(दोन वेगळ्या पिढ्यांमध्ये आणि भिन्न सांस्कृतिक वातावरणात वाढलेले कलाकार एकाच मंचावर येतात तेव्हा त्यांच्यामध्ये होणार्या ‘कलाकेंद्रित’ गप्पा या विशेष ठरतात. नुकताच अशा दोन बासरीवादकांचा संवादयोग ‘लोकसत्ता गप्पा’ च्या नव्या पर्वात जुळून आला. आपल्या सुमधुर बासरीवादनातून सर्वांना परिचित असलेले पद्मश्री पंडित रोणू मजुमदार हे या नव्या पर्वातील गप्पाष्टकाचे मानकरी. त्यांची जडणघडण, कलेच्या सादरीकरणानिमित्त त्यांनी जगभर केलेला प्रवास आणि सांगीतिक क्षेत्रातील प्रतिभावंतांचा त्यांना लाभलेला सहवास अशा त्यांच्या जीवनातील विविध पैलूंवर त्यांना बोलते केले प्रसिद्ध बासरीवादक अमर ओक यांनी. ओक स्वत: एक गुणी आणि अभ्यासू बासरीवादक म्हणून प्रसिद्ध आहेत. ‘स्वरभाषा’ हा दोघांमधील दुवा साधत त्यांनी बासरीवादनातील बारकाव्यांसह पंडिजींची संगीत कलेवर असणारी आस्था आणि आध्यात्मिक विचारांची बैठक लक्षात घेऊन साधलेला संवाद उत्तरोत्तर रंगत गेला. पंडितजींनी गप्पांच्या ओघात बासरीवादनातून रसिकांना दिलेला स्वरानंद हे या गप्पांचे वैशिष्ट्य ठरले. संवादाची तसेच बासरीच्या स्वरांची सुरेख लय या दोन्हीही कलाकारांच्या संवादातून हळूहळू उलगडत गेली. अशा या स्वरमय गप्पांमधील पं. रोणू मजुमदार यांच्या प्रदीर्घ उत्तरांचा हा संपादित अंश…)
जगभरात सांगीतिक मुशाफिरी करत असताना मला एक गोष्ट पुन:पुन्हा जाणवत गेली ती म्हणजे, यशावर प्रेम करू नका. तुमचं प्रेम हे कलेच्या साधनेवर असायला हवं. तुमची साधना आणि सादरीकरण इतकं ताकदीचं असलं पाहिजे की, रसिकांनी तुम्हाला कार्यक्रमांची निमंत्रणं द्यायला हवीत. मला नेहमी वाटतं की कोणतीही कलाकृती ही परिपूर्ण नसते. प्रत्येक वेळेला आपल्या लक्षात येत जातं की आपण आत्ता जे सादर करतोय त्याहूनही अधिक उत्तम सादर करू शकतो. तुम्ही जितकं शिकत जाता तसं तुम्हाला कळत जातं की तुम्हाला अजून खूप काही शिकायचं आहे. म्हणजे असं होतं की अनेकदा कार्यक्रमानंतर रसिक तुमच्या सादरीकरणाची स्तुती करताना तुम्ही किती परिपूर्णतेने वाजवलं हे सांगतात. मात्र, तुम्हालाच माहीत असतं तुम्ही आज कुठे कुठे चुकला आहात आणि कुठल्या गोष्टीचा सराव करण्याची तुम्हाला अधिक गरज आहे.
