रघुनंदन भागवत
गुजरातमध्ये १९९८ पासून सलग २८ वर्षें भाजप सत्तेत आहे. त्या राज्यातील एखाद दुसरी नगरपालिका सोडली तर इतर सर्वत्र भाजपच सत्तेत आहे. अहमदाबाद महानगरपालिकेत तर भाजप १९८५ पासून सलग ४० वर्षें सत्तेत आहे. इतर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुद्धा भाजपचेच वर्चस्व आहे. वरील वस्तुस्थिती बघता कोणालाही असे वाटेल की गुजरातमध्ये विरोधी पक्ष ‘जिवंत’ तरी आहे का. हीच परिस्थिती महाराष्ट्रात येऊ लागली आहे का? असल्यास कशी? यासाठी गेल्या ३० वर्षात गुजरातमधील राजकारणाने जी कूस बदलली त्याचा थोडक्यात परामर्ष घेणे जरूर आहे.
१९९० पर्यंत, एक जनता पक्षाचा कालखंड सोडला तर गुजरातमध्ये काँग्रेसची एकहाती सत्ता होती. १९९५ मध्ये सर्वप्रथम भाजपने स्वबलावर सत्ता मिळवली. पण लगेचच भाजपला दुहीचे ग्रहण लागून त्यांची सत्ता गेली. शंकरसिंह वाघेला यांनी बंड पुकारले आणि स्वतःचा वेगळा पक्ष स्थापन करून काँग्रेसच्या साथीने सरकार बनवले. पण हे सरकार टिकले नाही. १९९८ मध्ये विधानसभेच्या मुदतपूर्व निवडणुका घ्याव्या लागल्या. भाजपने परत सत्ता मिळवली. केशुभाई पटेल यांचे सरकार स्थापन झाले पण भ्रष्टाचार व गुजरातमधील २००१च्या भीषण भूकंपानंतर पुनर्वसन करण्यात आलेल्या अपयशा मुळे केशुभाईंची उचलबांगडी झाली. अटल जीनी नरेंद्र मोदींना गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून नियुक्त केले. हाच गुजरातमधील टर्निंग पॉईंट ठरला. भुजचा भूकंप आणि गोधराकांडानंतरची दंगल या दोन्ही परिस्थिती हाताळून मोदी यांनी जनतेच्या मनात स्थान पक्के केले. मोदींनी २००२च्या अखेरीला मुदतपूर्व निवडणुकीचा जुगार खेळला. तो कमालीचा यशस्वी ठरला आणि मोदी स्पष्ट बहुमत मिळवून पुनः सत्तेत आले. त्यानंतर मोदींनी ‘गुजरातचे विकासपुरुष’ अशी प्रतिमा निर्माण करून २००७ व २०१२ या दोन्ही सलग निवडणुका जिंकल्या. २०१४ मध्ये मोदी पंतप्रधान झाल्यावर आनंदीबेन पटेल गुजरातच्या मुख्यमंत्री झाल्या. त्यांच्याच काळात गुजरातमधील प्रभावी पाटीदार समाजाचे आरक्षणासाठी आंदोलन झाले. हार्दिक पटेल नावाच्या २२ वर्षीय युवकाने या आंदोलनाचे नेतृत्व केले. हे आंदोलन शमवण्यात आनंदीबेन असफल ठरल्या. २०१७च्या निवडणुकांच्या सव्वा वर्ष अगोदर अचानक आनंदीबेनना पायउतार व्हावे लागले आणि विजय रूपाणी सारख्या सौम्य प्रकृतीच्या व अल्पसंख्य जैन समाजातील व्यक्तीला मुख्यमंत्री केले गेले.
विजय रूपाणी यांच्याच नेतृत्वाखाली २०१७ ची विधानसभा निवडणूक लढवली गेली. या निवडणुकीत काँग्रेसने चांगले आव्हान उभे केले होते. पाटीदार आंदोलनही ताजे होते. दोन्हीचा फटका भाजपला बसला व त्यांनी साधे बहुमत मिळवले पण प्रथमच त्यांचा आकडा १०० च्या खाली आला.
या झटक्यानंतर मात्र भाजपने काँग्रेसमधील प्रभावशाली व्यक्तींना भाजपमध्ये घेण्याचा सपाटा लावला. काँग्रेसचे तत्कालीन प्रमुख नेते चावडा यांनीच भाजपमध्ये प्रवेश केला. हार्दिक पटेलचा क्षत्रिय साथीदार कल्पेश ठाकोर याला भाजपमध्ये घेण्यात आले. सगळ्यात कडी म्हणजे पाटीदार आंदोलनाचा चेहरा असलेला हार्दिक पटेल काँग्रेसमधून भाजपमध्ये आला. ठाकोर व हार्दिक यांनी २०१७च्या निवडणुकीत भाजपला जेरीस आणले होते.
