डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली चवदार तळे सत्याग्रहाचे शताब्दी वर्ष सुरू झाले आहे. त्या अनुषंगाने चवदार तळे सत्याग्रहासंदर्भात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची त्या वेळची (१९२७ सालची) भूमिका, ‘सत्याग्रहा’चे हत्यार ज्यांनी रुळवले ते महात्मा गांधी आणि ‘डॉ.आंबेडकर यांची महाडच्या सत्याग्रहाची चळवळ ही आम्हांस दोषार्ह वाटत नाही’ असे म्हणून अस्पृश्यता आणि जातिअंत यांविषयी मते मांडणारे स्वा. सावरकर यांच्या भूमिका वरकरणी एकसारख्या वाटल्या तरी भिन्न कशा ठरतात (जे इतिहासाच्या ओघात सिद्धही झाले) याची चिकित्सा मूळ अवतरणांसह करणे हा या लिखाणाचा उद्देश आहे.
सत्याग्रहाचे तंत्र महात्मा गांधींनी प्रथम आफ्रिकेत विकसित केले आणि नंतर भारतात खिलाफत व असहकार ही जनआंदोलने संघटित करताना त्याच (सत्याग्रह) तंत्राचा मोठ्या प्रमाणात वापर केला. डॉ. आंबेडकरांनी ज्या सत्याग्रहांचे नेतृत्व केले ते मुख्यतः व मूलतः स्वकीयां विरूध्दचे सत्याग्रह होते. महात्मा गांधींनी संघटित केलेली सत्याग्रह आंदोलने परकीय राज्यकर्त्यांच्या विरोधात होती.
याउलट, भारतातील सामाजिक प्रश्न सोडविण्यासाठी म.गांधीजींचे सत्याग्रहाचे तंत्र वापरण्याचा डॉ. आंबेडकर केलेला प्रयोग अभिनव आणि महत्त्वाचा होता. महाडच्या सत्याग्रह परिषदेच्या मंडपात फक्त म. गांधीजींचीच तसबीर परिषदेच्या मंडपात लावण्यात आली होती. म.गांधींची तसबीर, मिरवणुकीत केलेला गांधीजींचा जयजयकार यावरून सत्याग्रह संकल्पना राबवताना डॉ. आंबेडकरांनी म.गांधीचे महत्त्व अधोरेखित केले होते!
महाडच्या सत्याग्रहात भाग घेणाऱ्यांमध्ये गंगाधर नीळकंठ सहस्रबुद्धे, अनंतराव चित्रे, सुरबानाना टिपणीस, शांताराम पोतनीस, द.वि. प्रधान आणि भा.वि.प्रधान (हे दोन्ही प्रधान बंधू) ह्या ब्राह्मण समाजातील मान्यवरांचा सक्रिय सहभाग होता. केशवराव जेधे, दिनकरराव जवळकर, वा.न.घोरपडे ह्या ब्राह्मणेतर पक्षाच्या नेत्यांनी पाठिंबा दिला होता.
दोन सत्याग्रहांतला फरक
सत्याग्रहाची म.गांधीजींनी केलेली व्याख्या आणि डॉ.आंबेडकरांनी केलेली व्याख्या यामधील फरकही लक्षात घेणे गरजेचे आहे.