बासरीवादनाचे सुरुवातीचे धडे मी अर्थातच माझ्या वडिलांकडे म्हणजेच भानू प्रसाद मजुमदार यांच्याकडे गिरवले. ते पंडित पन्नालाल घोष यांचे शिष्य होते. पुढे मी पंडित लक्ष्मणप्रसाद जयपूरवाले यांच्याकडून गायनाची तालीम घेतली. त्यावेळी मला गायनाहून अधिक वाजवण्यात रस आहे हे त्यांनी हेरलं असणार. माझ्या वाजविण्याच्या आवडीविषयी त्यांनी माझ्या वडिलांना सांगितलं आणि तुम्ही याला बासरीवादनाचेच शिक्षण द्या असं सुचवलं. मी बासरीवादनाची तालीम दिग्गज बासरीवादक विजय राघव राव यांच्याकडे घेतली. तसेच पुढे मला पंडित रविशंकर यांचंही मोलाचं मार्गदर्शन लाभलं. मला संगीत क्षेत्रातील अनेक प्रतिभावंतांचा सहवास लाभला. मला आठवतंय, अगदी १७ वर्षांचा असताना मी राहुलदेव बर्मन अर्थात पंचमदांकडे पहिलं गाणं रेकॉर्ड केलं होतं ते ‘लव्ह स्टोरी’ चित्रपटातील ‘तेरी याद आ रही हे’… या गाण्यात बासरीचा एक तुकडा मी सादर केला होता. १९९६ मध्ये मला पहिल्यांदा सवाई गंधर्व महोत्सवात माझी कला सादर करण्याची संधी मिळाली. आणि त्यामागे साक्षात स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी होते. विलेपार्ले येथे एका कार्यक्रमात त्यांचा सत्कार होणार होता. त्याच कार्यक्रमात त्यांनी माझं बासरीवादन ऐकलं आणि त्यानंतर मला सवाईमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. आतापर्यंत मी सात-आठ वेळा या महोत्सवात बासरीवादन केलं आहे. मात्र, भीमसेनजींमुळे पहिली संधी मिळाली होती, ही आठवण माझ्यासाठी खास आहे.
अनेकदा असं होतं की रागाची गाण्याच्या माध्यमातून येणारी अनुभूती वेगळी असते आणि बासरीच्या माध्यमातून येणारी वेगळी. उदाहरण द्यायचं झालं तर मी बिलासखानी रागाचं देईल. हा राग बासरीच्या माध्यमातून सादर करणं म्हणजे तलवारीच्या धारेवरून चालण्यासारखं आहे. त्यामुळे मी हा राग सादर करतो तेव्हा रसिकांना आधीच याविषयीची कल्पना देतो. कारण अनेकदा रसिकांकडून नकळत बासरीवादनाची तुलना गायनाशी केली जाते. हा राग बासरीवादनातून उत्तम रीतीने कसा सादर करता येईल यासाठी मी आजही मेहनत घेतो. बासरीवादन करताना सुरुवातीला फार रितेपण वाटतं. कारण वादन करताना श्वास हा फार महत्त्वाचा असतो. आणि म्हणूनच अनेकदा बासरीवादकांबरोबर साथसंगत करण्यासाठी त्यांची शैली माहीत असणारे कलाकार असतात. माझ्या साथीला माझा पट्टशिष्य असतो. त्यामुळे बासरीवादन करताना साथसंगत असणे फार गरजेची आहे, असं माझं मत आहे.
मी रेकॉर्डिंग आणि लाइव्ह कार्यक्रम खूप केले आहेत पण मी अधिक रमतो तो लाइव्ह कार्यक्रमातच. त्यातलं वेगळेपण म्हणजे तिथं ‘रिटेक’ नसतो. ती एक परीक्षाच असते आणि निकालही त्वरित लागतो. समोर रसिक तुम्हाला दिसत असतात. मला प्रयोग करायला खूप आवडतात. मी अगदी गाण्यापासून ते स्वरवाद्यांपर्यंत जुगलबंदीचे कार्यक्रमही केले आहेत. संगीत क्षेत्रातील अनेक कलाकारांबरोबर जुलगबंदीचे कार्यक्रम करण्याचा अनुभव मी घेतला आहे. यात बालमुरलीकृष्ण, जयतीर्थ मेवंडी, कुशल दास, बॉम्बे जयश्री, आरती अंकलीकर, अरुणा साईराम अशा अनेक कलाकारांचा समावेश आहे. मला असं वाटतं गाण्याबरोबर जुलगबंदी करणं फार अवघड आहे. बालमुरलीकृष्ण यांच्याबरोबरची जुलगबंदी माझ्यासाठी विशेष आहे.
