वर्ल्ड एक्स्पोझिशन म्हणजे जत्रा, प्रदर्शनाच्या गावगन्न्यात पॅरिस १९०० आणि सेंट लुईस १९०४ या दोन्ही ऑलिम्पिक स्पर्धा हरवून गेल्या नि विस्मरणीय ठरल्या. त्यामुळे ऑलिम्पिकविषयी नागरिक आणि सरकारे पुरेशी गंभीर नाहीत आणि म्हणून या चळवळीचे काही खरे नाही अशी भीती तिचे प्रणेते पिअर द कुबर्ता यांना वाटू लागली होती. भविष्यात या असल्या प्रदर्शनांच्या काळात ‘फावल्या वेळातील मनोरंजन’ ही ऑलिम्पिकची ओळख प्रस्थापित होणे धोकादायक ठरेल याची जाणीव कुबर्ता आणि त्यांच्या सहकार्‍यांना एव्हाना झालेली होतीच. ऑलिम्पिकच्या माध्यमातून खेळातील निकोप स्पर्धा, शारीरिक तंदुरुस्ती आणि आंतरसांस्कृतिक मेळावे ही मूळ संकल्पना सातत्याने मागे पडत चालली होती. तिचे पुनरुज्जीवन आवश्यक होते. अन्यथा ऑलिम्पिक चळवळीचाच अकाली शेवट ठरलेला होता. ती संधी मिळाली लंडन ऑलिम्पिकच्या निमित्ताने.

अर्थात सर्वस्वी अनियोजित आणि अनपेक्षित प्रकारे. तरीदेखील, खेळांविषयी आत्मीयतेची संस्कृती आणि शिस्तबद्ध नियोजन या दोन गुणांच्या जोरावर ब्रिटिश सरकारने पहिलेवहिले लंडन ऑलिम्पिक यशस्वी करून दाखवले. परंतु मुळात ते त्यांनी आयोजित करायचेच नव्हते!

‘घुसखोर’ ऑलिम्पिक

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने १९०१मध्ये एक काहीसा विचित्र आणि अव्यवहार्य निर्णय घेतला होता. त्यानुसार, प्रत्येक ऑलिम्पिक स्पर्धेच्या मध्ये ऑलिम्पिकसारख्याच बहुविध खेळांच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा भरवण्याचे ठरले. यात एक मुख्य फरक असा की, अशा मुदतमध्य (इंटरकॅलेटेड ऑलिम्पिक) स्पर्धा केवळ ग्रीसमध्येच भरवल्या जाणार होत्या. ऑलिम्पिक स्पर्धा दर चार वर्षांनी होतात, तशा या स्पर्धाही दर चार वर्षांनी भरवल्या जाणार होत्या. सन १९०१मध्ये याबाबत निर्णय घेतला गेला, त्यावेळी १९००मध्ये पॅरिस येथे दुसरे ऑलिम्पिक झाले होते नि १९०४ मधील ऑलिम्पिक होऊ घातले होते. अथेन्समध्ये १८९६मध्ये पहिले आधुनिक ऑलिम्पिक झाले. त्यामुळे अशा स्पर्धा भरवण्याची अथेन्सची क्षमता असून यापुढेही सातत्याने ऑलिम्पिक स्पर्धा भरवण्यासाठी अथेन्सची ऑलिम्पिक समिती आग्रही होती. या मागणीला सर्वांत मोठा विरोध पिअर द कुबर्तांचा होता. त्यांना पहिले ऑलिम्पिक पॅरिसमध्येच भरवायचे होते. ते होऊ शकले नाही तेव्हा एका मर्यादेबाहेर अथेन्स आणि ग्रीसचे महत्त्व वाढू देणे त्यांना मान्य नव्हते. त्यांच्या दुर्दैवाने पॅरिस ऑलिम्पिकचे आयोजन करणार्‍या त्यांच्या देशवासियांनीच एक्स्पोझिशनला झुकते माप देऊन ऑलिम्पिकची मात्र अक्षरश: माती केली. तेव्हा तडजोड म्हणून ग्रीसला दर चार वर्षांनी ऑलिम्पिक स्पर्धा भरवू देण्याची परवानगी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीला द्यावी लागली. समितीच्या १९०१ मध्ये झालेल्या सहाव्या सत्रात इंटरकलेटेड ऑलिम्पिकला मंजुरी मिळाली. तातडीने म्हणजे १९०२ मध्ये असे ऑलिम्पिक भरवणे शक्य नव्हते. तेव्हा १९०६ मध्ये ते भरवायचे ठरले. त्या वर्षी अथेन्स १८९६ ला दहा वर्षेही पूर्ण होणार होती. ऑलिम्पिकच्या दृष्टीने ग्रीसचे महत्त्व आणि कुबर्तांच्या संकल्पनेतील क्रीडा मेळावा असे दोन्ही योग जुळून येत होते. मूळ ऑलिम्पिकला या घुसखोर ऑलिम्पिकचे ग्रहण हळूहळू लागत असल्याचे एव्हाना कुबर्ता आणि त्यांच्या सहकार्‍यांच्या लक्षात येऊ लागले होते. नंतरच्या काळात दोन घडामोडी त्यांची भीती खरी करणार्‍याच घडल्या.

