डॉ. विवेक बी. कोरडे
पाच हजार बारा जागा. आकडा तसा भारदस्त वाटतो, वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर ठळक छापून यावा असा. पण इथे ‘जागा मंजूर होणे’ आणि ‘जागेवर माणूस रुजू होणे’ यांच्यामध्ये एक अख्खा भूगोल, इतिहास आणि कधीकधी एक पूर्ण आयुष्य सामावलेलं असतं. गेल्या पाच वर्षांत राज्यात जेमतेम दोन हजार पदं भरली गेली, आणि रिक्त जागांचा आकडा बारा हजारांच्या पुढे गेला हे गणित कुणाला समजावं लागत नाही. ही भरती ‘रखडणं’ हा अपघात नसून तो या व्यवस्थेचा स्थायीभाव झाला आहे. दरवर्षी नवा जीआर निघतो, नवी तारीख जाहीर होते, नवं आश्वासन दिलं जातं आणि नवा उमेदवार आणखी एक वर्ष वयोमर्यादेच्या उंबरठ्याजवळ ढकलला जातो. या राज्यातल्या प्राध्यापक भरतीत जीआर हे ऋतूंसारखे येतात कधी वेळेवर, कधी उशिरा, पण नेहमी अपुरे. एक जीआर पात्रता निकष बदलतो, दुसरा नॅक मान्यता सक्तीची करतो, तिसरा मुलाखतीचे निकष ‘पारदर्शक’ करण्याचा आदेश देतो. प्रत्येक जीआर कागदावर सुधारणा असतो, पण प्रत्यक्षात तो एक नवा अडथळा असतो जो ओलांडेपर्यंत मागचा उमेदवार म्हातारा होतो आणि नवा उमेदवार तयार होतो रांगेत उभं राहायला. आणि गंमत अशी की प्रत्येक वेळी घोषणा होते ती ‘पारदर्शकते’ची. जणू पारदर्शकता ही अशी वस्तू आहे जी दरवर्षी नव्याने शोधावी लागते, दरवर्षी नव्याने वचन द्यावं लागतं. जर खरंच व्यवस्था पारदर्शक असती, तर हे ‘पारदर्शकते’चं आश्वासन इतक्या वेळा द्यावं लागलं नसतं.
गुणवत्तेचा बाजार
या भरतीत सगळ्यात जास्त चेष्टा होते ती गुणवत्तेची. निबंध, संशोधन प्रकाशनं, नेट-सेट, पीएच.डी. हे सगळे निकष कागदावर कठोर दिसतात. पण प्रत्यक्ष मुलाखतीच्या खोलीत काय घडतं, हे कुणालाच सांगायची गरज नाही. ज्या संस्थाचालकांच्या हातात संस्था आहे, त्यांच्याच हातात अनेकदा गुणांकनाची कळसुद्धा असते. जो हुशार, प्रामाणिक, गरीब घरातून आलेला उमेदवार वर्षानुवर्षं अभ्यास करून पात्रता कमावतो, तो शेवटी एका बंद दाराबाहेर उभा राहतो आणि आतून येणारा निर्णय आधीच ठरलेला असतो. सामान्य, होतकरू, पात्रताधारक तरुण-तरुणींनी किती वाट पाहायची? कुणी नेट पास करून आठ वर्षं झाली, कुणाची पीएच.डी. होऊन सहा वर्षं लोटली. या काळात कुणी खासगी शिकवण्या करत जगला, कुणी कंत्राटी तासिका तत्त्वावर राबला कायम पगाराच्या नोकरीची स्वप्नं पाहत. आणि दरवेळी टीव्हीवर, वर्तमानपत्रात एकच बातमी येते ‘भरतीचा मार्ग मोकळा! जणू हा रस्ता कधी बंदच नव्हता, आणि मोकळा शब्द ऐकून टाळ्या वाजवायच्या. खरं तर या भरतीचं वेळापत्रक बघितलं, तर वाटतं की इथे उमेदवारांची परीक्षा गुणवत्तेची नसून संयमाची घेतली जाते. जो सर्वात जास्त काळ थांबू शकतो, टिकून राहू शकतो, आर्थिक व मानसिक ताण सहन करू शकतो तोच शेवटी जिंकतो.
