवेगळी वाटे. पण आईने नेहमी मला माझ्या नैसर्गिक आवाजातच गायला लावले. त्याकरिता ती स्वत: माझ्या काळी पाचच्या पट्टीत – तिला आवाजावर ताण पडत असूनदेखील – गायली!

सुरुवातीला आपल्याला बरेच काही – संगीत विशारदपर्यंत- गाणे येते या भ्रमात मी शिकायला बसत असे. त्यामुळे पहिल्याच आलापात आईने अडवले किंवा चुकीची दुरुस्ती केली, की मी चिडत असे. ‘‘अगं, आत्ताच तर आवाज लावलाय, अजून गळा तापलासुद्धा नाहीये, लगेच सूर ‘परफेक्ट’ कसा लागेल? पाच मिनिटं तरी दे नं मला …’’ अशी मी आईवर करवादत असे. त्यातून गुरूवर चिडण्याचा हक्क मला मी तिची मुलगीच असल्यामुळे जन्मजातच प्राप्त झालेला! पण पोटची मुलगीच असल्यामुळे माझ्याबाबतीत कठोरपणा दाखवायचा अधिकारही आईला मिळालेला होता! आणि तरीदेखील माझ्या मनाविरुद्ध तिने जबरदस्तीने मला रियाजाला बसवले असे कधी झाले नाही; ‘इतका तास रियाज झाल्याशिवाय उठायचे नाही’ अशी सक्ती तिने कधी केली नाही. तिचा आग्रह ‘क्वालिटी’बद्दल असे, ‘क्वांटिटी’बद्दल नव्हे! याविषयी तिचे आवडते वाक्य म्हणजे,

‘‘अगं, एक तान हजार वेळा म्हटलीस म्हणून काय ती सुधारणार आहे का? डब्यात दगडगोटे भरून हजार वेळा हलवण्यासारखंच आहे ते! जे गाते आहेस ते लक्ष देऊन गायला नको का?’’

एखादी न गवसणारी जागा शिष्येच्या ‘गळी उतरवण्या’चे आईचे कसब काही औरच असे. हाडाची शिक्षिका! एखादी हरकत किंवा जागा जर शिष्येकडून जशीच्या तशी ‘रिपीट’ केली गेली नाही, तर तिला चैनच पडत नसे. ‘येत नाही’ म्हणून कोणतीही गोष्ट सोडून दिलेली तिला खपत नसे. एकदा सांगून आले नाही तर अनेकदा शांतपणे सांगणार; तरीदेखील आले नाही तर उलगडून फोड करून समजावणार! जोपर्यंत येत नाही तोपर्यंत अखंड, अथक प्रयत्न चालू! आल्यानंतरही लगेच ‘हुश्श्य! सापडले एकदाचे!’ ही भावना नाही; तर ते लगेच ताबडतोब घोटून कंठस्थ करायचे! अर्थात, या प्रक्रियेला कुणाला जास्त वेळ लागे, कुणाला कमी. हे सर्व प्रत्येक शिष्येच्या पचनी पडेपर्यंत आईचा ध्यास सुटत नसे. म्हणूनच एका वेळी एकाच शिष्येला शिकवायचे! मी नेहमी आईला म्हणत असे, की ‘‘तुझ्या शिष्यांची प्राथमिक तयारी झाल्यानंतर आणि एक ठरावीक पातळी गाठली गेल्यानंतर तू सगळ्यांना एकत्र घेऊन का बसत नाहीस? प्रत्येकीबरोबर वेगळे गाऊन तुझा आवाज आणि शरीर दमणार, वेळ जास्त खर्च होणार; त्यापेक्षा सर्वजणी एकदम बसल्या तर वैचारिक देवाणघेवाणही चांगली होईल, जिची जितकी कुवत आणि पात्रता तितकी ती गाणे उचलत जाईल, आत्मसात करत जाईल.’’

पण आईतल्या गुरूला हे कधीच पटले नाही. तिचे म्हणणे, ‘‘जसा प्रत्येक शिष्येचा आवाज लगाव वेगळा, तशी तिची समज वेगळी. एखादीची मींड चांगली तर दुसरीची तान. जिचा जो ‘वीकनेस’ तिथे तिला जास्त मदतीची गरज. या सगळ्यांच्या गरजा एकत्रितपणे कशा फिटणार?’’