सत्याग्रह आणि निःशस्त्र प्रतिकार ( Passive Resistance) यामध्ये दोन ध्रुवाइतके अंतर असून म.गांधीजींच्या मते निःशस्त्र प्रतिकार म्हणजे दुबळ्यांच्या हातातील शस्त्र आहे. आपले साध्य गाठण्यासाठी निःशस्त्र प्रतिकारात हिंसा किंवा शारीरिक बळाचा वापर वर्ज्य नसतो. याउलट सत्याग्रह म्हणजे आत्मबल. हे सर्वात सामर्थ्यशाली माणसांचे शस्त्र कोणत्याही प्रकारे हिंसेचा उपयोग करणे म.गांधीजींचा सत्याग्रही निषिद्ध समजतो. ( श्री मन्नारायण (संपादक), द सिलेक्टेड वर्क्स ॲाफ महात्मा गांधी, खंड ६, पृष्ठ १७९)
‘याउलट जेथे समभाव आहे तेथे सत्कार्य आहे आणि अशा कार्याविषयी जो आग्रह तो सत्याग्रह’ अशी व्याख्या डॉ. आंबेडकरांनी केलेली आहे. सत्याग्रह हाच ‘गीते‘चा मुख्य प्रतिपाद्य विषय आहे असे ठाम मत व्यक्त करून आपण सत्याग्रहाची व्याख्या ‘गीते‘ वरून घेतली आहे असेही डॉ. आंबेडकरांनी प्रतिपादन केले आहे. ( बहिष्कृत भारत, २५ नोव्हेंबर १९२७) महाड चवदार तळे सत्याग्रहास म. गांधीजींनी लगेच पाठिंबा दिला नाही. इंग्रज राज्यकर्त्यां विरूध्द गांधीजींनी वापरलेले सत्याग्रहाचे शस्त्र अस्पृश्यांनी वापरले तर त्यात काय चुकले? या प्रश्नाला म. गांधीजींनी दिलेले उत्तर डॉ.आंबेडकरांना समाधानकारक वाटले नाही. अस्पृश्यता म्हणजे स्पृश्यांनी केलेले पाप असे म.गांधींजींचे मत असल्यामुळे त्याबद्दलचे प्रायश्चित्त स्पृश्यांनी घ्यावे आणि या प्रश्नावर सत्याग्रह करावयाचा अधिकारही स्पृश्यांनाच आहे, असे गांधीजींचे म्हणणे होते. त्यावर, ‘साम्राज्यवाद’ हेही ब्रिटिशांचे पाप असल्यामुळे त्याबद्दल प्रायश्चित्तही ब्रिटिशांनीच घ्यावे आणि साम्राज्यवादा विरूध्द सत्याग्रह करण्याचा अधिकारही भारतीयांना नसून तो ब्रिटिशांनाच आहे, असे म्हणणे गांधीजींच्या तर्कशास्त्रा प्रमाणे बरोबर ठरेल अशी टीका डॉ. आंबेडकरांनी केली.
सावरकरांची भूमिका
महाड चवदार तळे सत्याग्रहाची पूर्वतयारी सुरू असताना तेव्हा रत्नागिरील स्थानबद्ध असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्यांचे धाकटे बंधू डॉ. नारायणराव यांच्या ‘श्रध्दानंद‘ पत्राच्या १ सप्टेंबर १९२७ च्या अंकात एक लेख प्रसिद्ध केला. ‘डॉ.आंबेडकर यांची महाडच्या सत्याग्रहाची चळवळ ही आम्हांस दोषार्ह वाटत नाही. तसेच ह्यात काही अतिरेक होत असेल तर तो डॉ.आंबेडकरांच्या सत्याग्रह मंडळाकडून नसून तो महाडच्या धर्मविमूढ स्पृश्यांकडून होय. हिंदु धर्मावरील अस्पृश्यतेचा कलंक वेळ पडली तर आम्ही आपल्या रक्ताने धुवून काढू ही डॉ. आंबेडकरांची प्रतिज्ञा खऱ्या हिंदूला शोभण्यासारखी आहे. म्हणूनच त्यांच्या सत्याग्रहासही आम्ही न्यायच समजतो.‘ ( स्वातंत्र्यवीर सावरकर, जात्युच्छेदक निबंध, पृष्ठ ७१-८१) ‘आमच्या तथाकथित अस्पृश्य धर्मबंधूना निर्बंधां प्रमाणेच (कायद्या प्रमाणेच) प्राप्त झालेले अधिकारही उपभोगू देण्यास यापुढेही स्पृश्य लोक विरोध करतील तर ते नैर्बंधिक अधिकार बजावण्यासाठी अगदीच अपरिहार्य तेथे तथाकथित अस्पृश्यांनी सामसत्याग्रहही केल्यास त्यात त्यांच्याकडे काहीही दोष देता येणार नाही. अर्थातच मन: प्रवर्तनाचे आणि स्पृश्यांचे मन वळवून ते निर्बंधिक अधिकार पदरात पाडून देण्याचे सर्व गोडीगुलाबीचे उपाय थकल्या नंतरच निरुपाय म्हणून असे सत्याग्रह केले जावे.’ असे पथ्य पाळण्याची स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सूचना केलेली दिसते. ( स्वातंत्र्यवीर सावरकर, जात्युच्छेदक निबंध, पृष्ठ ७१-८१)
अस्पृश्यता हा हिंदू धर्मावरील कलंक आहे असे म.गांधीं प्रमाणे स्वातंत्र्यवीर सावरकरही म्हणत असत. त्याबाबतची डॉ.आंबेडकरांनी १९२७ च्या एप्रिल मध्ये मांडलेली भूमिका वेगळी आहे.