‘वन प्लस’ चा नवाच अर्थ
अलीकडे या भरतीच्या वर्तुळात एक नवा शब्द ऐकू येतो ‘वन प्लस’- हा कुठल्या मोबाईल कंपनीचा फोन नाही. हा सध्याच्या प्राध्यापक भरतीचा ‘रेट’ आहे, असं म्हणतात. एक कोटीच्या पुढे. आता विचार करा ज्या घरात वर्षभराचं उत्पन्नच मिळवण्याचे पूर्ण स्रोत नाहीत, त्या गरीब, सामान्य घरातल्या हुशार, होतकरू पात्रताधारकाने या शर्यतीत उतरायचं तरी कसं? गुणवत्ता, नेट-सेट, पीएच.डी., संशोधन प्रकाशनं हे सगळं कागदावर मिरवायला ठीक आहे, पण जिथे जागेचा दरच ‘वन प्लस’ असा बोलला जातो, तिथे पदवीचं प्रमाणपत्र आणि बँक खात्यातली शिल्लक यांच्यातली स्पर्धा कोण जिंकणार, हे वेगळं सांगायला नको. पारदर्शक भरतीची इथे अक्षरशः ऐशीतैशी झाली आहे आणि तीही इतक्या सफाईनं की त्याला अधिकृत भाषेत फक्त ‘अनियमिततेच्या तक्रारी’ इतकंच गोंडस नाव दिलं जातं. आता यावर उपाय म्हणून सांगितलं जातंय – मुलाखतींची व्हीडिओग्राफी बंधनकारक होणार. वा, किती छान कल्पना. जणू भ्रष्टाचार हा फक्त कॅमेऱ्यासमोर होतो आणि कॅमेरा दिसला की माणसं अचानक प्रामाणिक होतात.
पण व्हीडिओग्राफी फक्त मुलाखतीच्या पंधरा मिनिटांची होणार आहे, की त्याआधी महिनोन्महिने चालणाऱ्या ‘बैठकांची’, ‘समझोत्यांची’, ‘याद्या ठरवण्याच्या बंद खोल्यांतल्या चर्चांची’सुद्धा होणार आहे? कॅमेरा फक्त तेवढ्याच क्षणी चालू होतो जिथे उत्तरं आधीच ठरलेली असतात आणि प्रश्न औपचारिकता उरतात. व्हिडिओग्राफी हे पारदर्शकतेचं नाटक आहे की खरंच जबाबदारी हे ठरवायला अजून एक चौकशी समिती लागेल, आणि तोपर्यंत पुढचा जीआर निघालेला असेल.
