मधू मोहिते

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाराष्ट्रातील, विशेषत: सातपुडय़ाच्या परिसरातील चळवळीच्या संदर्भात दिवंगत कुमार शिराळकर यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि त्यांच्या कम्युनिस्टपणाचा एका समाजवादी साथीने घेतलेला वेध..

खांद्यावर कोंबून भरलेली झोळी, पँट घोटय़ाच्या वर गेलेली, रापलेल्या लोकांच्या जथ्यामध्ये अनवाणी पायांनी घोषणा देत – हात उंचावून तो त्यांना चेतवत होता. शहादा, नंदुरबार येथील शेकडो लोकांना घेऊन ४००-५०० किमी अंतर कापून तो मुंबईत दाखल होत होता. शेकडो मैल चालल्याचा शीण, ओढलेले घामट चेहरे, कपडय़ांना अनेक दिवस पाणी न लागल्यामुळे मातकटलेल्या भिल्ल आदिवासींना मजुरी, रेशन याबाबत न्याय मिळावा म्हणून तो त्यांच्या बरोबर १५-१६ दिवस पायपीट करीत त्यांना ‘विजय आपलाच आहे’ अशी चेतना देत होता. पोटात अन्न आहे-नाही, तहान भागली न भागली याची तमा न करता त्यांच्या हक्कांसाठी झपझप पावले टाकत असताना मी त्याला पाहिले आणि तेच चित्र माझ्या डोळय़ात कायमचे साठवले गेले. माझे हात आपसूक फुरफुरले. माझे शिक्षक हुसेन दलवाई यांच्या सांगण्यावरून लांबून येणाऱ्या मोर्चेकऱ्यांना अन्न पाकिटे वाटण्यासाठी मी आणि माझे सहकारी शाळेच्या गणवेशामध्ये आलो होतो. आम्ही ती वाटत असतानाच समोरून हा किमयागार येत होता. माझे मन त्याच्यात गुंतून गेले होते. शांतारामने हलविले नि मी भानावर येऊन विचारले, ‘हा अनवाणी पायांनी व घोषणा देणारा कोण ?’ उत्तर आले, ‘तो कुमार शिराळकर आहे!’

त्याची बातमी आली, की त्याच्या जगण्याचा संघर्ष संपला आहे ! सुन्न झालो, व्याकुळलोसुध्दा. परंतु हजारो-लाखो लोकांचा आत्मविश्वास जागविणारा, माझ्यात स्फुल्लिंग फुंकणारा कुमार धगधगता आहे. ज्यांच्यासाठी त्याने आवाज दिला, आयुष्य वेचले तो संघर्ष निरंतर आहे. कुमार अमर आहे !!

माझी ही आठवण ४८ वर्षांपूर्वीची आहे. त्याची ‘‘ऊठ वेडय़ा तोड बेडय़ा’’ ही पुस्तिका वाचली. हा संघर्ष अटळ आहे म्हणूनच तो लढला पाहिजे, हे त्याचे युवकांसाठीचे सहज सुलभ भाषेत असलेले आवाहन भिडणारे आहे. मी युवक क्रांती दलामध्ये सक्रिय होत होतो. ‘युक्रांद’मध्ये कुमार सप्तर्षीच्या नेतृत्वाचे आकर्षण होते. त्याचे भाषण व कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याची कला मोठी लोभस होती. खेडय़ापाडय़ातील गावगाडा त्याला उत्तम समजत होता. सर्वसामान्य माणसापासून ते कार्यकर्त्यांपर्यंत तो सत्याग्रह आणि संघर्ष यांचा मिलाप उत्तम गळी उतरवायचा. कार्यकर्ते त्याच्या प्रेमात होते. मलाही त्याच्या नेतृत्वाची भुरळ होती. तो आवडायचा. परंतु आणीबाणीनंतर ‘युक्रांद’बरखास्त करून ‘जनता पार्टीत’ विलीन व्हावे हा त्याचा प्रस्ताव अनेक युक्रांदियांनी नाकारला. याच काळात, कुमार शिराळकर आणि अनेक पूर्णवेळ कार्यकर्ते ‘श्रमिक संघटने’च्या रूपाने शहादा नंदुरबारमध्ये विचलित न होता काम करीत होते, याचे मला आकर्षण वाटत होते. कुमार सप्तर्षी यांनी जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर ‘युक्रांद’मध्ये दोन गट पडले. मी पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून काम सुरू केले होते. गिरणी कामगार सभेच्या वतीने स्वातंत्र्यसैनिक असलेले साथी प्रभाकर मोरे यांच्या नेतृत्वाखाली काम करीत होतो. मुंबईच्या चाळ संस्कृतीत राहणारे व पडक्या घरात आणि समाजवादी पक्षात राहून जॉर्ज फर्नाडिस यांच्या सोबत कामगार चळवळीत अग्रगण्य राहून काम करीत होते. गिरणगावातील संघर्ष व न्यायासाठी त्यांची निस्पृह धडाडी मी पाहात होतो, शिकत होतो. अशात डॉ. दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली १९८०चा प्रदीर्घ संप झाला. मुंबई ‘युक्रांद’मध्ये आम्ही कार्यकर्ते सक्रिय होतो. परंतु पुढे काय, म्हणून मी रायगड जिल्ह्यात सुधागड- खालापूर तालुक्यात काम सुरू केले. तेव्हाही कुमार शिराळकर माझ्या डोक्यात होता. वारंवार भेटी होत नव्हत्या तरीही तो पाय रोवून संघटन करीत असल्याचे मला भावत होते. कोणतीही प्रसिद्धी न करता तो सातत्याने संघटनात्मक काम करीत होता. म्हणून त्यांचे संघटन पाहावे व कुमारचा सहवास- सहभाग मिळावा म्हणून मी आणि दीपक नायनाक शहाद्याला गेलो होतो.

