कुंभमेळ्याच्या ‘शाही स्नाना’साठी प्रयागच्या त्रिवेणी संगमावर येत्या बुधवारी, २९ जानेवारी रोजी मौनी अमावस्येनिमित्त पुन्हा हजारो भाविक जमतील. ही परंपरा अनेक शतकांपासूनची आहे. कुंभमेळ्याचे लिखित संदर्भ ‘हर्षवर्धना’च्या काळात, प्रामुख्याने सातव्या शतकापासून मिळतात. पुढे आदी शंकराचार्यांनी त्यास धार्मिक अधिष्ठान प्राप्त करून दिले.
भारताच्या उत्तर भागातच, प्रमुख चार ठिकाणी कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. महाराष्ट्रातील दख्खनच्या पठारावरील ‘गोदावरी’ नदी, जी गंगा नदी नंतर भारतातील सगळ्यात मोठी नदी आहे! ही जर सीमारेषा मानली तर, तिच्या पलीकडील उत्तरेकडील भागात प्रामुख्याने ‘कुंभमेळा’ भरतो. गेल्या दशकभरात, भारतात माहिती-तंत्रज्ञानात वेगाने बदल होत असताना… ‘व्हॅाटस्ॲप’, ‘इन्स्टाग्राम’, ‘फेसबुक’, ‘एक्स’ (पूर्वीचे ‘ट्विटर’) या समाज माध्यमांचा वापर वाढला आहे. त्यामुळे हातातील ‘स्मार्टफोन’ मध्ये दिवसातील कोणत्याही वेळी सतत माहिती, चलचित्रे (व्हिडिओ) यांचा लोंढा येऊन आदळत असतो. हल्ली ‘कुंभमेळ्या’तील हवी ती ‘क्षणचित्रे’ घरबसल्या पाहायला मिळत आहेत. पूर्वी दूरदर्शन या सरकारी मालकीच्या प्रसार माध्यमाची मक्तेदारी असताना किंवा नंतर खासगी उपग्रह वाहिन्यांची संख्या वाढल्यानंतरही ‘कुंभमेळ्या’तील ‘इत्यंभूत’ माहिती-दृश्ये आपल्या पर्यंत पोहोचत होतीच असे नाही! त्यावर काही बंधने होती. ती बंधने आता समाजमाध्यमांचा वाढत्या वापरामुळे आणि प्रभावामुळे बऱ्यापैकी ‘सैल’ झाली आहेत.
उदाहरणार्थ, ‘नागा साधू’ हे कुंभमेळ्यातील आकर्षणाचे केंद्रबिंदू आणि कुतूहलाचा भाग ठरत. परंतु त्यांची कुंभमेळ्यातील महिन्याभरातील वास्तव्याची दैनंदिन माहिती, त्यांची जीवनशैली वगैरे बाबी देशात इतरत्र वास्तव्य असलेल्या जनतेपर्यंत किंवा देशाबाहेरील व्यक्तींपर्यंत सहज पोहोचण्यास मर्यादा होत्या. आता समाज माध्यमांतून हे सर्व विनाविलंब ‘सार्वजनिक‘ होत आहे. सध्या ‘प्रयागराज’ (पूर्वीचे अलाहाबाद) येथे भरलेला आणि पुढे दीड महिना सुरू राहणार असलेला कुंभमेळा (माघ-मेळा) यातही शैव, वैष्णव, नागा वगैरे संप्रदायाचे साधू-साध्वी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. परंतु त्यांच्या संदर्भात ‘व्हॅाटस्ॲप’, ‘इन्स्टाग्राम’, ‘फेसबुक’, ‘एक्स’ (पूर्वीचे ‘ट्विटर’) वगैरे समाज माध्यमातून प्रसारित करण्यात येणाऱ्या किंवा होणाऱ्या चित्रफिती पाहून कुतूहल, मनात गोंधळ होण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळेही असेल, पण कधीकधी कुंभमेळ्याची चलचित्रे समजमाध्यमांच्या उपभोक्त्यांकडून थट्टा-मस्करीचा विषय ठरत आहेत.
पण ‘वास्तव’ काय आहे?
