महाराष्ट्रातील नगरपरिषदांच्या निवडणुका झाल्या. सध्या महापालिका निवडणुकांचा धुराळा उडतो आहे. आणि जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी १५ जानेवारी २०२६ रोजी आपण मताधिकार बजावणार आहोत.

निरनिराळे राजकीय पक्ष आणि  उमेदवारांकडून प्रचार जोरात सुरू आहे. लोकशाहीचा कणा असलेल्या मतदारावर वेगवेगळ्या मार्गाने त्याच्या उज्वल भवितव्याच्या दाखल्यांचा भडीमार केला जात आहे. एकूणच प्रचारात लाड, लाडकी, लाडिकता अशा लाडीक शब्दांची मोठी चलती आहे. लाडिकपणाचाही आक्रस्ताळा प्रचार कसा असतो हे दिसू लागले आहे. अलीकडे निवडणुका जाहीर होण्यापूर्वी, जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता सुरू असताना रेवडी वाटपाचे उपक्रम दिसू लागले आहेत. तसेच निवडणुकीमध्ये पैशाचा वारंवार वापर होऊ लागलेला आहे हे सारे चिंताजनक आहे. अर्थात याची केवळ चिंता करून चालणार नाही तर त्यामध्ये बदल करण्याचे उत्तरदायित्व मतदार म्हणून आपणच स्वीकारण्याची गरज आहे.

यापूर्वी दिलेली आश्वासनेही न पाळणारे विविध राजकीय पक्ष आहेत तरीही विकास, गॅरंटी हे शब्द सातत्याने वापरले जात आहेत. अशा या सगळ्या भवतालात मतदार म्हणून प्रत्येकाने गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. तसेच काही जण ‘नोटा’चा पर्याय वापरण्याचाही विचार करत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर मताधिकार बजावणे हे लोकशाहीच्या अनमोल ठेव्याच्या जोपासनेसाठी आणि लोकशाही बलशाली करण्यासाठी आवश्यक असते.त्यामुळे ज्यांना मत देण्याचा अधिकार आहे तो त्या प्रत्येकाने बजावलाच पाहिजे हे लक्षात घेतले पाहिजे.भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव पूर्ण झाल्यानंतर आणि भारतीय राज्यघटनेचा अमृतमहोत्सव सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर विवेकपूर्ण मताधिकार बजावणे आवश्यक आहे. भारतीय राज्यघटनेने आपल्याला अगदी सहजपणे मतदार म्हणून दिलेला अधिकार वापरण्यासाठी आपण किती सजग, सक्षम, विवेकी, प्रामाणिक आहोत हे स्वतःशीच तपासण्याची गरज आहे.

सरकार निर्माण करण्यात आणि सरकारवर निमंत्रण ठेवण्यात नागरिकाला सहभागी होता आलं पाहिजे हे लोकशाही पद्धतीत गृहीत धरले आहे.आपले लोकप्रतिनिधी निवडण्यासाठी अधिकार बजावणे हा या सहभागाचा महत्त्वाचा व मूलभूत आविष्कार आहे. मताधिकार म्हणजे सरकार कसे असावे यासंबंधी लोकांनी आपल्या मताद्वारे प्रतिनिधींची निवड करण्यासाठी व्यक्त केलेली इच्छा. अशी इच्छा व्यक्त करणाऱ्या नागरिक म्हणजेच मतदार असतो.

लोकशाही आणि लोकांची सार्वभौम सत्ता या आपल्या राष्ट्राच्या पायाभूत संकल्पना प्रत्यक्षात आणण्याचे एक महत्त्वाचे साधन म्हणून आपण मताच्या अधिकाराकडे पाहिले पाहिजे .हा मताधिकार बजावताना आपण जेवढे जागरुक, बळी न पडणारे ठरू तेवढे आपले स्वतःचे व देशाचे हीच सुरक्षित राहील. त्यामध्ये प्रगती करण्याचे कर्तव्य आपण पार पाडू शकतो. एका अर्थाने मताधिकार हा नवा समाज घडविण्याचा अधिकार आहे. तो कोणाच्याही भिडेपोटी किंवा आंधळेपणाने वापरायचा नसतो. अगर कशाच्या तरी मोबदल्यात विकायचाही नसतो.

मत देणे म्हणजे दान करणे नाही. कारण आपण आपली एखादी गोष्ट दान केली की त्याचे पुढे काय झाले हे विचारता येत नाही. त्यामुळे मत ही दान करण्याची बाब नव्हे. तर मत हा आपला हक्क, कर्तव्य आणि अधिकार आहे. निवडून जाणाऱ्या प्रतिनिधींना दिलेला तो आदेश आहे. आपण मताधिकार बजावला तर त्याचा योग्य व अपेक्षित वापर होतो किंवा नाही हे आपण पाहू शकतो. थोडक्यात लोकप्रतिनिधींवर मतदाराचा कायमचा अधिकार राहतो. त्यामुळे मतदानाऐवजी मताधिकार बजावण्याची भूमिका आपण मनात पक्की केली पाहिजे.

