scorecardresearch

लाल किल्ला : थंड डोक्याचा निष्ठुर खेळ

लोकांची मने वळवण्यासाठी ‘ईडी’चा वापर केला गेला हे खरे; पण सत्तांतरासाठी इतकेच पुरेसे नसते.

maharashtra political crisis bjp target shiv sena in Maharashtra
लाल किल्ला : थंड डोक्याचा निष्ठुर खेळ

महेश सरलष्कर

भाजपने देशातील राजकारण बदलून टाकले असल्याने टिकून राहायचे असेल तर, त्याला प्रत्युत्तर देत भाजपइतकीच दीर्घकालीन आखणी करून मात करावी लागेल. हा धडा शिवसेनेनेच नव्हे, काँग्रेसनेही शिकायला हवा.

डीच वर्षांपूर्वी २०१९ च्या लोकसभा निवडणुका होण्याआधी विद्यमान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा प्रचाराच्या भाषणात सातत्याने सांगत असत, ‘‘ही निवडणूक भाजपने जिंकली तर, पुढील पन्नास वर्षे भाजप देशावर राज्य करेल.’’ त्याहीआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसमुक्त भारताची ‘घोषणा’ केली होती. आठ-दहा दिवसांपूर्वी शहा म्हणाले, ‘‘आता आपल्याला ‘खरा’ इतिहास लिहिण्यापासून कोणी रोखू शकत नाही.’’ या सगळय़ा विधानांचा अर्थ काय होतो? संघ परिवारातील भाजपही आपल्या मूळ संघटनेप्रमाणे दीर्घकालीन आखणी करून धोरणांवर अंमल करतो. गुजरात दंगलीसंदर्भातील याचिका सर्वोच्च न्यायालयाने निकालात काढल्यानंतर दुसऱ्याच दिवशी, सामाजिक कार्यकर्त्यां तिस्ता सेटलवाड यांना गुजरात पोलिसांनी ताब्यात घेतले. गुजरात दंगलीतील पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी सेटलवाड वीस वर्षे लढत आहेत. आता त्यांच्या विरोधात हळूहळू चौकशीचे फास आवळले जात आहेत. कुठलीही घटना वा तिचे परिणाम अचानक होत नाहीत. त्यामागे अत्यंत शांतपणे, बराच काळ विचार करून पावले उचललेली असतात. महाराष्ट्रात गेल्या मंगळवारपासून होत असलेल्या सत्तांतराच्या नाटय़ामागे भाजपने ताकद उभी केली आहे, हे मोठे गुपित नव्हे. महाराष्ट्रातील सत्ता पुन्हा मिळवण्याच्या ‘ध्येया’ने गेली अडीच वर्षे तयारी होत असेल तर, शिवसेनेतील बंडखोरी कोणी तरी कोणावर रुसून बसले म्हणून झालेली नाही. वाजपेयी- अडवाणी- राजनाथ- गडकरी यांचा भाजप आणि आठ वर्षांतील मोदी-शहांचा भाजप, या दोहोंतील कार्यपद्धतीमध्ये आमूलाग्र बदल झालेला आहे. एके काळी वाजपेयींनी केंद्रात आघाडीचे सरकार समन्वयाने चालवले होते, ही बाब आता भाजपच्या नेत्यांना स्वप्नवत वाटेल. (आत्ताही राष्ट्रीय लोकशाही आघाडी आहे, पण त्यात दखलपात्र फक्त दोन पक्ष आहेत.) महाराष्ट्रातील घडामोडींसंदर्भात भाजपमध्ये सुई पडली तरी आवाज येईल इतकी नीरव शांतता आहे. दिल्लीत असलेले मराठी भाजप नेते चिडीचूप आहेत! इतक्या कडेकोट बंदोबस्तात सत्तांतराचे नाटय़ घडवले जात असेल तर त्याची आखणी कधीपासून आणि कशी केली जात होती, याची कल्पना येऊ शकेल.

नक्की वाचा >> Maharashtra Political Crisis: एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंना दोन वेळा फोन; ‘या’ विषयांवर झाली चर्चा

मध्यमवर्ग नोकरदार वर्ग राजकारणात सहसा उतरत नाही, ‘दबंग’ होण्याची ताकद असते, इच्छा असते असेच लोक राजकारणात येतात, त्यांचे आर्थिक व्यवहार कधी कधी शंकास्पद असतात. मग, त्यांना ‘आपलेसे’ करण्यासाठी सक्तवसुली संचालनालयची (ईडी) मदत घेतली जाते. महाराष्ट्रात भाजपने अनेकांविरोधात ‘ईडी’चा ससेमिरा लावला आहे. राजकीय स्तरावर किरीट सोमय्यांसारखे नेते दररोज कुठल्या ना कुठल्या केंद्रीय तपास यंत्रणांकडे धाव घेऊन भाजपसाठी न्याय मागत आहेत. पण, ‘ईडी’ सगळय़ांच्या सवयीची झाली आहे. लोकांची मने वळवण्यासाठी ‘ईडी’चा वापर केला गेला हे खरे; पण सत्तांतरासाठी इतकेच पुरेसे नसते.

