महादेव पांडुरंग गवळी
‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे…’ संत तुकाराम महाराजांच्या या अभंगातील निसर्गाशी असलेले आत्मीय नाते आजच्या पिढीने पुन्हा समजून घेण्याची वेळ आली आहे. आपल्या संतपरंपरेने निसर्गाला केवळ उपभोगाची वस्तू मानले नाही; तर तो जीवनाचा सहचर आहे, अशी शिकवण दिली. म्हणूनच भारतात नदीला माता, भूमीला माता आणि पाण्याला जीवन म्हटले गेले. पण विकासाच्या नावाखाली आपण निसर्गाशी असलेला हा संवाद हरवला. नद्यांना गटारे बनवले, डोंगर उध्वस्त केले, जंगलांची कत्तल केली आणि जमिनीखाली हजारो वर्षांत साठलेला भूजलाचा अमूल्य ठेवा काही दशकांत संपविण्याची स्पर्धा सुरू केली.

आज महाराष्ट्र राज्य १६ जुलै रोजी ‘भूजल दिन’ साजरा करीत आहे. हा केवळ दिनविशेष नाही; तर भविष्यातील जलसंकटाचा इशारा आहे. हा दिवस आपल्याला एक प्रश्न विचारतो आपण पुढील पिढीसाठी पाणी साठवत आहोत की पाण्याचे भविष्य खर्च करून टाकत आहोत?

जागतिक तापमानवाढ, हवामान बदल आणि वाढती लोकसंख्या यामुळे जगातील पाण्याची मागणी झपाट्याने वाढत आहे. अनेक आंतरराष्ट्रीय अभ्यासांमध्ये २०३० पर्यंत गोड्या पाण्याची मागणी उपलब्धतेपेक्षा लक्षणीयरीत्या वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. भारत हा जगातील सर्वाधिक भूजल वापरणाऱ्या देशांपैकी एक आहे आणि महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील पिण्याचे पाणी, सिंचन आणि अनेक उद्योग आजही मोठ्या प्रमाणावर भूजलावर अवलंबून आहेत. त्यामुळे भूजलाचा प्रश्न हा केवळ पर्यावरणाचा नाही, तर अन्नसुरक्षा, अर्थव्यवस्था, सार्वजनिक आरोग्य आणि सामाजिक स्थैर्याचा प्रश्न बनला आहे.

महाराष्ट्राची भौगोलिक रचना हे संकट अधिक गुंतागुंतीची बनवते. राज्यातील बहुतांश भाग कठीण बेसाल्ट खडकांनी व्यापलेला असल्याने भूजल साठवण्याची क्षमता मर्यादित आहे. त्यात अनियमित पाऊस, कमी कालावधीत होणारी अतिवृष्टी, वाढते काँक्रीटीकरण, जंगलतोड आणि शेकडो फूट खोलवरून सुरू असलेला भूजलाचा अनियंत्रित उपसा यामुळे भूजल पुनर्भरणाचा नैसर्गिक समतोल ढासळत आहे. परिणामी, एका बाजूला पावसाळ्यात पूर आणि दुसऱ्या बाजूला उन्हाळ्यात टँकरची प्रतीक्षा—हे महाराष्ट्राचे नवे वास्तव बनले आहे.

भूजल अभ्यासक सातत्याने एक महत्त्वाची बाब अधोरेखित करतात ‘भूजल निर्माण करता येत नाही; ते फक्त संवर्धित करता येते.’ निसर्गाने दिलेल्या पुनर्भरण क्षमतेपेक्षा अधिक उपसा सुरू राहिला, तर एक दिवस विहिरी, बोअरवेल आणि झरे कायमचे शांत होतील. याहून गंभीर बाब म्हणजे भूजलाची गुणवत्ता. रासायनिक शेती, औद्योगिक सांडपाणी, नागरी प्रदूषण आणि अनियंत्रित कचरा व्यवस्थापनामुळे अनेक भागांतील भूजल दूषित होत आहे. एकदा भूजल प्रदूषित झाले, तर ते पूर्ववत करणे अत्यंत कठीण असते. म्हणूनच भूजल संवर्धन म्हणजे केवळ पाण्याचे संरक्षण नव्हे, तर मानवाच्या आरोग्याचे आणि भावी पिढ्यांच्या अस्तित्वाचे संरक्षण आहे.