‘पारदर्शक भरती’ — या शब्दाचीच सर्वात मोठी फसवणूक
जेव्हा जेव्हा उमेदवार संघटना, नव-प्राध्यापक संघटना ओरडून सांगतात ‘ही भरती लोकसेवा आयोगामार्फत करा, किंवा किमान एखाद्या केंद्रीकृत ऑनलाईन पोर्टलमार्फत करा, म्हणजे माणसाच्या हातात माणूस निवडण्याचा अधिकारच राहणार नाही’ तेव्हा सरकार दरवेळी तेच एक वाक्य ऐकवतं : ‘यावेळी भरती पूर्णपणे पारदर्शक होईल, बघाच तुम्ही.’ आणि जनताही, उमेदवारही, दरवेळी नव्याने आशेवर जगतात… जणू हे वाक्य पहिल्यांदाच ऐकलं जातंय. पण प्रत्यक्ष भरतीची वेळ येते तेव्हा हेच सरकार, हीच व्यवस्था स्वतःच घालून दिलेले नियम इतक्या बेमालूमपणे पायदळी तुडवतात की चौकशी करणाऱ्यालाही नियम कुठे मोडला हे शोधावं लागतं. कधी गुणांकनाचे निकष बदलले जातात, मुलाखतीचे पॅनल ‘सोयीस्कर’ ठरवले जातात, संस्थाचालकांच्या शब्दाला अंतिम निर्णयाचं वजन मिळतं आणि हे सगळं इतक्या ‘व्यवस्थित’ पद्धतीने घडतं की त्याला ‘बेकायदा’ म्हणणंही अवघड होऊन बसतं. कारण कागदोपत्री सगळं नियमानुसारच झालेलं दाखवलं जातं. भ्रष्टाचारालाही इथे कायद्याचा सूट शिवलेला असतो. आणि म्हणूनच ‘पारदर्शक भरती’ हा शब्दच या व्यवस्थेतला सर्वात मोठा विनोद, सर्वात मोठं दुखणं ठरतो. कारण या तथाकथित पारदर्शकतेतच, अत्यंत पारदर्शकपणे, कित्येक गोरगरीब, प्रामाणिक, पात्रताधारक तरुण-तरुणींच्या प्राध्यापक होण्याच्या स्वप्नांची विल्हेवाट लावली जाते उघड्या डोळ्यांनी, सगळ्यांसमोर, आणि तरीही कुणावरही ठपका न ठेवता. जे स्वप्न पाहण्याचं धाडस गरिबाने केलं, त्याच स्वप्नाला ‘पारदर्शक प्रक्रियेत नापास’ ठरवून नाकारलं जातं आणि वर सांगितलं जातं, ‘प्रक्रिया योग्य पद्धतीने राबवली गेली.’ या राज्यात पारदर्शकता म्हणजे काचेची भिंत झाली आहे बाहेरून सगळं स्पष्ट दिसतं, पण आतून बाहेर पडायला दरवाजा कुठेच नाही.
हीच भरती लोकसेवा आयोगामार्फतकरा, ही मागणी दरवेळी फेटाळली जाते, कारण आयोगाच्या हातात भरती गेली की ‘व्यवस्थापन’ शक्य होत नाही, ‘सोय’ बघता येत नाही, ‘ठरलेली नावं’ आत घुसवता येत नाहीत. आणि म्हणूनच ही मागणी कायम प्रलंबित ठेवली जाते जशा जागा प्रलंबित ठेवल्या जातात, जसे जीआर प्रलंबित ठेवले जातात, तशीच ही मागणीही.
दोन मिनिटांची मुलाखत — आणि ‘पारदर्शकते’चा कळस