रोम ते लंडन

अमेरिकेतील सेंट लुईस येथे १९०४मध्ये झालेले ऑलिम्पिक नियोजनशून्य कारभार आणि संयोजकांच्या अनास्थेच्या कसोटीवर पॅरिस १९०० वर कडी करणारे ठरले. सन १९०४ मध्येच लंडन येथे ऑलिम्पिक समितीची बैठक झाली. त्यावेळी १९०८मधील स्पर्धेसाठी रोम, बर्लिन, मिलान आणि लंडन या चार शहरांनी दावेदारी दाखल केली. पण रोमने बाजी मारली. दोन वर्षांनी म्हणजे १९०६मध्ये ७ एप्रिल रोजी इटलीत नेपल्समध्ये माउंट विसुव्हियस ज्वालामुखीचा उद्रेक झाला. नेपल्स शहरात या उद्रेकाने विध्वंस घडवला. या नैसर्गिक आपत्तीकडे निधी वळवावा लागल्यामुळे इटलीच्या सरकारने ऑलिम्पिक भरवण्याबाबत असमर्थता व्यक्त केली. खरे तर त्या घटनेच्या आधीपासूनच इटालियन सरकारला निधीची चणचण जाणवत होती असा उल्लेख आढळतो. माउंट विसुव्हियसचा उद्रेक हा ऑलिम्पिक भरवण्याच्या जबाबदारीतून मुक्त होण्यासाठी निमित्त ठरले इतकेच. त्याच महिन्यात तिकडे अथेन्समध्ये इंटरकलेटेड ऑलिम्पिकला सुरुवात झाली. त्या ऑलिम्पिकचे नियोजन पॅरिस आणि सेंट लुईसपेक्षा कितीतरी सरस होते. सर्व खेळाडूंची रीतसर नोंदणी वगैरे झाले. तेव्हा हवशे-नवशे नि ऐर्‍यागैर्‍यांना स्थान नव्हते. ऑलिम्पिकच्या इतिहासात पहिल्यांदाच उद्घाटन आणि समारोप समारंभांचे आयोजन करण्यात आले. खेळाडूंनी त्यांच्या देशांचे ध्वज घेऊन रुबाबात संचलन वगैरे केले. विजेत्या खेळाडूंसाठी राष्ट्रीय ध्वजवंदनादेखील पहिल्यांदाच देण्यात आली. एकीकडे ‘समांतर’ ऑलिम्पिक अशा रीतीने यशस्वी होत असताना, दुसरीकडे मूळ ऑलिम्पिकच्या आयोजनात सतराशे साठ विघ्ने येत होती किंवा ते भरवणार्‍या देशांमध्ये पुरेसे गांभीर्य दिसून येत नव्हते. अशा कोंडीग्रस्त वातावरणात पिअर द कुबर्ता यांनी ब्रिटनचा धावा केला. या खेळांदरम्यान त्यांनी ब्रिटनचे लॉर्ड डेसबरो यांची भेट घेतली नि ऑलिम्पिक आयोजनाबाबत त्यांना साकडे घातले. विल्यम हेन्री ग्रेनफेल तथा लॉर्ड डेसबरो म्हणजे एक वल्लीच. क्रिकेट, बोटरेसिंग, तलवारबाजी, टेनिस अशा विविध खेळांमध्ये त्यांनी नैपुण्य गाजवले. खेळण्याबरोबरच प्रशासनावरही त्यांची हुकूमत होती. कुबर्ता यांनी त्यांची अथेन्समध्ये भेट घेतली, त्यावेळीही डेसबरो तलवारबाजी स्पर्धेत सहभागी झाले होते नि जिंकलेही. ते ब्रिटनमधील यशस्वी आणि प्रभावशाली राजकारणी होते. सन १९०८मध्ये ऑलिम्पिकची जबाबदारी लंडन शहराने उचलावी अशी विनंती कुबर्ता यांनी लॉर्ड डेसबरो यांना केली. ती डेसबरोंनी मान्य केली. त्यावेळी ऑलिम्पिकसाठी अवघे १८ महिने शिल्लक राहिले होते. तरीदेखील तेवढ्या काळात डेसबरो आणि ब्रिटिश सरकारने आवश्यक त्या सुविधा उभ्या करून दाखवल्या आणि ऑलिम्पिकचे यशस्वी आयोजनही करून दाखवले.