बुद्धिबळाच्याही पुढले..

नाहीतर, महाराष्ट्रात कधीच सत्तांतर झाले असते. कर्नाटक, मध्य प्रदेश व राजस्थानमध्येही निव्वळ ‘ईडी’ची चौकशी सुरू करून सत्तांतर घडवण्याचा प्रयत्न झालेला नाही. अन्यथा, अशोक गेहलोत यांनी वर्षभरापूर्वीच राजस्थान गमावले असते. भाजपने ‘ईडी’चा वापर फक्त आमदारांच्या मानसिक खच्चीकरणासाठी केला. त्यातून सत्तांतर होणार नाही, हे भाजपलाही माहीत होते. मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य शिंदे, राजस्थानमध्ये सचिन पायलट, महाराष्ट्रात एकनाथ शिंदे ही काँग्रेस आणि शिवसेनेतील असंतुष्ट ‘प्यादी’ अचूक टिपली गेली, त्यांना आपला गट घेऊन येण्याची अट घातली गेली. ज्योतिरादित्यांनी ती अट पूर्ण केली, एकनाथ शिंदे त्या मार्गावर आहेत, पायलटांना ते जमले नाही. पूर्वी शिवसेनेतून छगन भुजबळ वा नारायण राणे बाहेर पडले, ते थेट राष्ट्रवादी काँग्रेस वा काँग्रेसमध्ये गेले. तेव्हा राजकीय पक्षांतील फुटाफुटीचे गणित इतके सोपे होते. या दोन्ही पक्षांनी शिवसेनेला संपवण्याचा डाव टाकला नव्हता. भाजपला शिवसेना हा पक्ष महाराष्ट्रातून संपवून टाकायचा आहे, असे वाटावे इतक्या थंडपणे गुवाहाटी आणि अर्थातच दिल्लीतून शिवसेनेत उभी फूट पाडण्याचा घाट घातला जात असल्याचे दिसते. भाजप राजकीय समीकरण सोडवण्यासाठी ‘कॅलक्युलेटर’ नव्हे तर, ‘कॅल्क्युलस’ वापरतो, हे विरोधकांना आत्ता कुठे लक्षात येऊ लागले आहे. अत्यंत गुंतागुंतीचे गणिती प्रश्न सोडवण्यासाठी ‘कॅल्क्युलस’चा वापर होतो. पूर्वी प्रणव मुखर्जी, अहमद पटेल असे मुरलेले काँग्रेसी बुद्धिबळाचा डाव खेळायचे असे म्हणतात. आता हा खेळ बुद्धिबळाचाही राहिलेला नाही. राजाला निव्वळ शह दिला जात नाही, राजाचे अस्तित्वच मिटवून टाकले जाऊ शकते!

हे ही वाचा >> Maharashtra Political Crisis: खरी शिवसेना कोणाची? उद्धव ठाकरेंची की तुमची?; एकनाथ शिंदे यांनी दिलं उत्तर; म्हणाले…

भाजपविरोधात अश्रू ढाळून, बंडखोरांना भावनिक आवाहन करून डाव उलटण्याचे दिवस केव्हाच संपले. रस्त्यावर उतरून ज्या राजाने ‘लगाम’ हाती घेतले, त्याने भाजपवर मात केली असा राजस्थानातील ताजा इतिहास आहे. सचिन पायलट आपल्या सहकाऱ्यांसह हरियाणाच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये होते, भाजपने ‘मोहीम कमळ’ पूर्ण करण्याची जबाबदारी केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्याकडे दिली होती. त्यांनी कामगिरी फत्ते केली असती तर कदाचित ते राजस्थानचे मुख्यमंत्री असते. पण मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी पायलट गटात येणाऱ्या ‘बंडखोर’ आमदारांना राजस्थानबाहेर जाऊच दिले नाही. (अर्थात गेहलोत यांना रसद मिळाली ती भाजपमधूनच- त्यांना वसुंधरा राजेंनी मदत केली-  असे म्हटले जाते). गेहलोत यांनी पायलट गटाकडे पुरेसे संख्याबळ होणार नाही याची दक्षता घेतली. महाराष्ट्रातून पर्यटनाला गेल्यासारखे टप्प्याटप्प्याने शिवसेनेचे बंडखोर दोन हजार किमीवर असलेल्या गुवाहाटीत जाऊन पोहोचले. पण राजस्थानमध्ये अशोक गेहलोत यांनी ‘बसप’च्या आमदारांना फोडून काँग्रेसमध्ये आणले. विधानसभेत बहुमत सिद्ध केले, सचिन पायलट यांच्या हाती अजूनही काहीही लागलेले नाही.

