आदरणीय तात्यासाहेब,
आपणास जयंतीनिमित्त प्रथम विनम्रतापूर्वक अभिवादन !
ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कुसुमाग्रज तथा वि. वा. शिरवाडकर म्हणजे तुम्ही हे मराठी साहित्य विश्वाला लाभलेलं प्रतिभावंत अनमोल रत्न. तुमचे उत्तुंग व्यक्तिमत्व म्हणजेच मराठी मनाचा मानबिंदूच. आपण मराठी साहित्य क्षेत्राला फक्त समृद्ध, संपन्नच केले नाही तर मराठी ही राजभाषा, ज्ञानभाषा व्हावी यासाठी मोठे योगदान दिले. आपल्या संघर्षाला, योगदानाला आणि दर्जेदार कलाकृतींना अभिवादन करण्यासाठी तसेच मातृभाषेचा गौरव म्हणून २१ जानेवारी २०१३ रोजी महाराष्ट्र शासनाने २७ फेब्रुवारी हा आपला जन्म दिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा करायचा निर्णय घेतला. पण तात्यासाहेब, आम्हांला ‘मराठी भाषा गौरव दिन’ (२७ फेब्रुवारी) आणि ‘मराठी राजभाषा दिन’ (१ मे) यामधला फरकच समजत नाही.
तात्यासाहेब, १ मे १९६० मध्ये महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी महाराष्ट्राची अधिकृत ‘राजभाषा मराठी’ असल्याचा शासकीय आदेश जारी केला, मराठी लोकांसाठी व अधिकाऱ्यांसाठी ‘राजभाषा परिचय’ पुस्तकही प्रकाशित केले. तरी, महाराष्ट्रातील मराठी भाषेची दुरावस्था पाहून आपण व्यथित होऊन ‘महाराष्ट्राच्या राजधानीत मंत्रालयासमोर मराठी भाषा डोक्यावर राजमान्यतेचा सोनेरी मुकूट घालून उभी आहे, परंतु तिच्या अंगावरची वस्रे फाटली आहेत’ हे मनातील शल्य व्यक्त करता. त्यातून मराठी भाषेविषयीचे आपले प्रेम, आत्मीयता, जिव्हाळा, तळमळ दिसून येते. पण, मराठीच्या नावाने सोयीचे राजकारण करणारे, गळे काढणारे राजकारणी आणि साहित्यिकांनी ते गांभीर्याने कधी घेतलेच नाही. महाराष्ट्राची राजभाषा राजमान्य व लोकमान्य होण्याऐवजी शैक्षणिक, शासकीय, दैनंदिन व्यवहार तसेच सार्वजनिक क्षेत्रातून तिचे स्थान कमी होत गेले. मराठीचे स्वतःचे राज्य असावे, मराठीला राजभाषेचा दर्जा मिळावा म्हणून आपल्यासह अनेकांनी संघर्ष केला, धडपड केली. पण, अमृताते पैजा जिंकणारी आपली मातृभाषा आज महाराष्ट्राच्या राजधानीतच परकी व पोरकी बनत चालली आहे. साहित्य संमेलनांमध्ये कौतुकाची मलमपट्टी आणि कागदावर मराठी भाषा पंधरवडा साजरा करून किंवा गौरव गीते गाऊन मराठी भाषेला काय संजीवनी मिळणार आहे ?
तात्यासाहेब, आधुनिकीकरण, जागतिकीकरण आणि पाश्चिमात्य संस्कृती प्रवाह, संपर्क व दळणवळणाची वेगवान साधने, स्पर्धेत पुढे जायचे असेल, टिकून राहायचे असेल, उज्वल भविष्यासाठी, प्रगतीसाठी, इलेक्ट्रोनिक माध्यमांचा प्रभाव, इंग्रजीचे वाढते महत्व, रोजगाराच्या संधी, परदेशागमन यासारख्या असंख्य कारणांमुळे लोकांचा इंग्रजी माध्यमांकडे कल वाढला आहे. त्यांना मराठी भाषा कनिष्ठ वाटू लागली. काहींना मराठीत बोलण्यापेक्षा इंग्रजीत संवाद साधणे प्रतिष्ठेचे वाटते. तर, काही मंडळी समोरची व्यक्ती अमराठी आहे म्हणून हिंदीत संवाद साधतात. मराठी कार्यक्रमात उपस्थित उच्चभ्रू अमराठी मंडळींमुळे हिंदी, इंग्रजीचा वापर होत असेल तर त्याला महाराष्ट्र धर्म म्हणायचा की लाचारी ? तसेच, राजकीय मंडळी इतरांना मुलांना मराठीतून शिक्षण देण्याचा सल्ला देतात. मात्र, त्यांची मुले इंग्रजी माध्यमांच्या इंटरनॅशनल शाळांमध्ये तसेच परदेशात शिक्षण घेत असतात. एवढंच नाही तर, मराठी साहित्य संमेलन आयोजित करणाऱ्या किती साहित्यिकांनी, आयोजकांनी आपल्या मुलांना, नातवंडांना मराठी माध्यमातून किंवा मराठी शाळांमधून शिक्षण दिले आहे ?