अखेर एक आदर्श ऑलिम्पिक

त्या काळातील सर्वांत श्रीमंत आणि सर्वांत प्रभावशाली देशामध्ये ऑलिम्पिक भरवले जाणे हे त्या चळवळीसाठी अत्यावश्यक असे टॉनिक ठरले. शिवाय ब्रिटनच्या त्या काळी जगभर पसरलेल्या वसाहतींमध्येही ऑलिम्पिकची चर्चा अधिक व्यापक स्वरूपात झाली. तोपर्यंतच्या आणि नंतरच्याही ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये लंडन १९०८ ही स्पर्धा सर्वाधिक प्रदीर्घ काळाची ठरली. तसेच त्या स्पर्धेच्याही काळात अँग्लो-फ्रेंच एक्स्पोझिशन भरवले गेलेच. पण तोपर्यंत ऑलिम्पिकसाठी सर्वस्वी नकारात्मक ठरू लागलेल्या या दोन्ही घटकांचा झाकोळ मुख्य स्पर्धेवर कुठेच जाणवला नाही. कारण या स्पर्धेसाठी लंडनमध्ये सर्व पातळ्यांवर तयारी केली गेली नि सहकार्य मिळत गेले. ‘व्हाइट सिटी’ या ६८ हजार आसनी स्टेडियमची उभारणी खास ऑलिम्पिकसाठी करण्यात आली. एप्रिल ते ऑक्टोबर असे से सहा महिने ही स्पर्धा चालली. एकूण २२ देशांतील २ हजारांहून अधिक खेळाडूंनी भाग घेतला. शूटिंग ड्युएल ( गोळ्या मेणाच्या!), धावत्या हरणाची शिकार वगैरे विचित्र आणि अघोरी खेळ अंतर्भूत होते. परंतु जलतरणासाठी स्वतंत्र कृत्रिम तलाव असणे ही त्या काळातली नवलाई.

खेळाच्या आघाडीवर बरेच काही सुलभ घडून आले, तरी या स्पर्धांना ठसठशीत राजकीय किनार मात्र होतीच. अमेरिकी खेळाडू अनेक स्पर्धांमध्ये ब्रिटिश स्पर्धकांशी किंवा ब्रिटिश संयोजकांशी भांडत राहिले. प्रस्थापित महासत्तेविरुद्ध उदयोन्मुख महासत्तेतील वादाच्या ठिणग्या पडू लागल्याची ती चाहूल होती. ब्रिटनमध्ये राजाचे किंवा राणीचे कौतुक ठरलेले. अमेरिकनांना त्याचाच तिटकारा. या स्पर्धेत पहिल्यांदाच ध्वज घेऊन संचलन झाले. पण ब्रिटनचे राजे सातवे एडवर्ड यांच्यासमोर ध्वज झुकवण्यास अमेरिकी पथकाने नकार दिला. ‘हा ध्वज कुण्या मर्त्य मानवी राजासमोर झुकणारा नाही!’ असे बाणेदार उत्तर पथकप्रमुखाने दिल्याचे सांगितले जाते. फिनलंड त्या काळी रशियन साम्राज्याचा भाग होता. पण रशियाचा झेंडा घेऊन जाण्यास फिनिश पथकाने नकार दिला. अर्थात असे वाद तेव्हाही व्हायचे, आजही होतात. पण लंडन १९०८मधील नेटक्या आयोजनामुळे लंडनवासी आणि ब्रिटिशांनी ऑलिम्पिक चळवळीला नव्याने उभारी मिळाली ही बाब पिअर द कुबर्तांसारखी स्वाभिमानी असामीही नाकारू शकली नाही.