आज गरज आहे ती जलव्यवस्थापनाच्या नव्या विचारांची. ‘धरण भरले म्हणजे प्रश्न सुटला’, ही मानसिकता बदलावी लागेल. प्रत्येक गावाने स्वतःचा ‘जलताळेबंद’ तयार केला पाहिजे. गावात किती पाऊस पडतो, किती पाणी वाहून जाते, किती मुरते, किती उपसा होतो आणि किती पुनर्भरण होते, याची शास्त्रीय नोंद ठेवली गेली पाहिजे. पाण्याचा प्रत्येक थेंब हा नियोजनाचा विषय बनला पाहिजे. छतावरील पावसाचे पाणी संकलन, विहीर व कूपनलिका पुनर्भरण, शोषखड्डे, रिचार्ज शाफ्ट, शेततळी, पाझर तलाव, नाला बंधारे, समतल चर, वृक्षारोपण, मृदसंधारण आणि सूक्ष्म सिंचन या उपाययोजना केवळ सरकारी योजना नसून भविष्यातील जलसुरक्षेची जीवनरेषा आहेत.

या लढ्यात शासनाइतकीच समाजाची भूमिकाही महत्त्वाची आहे. लोकसहभागाशिवाय जलक्रांती घडत नाही. हीच जाणीव ठेवून आत्मनिर्धार फाउंडेशनने भूजल पातळी वाढविण्यासाठी आणि जलसाक्षर समाज घडविण्यासाठी व्यापक लोकचळवळ उभारण्याचा संकल्प केला आहे. गावागावांत भूजल जनजागृती, जलताळेबंद, वैज्ञानिक जलनियोजन, रूफटॉप रेनवॉटर हार्वेस्टिंग, विहीर व कूपनलिका पुनर्भरण, वृक्षारोपण, शालेय जलसाक्षरता अभियान, शेतकरी मार्गदर्शन आणि लोकसहभागातून जलसंवर्धनाचे प्रत्यक्ष प्रकल्प राबविण्याचा उपक्रम हाती घेण्यात येत आहे. ही केवळ संस्थेची योजना नसून ‘पाणी वाचविण्यापासून पाणी निर्माण करण्याकडे’ समाजाला नेणारी लोकचळवळ आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले होते, ‘शिक्षण हे परिवर्तनाचे शस्त्र आहे” ” आज त्या विचाराचा विस्तार करून असे म्हणावेसे वाटते “जलसाक्षरता हे भविष्यातील जलसुरक्षेचे सर्वात प्रभावी साधन आहे.’ कारण कायदे, योजना आणि निधी महत्त्वाचे असले तरी समाजाची मानसिकता बदलल्याशिवाय जलसमृद्ध महाराष्ट्र घडणार नाही.

महाराष्ट्र राज्य भूजल दिन हा केवळ एक दिवस साजरा करण्याचा कार्यक्रम ठरू नये. तो प्रत्येक गावाच्या जलआराखड्याचा प्रारंभ ठरावा, प्रत्येक शाळेच्या जलशपथेचा दिवस ठरावा, प्रत्येक शेतकऱ्याच्या पाणी बचतीच्या संकल्पाचा दिवस ठरावा आणि प्रत्येक नागरिकाच्या जबाबदारीची नव्याने जाणीव करून देणारा दिवस ठरावा.

कारण पुढील पिढी आपल्याला ‘तुम्ही आमच्यासाठी किती पैसा ठेवला?’ हा प्रश्न नाही; तर ‘तुम्ही आमच्यासाठी पाणी ठेवले का?‘ हा प्रश्न विचारेल. त्याचे उत्तर आजच्या आपल्या कृतीतून लिहिले जात आहे. म्हणूनच आजच ठरवूया—भूजलाचा प्रत्येक थेंब वाचवू, प्रत्येक थेंब जमिनीत मुरवू आणि जलसमृद्ध, आत्मनिर्भर महाराष्ट्र घडविण्यासाठी लोकचळवळ उभी करू. कारण भूजल वाचविणे म्हणजे केवळ निसर्गाचे संरक्षण नव्हे, तर आपल्या संस्कृतीचे, अर्थव्यवस्थेचे आणि पुढील पिढ्यांच्या जीवनाचे संरक्षण होय.

अध्यक्ष, आत्मनिर्धार फाउंडेशन
maha.gav111@gmail.com