अस्पृश्यतेबद्दलची मतांतरे
२२ एप्रिल १९२७ त्या ‘बहिष्कृत भारत‘ पाक्षिकाच्या अंकातील संपादकीयात डॉ.आंबेडकरांनी लिहिले आहे, ‘ आजवर म.गांधी प्रमाणे अस्पृश्यता हा हिंदू धर्मावरील मोठा कलंक आहे असे आम्ही मानत होतो.; पण आता आमची दृष्टी फिरली आहे; व तो आमच्या नरदेहा वरील कलंक आहे असे आम्ही समजतो. हा हिंदू धर्मावरील कलंक आहे असे जोपर्यंत आम्ही मानीत होतो तोपर्यंत तो काढून टाकण्याचे कार्य आम्ही तुमच्यावर सोपविले होते. हा आमच्यावरील कलंक आहे अशी आमची जाणीव झाल्यामुळे तो धुवून काढण्याचे पवित्र कार्य आता आमचे आम्हीच स्वीकारले आहे. या कार्याच्या सुध्दा प्रीत्यर्थ आमच्यापैकी काही जणांना आत्मयज्ञ करावा लागला तरी आम्ही मागेपुढे पाहणार नाही. तुम्ही तळे शुद्ध करून आमची अपवित्रता सिध्द करण्याचा महाड येथे जो नीचतम प्रयत्न केला तसा आणखी हवा तर करा; पण आम्ही पवित्र आहो हे तुमच्याच मुखे वदवून घेतल्याखेरीज आमची शांती होणार नाही. तुम्ही हिंदुधर्माला लाविलेला कलंक आम्ही आपल्या रक्ताने धुवून टाकावा असा जर ईश्वरी नेमानेम असेल तर आम्ही स्वतःस अत्यंत भाग्यवान समजतो… या स्वजनोध्दाराच्या तसेच धर्मोध्दाराच्या महत्कार्यात यश: प्राप्ती होण्यास रक्तपात होऊ नये अशी आमची उत्कट इच्छा आहे; पण नाईलाज होऊन ब्राह्मण्यग्रस्त लोकांच्या दुराग्रहाचा रक्तपाताचा प्रसंगच जरी ओढावला तरी आम्ही मागे घेणार नाही व त्याची जबाबदारी केव्हाही आमच्यावर असू शकणार नाही. हे यांनी पक्के ध्यानात ठेवावे.’
सत्याग्रह पूर्णपणे अहिंसक असावा असा महात्मा गांधी मंत्र म्हणत असत. तसा मंत्र डॉ.आंबेडकरांनी म्हटलेला नाही. रक्तपाताचा प्रसंग ओढवला तरी बेहत्तर आम्ही मागे हटणार नाही अशा भाषेत डॉ.आंबेडकर बोलत असत. तशा भाषेत सत्याग्रहाचे आद्य प्रणेते म.गांधी बोलत नसत, हे लक्षात घेतले पाहिजे. अस्पृश्यता हा हिंदुधर्मावरील कलंक आहे असे म्हणणे निराळे आणि तो नरदेहावरील कलंक आहे असे म्हणणे निराळे. या मूलतः भिन्न भूमिकेमुळे अस्पृश्यता निर्मूलन हे उद्दिष्ट समान असले तरी म.गांधी आणि डॉ.आंबेडकर यांनी समान उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आखलेली रणनीती आणि वापरलेले डावपेच यांचे स्वरूप वेगळे असणे अटळ झाले.
