राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री, जलसंपदा विभाग (गोदावरी आणि कृष्णा खोरे महामंडळ)
सहज व मुबलक उपलब्ध असते तेव्हा उधळपट्टी आणि टंचाई असते त्या वेळी नशिबाला दोष देत, तेव्हाच्या उधळपट्टीबद्दल हळहळ करीत राहणे, ही पाण्याबाबतची धारणा नवीन नाही. हवामान बदल, पावसाचे अनियमित व विषम प्रमाण ही सारी संभाव्य जलसंकटाची लक्षणे आहेत. याला तोंड देण्यासाठी सिद्ध राहण्याचा, बदल घडवून आणण्याचा संकल्प महाराष्ट्र सरकारने सोडला आहे. जलसंपत्तीबाबत महाराष्ट्र समृद्ध असावा, पाण्याच्या वापराबाबत सर्वच पातळ्यांवर साक्षरता निर्माण व्हावी, हेच मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांचे उद्दिष्ट आहे. त्या दृष्टीने त्यांच्या नेतृत्वाखाली सरकार अनेकविध उपाययोजना करीत आहे. नदीजोड प्रकल्प हा त्याचाच एक महत्त्वाचा भाग. मुख्यमंत्री त्यासाठी आग्रही असल्याचे महाराष्ट्राने पाहिले आहे.

जलसमृद्ध महाराष्ट्राचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्याची जबाबदारी जलसंपदा विभागाकडे आहे. या विभागाचे काम लोकाभिमुख व्हावे, त्यात सर्वसामान्यांचा सहभाग असावा आणि कामकाज गतीने व्हावे, या उद्देशाने ‘जल व्यवस्थापन कृती पंधरवडा’ या उपक्रमाची गेल्या वर्षीपासून सुरुवात करण्यात आली. त्याची प्रेरणा मुख्यमंत्री फडणवीस यांचीच आहे. याच पंधरवड्यात यंदा एक आगळा, नवीन उपक्रम जलसंपदा विभागाने आखला होता. तो म्हणजे ‘गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रा २०२६’. चैत्र-वैशाख हा तसा यात्रा-जत्रांचा हंगाम असतो. ही जलयात्राही वैशाख वणव्यामध्ये आयोजित केली गेली होती. तिचा उद्देश स्वाभाविकच नवसंजीवनी मिळवून देण्याचा होता. जलसंवर्धनाचा व्यापक संदेश सर्वदूर पोहचविण्याच्या उद्देशानेच जलसंपदा विभागाने यात्रेचे नियोजन केलेे होते. जलसंवर्धन विषयावर जनजागृती, सर्वसामान्य जनतेचा सहभाग आणि शाश्वत पाणी व्यवस्थापनाची संकल्पना अधिक बळकट करणे, ही जलयात्रेची मुख्य उद्दिष्टे आहेत.

जलसंवर्धन, जलसंपदा या विषयांवर आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहमीच ठाम व स्पष्ट भूमिका घेतलेली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अमृत सरोवर अभियानांमध्ये देशभरातील ७० हजार जलस्रोतांचा विकास करण्यात आला. त्यांनी पाण्याच्या क्षेत्रातील कार्यकर्त्यांचा ‘जलसैनिक’ म्हणून गौरव केला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या कर्तृत्वाबद्दलची गौरवाची भावना त्यांनी वेळोवेळी बोलून दाखविलेली आहे. त्या ‘संपन्न भारतीय संस्कृतीच्या पालक’ होत्या, असे पंतप्रधान मानतात. शेती उत्पादन वाढविण्यासाठी अडीचशे-पावणेतीनशे वर्षांपूर्वी अहिल्यादेवींनी जलसंवर्धनाचे केलेले व्यापक काम देशासाठी आजही आदर्शवत आहे. दूरदर्शी नेतृत्व कसे असते, हे त्यांनी केलेल्या जलसंवर्धनाच्या कामांतून दिसते, असे ते म्हणतात.

