प्राजक्ता वाढोणकर
‘नितेश राणे यांना एक महिन्याच्या कारावासाची शिक्षा’, ‘कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्याविरुद्ध मरणाणोत्तर गुन्हा दाखल करा’, ‘जागेच्या वादावरून मंत्री सरनाईकांविरोधात आंदोलन’ या बातम्या वाचल्या. या व्यतिरिक्त राज्यात सध्या इतरही कार्यक्रम जोमात सुरू आहेत. महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांविरोधात रोज उठून कुणीतरी अमराठी अक्षरश गरळ ओकतो आहे. राजकीय पातळीवर तथाकथित पुढारपण करणाऱ्यांची रोजची नवनवीन विधाने तर अशी असतात की यच्चयावत स्टॅण्डअप कॉमेडियन्सनी तहहयात निवृत्ती घेऊन घरी बसावे आणि या राजकारण्यांना जनतेचे फुकट मनोरंजन करण्याचा धंदा करू द्यावा.

इतिहासात अकबराच्या दरबारातील नवरत्ने त्यांच्या कलेसाठी ओळखली जायची तर महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकारणातील काही नररत्ने आपल्या ‘अतरंगी’ कृतींनी ओळखली जातात. त्यांचे अजब कारनामे खालीलप्रमाणे आहेत.

१. ‘चिखलरत्न’ नितेश राणे (भाजप)

राणे साहेब चिखलाच्या ‘प्रयोगा’साठी प्रसिद्ध आहेत. ४ जुलै २०१९ रोजी मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाची पाहणी करायला गेलेल्या या कणकवलीच्या आमदारांचे संबंधित इंजिनीअरला चिखलाने अंघोळ घालण्याचे कृत्य ऐतिहासिक ठरले असून, त्यासाठी नुकतीच त्यांना एक महिन्याची शिक्षाही झाली आहे. कामाच्या दर्जाबाबत विचारणा केल्यानंतर संबंधित अभियंत्यावर चिखल ओतणे, त्याला चिखलातून फरफटत नेणे असे आरोप त्यांच्यावर होते.

२. ‘शब्दरत्न’ संजय गायकवाड (शिवसेना – शिंदे गट)

अकबराच्या दरबारात शब्दांचा सन्मान व्हायचा, पण हे गायकवाड साहेब शब्दांची ‘होळी’ करतात. राहुल गांधींची जीभ कापणाऱ्याला ११ लाखांचे बक्षीस जाहीर करणे असो किंवा ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकाच्या प्रकाशकाला शिवीगाळ करणे, असो त्यांचे ‘वाक्पटुत्व’ एव्हाना जगजाहीर झाले आहे. तमाम मराठी मंडळींचे श्रद्धास्थान असलेल्या शिवाजी महाराजांना मराठी माणसांनी काय संबोधायचे, हे मीच ठरवणार असा त्यांचा अजब दावा आहे. त्यांचे शब्द म्हणजे इतिहासावरची टिप्पणी नाही, तर वादाची नवी ‘ठिणगी’ ठरतात!

३. ‘पत्ते-रत्न’ माणिकराव कोकाटे (राष्ट्रवादी – अजित पवार गट)

राजा मानसिंग रणांगणावर डावपेच खेळायचे, पण कोकाटे साहेबांनी विधानसभा सभागृहात मोबाईलवर ‘रमी’चे डावपेच खेळून आपली वेगळी ओळख निर्माण केली. तेव्हा ते क्रीडामंत्री असल्याने आपण कोणता तरी खेळ खेळतो, असे त्यांना वाटत असणार. पण तो खेळ न ठरता, ‘गेम’ ठरला. सध्या ते आपल्या जुन्या ‘प्रकरणां’मुळे मंत्रिमंडळाबाहेर राहून ‘विश्रांती’ घेत आहेत.

४. ‘बंदूक-रत्न’ गिरीश महाजन (भाजप)

अकबराचे मंत्री युद्धकला शिकवायचे. महाजन साहेब शाळेच्या कार्यक्रमात चक्क कमरेला पिस्तूल लावून गेले होते. विशेष म्हणजे तेव्हा त्यांच्यासमोर मूकबधीर विद्यार्थी होते. आपल्या या कृतीने आपण विद्यार्थ्यांसमोर कोणता आदर्श ठेवतो आहोत, असा साधा विचारही त्यांच्या ‘निष्पाप’ मनाला शिवला नाही. बिबट्याला मारण्यासाठी हातात बंदूक घेऊन फिरणारे त्यांचे फोटो हे त्यांच्या ‘शौर्या’चे आधुनिक दर्शन आहे. पूरग्रस्तांची पाहणी करायला गेल्यावर त्या होडीत बसून सेल्फी काढण्याचे त्यांचे ‘उद्योग’ही चांगलेच गाजले होते. ‘आक्रोश मोर्चा’च्या निमित्ताने त्यांनी ओढवून घेतलेल्या ‘राड्या’चा व्हिडिओही चांगलाच गाजला.

५. ‘खेकडा-रत्न’ तानाजी सावंत (शिवसेना – शिंदे गट)

मियाँ तानसेन पावसासाठी राग गायचे, सावंत साहेबांनी मात्र पावसाचे पाणी धरण फोडण्यासाठी ‘खेकड्यां’चा राग आळवला. ‘धरण खेकड्यांनी फोडले’ हे त्यांचे जागतिक दर्जाचे संशोधन विज्ञानालाही कोड्यात टाकणारे आहे.

६. ‘गावरान-रत्न’ अब्दुल सत्तार (शिवसेना – शिंदे गट)

शब्दांची धार आणि भाषेचा ‘कौशल्यपूर्ण’ वापर यात सत्तारांचा हात कोणी धरू शकणार नाही. महिला नेत्यांविरुद्ध केलेली विधाने आणि अधिकाऱ्यांना दिलेले ‘फटकारे’ हे त्यांच्या दरबारी संस्कृतीचे खास पैलू आहेत.

७. ‘मराठी-रत्न’ प्रताप सरनाईक (शिवसेना – शिंदे गट)

बिरबलाच्या युक्त्या प्रसिद्ध होत्या, सरनाईक साहेबांची रिक्षाचालकांसाठीची ‘मराठी सक्ती’ची युक्तीही तशीच प्रसिद्ध झाली. सध्या ते ई़डीच्या फेऱ्यातून ‘क्लीन चिट’ मिळवून राजकारणात पुन्हा सक्रिय झाले आहेत.

८. ‘हिशोब-रत्न’ बाबनराव लोणीकर (भाजप)

जनतेला आपल्या उपकारांची जाणीव करून देण्यात लोणीकर साहेब माहीर आहेत. ‘तुम्ही जे मोबाईल वापरता, ते आमच्या सरकारने दिलेत,’ असे सांगून त्यांनी जनतेला तिच्या ‘कर्तव्या’ची आठवण करून दिली. त्यांच्या मते जनता ही केवळ लाभार्थी नसून, ती ऋणी आहे!

९. ‘चमक-रत्न’ छगन भुजबळ (राष्ट्रवादी – अजित पवार गट)

कलेचे भोक्ते असलेल्या भुजबळांची शैलीच निराळी. जेल वारी करून आल्यावरही त्यांच्या भाषेतील दरारा तसाच आहे. ‘कॅबिनेटमध्ये काय चालतं ते आम्हालाही कळत नाही,’ असे म्हणून त्यांनी मंत्रिमंडळातील ‘पारदर्शकते’वर जो प्रकाश टाकला, ते केवळ एक निष्णात ‘रत्न’च करू शकतो.

prajakta.wadhonkar@gmail.com