कित्येक मराठी लोकांनी मराठी माध्यमातून शिक्षण घेऊन अनेक क्षेत्रात यशाची शिखरे पादाक्रांत केली आहेत. रशिया, जपानसारख्या प्रगत देशांत तर त्यांचे सर्व शिक्षण त्यांच्या मातृभाषेतूनच चालते. जगाच्या कानाकोपऱ्यात त्यांचे विज्ञान, वैज्ञानिक व व्यापारी जात असतात; पण त्यांचे कुठेच अडत नाही. मराठी भाषिक लोकांचा निरुत्साह व राजकीय अनास्थेमुळे मराठी शाळांची पातळी घसरत असतांना, विद्यार्थी संख्या घटत असतांना, मराठी शाळा बंद, ओस पडत असतांना शासनाच्या, महापालिकेच्या माध्यमातून उपाययोजना आणि शैक्षणिक दर्जा, गुणवत्ता सुधारण्यासाठी, संवर्धनासाठी कोणतेच प्रयत्न, संकल्प, धोरणे राबविली का जात नाहीत ? उलट शिक्षण क्षेत्र कार्पोरेट कंपन्यांना खुले करण्यात आले असून शिक्षणाचे खाजगीकरण, बाजारीकरण करण्यात येत आहे. हजारो मराठी शाळा बंद होणार असतील तर, मराठी भाषेच्या अस्तित्वालाच मोठा धोका निर्माण झाला नाही का ? कारण, त्यातून दिले जाणारे शिक्षण हे मराठीच असते याचा सर्वांना विसरच पडल्याचे दिसत आहे. हिंदी, इंग्रजी भाषेचा व्देष नाही पण, मायमराठीचा होत चाललेला ऱ्हास क्लेशदायक आहे.
ज्या मराठी भाषेने साहित्य क्षेत्राला समृद्ध, संपन्न केले ती मराठी ज्या राज्याची राजभाषा आहे, त्या राज्याच्या स्थापनेच्या अर्धशतकानंतरही त्याच्या राजभाषेची अधोगतीच होत असेल तर, चिंता आणि चिंतन करत बसण्यापेक्षा संवाद, व्यवहार, शिक्षण, शासकीय व निमशासकीय कारभार, राज्यकारभार, न्याय व्यवस्था, ज्ञान, कला, विज्ञान, तंत्रज्ञान, बँका तसेच इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी हा विषय आणि वापर बंधनकारक नाही तर सक्तीचा केलाच पाहिजे. कारण, राज्यघटनेच्या आठव्या परिशिष्टात समाविष्ट केलेल्या २२ भाषांपैकी मराठी ही महत्वाची भाषा आहे, पण तरीही शिक्षण व्यवस्था, भाषा संचालनालय आणि शासन व्यवस्था मराठीकडे फार गांभीर्याने पाहत नाही. त्यामुळे सर्वच क्षेत्रात तिची गळचेपी होऊन तिला दुय्यम स्थान मिळाले आहे. कोणाकडेच मराठी भाषा विषयक सुसंगत धोरण आणि मानसिकता नाही. अमराठी व्यापारी आणि अधिकाऱ्यांनाही मराठीशी काहीही देणेघेणे नाही. त्यामुळे मराठी भाषेची अधोगती झाली आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला असला तरी शैक्षणिक, सार्वजनिक क्षेत्रात तिला अजिबात स्थान नाही हे वास्तव दुर्लक्षित करुन चालणार नाही. फक्त बोली भाषेपुरती ती टिकून राहिली हे उपयोगाचे नाही. त्यामुळे, भविष्यात मातृभाषा मराठी ही मृतभाषा होऊ नये एवढीच माफक अपेक्षा करुन इथेच थांबतो..
मराठी भाषा गौरव दिनाच्या तुम्हांलाही सदिच्छा
milind.kamble1873@gmail.com