अंबरसिंग महाराज यांनी सुरू केलेला आदिवासींचा संघर्ष तेव्हा सुरू होता. त्याला ‘माणूस’सारख्या नियतकालिकांतून प्रसिद्धी मिळत होती. २ मे १९७१ रोजी धडगाव येथील विश्राम पाटील यांनी आदिवासींना दोन दोन पायली धान्य दिले. सुगीला परतफेडीची बोली होती, परंतु जगन्नाथ पाटील यांनी आपले धान्याचे कोठार लुटले अशी पोलीस तक्रार केली. म्हसावद गावात तेथील पाटील गुजर समाजाने आदिवासींना बेदम मारहाण केली. लक्कडकोट येथील सुरत्या जतन्या भिल या आदिवासीची गोळय़ा घालून हत्या केली गेली. तेव्हा अंबरसिंग महाराज यांनी महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांना ‘सातपुडा साद घालत आहे’ असे आवाहन केले. तेव्हा कुमार शिराळकर, दीनानाथ मनोहर, प्रकाश सामंत, विजय कान्हेरे, सुधीर बेडेकर, छाया दातार आदी अनेक कार्यकर्ते तिथे गेले आणि सातपुडा परिसर चळवळीचे केंद्र झाले. वाहरू सोनावणे, जयसिंग माळी, तुलसी परब, प्रदीप मोरे असे कितीतरी कार्यकर्ते गावागावांत चळवळ करीत होते. धनदांडगे श्रीमंत शेतकरी कार्यकर्त्यांना वेचून वेचून मारहाण करायचे. अशात कुमारवर प्राणघातक हल्ला झाला. तो त्यातून वाचला आणि पुन्हा कामाला लागला. कार्यकर्ते भूमिगत होऊन काम करीत होते. दहशतीचे वातावरण होते. शेतकऱ्यांची ‘पुरुषोत्तम सेना’ टपून पाठलाग करायची. अशा वातावरणात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांविषयी कौतुक व अभिमान वाटत होता. त्याला प्रत्यक्ष भेटून काम व संघटन पाहावे यासाठी आम्ही गेलो होतो.

