– संजीव खांडेकर

विसाव्या शतकातील साठचे दशक जगभर मोठा बहारीचा काळ होता. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात युवकांची नवनवी आंदोलने जन्माला येत होती. याचे पडसाद भारतात न उमटले तर नवलच. १९६०-७० या काळातील भारताच्या नव्या व संख्येने मोठ्या असलेल्या ‘आधुनिक’ तरुण वर्गाच्या अस्वस्थतेतून व संतापातून व्यवस्थेला नवे, अडचणीचे आणि भेदक प्रश्न विचारणार्‍या संघटनांचा, नव्या डाव्यांच्या आंदोलनांचा जन्म होत होता. याच काळात ज्या नव्या संघटना व नवे नेतृत्व निर्माण होत होते त्यातील महाराष्ट्रातील एक प्रमुख नाव म्हणजे कुमार सप्तर्षी व त्याच्या पुढाकाराने स्थापन झालेली ‘युवक क्रांती दल’ ही संघटना.

आज ‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या रूपाने देशातील रस्त्यावर उसळलेला जेनझी तरुण-तरुणींच्या उद्रेकाचा नवा बहर उदयाला येण्याच्या काळात कुमारचे निधन झाले आहे. कुमारची ऊर्जा, झपाटा, उरक आणि तो जे करीत होता त्यावरची निष्ठा प्रचंड अणि अखंड होती. ज्या नवचैतन्याच्या काळात त्याने आंदोलने केली, शंकराचार्यांचा सामना केला, मोर्चे काढले, लाठ्या खाल्ल्या, तुरुंगवास सोसला, प्रेम केले, प्रेमभंग पचवले, कठोर आत्मपरीक्षण केले, आत्मपीडनाला चळवळीचा शब्द दिला, लोहिया ते लेनिन, आणि आरएसएस ते गांधी असा अनोखा प्रवास केला, त्या काळातून तो जीवनाच्या कोणत्याच टप्प्यावर बाहेर पडायला तयार नव्हता. हे त्याचे सामर्थ्य होते आणि मर्यादाही. हा त्याचा कोष होता आणि फुलपाखरू बनण्याचे स्वप्नही या कोषातच होते.
‘संकल्प-सामाजिक चळवळीतील तरुणांच्या जाणिवांचा शोध’ या माझ्या १९८२ साली प्रकाशित झालेल्या पुस्तकातील त्याच्या लेखासाठी आमच्या अनेक भेटी व प्रदीर्घ चर्चा झाल्या. त्याची लिहिण्याची, सांगण्याची ताकद असामान्य होती. १५ वर्षांपूर्वी या पुस्तकाच्या दुसर्‍या आवृत्तीच्या निमित्ताने मी त्याच्या ‘मनोगता’चे वाचन केले तेव्हा मला त्याच्या ‘घडण्या’च्या काळात फ्रॉईिडअन ‘ऑडिपस कॉम्पलेक्स’चे पुसट व काही ठिकाणी ठळक दर्शन झाले. त्यात मुलाचा वडिलांच्या अधिकाराशी (लॉ ऑफ फादर) होणारा संघर्ष स्पष्ट दिसतो. कुमार आणि त्याच्या आई- वडिलांच्या नात्याचा छेद एका आर्थिक वादातून होतो. कुमारच्या म्हणण्याप्रमाणे वडील त्याला ‘तू आमची बुडलेली इन्व्हेस्टमेंट आहेस’ असे हिणवतात. त्यावर कुमार म्हणतो ‘मी उद्या अपघातात मेलो तर तुमच्या इन्व्हेस्टमेंटचे काय होईल?’ वडील त्याला सांगतात इन्व्हेस्टमेंट बुडेल, पण तुझ्यावरचा खर्च (ही) थांबेल.’

इथे या प्रतीकात्मक मृत्यू संवादाने तर त्यांच्यातील भावनिक व सांस्कृतिक, सामाजिक व राजकीय ‘पिता-पुत्र’ नातेसंबंधांचा अंत होतो. वडिलांच्या अधिकाराविरुद्ध बंड, मग ते गळ्यातले जानवे तोडणे असो वा घराचा पितृसत्ताक सुरक्षेचा त्याग करणे असो, झिझक म्हणतो तसा ‘बिग अदर’चा – आदरस्थानाचा, आयडिअल फादरचा र्‍हास, व्यवस्थेच्या ढोंगीपणाचा साक्षात्कार हीच बंडखोरीच्या प्रकटीकरणाची पहिली खिडकी असते. कुमारमध्ये ती खिडकी उघडून बाहेर पाहण्याचे धैर्य त्या काळात होते हे महत्त्वाचे.