तिच्या म्हणण्यात तथ्य तर होतेच, परंतु प्रत्येकीचा हरएक ‘वीकनेस’ मिटवण्यामागे एक ‘सर्वे s पि सुखिन: संतु’ची कळकळ, त्यासाठी अपार कष्ट करण्याची तयारीही होती. कुणाला आवाजाची देणगी खूप चांगली पण गाणे बुद्धीला समजत नाही. एखादीची समज खूप चांगली पण सतत सर्दीची तक्रार! आणखी कुणी खूप हुशार, आवाजही चांगला, पण करायला पाहिजे तेवढी मेहनत करत नाही, कुणी अद्वितीय गुणवत्तेचा आवाज लाभलेली, मेंदूही ‘हुशार’ मिळालेला, रियाजातही हार न जाणारी; पण मंचावर चढली, की अवसान घालवणारी! … अशी प्रत्येक शिष्येची कोणती ना कोणती काळजी घेऊन आईतली गुरु सदैव वावरत असे!

माझ्या काही गुरुभगिनींना माणिकताईंची आदरयुक्त भीती वाटे. स्वत: गायला बसते वेळेस श्रोत्यांमध्ये ऐकायला माणिकताई असल्या, तर त्यांना दडपण येत असे. कारण कोणतीही जागा गळ्यातून गेल्यावर जशी गुरूंकडून वाहवा येई, तशीच कोठे घसरले तर कपाळावर आठीही! गाणारीला समोर माणिकताई बसल्या असल्याचे आणि आपण जे करीत आहोत – करणार आहोत- त्याची पूर्ण जाण त्यांना असल्याचे दडपण येई. मला स्वत:ला मात्र समोर बसलेल्या आईच्या रूपात नेहमीच स्फूर्तिस्थान सापडत असे. ‘कार्यक्रम चांगला झाला’ असे कोणीही कितीही सांगितले, तरी जोपर्यंत आईकडून ऐकत नाही तोपर्यंत समाधान होत नसे. आणि असे आईकडून नेहमीच ऐकायला मिळे असे नाही. त्यातून स्पष्टवक्तेपणा तर असा, की ‘लोकांना आवडलंय तेवढं आपलं चांगलं झालंय या भ्रमात राहू नकोस बरं!’ असं खाडकन् सुनावणार! पण एकदा का आईची पसंती मिळाली, की कोणीही कितीही टीका केली, तरी तिची धार जाणवत नसे.

आईने आम्हाला संगीतविद्या तर दिलीच, पण रागविचार करायला शिकवला, लयविचार दाखवला, एखाद्या नवीन रागाला उलगडताना कशा तऱ्हेने प्रयत्न करावेत याची वाट दाखवली, मग तो राग तिच्या नेहमीच्या पठडीतला नसला तरीसुद्धा! महासागरात खोलखोल बुड्या मारून शिंपल्यातले मोती शोधावे तसे एखाद्या रागातील सारी स्वरवलये पिंजून त्याची बलस्थाने कशी शोधावी ते शिकवले. तो तर तिचा हातखंडा विषय! पण अभिजात संगीताचा रागविचार करतेवेळीच ठुमरी, दादरा, भजन व अभंग यांतही तिने आम्हाला आनंद व समाधान शोधायला शिकवले.

माझ्या आईने आधी शिष्या म्हणून आणि मग गुरू म्हणून अभिजात संगीताच्या क्षेत्रात अतुलनीय काम केले. तिच्या हयातीत ते तिला जाणवलेही नसेल, इतक्या सहजपणे केले. तिच्या या योगदानामुळे अभिजात संगीतातल्या पवित्र ‘गुरू शिष्य’ नात्याला एक अलौकिक परिमाण लाभल्याचे आम्हां सर्वांना जाणवले. तिच्या या गुरुऋणाची परतफेड आम्ही कशी करतो ते आता आमच्यावर अवलंबून आहे!