विक्रम अवसरीकर
भारताच्या इतिहासाबद्दल जे जे बोलले जाते, लिहिले जाते, ज्या कहाण्या सांगितल्या जातात, ज्या परंपरांचा दाखल दिला जातो, गोडवे गायले जातात त्या सगळ्या गोष्टी सांस्कृतिक स्वरूपाच्या असतात. कोणत्याही राजाबद्दल बोलले जाते ते त्यांनी केलेल्या महान कार्याबद्दल. मग ते औंध सारखे छोटे संस्थान असो व बडोद्यासारखे मोठे जे बोलले जाते ते सांस्कृतिक गोष्टींबद्दल, समाज सुधारणेबद्दल. राजकीय बाबींबद्दल फार थोडे बोलले जाते. कारण भारत ही एक सांस्कृतिक घटना आहे, राजकीय साम्राज्य नाही.
भारताच्या आजवरच्या हजारो वर्षांच्या ज्ञात इतिहासामध्ये केवळ एकच एक केंद्रवर्ती सत्ता आहे असा कालखंड फार थोडा आहे. या मध्यवर्ती साम्राज्यामुळे भारतीयांची ओळख टिकली वाढली असे आपल्याला खचितच म्हणता येणार नाही. भारताची ओळख प्रामुख्याने जगभर प्रसार-प्रचार झालेल्या संस्कृतीमुळे वाढली. यात प्राचीन परंपरा, त्यांचा प्रसार, बुद्ध धर्माचा प्रसार इत्यादींचा समावेश होतो.
या परंपरांचा प्रसार होण्यामागे कोणत्याही भाषिक, स्थानिक सांस्कृतिक अडचणी आल्या नाहीत. सगळ्या प्रदेशांमध्ये एकच एक भाषा बोलली गेली पाहिजे असा अट्टहास नव्हता. त्यामुळेच असा फुलोरा फुललेला आज आपल्याला दिसतो. मात्र अलीकडे केवळ हिंदी भाषाच भारताची एकात्मकता राखू शकते असा खोटा प्रचार सातत्याने केला जाऊ लागला आहे. जनभावनेच्या रेट्यामुळे भाषिक आधारावर राज्यांची रचना केली गेली. भारताच्या मूळ प्रकृतीकडे दुर्लक्ष करून भाषा या विषयाला महत्व दिले गेले, पण भारताची मुळातील प्रकृती कोणती असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित होतो. जेव्हा केव्हा लोकसमुदाय इकडून तिकडे गेले तेव्हा त्यांनी आपल्या परंपरा आपल्याबरोबर तिकडे नेल्याच पण मूळच्या स्थानिक संस्कृतीचा स्वीकार करून जशी दुधात साखर विरघळावी, तसे ते विरघळून गेले.
गुजरात मधून महाराष्ट्रात स्थायिक झालेल्या महानुभाव पंथाच्या अनुयायांनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली. कित्येक मराठी लेखक कन्नड, हिंदी, बंगाली भाषेत लिहिते झाले. मूळच्या महाराष्ट्रतल्या पण तामिळनाडूमध्ये राज्य असलेल्या भोसले घराण्याच्या शाखेने तर तेथील जनतेची मने जिंकली आणि अनेक वर्षे राज्य केले. मध्य प्रांतात राज्य करणाऱ्या शिंदे, गायकवाड, होळकर घराण्यांनी जे काम केले ते प्रसिद्ध आहे. या साऱ्या घडामोडी घडत असताना भाषा हा विषय कधीही अडथळा म्हणून पुढे आल्याचे पुरावे नाहीत.
मात्र आज जणूकाही सर्व देशवासियांनी हिंदी भाषा स्वीकारली नाही, तर भारत एकत्र राहूच शकणार नाही, त्याची शकले होतील असा प्रचार केला जात आहे. हा प्रचार करणाऱ्या लोकांनाच भारत कळलेला नाही हेच यातून दिसून येते. कोणावरही त्याच्या भाषेमुळे किंवा कोणाच्याही भाषेवर अत्याचार होऊ नयेत, याची काळजी घेण्यात राज्यकर्ते कमी पडत आहेत. बेळगावातील मराठी बांधवांवर होणारे भाषिक अत्याचार हे त्याचे बोलके उदाहरण. तिथे विद्यार्थ्यांना स्वतःची मातृभाषा शिकणेही कठीण होऊ लागले आहे.
प्रगत राज्यांमध्ये मागास राज्यांतून नोकरी धंद्यासाठी आलेल्या लोकांचा द्वेष करण्याचे काही कारण नाही. संविधानाने प्रत्येकाला उदरनिर्वाहाचे साधन शोधण्याचा अधिकार दिला आहे आणि त्यासाठी देशाच्या कोणत्याही भागात जाण्यास मनाई केलेली नाही. परंतु पूर्वापार जे चालत आले आहे त्यापद्धतीप्रमाणे बाहेरून आलेली ही नोकरदार माणसे इथल्या संस्कृतीशी एकरूप होत नाहीत हा खरा कळीचा मुद्दा आहे.
वेगवेगळ्या समूहाचे लोक आपापल्या तटबंदीच्या आड जगतात त्यांचा काडीमात्र संबंद्ध स्थानिक संस्कृतीशी येत नाही किंबहुना, ते असा संबंध येऊ देण्याच उत्सुक नसतात. हेच आजचे आणि कालचेही वास्तव आहे. स्थानिक लोकही अशांना समजला खतपाणी घालून व्यवहार करण्यासाठी आपल्या भाषेचा वापर न करता बाहेरून आलेल्या लोकांच्या भाषेचा वापर करतात. स्थानिक संस्कृतीचा अस्सल अनुभव परप्रांतियांना देण्यासाठी आग्रही असणे ही काही देशविरोधी कृती नाही, उलट हे तर हजारो वर्ष चालत आलेल्या भारतीय संस्कृतीचे पालन आहे.
आजकाल युद्धांनी ग्रासलेल्या जगात भूराजकीय ज्ञान असणे प्रत्येक देशाला महत्त्वाचे वाटू लागले आहे. असेच भान प्रत्येक राज्यानेही बाळगणे गरजेचे आहे. याचा अर्थ अन्य राज्यांना वा राज्यांतील रहिवाशांना शत्रूत्वाच्या दृष्टीने पाहावे असा नाही. मात्र अन्य प्रातांतून आलेल्यांकडून मराठी संस्कृतीवर होणारी राजकीय आक्रमणे आता भारतीय संस्कृतीच्या नावाखाली चालवून घेतली जाऊ नयेत. देशभक्ती, एकात्मतेच्या नावाखाली आपले लोक कंबरेचे सोडून डोक्याला बांधण्यास तयार असतात. हा चुकीचा दृष्टिकोन आहे. मराठीचा प्रसार, प्रचार करणे म्हणजे भारतीय संस्कृतीचाच प्रसार करणे आहे, मराठी भाषा ही भारतीय राष्ट्रभाषा आहे, याचा विसर पडणे स्वीकारार्ह नाही.
vikram.awasarikar@gmail.com