गांधीवादी वडिलांचा बुरखा फाटणे आणि धर्म व अध्यात्माचे प्रतीक असणार्‍या शंकराचार्यांचे ढोंग-पितळ उघडे पडणे यातून भगव्या वेषाचे आणि धार्मिक आदरस्थानांचे आकर्षण व अधिकार कुमारच्या जीवनातून कसा हद्दपार झाला, याचे वर्णन त्याने मनोगतात केले आहे. त्यामुळे जैविक वा धार्मिक वडिलांऐवजी त्याने नेहरू, लोहिया आणि लेनिनमध्ये आपले ‘आदर्श पिता’ शोधण्याचा प्रयत्न कोवळ्या वयातच केला होता.

झिझेकने अनेकदा माणसे वैयक्तिक दु:खाचे इम्पर्सनल किंवा अवैयक्तिक ध्येयात कसे परिवर्तन करतात याबद्दल लिहिले आहे. कुमारच्या मनोगतात मला झिझेक स्पष्टपणे दिसला. तो लिहितो, ‘‘या भयापोटी माणसामध्ये वैयक्तिक पातळीवर गुंतण्याऐवजी अवैयक्तिक गोष्टीवर या काळात मी अधिक निष्ठा ठेवू लागलो. ध्येय, निष्ठा, कॉज, तत्त्वविचारसरणी या निर्गुण वस्तूंना अंतर्मनामध्ये पकडू लागलो. त्यात विलग होण्याचे भय नसते!’’

मैत्रिणीने दिलेला नकार आणि तुटलेले घर या वैयक्तिक आघातांना त्याने क्रांती या निर्गुण (ॲबस्ट्रॅक्ट) संकल्पनेत परावर्तित केले. झिझेकने वारंवार फ्रॉईिडअन ‘डेथ ड्राइव्ह’- स्वत:ची जुनी ओळख पूर्णपणे पुसून नवीन ओळख निर्माण करण्याची उमेद यावर लिहिले आहे. कुमारने लिहिले होते, ‘‘हॉस्पिटलमध्ये मानस रोगाची टर्म करताना शॉक ट्रिटमेंट शिकलो होतो. शॉक ट्रिटमेंट म्हणजे डेथ एक्सपिरियन्स. मृत्यूचा अनुभव. मनाची नव्याने उभारणी करायची असेल तर असा अनुभव आवश्यकच. आपला मृत्यू झालाय अशी कल्पना करून पुर्नजन्म झालाय असे मानून नव्या संस्कृतीचे मन तयार करायचे!’’

कुमारने स्वत:च्या डिप्रेशन आणि ‘देवदास कॉम्प्लेक्स’ आत्मपीडनाला मानसिक मृत्यू अनुभवातून नेले आणि दु:खाचे रूपांतर प्रस्थापित विरोधी संघर्षात केले. तो लिहितो, ‘‘कोणतेही रुटीन हे बोअरडमच असते…या निर्णयानंतर प्रत्येक उगवणारा दिवस नवा असतो. सडलेल्या समाजाच्या प्रस्थापिताचा भाग असणे म्हणजे बोच असलेले टोचणी लागलेले जीवन जगावे लागणे… आता नैतिक पेच नसलेले जीवन जगता येते’’

कुमार भाबडा होता, होता हे खरेच, पण त्याच्यात एक असाधारण चुंबक शक्ती होती. तरुण- तरुणी त्याच्या बोलण्या- चालण्यावर वेड्यासारखे फिदा असत. एखाद्या रॉकस्टारसारखा, वुडस्टॉक हिरोसारखा किंवा बिटल्सच्या गाण्यासारखा तो त्या काळात तरुणांच्या-तरुणींच्या गर्दीत लहरत असे. अरुण साधूंनी ‘पडघम’ हे नाटक लिहिले तेव्हा ते मला म्हणाले होते, ‘हा कोण सांप्रती आला, नवतारा अवचित उदयाला’ हे गाणे लिहिताना त्यांच्यासमोर जे काही चेहरे होते त्यातला एक महत्त्वाचा चेहरा कुमार सप्तर्षी होता.

१९६५ ते १९७५ या काळात महाराष्ट्रात चळवळीचे पेव फुटले होते. शहादा, दलित पॅन्थर ते युक्रांद, शिवसेना ते कामगार संघटना, डाव्या आणि उजव्या चळवळीतील तरुण प्रस्थापितांना प्रश्न विचारत होते. कुमार सप्तर्षी अशा काळातला तारा होता.