‘विचार, वारसा आणि विकास’ अशी यात्रेची त्रिसूत्री आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा अजित पवार यांचे संपूर्ण मार्गदर्शन यात्रेसाठी मिळत आहे. या त्रिसूत्रीमधील विचार कशाचा हे स्पष्ट आहे. जलसंधारण करणे, तुटीच्या खोर्‍यांकडे पाणी वळविणे, शेतकर्‍यांना हक्काचे पाणी मिळवून देऊन त्यांचे उत्पन्न वाढविण्यास मदत करणे हा विचार आहे. महाराष्ट्राचा विकास हा महायुती सरकारचा एककलमी कार्यक्रम आहे. जलसंसाधनांच्या विपुल उपलब्धतेमुळे विकासाचा महामार्ग प्रशस्त होतो. यात्रा जो वारसा जपू पाहते, संवर्धन करून पुढे नेऊ पाहते तोही अतिशय महत्त्वाचा आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मत्रिशताब्दी वर्षात अशी यात्रा निघणे, हा फार वैशिष्ट्यपूर्ण पैलू आहे, असे मी मानतो. पुण्यश्लोक राजमातेच्या राज्यकारभाराला साजेसे हे अभिवादन आहे.

दक्षिण गंगा म्हणून ओळखल्या जाणार्‍या गोदावरीने या यात्रेच्या माध्यमातून श्री क्षेत्र महेश्वर येथे रेवामैयाची, अर्थात नर्मदेची गळाभेट घेतली. या दोन्ही नद्यांकाठी वसलेल्या संस्कृतींची आतली वीण समान आहे. तिचा पोत अधिक घट्ट करण्याचे काम यात्रेद्वारे झाले, असा माझा दृढ विश्वास आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये, किंबहुना एकूणच जगामध्ये नदी फार महत्त्वाची आहे. जगभरातील सार्‍या संस्कृती नदीच्या आश्रयाने, तिच्या नजरेखालीच वाढल्या, प्रगत झाल्या. आपण भारतीयांनी तर नदीला लोकमाता मानले आहे. गोदावरीच्या काठी राहिलेले कविश्रेष्ठ कुसुमाग्रज या आईची महती गाताना लिहितात –

नदीमाय जल सार्‍या तान्हेल्यांना देई
कोणी असो, कसा असो भेदभाव नाही।।
शेतमळे मायेमुळे येती बहरास,
थाळीमध्ये माझ्या भाजी-भाकरीचा घास।।

गोदावरी आणि नर्मदा, या दोन्ही नद्यांबद्दल भारतीय समाजमनाला किती गाढ श्रद्धा वाटते, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. हजारो वर्षांपासून त्या आपले जीवन समृद्ध करीत आल्या आहेत, संस्कृतीला आकार देत्या झाल्या आहेत. ‘रामचंद्रिका’ महाकाव्य लिहिणारे केशवदास म्हणतात, ‘अति निकट गोदावरी पाप संहारिणी।’ भारतीयांचे आणि भारतीय संस्कृतीबद्दल आत्यंतिक आपुलकी असलेल्यांचे श्रद्धास्थान असलेले प्रभू श्रीरामचंद्र आणि सीतामाई यांच्या रहिवासाने गोदाकाठ पावन झालेला आहे.
नर्मदामैया म्हणजे आपल्या प्राचीन संस्कृतीची माताच. नर्मदा आहे संकटहारिणी, कष्टनिवारणी; मनाची तहान भागविणारी आई. उच्च कोटीचे संत-महंत, वेदांती, संन्यासी आणि अगणित भक्त यांच्यामुळे रेवाकाठ संस्कृती, अध्यात्म याबाबत कमालीचा समृद्ध आहे. या दोन नद्या भारतवर्षाच्या उत्तर आणि दक्षिण विभागाचे प्रतिनिधित्व करतात. एक पूर्ववाहिनी आणि दुसरी पश्चिमवाहिनी. आचार्य काकासाहेब कालेलकर यांनी लिहिले आहे की, ‘‘कोणत्याही धार्मिक कार्यक्रमाच्या वेळी ‘गोदावर्या: दक्षिणे तीरे’ आणि ‘रेवाया: उत्तरे तीरे’ असे म्हणत संकल्प सोडला जातो. या दोन नद्या देशाचे उत्तर दक्षिण भाग असे विभाजन करतात.’’ अर्थात आज काही मंडळी राजकीय स्वार्थासाठी असा भेद निर्माण करू पाहात आहेत, ते येथे अपेक्षित नाही. गोदावरी आणि नर्मदा विरुद्ध दिशांनी वाहत असल्या, तरी अंत:प्रवाहांनी त्यांनी कोट्यवधी भारतीयांना सीमा, प्रांत आदी भेद टाळून जोडले आहे. तेच युगानुयुगाचे नाते आपण जलयात्रेतून बळकट करीत आहोत.