श्रमिक संघटनेचे शहादा ऑफिस म्हणजे एक लांबट अशी खोली होती. चुलीवर अन्न शिजवायला दोन-चार काळपटलेली जर्मनची पातेली होती. दोऱ्या टांगून कपडे वाळवायची – ठेवायची सोय केलेली. टेबल खुच्र्या अशा नव्हत्याच. विक्रम कान्हेरे आणि तीन-चार कार्यकर्ते भेटले. कुमार आणि अन्य कार्यकर्त्यांना कसे भेटता येईल, ते असतील त्या गावांमध्ये जाता येईल का असे प्रश्न आम्ही केले. कुमारबरोबर फिरता येणे अवघड होते. तो कुठे आहे हे त्यांना सांगता येत नव्हते. थोडय़ा गप्पा झाल्यावर आम्हाला सांगण्यात आले की, परिसरातील वातावरण तंग आहे. आदिवासींच्या जमिनी व मजुरीसंबंधी संघर्ष अनेक गांवात सुरू आहे. त्यामुळे पुरुषोत्तम सेना व जमीनदार कार्यकर्त्यांना वेचून मारहाण करीत आहेत. मोकळेपणानं फिरणे अवघड आहे. हे ऐकून आम्ही थोडे हिरमुसलो. आम्हाला कुठे कसे जाता येईल असे विचारले असता प्रदीप मोरे या कार्यकर्त्यांबरोबर तुम्ही राहा असे सांगण्यात आले. माझा रंग आणि पेहराव लक्षात घेता मी शहरी दिसतो म्हणून आम्हाला डोक्यावरून घोंगडी घ्यायला सांगितले गेले. संध्याकाळी कुठच्या तरी गावात जायला निघायचे होते. हवेत संध्याकाळचा गारवा सुरू झाला होता, खांद्यावर झोळय़ा आणि अंगावर घोंगडी घेऊन निघालो. रात्रीचे आठ-नऊ झाले असतील. शेताच्या बांधावरून जात असताना लांबूनच फटफटीचा आवाज आला. प्रदीप सावध झाला आणि म्हणाला जमिनदारांचे रखवालदार बहुदा आले असावेत. समोरासमोर भेट झाली तर धोका आहे. तुम्ही काहीच बोलायचे नाही कारण तुम्हाला पावरी भाषा येत नाही. ते जवळ येताहेत असे लक्षात घेऊन एका मोठय़ाशा झुडपामागे आपण घोंगडी पांघरून लपू या. आम्ही तसेच केले आणि श्वास रोखून बसलो. झुडूप आठ दहा फूट उंच होते. थोडय़ाच वेळात ते तिथेच आले. मोटरसायकल उभी केली आणि त्यांच्या भाषेत ते काहीतरी बोलू लागले. आम्हाला भीती वाटली. प्रदीपने हात दाबून धीर द्यायचा प्रयत्न केला. थोडय़ा वेळाने ते निघून गेले. फटफटी लांबवर गेली असेल असे लक्षात घेऊन आम्ही उभे राहिलो. प्रदीप म्हणाला ते बांध फोडून उसाला पाणी द्यायला आले असतील.

मी सुधागड खालापूर तालुक्यात पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून काम करीत असताना एप्रिल १९८७ मध्ये माझ्यावर आणि शांताराम पंदेरेवर प्राणघातक हल्ला झाला. तेव्हा सर्व डाव्या संघटनांनी व नेत्यांनी सक्रिय पाठिंबा दिला होता. कुमार त्यामध्ये अग्रसेर होता. मी हॉस्पिटलमध्ये असताना तो दोन-तीन वेळा सभा घेण्यासाठी खालापूरला गेला होता. आमच्या घरी एक दिवस राहिल्यानंतर मी त्याला एखादा दिवस अजून राहा म्हणून सांगितले, तर त्याने त्याचा मनोमन घेतलेला निर्णय सांगितला. तो असा की कोणत्याही एका ठिकाणी तीन दिवसांपेक्षा जास्त थांबायचे नाही. संघटनेसाठी दुसऱ्या ठिकाणी गेले पाहिजे असा त्याचा दंडक होता. त्याचा हा दंडक आणि त्याचे वागणे, बंगाली प्रसिद्ध लेखक शरदचंद्र चटर्जी यांच्या ‘सव्यासाची’ (पाथेर दाबी) या कादंबरीतील क्रांतिकारी संन्यासी डॉक्टरची आठवण करून देणारे होते.