तटस्थपणे पाहिले तर, आज ‘युनेस्को’च्या ‘जागतिक सांस्कृतिक वारसा’ म्हणून दर्जा लाभलेला कुंभमेळा हा ‘सामाजिक अभ्यासा’चा सुद्धा भाग आहे. ‘हिंदू’ जीवन पद्धती, त्यातील असंख्य प्रथा-परंपरा- रूढी-चालीरीती यांचा ‘संगम’ तिथे होतो. येथे शैव-वैष्णव संप्रदायातील संघर्ष जसा आहे तसेच येथे ‘तृतीयपंथीयां’नाही स्थान आहे. (एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस, भरलेल्या ‘कुंभमेळ्या‘त शैव- वैष्णव यांच्यात झालेला संघर्ष! त्यात हजारो सांधूंचा पडलेला बळी वगैरे बाबी आपल्याला माहीतच नसतात.) ‘हिंदू’ म्हणून ही ओळख शेकडो जाती-पोटजाती, पंथ, संप्रदाय यात सामावलेली आहे. प्रत्येकाची स्वतंत्र आणि वैशिष्ट्यपूर्ण प्रमुख प्रतीके, देव-देवता, उपासना पद्धती आहेत. महाराष्ट्रा पुरते बोलायचे झाले तरी महानुभाव, दत्त संप्रदाय, नाथपंथी किंवा भागवत धर्माची पताका हाती धरलेले ‘वारकरी’ संप्रदाय स्वतःला ‘हिंदू’ म्हणवून घेत असले तरी, आजही आपली ‘स्वतंत्र’ उपासना पद्धत, प्रतीके यांची ओळख राखून आहेत. ‘कुंभमेळ्या’त सहभागी नागा किंवा इतर संप्रदाय-आखाडे यातील साधू-साध्वी यांचे चित्र-विचित्र वेशभूषा केशभूषा, त्यातील भडकपणा, मिरवणुकीने त्यांचे येणे, त्यातील त्यांचे ‘नर्तन’-‘वर्तन’ लक्षवेधी आणि बहुचर्चित ठरते. पण याचाही एक ‘इतिहास’ आहे आणि तो आत्ताच्या या समाजमाध्यमी कोलाहलात जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
समाज-संस्कृतीच्या अभ्यासाअंती हे साधार स्पष्ट झाले आहे की, ‘हिंदू’ म्हणून विशिष्ट समूहाची ‘धार्मिक ओळख’ अस्तित्वात येण्यापूर्वीपासूनच, या समाज रचनेत उपासनेच्या अनेक प्रचलित पद्धती, ‘तंत्र’ अस्तित्वात होत्या! त्यांचे ‘तंत्र’ विषयक ‘तंत्रग्रंथ’ही अस्तित्वात होते. एकीकडे ‘बौद्ध’ आणि ‘जैन’ या धर्मांच्या प्रभावामुळे, त्यातही विशेषतः ‘बौद्ध’ धर्माच्या लोकप्रियतेमुळे, आपला धर्म लोकप्रिय खाण्यासाठी हिंदूंना आपल्या धर्माच्या ‘स्वरूपात’ आणि ‘आचारां’मध्ये सुधारणा, फेरफार करावे लागले. इंद्र आणि वरुण यांच्यासारखे वेदकालातील प्राचीन देव मागे पडले. यज्ञांचे स्तोम बरेच कमी झाले. अहिंसा, दान, तीर्थयात्रा आणि व्रतवैकल्ये यांना यज्ञांपेक्षा जास्त महत्त्व दिले गेले. ‘पुराणे’ लोकांना आवडू लागली! या सर्व बदलांची इतिहासकार, समाज-संस्कृतीच्या अभ्यासकांनी दखल घेतली आहे. ‘धर्म शास्त्राचा इतिहास’ सहा हजारांहून अधिक पानांमध्ये लिहिणारे महामहोपाध्याय पांडुरंग वामन काणे यांनी, ‘बुद्ध धर्मीय, जैन धर्मीय आणि हिंदू धर्मीय यांच्यातील तंत्र- तत्त्वज्ञानाचा थोडक्यात परिचय’ करून दिला आहे. ( पां. वा. काणेकृत धर्मशास्त्राचा इतिहास, सारांशरूप ग्रंथ, उत्तरार्ध, १९८०, पृष्ठ. ४०९-४३८). महामहोपाध्याय पां. वा. काणे यांच्या मते, ‘हिंदू धर्मीयांकडून बौद्ध आणि जैन धर्मीयांनी तंत्राचे ज्ञान संपादन केले’. ( पां. वा. काणेकृत धर्मशास्त्राचा इतिहास, सारांशरूप ग्रंथ, उत्तरार्ध, १९८०, पृष्ठ. ४१३).
