प्रा. योगेश हांडगे
महाराष्ट्राची ओळख काय, असा प्रश्न कुणालाही विचारला तर अनेक गोष्टी सांगितल्या जातील- संतांची परंपरा, विचारवंतांचा वारसा, सह्याद्रीची कणखरता, सामाजिक चळवळींचा इतिहास आणि अर्थातच मराठी भाषा. ही भाषा केवळ संवादाचे माध्यम नाही; ती महाराष्ट्राच्या संस्कृतीचा श्वास आहे. पण आज त्याच मराठी भाषेबाबत एक अस्वस्थ करणारी बातमी समोर येते- दहावीच्या परीक्षेत तब्बल ९४ हजार विद्यार्थी मराठी विषयात नापास झाले. हा आकडा केवळ शैक्षणिक अपयश दाखवत नाही; तो एका समाजाची भाषिक आणि सांस्कृतिक दिशाभूल होत असल्याचा गंभीर इशारा देतो.
हा विषय केवळ ‘मराठी विषयात कमी गुण’ इतकाच मर्यादित नाही. प्रश्न आहे, मराठी मुलांना स्वतःची भाषा समजत का नाही? त्यांना ती कठीण का वाटते? आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, आपण नकळत आपल्या भाषेपासून इतके दूर कसे गेलो? काही दशकांपूर्वी मराठी ही घराघरातील भाषा होती. आज परिस्थिती बदलत चालली आहे. शहरांमध्ये अनेक कुटुंबांत मुलांशी इंग्रजी किंवा हिंदीत संवाद साधला जातो. ‘माझं मूल इंग्रजीत बोलतं’ हा अनेक पालकांसाठी अभिमानाचा मुद्दा झाला आहे. पण त्याच वेळी ‘माझं मूल नीट मराठी वाचू शकत नाही’ ही वस्तुस्थिती त्यांना अस्वस्थ करत नाही. हीच खरी शोकांतिका आहे.
इंग्रजी शिकणे चुकीचे नाही. जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी ते आवश्यकही आहे. मात्र, स्वतःची मातृभाषा हरवून दुसरी भाषा शिकणे ही प्रगती नसते; ती सांस्कृतिक तुटकता असते. मातृभाषा ही मुलांच्या विचारशक्तीची पहिली पायरी असते. ज्या भाषेत मूल स्वप्न पाहते, भावना व्यक्त करते, त्या भाषेतच त्याची बौद्धिक जडणघडण मजबूत होते. पण आपणच मराठीला दुय्यम स्थान देऊ लागलो आहोत.
शिक्षण व्यवस्थेचाही या परिस्थितीत मोठा वाटा आहे. अनेक शाळांमध्ये मराठी विषय केवळ ‘पास व्हायचा विषय’ म्हणून शिकवला जातो. भाषेची गोडी निर्माण करण्याऐवजी पाठांतरावर भर दिला जातो. कविता समजून घेण्यापेक्षा प्रश्नोत्तरे लक्षात ठेवणे महत्त्वाचे मानले जाते. परिणामी विद्यार्थ्यांच्या मनात मराठीविषयी आत्मीयता निर्माण होत नाही. आजची मुले मोबाइल, समाजमाध्यमे आणि डिजिटल जगात वाढत आहेत. त्यांच्या भाषेत इंग्रजी शब्दांची सरमिसळ वाढली आहे. मराठी पुस्तके वाचण्याची सवय कमी होत चालली आहे. घरात टीव्हीवरील मालिका हिंदीत, मोबाइलवरील व्हिडीओ इंग्रजीत आणि मित्रांशी संवाद मिश्र भाषेत- अशा वातावरणात शुद्ध मराठीशी त्यांचा संपर्कच कमी होतो. मग परीक्षेतले व्याकरण, निबंध किंवा आकलन कठीण वाटणे स्वाभाविकच आहे.
परंतु यासाठी केवळ विद्यार्थ्यांना दोष देता येणार नाही. समाज म्हणून आपणच मराठीपासून दूर जात आहोत. मोठमोठ्या दुकानांच्या पाट्या इंग्रजीत आहेत, कार्यालयांमध्ये मराठी वापर कमी झाला आहे, अनेक पालक मुलांना मराठी शाळेत घालणे कमीपणाचे समजू लागले आहेत. भाषा जपण्याची जबाबदारी फक्त शासनाची नसते; ती प्रत्येक घराची असते.
मराठीतील अपयशाचा हा आकडा आणखी एका वेदनादायक वास्तवाकडे लक्ष वेधतो- विद्यार्थ्यांच्या वाचन संस्कृतीचा ऱ्हास. पूर्वी घरात पुस्तकांचे कपाट असायचे. कथा, कादंबऱ्या, कविता मुलांच्या हातात असायच्या. आज मोबाइलच्या स्क्रीनने पुस्तकांची जागा घेतली आहे. वेगवान, छोट्या स्वरूपातील माहितीच्या सवयीमुळे दीर्घ वाचनाची क्षमता कमी होत आहे. परिणामी भाषेवरची पकड कमकुवत होत चालली आहे.
या परिस्थितीत उपाय काय? सर्वप्रथम मराठीला ‘फक्त विषय’ म्हणून नव्हे तर ‘जगण्याची भाषा’ म्हणून पुन्हा स्वीकारावे लागेल. घरात मुलांशी मराठीत संवाद साधणे, त्यांना मराठी पुस्तकांची ओळख करून देणे, गोष्टी सांगणे, कविता ऐकवणे या छोट्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. शाळांनीही मराठी शिकवण्याची पद्धत बदलली पाहिजे. भाषा ही आनंदाने शिकण्याची गोष्ट आहे, भीतीने नव्हे.
तंत्रज्ञानालाही शत्रू मानण्याची गरज नाही. उलट मराठीतील दर्जेदार डिजिटल सामग्री, ऑडिओबुक, शैक्षणिक व्हिडिओ, आकर्षक ॲप्स यांचा वापर करून मराठी अधिक जवळ आणता येईल. तरुण पिढी जिथे आहे, तिथे मराठी पोहोचली पाहिजे.
आज ९४ हजार विद्यार्थी मराठीत नापास झाले, ही केवळ आकडेवारी नाही; ती महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आरशाला गेलेला मोठा तडा आहे. भाषा मरते तेव्हा फक्त शब्द हरवत नाहीत; इतिहास हरवतो, संवेदना हरवतात, ओळख हरवते. म्हणूनच हा प्रश्न केवळ शिक्षणाचा नाही, तर अस्मितेचा आहे. महाराष्ट्राने संत ज्ञानेश्वर, तुकाराम, पु. ल. देशपांडे, कुसुमाग्रज यांसारखे शब्दसम्राट दिले. त्या भूमीत आज मुलांना स्वतःच्या भाषेत अपयश येत असेल, तर तो विचार करण्याचा क्षण आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. मराठीला पुन्हा घराघरांत, मनामनांत आणि शिक्षणाच्या केंद्रस्थानी आणावे लागेल. कारण भाषा वाचली तरच संस्कृती वाचेल. आणि संस्कृती वाचली तरच महाराष्ट्र आपल्या मूळ ओळखींसह पुढे जाईल.
handgeyogesh@gmail.com