२०२०-२१ मध्ये आलेल्या कोविडच्या साथीमुळे व सामान्य जनतेला भोगाव्या लागलेल्या त्रासामुळे रूपाणी सरकारबद्दल जनतेच्या मनात रोष निर्माण होऊन आपल्याला २०२२च्या निवडणुकीत फटका बसू शकतो याचा अंदाज मोदी -शहांना वेळीच आला. त्यांनी संपूर्ण रूपाणी मंत्रिमंडळाला राजीनामा द्यायला सांगितले आणि भूपिंदर पटेल यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण नवीन मंत्रिमंडळ स्थापन केले. आधीच्या मंत्रिमंडळातील एकाही मंत्र्याला नवीन सरकारमध्ये स्थान दिले गेले नाही. या चालीचा जबरदस्त फायदा २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला झाला.
२०२२ मध्ये भाजप गुजरात विधानसभेच्या १८२ पैकी विक्रमी १५६ जागा जिंकून सलग पाचव्यांदा सत्तेत आला. काँग्रेसची धूळधाण उडाली . त्यांना फक्त १७ जागा मिळाल्या. याच निवडणुकीत आप पक्षाने गुजरातमध्ये चंचुप्रवेश करून ५ जागा जिंकल्या व काँग्रेसची बरीच मते खाल्ली. काँग्रेसने त्यानंतर इतकी हाय खाल्ली आहे की आता पक्षाचे गुजरातमधील संघटन पूर्ण मोडकळीस आले आहे. २०१४ व २०१९च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला गुजरातमधून एकही जागा मिळाली नव्हती. २०२४ च्या निवडणुकीत मात्र काँग्रेसला एक जागा मिळाली हीच काय ती एकमेव जमेची बाजू.अर्जुन मोडवाडिया हे काँग्रेसचे मुख्य नेते जे पोरबंदरमधून सतत निवडून येतात, त्यांनीसुद्धा आता भाजपमध्ये प्रवेश केला आहे व ते सध्या मंत्री आहेत. दरम्यानच्या काळात भाजप स्थानिक स्वराज्य संस्थांवरील आपली पकड सतत मजबूत करत गेला.
गेल्याच वर्षी भाजपने आणखी एक धक्का दिला. त्यांनी भूपिंदर पटेल यांना मुख्यमंत्रीपदी कायम ठेवून बाकी सर्व मंत्रीमंडळ बदलून टाकले आहे. आता २०२७च्या अखेरीस होऊ घातलेल्या निवडणुकीत प्रस्थापित विरोधी लाटेचा(अँटी इन्कबन्सी) फटका बसू नये म्हणून मोदी-शहांनी घेतलेली ही ‘प्रो ऍक्टिव्ह’ स्टेप म्हणावी लागेल. एवढेच नाही तर हर्ष संघवी नावाचे नवीन नेतृत्व भविष्याच्या दृष्टीने पुढे आणले आहे. जेमतेम चाळीशीतला हा नेता सध्या गुजरातचा उपमुख्यमंत्री व गृहमंत्री आहे.
सतत ३० वर्षें सत्तेत राहणे ही काही सोपी गोष्ट नाही. पण यासाठी भाजपने भाकरी करपू नये म्हणून ती योग्य वेळी फिरवण्याची दक्षता घेतली आहे हेच त्यांच्या यशाचे गमक मानावे लागेल.
एकूणच १९९८पासूनचा भाजपचा गुजरातमधील सत्तेचा प्रवास हा काही सहजसुलभ झालेला नाही हे वरील इतिहासावरून आपल्या लक्षात येईल. पण असंख्य खाचखळगे ओलांडून/टाळून पुढे जाण्याची कला मात्र त्यांनी आत्मसात केली आहे.
महाराष्ट्र भाजप हा गुजरात भाजपापेक्षा सध्या खूप मागे आहे. पण गुजरातसारखा लांबचा पल्ला गाठण्यासाठी त्यांच्या मार्गाने पुढे चालायला मात्र महाराष्ट्रात सुरुवात झाली आहे असे मानायला जागा आहे. याचे कारण म्हणजे २०१७ च्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप क्रमांक १ चा पक्ष होता. ते स्थान त्यांनी ९ वर्षांच्या दीर्घ काळानंतरही कायम ठेवले आहे. लागोपाठ तीन विधानसभा निवडणुकीत भाजपने १०० पेक्षा अधिक जागा मिळवल्या आहेत ही गोष्ट सुद्धा दुर्लक्षित करता येणार नाही. महाराष्ट्रात भाजपमध्ये इतर पक्षातून होणारे घाऊक पक्षप्रवेश हे गुजरातचेच अनुकरण आहे.
गुजरातमध्ये प्रादेशिक पक्ष नाही. तेथे भाजप -काँग्रेस अशी द्विपाक्षीय लढत आहे. महाराष्ट्रात मात्र भाजपसमोर काँग्रेसबरोबरच प्रादेशिक पक्षांचे आव्हान येत्या काही काळात तरी राहील असे वाटते.
आज ना उद्या महाराष्ट्रात ‘गुजरात पॅटर्न’ अस्तित्वात येईल अशी चिन्हे दाखवणारे महाराष्ट्रातील विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकातील निकाल आहेत हे मात्र नक्की.
रघुनंदन भागवत
raghunandan. bhagwat @gmail. Com