हिंदू शाक्त पंथीयांच्या ‘तंत्रग्रंथां’मध्ये, ‘मुद्रा’ ( उदाहरणार्थ ‘कालीदेव”), ‘मद्य’, ‘मांस’, ‘मत्स्य’ आणि ‘मैथुन’ या पाच प्रकारांची महापूजा (पाच ‘म’-कार) तसेच ‘मंत्रमंडले’, ‘दक्षिण मार्ग’ आणि ‘वाममार्ग’, ‘जारणमारणा’दी क्रिया यांचे विवेचन केलेले असते. शाक्त पंथीयांच्या तंत्रात ‘शिव’ हा मुख्य पुरुष आणि ‘देवी’ ही मुख्य स्त्री असते.
‘दुर्गा’, ‘चामुंडा’, ‘भैरव’ आणि ‘भूतनाथ’ यांची उपासना करणाऱ्या (वामाचारी अगर वाममार्गी) हिंदूंमध्येही ‘चोळी मार्गी’ आणि ‘बीज मार्गी’ असे दोन पंथ असत. त्यांचा स्वामी दयानंदांनी निःसंदिग्ध शब्दांत धिक्कार केला आहे. (दुर्गा प्रसाद (संपादक), सत्यार्थ प्रकाश १९०८, पृष्ठ ३५४-३५५). दुसरीकडे ‘हीनयान’, ‘महायान’ पंथांच्या बौद्धांना कडक नीतीनियमांचे काटेकोर पालन करणे कठीण होऊ लागले. त्यामुळे त्या पंथाचे उपासक सुध्दा ‘वज्रयान’ या बौद्ध धर्मीयांच्या तिसऱ्या नव्या पंथाकडे आकृष्ट झाले!
‘वज्र’ या शब्दाचे ‘हिरा’, ‘इंद्राचे अस्त्र’ असे दोन प्रचलित अर्थ आहेतच. मात्र हिंदू धर्मीय शाक्तपंथीयांच्या तसेच बौद्ध धर्मीयांच्या ‘वज्रयान’ पंथीयांच्या भाषेत ‘वज्र’ म्हणजे, पुरुषाचे जननेंद्रिय असा अर्थ घेतला जातो. बौद्धांच्या ‘वज्रयान’ पंथाच्या ‘गुह्यसमाज तंत्रा’प्रमाणेच, हिंदूंच्या ‘शाक्त’पंथाने देखील, वर उल्लेख केलेल्या पाच ‘म’ कारांचा, थोडक्यात सुखोपभोगयुक्त योगाचा पुरस्कार केला. हिंदूंमधील वामाचारी पंथानुसार ‘साधक स्वैराचारण करत असताना, आपल्या आत्म्यामधील अहंकाराचा नाश करीत असतो’. तर दुसरीकडे हिंदू धर्मातीलच एक प्रवाह, (जो संख्येने ‘बहुसंख्य’ आहे) मात्र ‘मोक्ष’, ‘देव’, ‘स्वर्गप्राप्तीसाठी नामस्मरण’, भक्ती, सदाचारण, सदवर्तन, निर्मळपणा वगैरेंचा पुरस्कार करतो. ‘शाक्त गधडा जये देशी । तेथे राशी पापाच्या’ असे संत तुकारामांनी म्हटले आहे. (विष्णुबुवा जोग (संपादक), सार्थ श्री तुकारामाची गाथा, ७ वी आवृत्ती, १९९०, पृष्ठ ७१८-७२१) राजा प्रजा द्वाड देश । शाक्त वास करितो तो ।।१।। अधर्माचे उघड पीक । धर्म रंक ते गावी ।।२।।
न पिके भूमि कांपे भारे । मेघ वारे पितील ।। ३।। तुका म्हणे अवघी दु:खें । येती सुखें वस्तीला ।।४।। अशी दूषणे संत तुकारामांनी दिली तरी ‘शाक्तपंथ’ नष्ट झाला नाही. बौद्धांचा ‘वज्रयान’ पंथ आणि हिंदूचा ‘शाक्त’पंथ यांच्या शिकवणीची मूलतत्त्वे सारखीच होती. तरी ‘वज्रयान’ पंथाचा पुढे लोप झाला आणि दुसरा मात्र एकोणिसाव्या शतकातही टिकून राहिला! एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धाच्या अखेरच्या वर्षात लिहिलेल्या ‘शतपत्रा’मध्ये, ‘लोकहितवादी’ गोपाळ हरी देशमुख यांनी पुण्यातील शाक्तपंथीयांवर टीकेचे आसूड ओढले होते. नाशिक येथील पंडित अच्युतराव मोडक यांनी १८१५ मध्ये रचलेल्या ‘अवैदिक-धिक्कृति’ ग्रंथामध्ये पाच ‘म’- कारांची महापूजा करणाऱ्या शाक्तपंथीयांवर कोरडे ओढले होते.