आम्ही युक्रांदमध्ये काम करीत असताना छोटय़ा संघटनेच्या खूप मर्यादा आहेत, असे आमच्या लक्षात आले होते. सर्व प्रश्न राजकीय आहेत आणि केवळ सर्वसामान्यांना राजकीय शिक्षण देऊन भागणार नाही, तर संसदीय राजकारणातून पर्याय द्यावा लागेल अशी आमची भावना झाली होती. कुमार आणि श्रमिक संघटनेतील कार्यकर्ते मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचा विचार करीत होते असे समजले. म्हणून आम्ही आठ-दहा कार्यकर्त्यांनी त्याची भेट घेतली. संघटनेच्या एखाद्या विभागातील कामाच्या मर्यादा असतात हे मान्य होत होते. मार्क्‍सवादी विचारांविषयी आकर्षण वाटत होते, परंतु कामगारांची अधिसत्ता (डिक्टेटरशिप ऑफ द प्रॉलेटारिएट) याविषयी समाजवादी परंपरेत खूपच विरोध होता. त्याचा परिणाम आमच्यावर होता. त्याबद्दल त्याच्याशी बोललो. ‘तुम्ही पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घ्याल तेव्हा कळव’ असेही त्याला म्हणालो. परंतु त्याने स्वतंत्रपणे निर्णय घेतला. आमच्या मनाला लागले. कदाचित आम्ही तेवढे परिपक्व नसू असे आम्हाला वाटले.

काळ बदलला तरी अन्याय अत्याचार आजही कायम आहेत. विकासाच्या परिभाषेत आधुनिकता दिसते, जग अधिक गतीने पळताना दिसते. दारिद्रय़ गुणांक हलकासा कमी झाला असेल परंतु शोषण व्यवस्था आणि तिचे पोशिंदे सगळय़ा गोष्टी अधिक खुबीने आपल्या कह्यात घेत आहेत. काल-परवा लाल बावटय़ाचे वारसदार म्हणून प्रिय वाटणारे देश जगाच्या वाटमारीत दोन पावले मागे तर नाहीच, उलट पुढेच जायचे अशा भूमिकेत आहेत. मागच्या ६०-७० वर्षांत जे विरोधक होते त्यांनीसुद्धा राज्यात आणि देशात सत्तेची फळे चाखली. त्यामुळे गरिबांसाठी किंवा दलित, अल्पसंख्याक यांच्यासाठी बोलणारे खरे कोण, हा प्रश्न अधांतरीच असताना कुमारने निरोप घेतला ही गोष्ट वेदनादायक आहे. कुमार मार्क्‍सवादी पक्षाच्या राज्याच्या व केंद्रीय कमिटीवर होता, चीनला भेट देणाऱ्या शिष्टमंडळात होता याची माहिती पुढे आली आहे. श्रमिकांच्या व दलित – अल्पसंख्याक यांच्या संघर्षांत कितीही आव्हाने असली तरी ती लिलया पेलण्याची ताकद कुमारकडे होती. तशीच जगाच्या व देशाच्या अर्थव्यवस्थेची त्याची जाणदेखील मोठी होती. ‘मागोवा’सारख्या मार्क्‍सवादी विचारांच्या परिवारात त्याची जडणघडण झाली होती. असा कुमार अनेक जनसंघटनांच्या परिवारातून मार्क्‍सवादी पक्षात प्रवेश करता झाला होता. रस्त्यावर उतरून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांशी त्याचे जिव्हाळय़ाचे संबंध होते. कुमार पक्षात असला तरी त्याच्याशी संवाद साधण्यास कोणत्याही जन संघटनेतील कार्यकर्त्यांना संकोच वाटत नव्हता. अशा कुमारचा मार्क्‍सवादी पक्षाने किती न्याय्य वापर करून घेतला हे समजून घ्यायला खरेतर आवडेल. कारण माझ्यासारख्यांना कुमारची उंची मोठी वाटत होती. त्यामुळे त्याच्या क्षमतेला न्याय मिळाला का, असा प्रश्न मला नेहमी पडतो.

महाराष्ट्राचे सामाजिक, आर्थिक जनजीवन त्याने जवळून पाहिले होते. जातीचा, शिक्षणाचा वारसा असतानासुध्दा किती डीक्लास होता येते याचे कुमार हे एक मूर्तिमंत उदाहरण आहे. अशा कॉम्रेडला अखेरचा लाल सलाम करताना सातपुडा परिसर गदगदला आणि माणसे ढसाढसा रडली. माझ्यासारख्यांच्या डोळय़ाच्या पापण्या ओलावल्या, मन जड झालेय. परंतु हा बेडय़ा तोडायला भाग पाडणारा संन्यासी कुमार शिराळकर आपल्या अंतिम श्वासापर्यंत सोबत करणार आहे हे निश्चित!

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Late kumar shiralkar personality of communism tribals justice ysh
First published on: 09-10-2022 at 00:02 IST