म.गांधी साध्य आणि साधने यामध्ये फरक करीत नसत. साधन हे दर बी-बियाणे मानले तर साध्य म्हणजे बहरलेला वृक्ष समजावा लागतो. इतका साध्य आणि साधन यांच्यामध्ये म.गांधीजींच्या मते अतूट संबंध असतो. अशुध्द साधन वापरल्यास साध्यही शुद्ध राहात नाही. हिंसेचा अवलंब करणे म्हणजे अशुद्ध साधन वापरणे असे म.गांधीजी समजत असत. सत्य व अहिंसा ही जुळे भावंडे नसून त्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. असे म.गांधीजी सांगत असत.
डॉ.आंबेडकरांची साध्य-साधन संबंधा बाबतची तसेच हिंसा – अहिंसे बाबतची भूमिका म.गांधीजींच्या भूमिकेपेक्षा वेगळी होती. सत्याग्रहाची रीत कशी असावी हे सांगताना डॉ.आंबेडकरांनी लिहिले आहे, ‘ महात्मा गांधी हे आधुनिक काळातील सत्याग्रहाच्या चळवळीचे पुरस्कर्ते आहेत आणि सत्याग्रहाची रीत म्हणजे म.गांधींनी घालून दिलेली रीत. याशिवाय दुसरी रीत असू शकणार नाही, असा समज सर्वत्र पसरलेला दिसतो. म.गांधींच्या सत्याग्रहाची जी रीत आहे तीत त्यांनी हिंसेला वाव ठेवलेला नाही, इतकेच नव्हे तर जिथे हिंसा आहे, तेथे सत्याग्रह नाही असे त्यांचे मत आहे. हे महात्मा गांधींचे म्हणणे तर्कशुद्ध आहे, ह्या बद्दल एकमत होणे शक्य नाही, असे आम्हांस वाटते… हिंसा, अहिंसा ही केवळ आग्रहाच्या सिध्दीची साधने आहेत. जसे कर्माच्या किंवा कर्त्याच्या अनुरोधाने क्रियापदाचे खूप बदलते तसे काही साधनाच्या अनुरोधाने आग्रहाचे नैतिक स्वरूप बदलत नाही. कारण एखाद्या दुराग्रहीने आपला आग्रह पार पाडण्यास अहिंसेचा मार्ग पत्करला म्हणून त्याच्या दुराग्रहाला सत्याग्रह म्हणता यावयाचे नाही किंवा एखाद्या सत्याग्रहीने सत्याग्रहाच्या सिध्दीसाठी हिंसा केली एवढ्यावरून त्यांच्या सत्याग्रहाला दुराग्रह म्हणता येणार नाही. तसे जर झाले तर गीतेत श्रीकृष्ण परमात्म्याने अर्जुनास सत्याग्रहाच्या सिध्दीसाठी जो हिंसेचा मार्ग पत्करण्यास भाग पाडले त्यास काय म्हणावे?… हिंसा करणे हे जरी अयोग्य असले तरी आत्मसंरक्षणाचे कार्य त्याशिवाय साधत नसल्यास हिंसा करणे रास्त आहे, असे समजतात… सत्याग्रही माणसास हिंसा करावी लागली तर त्यास क्षम्य आहे, असे कारणपरत्वे म्हणावे लागेल.’ (बहिष्कृत भारत, २५ नोव्हेंबर १९२७)
सत्याग्रहाची अपरिहार्यता आणि अस्पृश्यता यांबाबत या तिघा समकालीनांच्या मतांमध्ये फरक कसा होता, हे यावरून पुरेसे होते. अखेर एकच तळटीपवजा उल्लेख आवश्यक आहे तो असा की, १९२७ साली महाड सत्याग्रहा संबंधीचे लेख आपल्या ‘बहिष्कृत भारत‘ पत्रात लिहिताना गीतेचा आधार घेणाऱ्या आणि श्रीकृष्णाचा उल्लेख ‘परमात्मा भगवंत‘ अशा शब्दात करणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची श्रीकृष्णा विषयीची तसेच ‘गीते‘ विषयीची मते कालांतराने पालटली.
लेखक इतिहास व राज्यशास्त्राचे अभ्यासक आहेत. padmakarkgs@gmail.com