महाराष्ट्रातील बंडाच्या पार्श्वभूमीवर, ‘पायलटांनी संधी थोडक्यात गमावली’, असे विधान केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी केले आहे. त्यावरून गेहलोत यांनी उणीदुणी काढली आणि ‘पायलट भाजपच्या संपर्कात होते हे सिद्ध होते’, अशी प्रतिक्रिया दिली. त्यामुळे पायलटांची आणखी कोंडी झाली आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपचा अतिरिक्त उमेदवार सुभाषचंद्र गोयल यांना आल्या पावली परतावे लागले; इतकेच नव्हे तर भाजपच्या आमदारांनाही गेहलोत यांनी फोडले. महाराष्ट्रात फक्त हाराकिरी झाली! त्याचीच पुनरावृत्ती कर्नाटकमध्ये झाली, कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखालील जनता दल (धर्मनिरपेक्ष) च्या दोन आमदारांनी राज्यसभा निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपला मतदान केले. कर्नाटकमध्ये कुमारस्वामींना सत्ता टिकवता आली नाही कारण, त्यांनी पक्षाला सांभाळले नाही. सत्तेतील भागीदार पक्ष काँग्रेसशी मतभेद तीव्र होत गेले. मग भाजपने सत्ता हिसकावून घेतली. मध्य प्रदेशमध्येही काँग्रेसमधील कमलनाथ, दिग्विजय सिंह आणि ज्योतिरादित्य शिंदे यांच्यातील नेतृत्वाच्या मुद्दय़ावरून झालेल्या संघर्षांत भाजपचे शिवराजसिंह चौहान पुन्हा मुख्यमंत्री बनले. केंद्रीय नेतृत्वाची पकड नसलेला पक्ष फोडून भाजपने राज्यांमधील सत्ता ताब्यात घेतली.

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या एका निष्ठावान नेत्याला प्रश्न विचारला गेला होता की, शरद पवार, अजित पवार यांचा दिवस पहाटे सुरू होतो, हे नेते सकाळी ७ वाजल्यापासून लोकांच्या गाठीभेटी घेतात. त्यांची प्रशासनावर पकड आहे, मग राहुल गांधी इतकी मेहनत का घेत नाहीत? त्यावर, या नेत्याचे म्हणणे होते, राहुल गांधींचे शिवसेनाप्रमुखांसारखे आहे. एकदा ठरवले की, मग ते कामाला लागतात.. पण, राजकारणात टिकण्यासाठी मेहनत करणाऱ्या कोणत्याही राजकीय नेतृत्वाने आपली पक्षावरील पकड कधीही ढिली होऊ दिली नाही, हे अनेक उदाहरणांमधून दिसते. राहुल गांधींची पक्षावर पकड नव्हती. अनेक नेते गेले, त्यांनी अडवले नाही. महाराष्ट्रातही नेते गुवाहाटीत गेले, त्यांना शिवसेना नेतृत्वाने अडवले नाही. पक्षात बंडखोरी होणार हे कळल्यानंतरही नेतृत्व गाफील राहिले. राजस्थानात बंडखोरीची कुणकुण लागताच थेट सचिन पायलट यांच्याविरोधात चौकशी सुरू झाली होती.

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसने विधानसभेत भाजपवर मात केल्यानंतर, सातत्याने तिथे भाजप आक्रमक होत आहे. महाराष्ट्राप्रमाणे तिथले राज्यपालही मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना सहकार्य करत नाहीत. ममतांचे सरकार कमकुवत करण्याचा सातत्याने प्रयत्न भाजप करत असला तरी, ममतांनी तृणमूल काँग्रेसवरची, प्रशासनावरची पकड थोडीदेखील सैल होऊ दिलेली नाही. उलट, दिल्लीत येऊन त्यांनी विरोधकांची बैठक घेतली. मोदींना थेट आव्हान देणाऱ्या विरोधी नेत्यांमध्ये ममता अग्रभागी आहेत. ममतांनी फक्त भावनिक खेळ केला नाही, तर त्या न थकता रस्त्यावर उतरून भाजपविरोधात संघर्ष करताना दिसतात. ओदिशामध्ये बिजू जनता दलाचे प्रमुख नवीन पटनायक २२ वर्षे मुख्यमंत्री आहेत, केंद्रात त्यांनी भाजपला विरोध केला नाही, पण राज्यात ते भाजपला कडाडून विरोध करतात. त्यांच्या या राजकारणामुळेच भाजपचे पक्षविस्ताराचे तेथील मनसुबे अजूनही पूर्ण झालेले नाहीत. पक्ष हाताबाहेर जात असल्याचे दिसताच, त्यांनी नेत्यांच्या ‘मुसक्या’ आवळल्या. म्हणजे, दोन वेळा पूर्ण मंत्रिमंडळ बदलून टाकले. ममता, गेहलोत, पटनायक यांनी करून दाखवले ते महाराष्ट्रातील नेतृत्वाला का जमले नाही?

भाजपने देशातील राजकारण बदलून टाकले आहे, त्याला प्रत्युत्तर देऊन टिकून राहायचे असेल तर भाजपइतकीच थंड डोक्याने दीर्घकालीन आखणी करून मात करावी लागेल. हा धडा शिवसेनेनेच नव्हे, काँग्रेसनेही शिकायला हवा. नुसत्या मोदीविरोधी घोषणाबाजीतून हाती काही लागण्याची शक्यता नाही.

mahesh.sarlashkar@expressindia.com

मराठीतील सर्व विशेष लेख ( Features ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Maharashtra political crisis bjp target shiv sena in maharastra zws

ताज्या बातम्या