आता या भरतीतल्या ‘पारदर्शकतेचा’ सर्वात कडवट, सर्वात हास्यास्पद नमुना बघा मुलाखत. या राज्यातल्या प्राध्यापक भरतीने पारदर्शकता इतक्या टोकाला नेली आहे की मुलाखतीला जाणाऱ्या उमेदवाराला आत पाऊल ठेवण्याआधीच माहीत असतं आपली निवड होणार नाही. कुणाकुणाला तर हेही नेमकं ठाऊक असतं की या जागेसाठी किती ‘व्यवहार’ पार पडला आहे आणि पॅनलच्या मनात आधीच कुणाचं नाव कोरलेलं आहे. तरीही हा उमेदवार मुलाखतीला येतो कारण अर्जाचा नियम असतो, कारण किमान हजेरी तरी लावावी लागते, कारण नाही आलं तर ‘संधीच सोडली’ असा शिक्का बसतो. एका बाजूला निकाल आधीच ठरलेला, दुसऱ्या बाजूला हजर राहण्याची सक्ती याहून क्रूर विनोद कुठला असेल? आणि मुलाखतीच्या खोलीत गेल्यावर काय घडतं? दोन मिनिटं. फक्त दोन मिनिटं. ज्या विषयाचा अभ्यास करण्यात उमेदवाराने आयुष्यातली दहा-बारा वर्षं घातली, त्या विषयावर धड एक प्रश्नही धड विचारला जात नाही. कारण पॅनलवर बसलेल्या विषयतज्ज्ञांना आणि इतर प्राध्यापक मंडळींना आधीच माहीत असतं या उमेदवाराचं इथे काही होणार नाही, त्यामुळे प्रश्न विचारण्याचे कष्ट तरी कशाला घ्यायचे? उलट, समोर बसलेला उमेदवार जर बऱ्याच वर्षांनी भेटलेला ‘जुना ओळखीचा’ असेल, तर मुलाखत आणखी सोपी होते. जणू ही प्राध्यापक निवडीची प्रक्रिया नसून जुन्या मित्रांचं स्नेहसंमेलन आहे – फक्त इथे एका बाजूला नोकरीचं भवितव्य पणाला लागलेलं असतं आणि दुसऱ्या बाजूला निवांतपणे चहा-पाणी होत असतं. ज्याची निवड आधीच निश्चित आहे, त्याला विषयाचे सखोल प्रश्न जे त्यांना आधीच दिले जातात ते विचारून ‘औपचारिकता’ पूर्ण केली जाते किंवा कधी त्यालाही सोडलं जातं गप्पांतच. आणि ज्याची निवड होणारच नाही, त्याच्यावर विषयाच्या प्रश्नांची बरसातही केली जात नाही कारण कशाला उगीच कष्ट घ्या, निकाल तर आधीच लिहिलेला आहे. एका अर्थी ही मुलाखत नावाची प्रक्रिया या भरतीतली सर्वात प्रामाणिक जागा आहे कारण इथेच व्यवस्था सर्वात उघडपणे कबूल करते की गुणवत्तेला इथे काही थारा नाही. बाकी सगळीकडे निदान भ्रष्टाचार लपवण्याचा आव तरी आणला जातो, इथे तोही आव आणला जात नाही. मग प्रश्न पडतो या दोन मिनिटांच्या ‘मुलाखतीसाठी’ उमेदवाराने वर्षानुवर्षं जो अभ्यास केला, जी तयारी केली, जो प्रवास-खर्च केला, जी रजा घेतली, त्याची भरपाई कोण करणार? आणि जर निकाल आधीच ठरलेला असेल, तर या तमाशाला ‘मुलाखत’ तरी का म्हणायचं? त्याला थेट ‘सोपस्कार’ म्हणा, निदान प्रामाणिकपणा तरी दिसेल.
म्हणे, ‘जून २०२६ पूर्वी भरती पूर्ण होईल’!