या काळातच लिटिल मॅगेझिन चळवळ, विद्रोही रॅडिकल रंगमंच, प्रायोगिक दृश्य कलांचा उदय, स्त्रीवादी चळवळी, मार्क्स, आंबेडकर, फुले, फॉईड, डार्विन यांचे पुनर्वाचन अशा अनेक घटनांनी सामाजिक विश्व पुरते ढवळून निघाले होते. असे क्षण इतिहासात दुर्मीळ असतात. कलात्मक, साहित्यिक आणि सांस्कृतिक विश्वातील प्रायोगिक व टीकात्मक किंवा आंतरविरोधी घडामोडींनी प्रस्थापित व्यवस्थेला सुरुंग लावणे आणि या सुरुंगातील दारू राजकीय विचारांनी त्यांच्या आचरणात उतरवण्यासाठी सांस्कृतिक व्यासपीठांशी संवाद साधून एक परिपूर्ण विश्वाच्या निर्मितीसाठी नव्या समाजमनाच्या बांधणीसाठी प्रयत्न करणे हा त्या काळातील व्यवच्छेदक क्षण होता. कुमार सप्तर्षी अशा क्षणाच्या प्रवासातील भागीदार होता. म्हणून त्याचे जाणे संपन्न भूतकाळाच्या पुस्तकातील एक महत्त्वाचे पान हरवण्यासारखे आहे.

चळवळींचा एनजीओपर्यंतचा प्रवास आणि नंतर त्या प्रस्थापित व्यवस्थेचा भाग बनणे हा कुमारचा गेल्या काही वर्षांतला दुखरा, सलणारा आणि छळणारा कोपरा होता. ‘सत्याग्रही’ या त्याच्या मासिकाच्या सुरुवातीच्या काही वर्षांत बोलताना मला ते स्पष्ट जाणवले होते. म्हणूनच कुमारने ‘जंतर-मंतर’ पाहायला हवे होते, असे मला प्रकर्षाने वाटत आहे. सगळीकडून अंधारून आले असताना गर्भातच चक्रव्यूहाचे ज्ञान झालेले अभिमन्यू व त्यांचे व्यूह तोडण्याचे कसब त्याने पाहायला हवे होते. काव्य, नाट्य, संगीत आणि चित्रकला यातील नवनवीन प्रयोग पोलीस बळाच्या रानटी आणि पाशवी ताकदीसमोरच कसे फुलत आहेत हे त्याने पाहायला हवे होते. राजकारणाची चौकट तोडून समाजातील अंगार आणि दु:ख यांना बदलाच्या रस्त्यावर आणण्यासाठी होणारे प्रयत्न, तेही विशीतिशीतील मुला-मुलींकडून, कोणतेही जड, अवघड, कोरड्या भाषेतील सिद्धान्त मांडण्याचा आव न आणता रॅप आणि र्ि‍हदमवर बदलाची नवी भाषा आणि गणिते कशी मांडली जात आहेत हे कुमारने पाहायला हवे होते. त्यांचा संताप आणि त्या संतापाचे त्यांनी टोकदार विनोदात केलेले रूपांतर त्याने पाहायला हवे होते. या तरुणांच्या डोळ्यातील निर्लेपता, चमक आणि भीतीचा नसलेला लवलेश त्याने पाहायला हवा होता. ‘निर्भय बनो’ हा गांधींचा संदेश पिझ्झा किंवा सॅन्डवीच खात खात कसा पसरवता येतो या ‘सत्याग्रहा’च्या नव्या पैलूने त्याला नक्कीच उभारी दिली असती आणि कदाचित नकार दिलेल्या प्रेयसीला ‘जेवण झालं का?’ असा व्हिडीओ कॉल करून, त्याचे रील बनवून ‘आजादी, इस्तिफा, दंडा, फंडा, हंडा…’ अशा गाण्यांच्या रॅपवर नाचणारा कुमार आपल्याला दिसला असता. किंवा कदाचित जंतर-मंतरवरील एखादे पोस्टर, लाठीने जखमी झालेल्या तरुणीची वेदना, कुणा तरुणाच्या फुटलेल्या डोक्यातून वाहणार्‍या रक्ताचा थेंब किंवा झुरळाचा मास्क घातलेला जत्था हीच त्याच्यासाठी श्रद्धांजली असू शकेल? की रशियाने अवकाशात पाठवलेल्या पहिल्या झुरळाचे ‘नादेझ्दा, नादेझ्दा…’ हे नाव उच्चारत कुमारचा आत्मा नादेझ्दा म्हणजे (रशियन भाषेत) ‘होप… आशा’ असा व्हॉट्सॲप मेसेज पुन्हा पुन्हा टाइप करत असेल?

sanjeev.khandekar@gmail.com