पंडित रविशंकर यांच्याकडून मीअनेक गोष्टी शिकलो. त्यात लयीशी कसं खेळावं हे शिकायला मिळालं, जे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. लयकारी हा श्वासांचा खेळ आहे असं मला वाटतं. पंडितजींसोबत मी अनेक कार्यक्रमही केले. त्यांनतर त्यांच्या ‘चॅट्स ऑफ इंडिया’, ‘न्यू ऑफरिंग्स फ्रॉम पं. रविशंकर’ आणि ‘पॅसेजेस’ या अल्बममध्ये कला सादर करण्याची संधी मला मिळाली. एकदा मॉस्कोला एक कार्यक्रम होता. आणि तिथे सादरीकरण करताना घडलेला प्रसंग आजही माझ्या स्मरणात आहे. मींड आणि गमक या भारतीय शास्त्रीय संगीतातील अत्यंत महत्त्वाच्या अलंकारिक क्रिया आहेत. मात्र, पाश्चात्त्य संगीतकारांना त्यो जरा अवघड ठरतात. त्या कार्यक्रमात अशा जरा अवघड सादरीकरणानंतर तिथले संगीत संयोजक थोडे नाराज झाले आणि त्यांनी विचारलं की तुम्ही पाश्चात्त्य शास्त्रीय संगीतातील एक तुकडा सादर करून दाखवाल का ? पंडितजींनी मंचावर सगळ्यांना विचारलं, ‘कोण सादर करणार?’ ते सादर करणं भारतीय बासरीसाठी थोडं अवघड होतं. मी होकार दिला. पंडितजी म्हणाले, ‘मंचाच्या मधोमध येऊन सादर कर आणि दाखवून दे आपण कोणत्या देशातून आलो आहोत ते.’ मी सादरीकरण केलं आणि त्यांनतर मला रसिकांनी उभं राहून दाद दिली. ही त्यावेळी फार मोठी गोष्ट होती. पंडित रविशंकर यांच्या बरोबरच्या अनेक आठवणी आहेत. त्यांचा एक किस्सा सांगण्यासारखा आहे. एकदा एक पत्रकार त्यांची मुलाखत घेण्यासाठी आल्या होत्या. तेव्हा बोलताना त्या पंडितजींना म्हणाल्या की तुम्ही सतारवादनातील देवच आहात… त्यावर पंडितजी लगेच उत्तरले, ‘‘मग तुम्ही चुकीच्या ठिकाणी आलेल्या आहात. देवाकडून कधीच चुका होत नाहीत. मी देव नाही. माझ्याकडून कला सादर करताना असंख्य चुका होतात, कधी कधी मनासारखं वाजवलं जात नाही. तुम्ही मला सर्वोत्तम कलाकार म्हणू शकता. तो मी आहेच. पण मला देवत्व बहाल करू नका.’’ माझी संगीत साधना नित्य सुरू असते. मी सतत प्रयोग करण्यावर भर देत असतो. मला वाटतं आता कुठे माझा प्रवास सुरू झाला आहे. बासरीवादनाच्या
पुढच्या काही टप्प्यांवर मला पोहोचायचं आहे. अनेकदा इतकं सुंदर संगीत मी ऐकतो आणि मग मला असं वाटतं की हेच संगीत आपण बासरीच्या माध्यमातून सादर करायला हवं. सध्या मी राग शहाना बहारचा सराव करतो आहे. तो राग आपण कसा सादर करू शकतो यावर मी लक्ष केंद्रित केलं आहे. तुम्ही एखाद्या कलेच्या जितक्या खोलात जाता, तितकं तुम्हाला कळत जातं की आणखीन खूप काही शिकायचं आहे…सादर करायचं आहे…माझ्या मनात हीच भावना असते की,
मैं धुआँ बनके जहाँ से चला जाऊँगा,
मेरी बाँसुरी में मुझे ढूँढा करेगी दुनिया…
शब्दांकन- सिद्धार्थ म्हात्रे