‘प्राध्यापक भरती जून २०२६ पूर्वी पूर्ण होणार, नव्या शैक्षणिक सत्रात विद्यार्थ्यांना नवे प्राध्यापक मिळणार.’ ही बातमी काही महिन्यांपूर्वी वाचून वाटलं होतं, चला, यावेळी तरी खरंच काहीतरी हलणार. पण खरं तर हे वाक्य नवं नव्हतंच साधारण वर्षभरापूर्वी, सप्टेंबर महिन्यातच, साडेपाच हजार जागा मार्च अखेरपर्यंत भरल्या जातील असं ठामपणे सांगितलं गेलं होतं. मार्च गेला, एप्रिल आला, आणि तीच फाईल पुन्हा नव्या तारखेसह पुढे सरकवली गेली ‘जूनअखेर पूर्ण होईल’. आता सप्टेंबर उजाडला आहे, आणि जमिनीवर प्रत्यक्ष काय दिसतं? तेच रखडलेलं रोस्टर, तेच अपूर्ण शिबिरं, तीच ‘प्रक्रिया सुरू आहे’ ही मख्ख उत्तरं. आणि गंमत इथेच संपत नाही. या दरम्यान विद्यापीठांनी काय केलं? तर पात्रताधारकांकडून चार-चार वेळा नवनवीन जीआरनुसार अर्ज मागवून घेतले. एकदा अर्ज भरा, मग निकष बदलले म्हणून पुन्हा भरा, मग रोस्टर सुधारला म्हणून पुन्हा भरा, मग फॉरमॅट बदलला म्हणून पुन्हा भरा. जणू अर्ज भरणे हाच अंतिम उद्देश आहे, नोकरी देणे नव्हे. उमेदवाराचा वेळ, पैसा, कागदपत्रांची जुळवाजुळव, प्रतिज्ञापत्रांचे नोटरी खर्च हे सगळं दरवेळी नव्याने खर्च होतं, आणि निकाल मात्र ‘प्रलंबित’ याच रकान्यात कायम राहतो. आणि याच वैतागातून आता काही पात्रताधारक मोकळेपणाने बोलू लागले आहेत ‘उशीर कशामुळे होतोय माहितीये का? कारण अजून विद्यापीठांचे ‘दर’च ठरलेले नाहीत!’ ही ओळ वाचून हसावं की रडावं, हेच कळत नाही. ज्या राज्यात भरतीला उशीर होण्याचं कारण म्हणून खुलेआम ‘दर ठरत नाहीये’ असं बोललं जातं, आणि ते ऐकून कुणालाच धक्का बसत नाही तिथे ‘पारदर्शक भरती’ हा शब्द वापरणं हाच खरं तर सर्वात मोठा उपहास आहे. यंत्रणेने आश्वासनांचा एवढा मोठा डोंगर रचला आहे की आता त्याखाली उमेदवारांचं संयमच नव्हे, तर या शब्दावरचा त्यांचा विश्वासही गाडला जातो आहे.
शेवटी एवढंच
पाच हजार जागा, बारा हजार रिक्त पदं, सहा महिन्यांची डेडलाईन, तीन वर्षांची प्रतीक्षा हे आकडे कागदावर बदलत राहतील, पण या भरतीमागचं तत्त्वज्ञान बदलल्याशिवाय काहीच बदलणार नाही, हे तितकंच खरं. जोपर्यंत निवडीचा अधिकार बंद खोलीत बसलेल्या मोजक्या हातांत राहतो, तोपर्यंत जीआर कितीही निघोत, व्हीडिओग्राफी कितीही सक्तीची होवो पारदर्शकता ही फक्त कागदावरची शाई राहील, प्रत्यक्षातली कृती नाही. आणि म्हणूनच शेवटचा प्रश्न सरकारला किंवा विद्यापीठांना नाही तो या संपूर्ण समाजाला आहे: ज्या दिवशी ‘पारदर्शक भरती’ हा शब्द ऐकून जनतेला हसू येण्याऐवजी खरोखर विश्वास वाटेल, तोच दिवस या राज्यातल्या शिक्षणाचा खरा पुनर्जन्म असेल. तोपर्यंत ही भरती अशीच ‘अत्यंत पारदर्शक’ राहील इतकी पारदर्शक, की तिच्या आरपार गरिबाचं स्वप्न कधीच दिसणार नाही आणि श्रीमंताचा मार्ग कधीच अडणार नाही. हाच या व्यवस्थेचा सर्वात मोठा, सर्वात उघड आणि तरीही सर्वात न बोलला जाणारा घोटाळा आहे.
(टीप: लेखातील आकडेवारी अलीकडील बातम्यांवर आधारित असून भरतीसंदर्भातील अद्ययावत माहितीसाठी अधिकृत शासकीय जीआर व विद्यापीठांच्या सूचना तपासाव्यात.)
लेखक अध्यापन क्षेत्रात असून शिक्षणविषयक लेखन करतात. vivekkorde0605@gmail.com