गोदावरी आणि नर्मदा यांना जोडणारा एक महत्त्वाचा दुवा महाराष्ट्राचा, अहिल्यानगर जिल्ह्याचा आहे. तो म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर! ‘धर्म आणि राजकारणाची गल्लत करू नका,’ असे सरधोपट विधान करणार्‍यांनी अहिल्यादेवींच्या कार्यकर्तृत्वाकडे डोळे उघडून पाहिले पाहिजे. प्रजाहितदक्ष कारभार करताना अहिल्यादेवींनी धर्मरक्षणासाठी केलेले काम अतुलनीय आहे. माळवा प्रांताबरोबरच संपूर्ण भारतातील भाविकांच्या सोयीसाठी त्यांनी विविध नद्यांच्या काठी भक्कम घाट बांधले. गोदा-नर्मदा जलयात्रेतून आपण मनापासून त्यांचे ऋण मान्य करीत अभिवादन केले.

राज्यकारभार करताना लोकहिताला सर्वतोपरी महत्त्व देणार्‍या पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी प्रशासनात स्वत:चा ठसा उमटविला. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी जलसंपदेचे महत्त्व ओळखले होते. ‘उदक पाहून गड बांधावा,’ अशी त्यांनी सूचना केलेली आढळते. त्यांच्याप्रमाणेच राजमाता अहिल्यादेवींनी जलव्यवस्थापन आणि पर्यावरणाचे संवर्धन यांसाठी केलेले काम अतिशय मोलाचे आहे. भाविकांची तहान भागविण्यासाठी त्यांनी ठिकठिकाणी तलाव, आड, बारव, कुंड बनवून घेतले. टंचाई जाणवणार्‍या प्रदेशात त्यांनी पाण्याचे विश्वासार्ह स्रोत उपलब्ध करवून दिले. शेतकर्‍यांना हमखास उत्पन्न मिळावे म्हणून त्यांनी सिंचनाची उत्तम व्यवस्था केली होती. पर्यावरणाच्या रक्षणाबाबतही त्या तेवढ्याच जागरूक होत्या. पाणी साठवायचे, वाढवायचे असेल तर त्यासाठी झाडे मोठ्या प्रमाणात हवीत, हे त्या जाणून होत्या.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांची जन्मत्रिशताब्दी, त्यांचे जन्मगाव असलेल्या जिल्ह्यातून वाहणारी गोदावरी आणि त्यांनी आदर्श राज्यकारभाराचा आदर्श जेथून जगासमोर ठेवला तेथील नर्मदा नदी… असा त्रिवेणी संगम जलयात्रेने साधला आहे. पाच दिवसांच्या यात्रेचा प्रारंभ गोदावरीचे उगमस्थान श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर व अहिल्यादेवींचे जन्मगाव श्री क्षेत्र चौंडी (ता. जामखेड) येथून एकाच वेळी झाला. त्र्यंबकेश्वर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते यात्रेचा आरंभ झाला. गोदामातेचे व १०८ कन्यांचे पूजन करण्यात आले. चौंडी येथे विधान परिषदेचे सभापती राम शिंदे व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते यात्रा सुरू झाली. या दोन्ही यात्रा शिर्डी येथे एकत्र येऊन तेथून पुढे श्री क्षेत्र महेश्वरकडे त्यांचा एकत्रित प्रवास झाला. यात्रेत तरुणांसह सुमारे ५०० जलयात्री सहभागी झाले होते. महत्त्वाचे म्हणजे राज्यातील ३० नदी खोर्‍यांमधील पाणी कलशांतून या यात्रेत आणले होते. त्या माध्यमातून जलंसवर्धनाबाबत ठिकठिकाणी होणारी जनजागृती आणि त्यातील लोकसहभाग ही जलसंपदा विभागासाठी मोठी जमेची बाब आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली व त्यांच्याच प्रेरणेतून पार पडलेली ही जलयात्रा महाराष्ट्रासाठी महत्त्वाची ठरली. सर्वसामान्य माणसांच्या हितासाठी ती पूरक ठरली, असा विश्वास मला वाटतो.