महामहोपाध्याय पां. वा. काणे यांचा जन्म ७ मे १८८० रोजी रत्नागिरी जिल्ह्यात परशुराम क्षेत्री झाला. ‘धर्मशास्त्राचा इतिहास’ या विख्यात ग्रंथात महामहोपाध्याय काणे यांनी लिहिले आहे की,“ प्रस्तुत ग्रंथकाराच्या बालपणात त्या काळी अशा वार्ता प्रसृत झाल्या होत्या की, महाराष्ट्रातील काही शहरात चक्रपूजा करण्यात येत असे. काही मोठ्या पंडितांनी देखील असे वाटत असे की, त्यांची विद्वता त्यांना देवीच्या प्रसादाने प्राप्त झाली होती.” ( पां. वा. काणेकृत धर्मशास्त्राचा इतिहास, सारांशरूप ग्रंथ, उत्तरार्ध, १९८०, पृष्ठ. ४३०). ‘तांत्रिकां’ चे सिद्धान्त आणि आचार यांचा १४ व्या शतकातही बराच दुर्लौकिक झाला असल्यामुळे त्या शतकातल्या आचार्य सायण व माधव या बंधूंनी (तांत्रिक ग्रंथांची माहिती असूनही) रचलेल्या ‘सर्वदर्शन संग्रह’ या ग्रंथात या ‘तंत्रा’ विषयी एकही शब्द त्यांनी लिहिलेला नाही, या सद्य:स्थितीकडे महामहोपाध्याय काणे यांनी लक्ष वेधले आहे तसेच सायणाचार्य व माधवाचार्य या बंधूंनी केलेल्या अनुल्लेखाचे एक तऱ्हेने समर्थनच केले आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी ‘तंत्रमार्गा’चा आणि विशेषतः ‘शाक्तपंथा’चा निःसंदिग्ध शब्दात धिक्कार केलेला आढळतो (महाराष्ट्र शासन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर : रायटिंग्ज ॲण्ड स्पीचेस, खंड ४, रिडल्स इन हिंदुइझम, १९८७, पृष्ठ ११३-११६ आणि पृष्ठ १७७-१८२). परंतु बौद्ध धर्मीयांच्या ‘वज्रयान’ पंथाची आणि या पंथाच्या ‘प्रज्ञोपाय’, ‘गुह्यसमाज’, ‘साधनाला’ वगैरे तंत्रग्रंथांविषयी डॉ. आंबेडकरांना काहीच माहिती नव्हती असे कोणीही अभ्यासक म्हणणार नाही! याचा उल्लेख प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे डॉ.आंबेडकरांनी केलेला आढळत नाही. नागपूर येथील ‘बौद्ध धम्म दीक्षा सोहळ्या’त त्यांनी आपल्या लाखो अनुयायांना ज्या २२ प्रतिज्ञांचा उच्चार करावयास लावला, त्यातील काही प्रतिज्ञा, ‘मी दारू पिणार नाही. मी खोटे बोलणार नाही. मी व्यभिचार करणार नाही’ या आशयाच्या होत्या. आज ‘तंत्र’पद्धती अस्तित्वात आहेत का? हा वेगळा मुद्दा! कुंभमेळ्यातील काही साधू साधकांवर या ‘तंत्र’-‘पंथ’ यांचा प्रभाव अजूनही टिकून आहे का? हा सुद्धा अभ्यासाचा भाग.
सध्याच्या काळात हिंदू ‘धर्म’-‘संस्कृती’-‘समाज रचना’ यांना एका साच्यात ठोकून बसविण्याचे प्रयत्न उजव्या विचारसरणीच्या पाठिराख्यांकडून जोरकसपणे सुरू आहेत. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हिंदू धर्म-संस्कृती तसेच भारतातच स्थापन झालेल्या समकालीन इतर धर्मातील ‘तंत्र’ प्रवाहांचा ओळख करून देण्याचा उद्देश सदर लेखाचा आहे. हे विवेचन पुरेसे आहे, असा लेखकाचा मुळीच दावा नाही. अभ्यासकांनी यात जरूर भर घालावी. कारण विचार विश्वात अंतिम असे काही नसते!