मताधिकार सन्मानपूर्वक बजावण्यासाठी आपण काही गोष्टी ध्यानात घेतल्या पाहिजेत.

० मतदार यादीतील आपले नाव व क्रमांक तपासून खात्री करून घेणे.  
० आपल्या मताधिकार केंद्राची निश्चित जागा समजून घेणे.
निवडणूक लढवीत असलेल्या उमेदवारांकडून त्यांचे जाहीरनामे मागवून घेणे.
० त्या जाहीरनाम्यांचा तुलनात्मक विचार करून तो जाहीरनामा आणि संबंधित राजकीय पक्षाच्या गेल्या पाच वर्षातील राजकीय भूमिका यांचा स्वतःच्या अनुभवातून विचार करणे आणि मत निश्चित करणे.

याकडे प्रत्येक मतदाराने लक्ष देण्याची गरज आहे. खरे पाहता आपण केवळ मतदार न राहता आपल्याला योग्य वाटत असलेल्या संघटनेत किंवा पक्षात सहभागी असायला हवे. निवडणुकीचा जाहीरनामा बनवण्याच्या चर्चेत सहभागी व्हायला हवे.
कारण आजच्या राजकारणाचे केवळ सत्ताकारण बनत असल्याच्या काळात उमेदवारांच्या आणि पक्षांच्या जाहीरनाम्यापेक्षा मतदारांचा जाहीरनामा तयार करणे अत्यंत महत्त्वाचे बनलेले आहे.

भारतीय राज्यघटना आणि लोकांच्या सामूहिक इच्छेशी बांधिलकी ठेवणारा उमेदवार आपण निवडला पाहिजे. सामाजिक आर्थिक राजनैतिक न्याय, विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता, लोकांचे सार्वभौमत्व, लोकशाही, समाजवाद, धर्मनिरपेक्षता राष्ट्रीय एकात्मता आदी संविधानातील मूल्यांचा आदर व जोपासना करणाऱ्या उमेदवारांना मत दिले पाहिजे.

भारताच्या राष्ट्रीयत्वाच्या मूलभूत तत्त्वांशी वैचारिक व क्रियाशील निष्ठा असणाऱ्या पक्षाने अथवा अनेक पक्षांनी एकत्र येऊन  सामूहिकपणे  उभ्या केलेल्या उमेदवाराचीच आपण निवड केली पाहिजे. कोणत्याही राजकीय पक्षाशी, संघटनेशी, आघाडीशी, युतीशी संबंध नसणाऱ्या अपक्ष किंवा स्वतंत्र उमेदवाराला आपल्या मताचा पाठिंबा देऊ नये. कारण लोकशाहीची शिस्त राखण्यासाठी ते अत्यावश्यक पथ्य आहे.

निवडणुकीच्या तयारीच्या आणि प्रचाराच्या काळात प्रत्येक स्त्री पुरुष मतदाराने स्वतःचा विचार सुरू ठेवला पाहिजे. एवढेच नव्हे तर आपल्याला पटलेली भूमिका व मान्य असलेल्या उमेदवार यांचा स्वतःहून स्वतःच्या परिचयाच्या लोकात प्रचारही केला पाहिजे. मात्र त्यासाठी कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा करू नये. उलट जो उमेदवार किंवा त्याचा कार्यकर्ता पैसे, वस्तू , दारू, जेवण वगैरे देत असेल तर तो पक्का भ्रष्ट आहे हे समजावे. एवढेच नव्हे तर तो गुन्हा आहे आणि त्यात देणारा व घेणारा दोघेही शिक्षेला पात्र आहेत.

आपले व आपल्या कुटुंबाचे जीवन स्वाभिमानाचे, शाश्वतीचे आणि सुखाचे होण्यासाठी आणि देशाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी समाज जीवनाची तशी मांडणी आवश्यक असते. त्यासाठी आपले प्रतिनिधी म्हणून हे कारभारी आपण निवडून द्यायचे असतात. त्यामुळे आज निवडणुकीला जो उमेदवार केंद्रित बाज आलेला आहे तो बदलून निवडणूक मतदार केंद्रित केली पाहिजे. त्यासाठी जास्तीत जास्त मतदारांनी मताधिकार बजावला पाहिजे.

(लेखक ‘समाजवादी प्रबोधिनी’, इचलकरंजीचे १९८५ पासूनचे कार्यकर्ते तसेच प्रबोधिनीच्या वतीने गेली ३५ वर्षे नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती’ मासिकाचे संपादक आहेत. )

prasad.kulkarni65@gmail.com